“बाई म्हणून जगताना” हे मैत्रेय प्रकाशनाचं स्वयंविकास मालिकेतलं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे हे ते पुस्तक हातात घेतल्याघेतल्याच आपल्या लक्षात येतं.पुस्तकाच्या बाह्य स्वरूपाइतकंच त्याचं अंतरंगही प्रभावी असल्याचं ते चाळताना जाणवतं.लेखिका सीमा पाटील या विषयातल्या तज्ज्ञ तर आहेतच पण भरपूर माहिती अतिशय मुद्देसूदपणे आणि तीही लालित्यपूर्ण शब्दात मांडणं त्याना पूरेपूर जमतंय असं पुस्तक वाचत असताना सहज लक्षात येतं.यासाठी मैत्रेयचं मन:पूर्वक अभिनंदन!
स्त्रीचं भागधेय असं की अगदी गर्भावस्थेपासून ते वृध्दावस्थेपर्यंत तिच्यामागचं शुक्लकाष्टं संपता संपत नाही.तिच्या बाजूने मुळी विचारच होत नाही.ती प्रेमळ, ती समजूतदार, ती त्यागाची मूर्ती म्हणून तिला हरभरय़ाच्या झाडावर चढवायचं आणि ती दुय्यम तिय्यम स्थानावर राहिल याची काळजी घ्यायची.हे सगळं कधी संपणार? स्त्रीनं युगानुयुगं असंच खितपत रहायचं का? या प्रश्नांची निश्चित, सकारात्म आणि ठाम उत्तरं हे पुस्तक देतं आणि तिथेच या पुस्तकाचं वेगळेपण सिध्दं होतं!
या पुस्तकात काय नाही? मुलगी वयात येताना तिच्यात नेमकं काय होतं, त्यावेळी तिला कसं मार्गदर्शन करायचं, ती आई झाल्यावर तिचा आहार नेमका कसा असावा की ज्यामुळे ती निरोगी आणि सडसडितही राहिल.अतिरिक्त चरबी जर साठलीच तर तिनं काय करावं, या विषयीचा वजन-उंचीचा तक्ता काय आहे, अन्नं कसं आणि किती खावं, उपासमार करण्यापेक्षा व्यायाम आणि आहार यांची योग्य सांगड कशी घालावी हे मुद्देसूदपणे पण कुठेही क्लीष्टता न आणता इथे वाचता येतं.मेनोपॉज अर्थात मासिक पाळी समाप्ती, मधूमेह या स्त्रियांना ग्रासणारय़ा महत्वाच्या समस्यांसाठी स्वतंत्र प्रकरणं या पुस्तकात समर्पकपणे मांडलेली आहेत.स्त्रीची मानसिकता, ती टिकवण्यासाठी तिनं घ्यायची काळजी, सगळ्या जगाचं करून झाल्यावरही वृध्दावस्थेत दुर्लक्षित, एकाकी झाल्यावरचा तिचा आहार तक्ता तसंच पाकक्रिया देऊन लेखिका आणखी आणखी सकारात्म होत जाते.
हे पुस्तक वाचत जाताना आणखी एक मह्त्वाची गोष्टं लक्षात येते की हे फक्त स्त्रियांनी वाचण्याचं पुस्तक नाही तर समस्त पुरूषांनी वाचण्याचं पुस्तक आहे! यातली आहार, व्यायामाची प्रकरणे त्यांच्यासाठीही माहितीपूर्ण तर होतातच पण विशेषत: शेवटच्या “महिला दिन” या प्रकरणात लेखिका स्त्रीची सद्यस्थिती आणि त्यावर योजले जाणारे, योजले जावेत असे उपाय मांडते आणि आपल्यालाही पटतं की फक्तं ८ मार्च साजरा केला की आपलं कर्तव्य संपत नाही!
या ७१ पानांमधे जो एवढा सगळा महत्वाचा ऐवज फक्तं पन्नास रूपयात आपल्या हाती लागतो तो एकदा वाचून ठेवून देण्यासारखा अजिबात नाही तर त्याची पारायणं करण्यासारखा आणि तो आपल्या कृतीत आणण्यासाठी आहे हे भान कायम ठेवून या मस्तं पुस्तकाला सामोरे जाऊया!
2 comments:
interesting...lagech gheto ani vachato
Vinayakji,
Thanks for sharing this information. Will surely read this..
Post a Comment