romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, August 23, 2010

“अनंत कोटीऽऽ ब्रह्मांऽऽडनायक…”

“आपल्या लोकांना तेहेतीस कोटी देव कमी पडायचं कारण काय मला सांग!” मनू तावातावानं मला विचारत होता भर श्रावण महिन्यात.
सुटीचा दिवस.दुपारी भरपेट जेऊन झाल्यावर पानाच्या गादीवर आम्ही भेटलो.माझे डोळे जड झालेले.केव्हा एकदा जाऊन झोपतोय असं मी मनात म्हणतोय आणि मनूचं नेहेमीप्रमाणे भलतंच काहीतरी!
आपल्याला काय करायचंय? आपण बरं आपलं आयुष्य बरं! रोजचा पोटापाण्याचा संघर्ष काय कमी आहे? मनू माझ्या शर्टाची बाही खेचत माझ्या झोपेचं खोबरं करणार या विचाराने माझा चेहेरा वेडावाकडा झाला.मनू म्हणाला, “च्यायला! नेहेमी काही तुला विचारावं तर तुझा चेहेरा आपला धर्मराजासारखा! नरो वा कुंजरो वा! साला सामाजिक जाणीव वगैरे तुला काही नाहीच! सांग ना! तेहेतीस कोटी द्येव-” मी लगेच म्हणालो, “जाऊ दे यार मनू.सुटीच्या दिवशी दुपारचं जागरण मला झेपत नाही मी-” मनूनं लगेच माझा हातच पकडला, “जातोस कुठे? चल! आज ’स्थानावर’ जायचं म्हणजे जायचंच! अरे घरोघरी गुरू तात्यांचे फोटो झळकताएत! जिकडे तिकडे श्री तात्या प्रसन्न! तेहेतीस कोटी अधिक एक! चल! चल!”
मी अगदीच काकुळतीला येतोय असं दिसल्यावर त्यानं झोपायला जायची मुभा दिली.संध्याकाळी मात्र वॉचमनसारखं येऊन त्यानं मला उठवलं.
सुटीचा दिवस.रिक्षा, लोकल सगळीकडे मरणाची गर्दी.एक दिवस लोकलचं थोबाड बघू नये तर ही पाळी!- माझा आत्मसंवाद चालूच राहिला.
आम्ही ’स्थानावर’ एकदाचे पोचलो.शाळेचा हॉल.असंख्य भक्तगण.स्टेजवर लाल मखमली खुर्च्यांमधे पाहुणे.धूप, उदबत्त्या, कापूर, भले मोठे हार.त्यांचा संमिश्र वास.मनू इथेही गप्प नाहीच.सारखा आपला या भक्ताकडे बघ.त्याला मान वेळावत हॅऽलोऽ कर.त्या तिसरय़ाकडे बघून अतिलाचार, कृत्रिम हस.भक्तांचं आपलं बरं.ब्रह्मानंदी टाळी लागलेली.मी परग्रहावर आल्यासारखा.भांबावलेला.मनू कोपरानं ढोसलत कानात सांगतोय, “ते बघ.ते गॅंगस्टरसारखे दिसताहेत ना! स्टेजवर रे! डोळे गांजेकसासारखे दिसताएत ते! ते तात्या! आधी वकील होते, आता गुरू झालेत.बाजूला त्यांची बायको ताती.तिच्या बाजूला ओणवा झालेला आणि तिच्या कानात काहीतरी सांगणारा तात्यांचा लहान भाऊ तातू.राम, लक्ष्मण, सीता! भरत शत्रुघ्न अजून यायचेत.” असं म्हणून मनू ख्यॅं खॅं करून हसला.मी चपापलोच.कुणी भक्त ऐकायचा आणि बेमुदत मार पडायचा.मी, मनू माझ्याबरोबर नाही असं दाखवत इकडे तिकडे बघत एका रिकाम्या खुर्चीत बसलो तर मनूनं लगेच बाजूची खुर्ची बळकावलीच.
एक अप टू डेट पोषाखातला भक्त स्टेजवर गेला.तात्यांना आणि परिवाराला त्यानं साष्टांग लोटांगण घातलं.मनूनं लगेच इकडे मला ढोसललं, “हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.याला तात्यांची सावली मोठी झालेली दिसली!” असं म्हणून मनू पुन्हा ख्यॅंऽ ख्यॅंऽ… मी नकळत विचारलं, “सावली? म्हणजे?”- “तात्यांची कृपाऽऽ” असं म्हणत मनू पुन्हा ख्यॅंऽ ख्यॅंऽ… मी पुन्हा चपापलो.दोन चार भक्तांची तंद्री भंगली.मनू आज मला बहुतेक मार खायला लावणार! मी अंग आक्रसून बसलो.
आता एक बॉयकट केलेली, स्लीवलेस पंजाबी आणि ओठ लालचुटुक असलेली माईकवर आली.बोलायला लागली, “आम्ही सुमोतून चाललेलो स्फीडमधे! समोरून भरधाव टॅंकर! मी डोळे मिटून तात्यांचा धावा केला.डोळे उघडले तर काय? टँकर गायब!” मनूनं आता मला इतक्या जोरात ढकललं की मी शेजारच्या अतिविशाल महिला भक्तिणीच्या मांडीवर पडता पडता वाचलो. “हिचं थोबाड बघून टॅंकरवाल्यानं दरीत उडी मारली! तात्या काय करणार?" असं म्हणून मनू इतक्या जोरात हसला की खुर्चीसकट पडायचाच बाकी राहिला.मला वाटलं आता वातावरण तंग होणार.मनू निसटणार आणि मला पडणार.इतक्यात चार-पाच म्हातारय़ा कोतारय़ा सुवासिनी नथी चाचपत, तोंडातल्या कवळ्या सावरत, दागिने दाखवत; तबकात पेटलेली निरांजनं घेऊन आल्या.ढोलकीवाल्याची थाप काडकन वाजली आणि तात्यांची आरती सुरू झाली.
तात्यांचे डोळे अर्धवट मिटलेले.तातींच्या तोंडावर माफक कृत्रिम हसू.काही तरी सतत शोधणारा तातू उर्फ लक्ष्मण आणि बेरडासारखे उभे भरत आणि शत्रुघ्नं.
’परमेसर परसन…’ या लोकप्रिय लोकगीताच्या चालीवर दुसरी आरती चालू झाली.पोरंटोरं, बायकापुरूष खच्चून बेंबीच्या देठापासून ओरडत होते.आश्चर्य म्हणजे इतका वेळ माझ्या बाजूला उभा असलेला मनू चक्कं कंबर हलवत त्या उडत्या तालावर नाचायलाच लागला.आधी मला वाटलं चेष्टा करतोय पण तो त्या सगळ्यात अक्षरश: रंगून गेला होता.सारखा हलत होता.एक आरती झाली की ’मजा आला मजा आला’ म्हणून टाळ्या पिटत होता.अनेक लोकप्रिय लोकगीतं, कोळीगीतं, सिनेमागीतं त्या आरत्यांमधे सामावलेली आणि तात्यांचा जयजयकार.
’अशी चिक मोत्यांची माळ…’ या चालीवर आरती चालू झाली आणि मनूनं उडीच मारली.अवघं सभागृह भक्तिरसात बुचकळून निघालेलं.कॉलेजमधली पोरं-पोरी धुंद झालेल्या.
शेवटी ’दत्त दर्सनला जायाचं जायाचं… सोबत तात्या येणार’ असा उच्चकोटीचा जयघोष झाला. ’आळंदीच्या ज्ञानाला भेटायला जायचं आणि सोबत तात्या पांडुरंग’ या भावनेनं आख्खा भक्तवर्ग बेहोष झाला.
अनंतकोटीऽऽ ब्रह्मांऽऽडनायक सच्चिदानंद सदगुरू श्री तात्याराव महाऽऽराज कीऽऽ अशी आरोळी माझ्या शेजारूनच आली.मनू खच्चून ओरडत होता.लोक घसा फो-फोडून जयजयकार करत होते.मनूचं तात्यांवरचं लक्ष हटत नव्हतं.चेहेरा भक्तीभावानं ओथंबलेला.हात जोडून त्याने डोळे मिटून घेतले.
जरावेळाने हनुमान उडी घेऊन मनू स्टेजवरही अवतरला असता आणि तात्यांच्या पायाशी बसून ते रामपंचायतन पूर्णही केलं असतं.
तेहेतीस कोटी देवांमधे अनंतकोटींची भर पडणार हे मला तरी पूर्ण कळून चुकलं होतं…

No comments: