मैत्रेय प्रकाशनानं या वर्षभरात स्वयंविकासाची जी पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यांत जाणवणारी ठळक गोष्टं म्हणजे या सगळ्या पुस्तकांतून मांडलेल्या प्रत्येक वेगवेगळ्या विषयाचा फोकस नक्की आहे, आपल्याला वाचकाला काय द्यायचं आहे हे नक्की केल्यावर ते मांड्ण्याची दिशा योग्य असावी लागते तशीही ती आहे.ही मांडणी वाचायला सोपी आहे आणि तरीही भरपूर आशय आणि एवढ्याश्या पुस्तकात तो आशयविषय साकल्यानं मांडणं हेही इथं झालेलं आहे.इथेच या पुस्तकांचं वेगळेपण ठसतं आणि मिळतं ते वाचकाला उत्तम ते दिल्याचं समाधान!
“सौंदर्योपासना, आरोग्य आणि सौंदर्य” या डॉ.सौ.विद्या जोशी लिखित पुस्तकाच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे माणसाचं प्रथमदर्शन त्याच्याबद्दलचा पहिला ठसा उमटवणारं असतं, हेही पुस्तक मैत्रेयच्या इतर सर्व पुस्तकाप्रमाणे तसा ठसा उमटवतं.सौंदर्य ही कल्पना आपल्याकडच्या या विषयाच्या अनेक पुस्तकांमधून आजतागायत बहुतेक वेळा बाह्योपचारांवरच भर देणारी राहिली आहे.प्रस्तुत पुस्तकाच्या नावापासूनच आरोग्य हे सौंदर्याच्या नाण्याची दुसरी बाजू आहे या विचारला हात घातला आहे.हा विचार सर्वात महत्वाचा आहे!मग या अनुषंगानं आपल्या सगळ्यांचाच वजन वाढणं किंवा वजन पुरेसं न वाढणं हा महत्वाचा विषय विस्तृतपणे मांडला आहे, इतका की या संदर्भात कुठलाही संदेह हे पुस्तक वाचलं तर वाचकाच्या मनात राहू नये!
डाएट हा आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यात रोज एकदा तरी येणारा शब्द! डाएट म्हणजे उपासमार का? नव्हे, डाएट म्हणजे चौरस आहार.सगळं काही खाणं पण एका मर्यादेतच! मग नुसतं डाएट केलं की झालं का? तर नाही, त्याबरोबर नियमित व्यायाम हवा आणि हे दोन्ही आयुष्यभर सांभाळण्यासाठी हवी इच्छाशक्ती! ही मानसिक ताकद मिळवायची ध्यानधारणेतून आणि योगासनांच्या नियमित सरावातून!
असं सगळं समजावत लेखिका या सगळ्याचं विस्तृत महत्वं आपल्या मनावर बिंबवत जाते.त्यासाठी पुस्तकात येतं समतोल वजनाचं गणिती सूत्र, नक्की काय खावं काय खाऊ नये याबद्दलचा सहज समजणारा, पटणारा उहापोह, वेगवेगळी योगासनं आणि त्यांच्या कृती, त्याही योग्यं त्या आकृतींसह म्हणजेच चित्रांसह!
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण कसं असावं आणि त्यात नियमितता, आपापल्या दिनक्रमाप्रमाणे कशी आणावी हे सोप्या शब्दात जर समजलं तर आणखी काय हवं? हवं ना! तरूणींना हव्या आहेत सौंदर्यस्पर्धांतून यशस्वी होण्यासाठी उपयुक्त टीप्स! या स्पर्धा म्हणजे नुसतं सुंदर दिसण्याच्या नसतात तर स्त्रीचं सर्वोतोपरिनं समृध्दं असणं जोखणारय़ा असतात.या विषयीची प्राथमिक माहिती आणि केस, त्वचा यांची काळजी घेण्यासाठीची मिश्रणं आणि लेप यांच्या कृती असं वाचता वाचता या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या नावाची छोटीशी यादी शेवटच्या पानावर दिसते आणि आपल्याला इतकं “सुंदर” पुस्तक इतक्या लवकर संपल्याची चुटपूट लागून रहाते.मग आपण पुन्हा मागची पानं आधाशीपणानं उलटू लागतो.आपल्या मनावर जे कोरलं गेलंय ते पुन्हा शोधू लागतो.हळूहळू हे पुस्तक आपण आणखी एकदा कधी वाचून काढलं हे आपलं आपल्यालाच समजत नाही!
तुम्हाला असं पुस्तक तुमच्याकडे असल्यावाचून रहावणार नाही असं माझं मत झालंय हे पुस्तक वाचून! तुम्हाला काय वाटतं?...
No comments:
Post a Comment