romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, January 7, 2009

बाशिंगहुडक्यांच्या आग्रहावरून

त्याला जेव्हा बाशिंग बांधायचं ठरलं

तेव्हा तो एकसारखा आपला गुडघा लपवायला लागला

आणि त्याचवेळी

कुणी जबाबदारीतून मोकळं व्हायला बघत होतं

कुणी टवाळी करायला विषय मिळवत होतं

कुणी म्हणत होतं,बांधलं असतंस तेव्हा तर

गुढघ्याएवढी अंगणात खेळली असती इतक्यात

कुणी मायेनं, आस्थेनं विचारपूस करत होतं

तर कुणी न बोलता बाशिंग सजवण्याच्याच मार्गाला लागलं होतं

या सगळ्याचा परिणाम होऊनच की काय

त्याच्या गुढघ्याला रग लागली आणि

तो डोकं वर काढू लागला,-

ते कुणी अगदीच ऐकत नाहीत म्हणून आणि

हल्ली आतून अगदी घणाचेच घाव बसतात

वर काहीतरी बांधलं

तर ते थांबतील तरी म्हणून

छुप्या बाशिंगहुडक्यांना आता मोकळं रानच मिळालं

जोसात येऊन ते चौखूर उधळले

रानातली रानफळ चकचकीत होऊन बाजारात यायला लागली

त्याला गिर्हाईक बनवलं गेलं अक्षरश:

आणि बोली अडतेच बोलू लागले

अडत्याना थोपवता थोपवता

त्याच्या नाकी दम यायला लागला

करतो काय! नाक मुठीत धरून गेला बाजार

त्याला बाजाराचा दिवस तरी

साजरा करणं भागच होतं

त्याच्या उकीरडा फुंकण्याच्या सवयीचा

आणि त्याच्या बार्गेनिंग पॉवरचा

बाजारात आधीच अक्षरश: ढोल वाजला होता

त्यामुळे आंबा, सफरचंद, काजू वगैरे

त्या रानात उगवणं शक्यच नव्हतं

रान तसं त्याच्या परिचयाचं नव्हतं असं नाही

पण फळं हस्तगत करायची जाळीच त्याच्याकडे नव्हती

होते ते नुसतेच रेशमाचे धागे

आतल्या आतच तटातटा तुटणारे

जोडले तरी गाठींचं प्रदर्शन करणारे

काही फळं दुसऱ्यांच्याच जाळ्यात अडकलेली

आणि उरलेल्यांपैकी एकानं स्वत:हून झाड सोडून

आपल्या हातावर यावं असा याचा अव्यवहारी हट्ट

तेव्हा, हल्ली बाजारसुध्दा नेमानं भरत नाही

सगळं रान भोवती नुस्तं गरागरा फिरत राहतं

धागे रेशमी असूनही फळं त्यात येतच नाहीत

हा याचा हट्ट सोडत नाही

वरचं रिकामं होऊन ते

गुडघ्यात आहे की काय असं वाटायला लागतं

रिकाम्या वर घण ठणाणायला लागतात

आणि हे सगळं थांबवायला

चुकीचे उपचार तरी सुरू होतात किंवा

क्रिएशनच्या नावाखाली घड्याळाचे काटे

निरूद्देश पुढे सरकवणं तरी सुरू होतं

यातून सावरायला तो स्वत:च

मुकुट बनवण्याच्या तयारीला लागतो

भीड सोडून हजारो कारागीरांची मदत घ्यायची

त्याच्या कृपादृष्टीची सतत भीक मागायची

कपाळावरचा घाम गाळून झटकून

मुकुट ठेवायला जागा तयार करायची

आता फळं मुकुटाभोवती डोलायला लागतील

बाशिंग बांधणं मग अगदीच कठीण असणार नाही

शिवाय मुकुट आल्यावर त्याच्यावर

ते पक्कं बसेल, शोभून दिसेल

वाजणारे घण आतातरी थांबतील

निदान

मुकुटाचं जबरदस्त आवरण तरी तयार असेल…    

1 comment:

Abhi said...

व्वा !!! जबरदस्त!!!

जाम आवडले आपल्याला!!!

-अभी