माझ्या सेमी-इलिटरेट आजीच्या तोंडून माझ्या लहानपणी ऐकलेली ही एक व्यावहारिक शहाणपणा सांगणारी म्हण…
आशा सुटंना देव भेटंना!
लहानपणीच ऐकलेली एक गोष्ट…
भक्ताला पावलेला देव भक्ताच्या हातात एक डबा देऊन म्हणाला,“थांब! लगेच उघडू नकोस! जेव्हा खरी गरज लागेल तेव्हाच हा डबा उघड!जा!”
भक्त निघाला.माणूसच तो! डबा उघडू नकोस असं बजावल्यामुळे डबा उघडण्याची उत्सुकता प्रचंड वाढली, ताणत गेली आणि शेवटी तुटली!त्यानं डबा उघडला आणि त्यातली एक एक वस्तू गुरूत्वाकर्षणाचा नियम भेदून भराभरा उडून जाऊ लागली!तो उड्या मारून त्या पकडायचा प्रयत्न करायला लागला.एकही वस्तू हाताला लागेना.डबा बंद करण्याचं ध्यानात आलं तेव्हा तो हादरला. घाईघाईत त्यानं डबा बंद केला आणि कपाळाला हात लाऊन रस्त्यातच मटकन खाली बसला…
भक्ताच्या संकटात लगेच धाऊन येणारा तो गोष्टीतला देव पुन्हा प्रकट झाला!
“बघ!तुला नको करूस म्हणून जे सांगितलं नेमकं तेच तू केलंस!”
माणूस म्हणाला,“मग काय करू?शेवटी मी एक माणूसच आहे!”
देव म्हणाला,“आता तो डबा उघड!”
माणूस तो डबा छातीशी आणखी कवटाळून म्हणाला, “नाही!अजिबात नाही!आता आतलं उरलंसुरलेलंही सगळं उडून जाईल!”
देव म्हणाला, “जे मी तुला करायला सांगतो त्याच्या विरूध्दच काहीतरी कर तू नेहमी!अरे माणसा,आता तो डबा खरंच उघड!त्यात एकच वस्तू शिल्लक राहिलीय आणि तू कितीही टाकून दिलीस तरी ती गोष्ट तुला सोडून जाणार नाही!!”
माणूस भांबावला!काय करावं कळेना!बळेबळेच त्याने डबा उघडला आणि देवाकडे पाहिलं.धावून आलेला तो देव आता अंतर्धान पावला होता.
आजतागायत माणसाला सोडून न गेलेली ती गोष्ट म्हणजे आशा!
मनाच्या कोपऱ्यात असलेला समाधानाचा देव सतत भेटत राहिला तरी ती सुटत नाही!
रॅटरेसमधे धावणाऱ्या आपली तर नाहीच नाही,आपल्या आशेचा होतो लोभ,मग होते लालसा. जगायचीच आशा नसणं,आयुष्यच नाकारणं हे मात्र भयंकर.
हेलन किलर,कार्व्हर,मदर थेरेसा,नसीमा हुरजूक यांसारख्यांनी या आशेच्या बळावर काय नाही उभं केलं?
त्या कोवळ्या वयात माऊलींना सुचलेली ती आशा,ते पसायदान,ते इतर कुणाला सुचलं असतं?
2 comments:
लेख आवडला .. अगदि मनातलं लिहल आहेत. तीन चार दिवसा पुर्वी असंच काहि माझ्या हि मनात आलं होत !!!
धन्यवाद.
अप्रतिम! गोष्ट खुपच छान आहे.
Post a Comment