गेले पंधरा दिवस मनू गायब.मला मनूची इतकी सवय की तो नाही म्हणजे माझं जगंच संपलं! मी आपला, त्याच्या भाषेत त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर त्याला शोधतोय…
आज ऑफिसमधे अर्जंट कामात बुडालेलो असताना माझ्यासमोर एक भैय्या उभा.चला हो चला!- असं मला त्याच्या भोजपुरी की कसल्या भाषेत सांगतोय.तोंडात पानाचा तोबरा.कपाळावर कुंकवाचा उभा पट्टा.मिशीला पीळ देऊन आकडा केलेला.मी म्हटलं, क्या है पंडितजी? क्या चाहिए? त्यानं माझा दंड धरून मला माझ्या ऑफिसमधल्या बसल्या जागेवरून उठवलंच.तोंडातल्या रसाचे
तुषार उडवत तो पुन्हा म्हणाला, चला हो! घुमत है समुंदर किनारे!- आणि डोळा मारून तो हसला.त्याक्षणी मी उडालोच! मनू! आणि या अशा अवतारात!
तो हसत मला ओढतोय.माझा मद्रासी साहेब रागारागाने आमच्याकडे बघतोय.मनूच्या अंगात आख्खा उत्तरप्रदेश संचारलेला.ऑफिसचा जेमतेम अर्धा दिवस भरलेला.उडुपी सुपरवायझरनं दांडी मारलेली.बाजूचा गुजराती ’मार्केट’ मधे गेलेला.मनू मला सोडत नाही.अशा सगळ्या अवस्थेत आता माझा मद्रासीसाहेब उट्टं काढणार या सगळ्या प्रकाराचं, याची कल्पना असूनही मला भर दुपारी ऑफिसबाहेर पडावं लागलं याचं कारण मनू!
बाहेर आल्यावर मी विचारलं, मनू! हे रे काय? एक पिचकारी टाकत तो म्हणाला, मनू नाही! मनवा बोला हो हमका! मी एकदा म्हणून बघितलं, मनवा!- आणि मला हसूच आलं.तो म्हणाला, हसो नाही! मनवा इ का नाम नाही? मी त्याला म्हटलं, तू बोल बाबा त्या भोजपुरी की कसल्या भाषेतून पण मला आधी सांग पंधरा दिवस होतास कुठे? तो म्हणाला, मुलखवॉं मां गएल रहिन हम.मला वाटलं हा आता दिलीपकुमारसारखं धोतर धरून, नाचून ’नैन लड गई रे’ म्हणणार आणि मनवानं मुलखाच्या गोष्टी सांगायला सुरवात केली.अगदी भिजवलेले चणे, राईचं तेल, टोमॅटो-बटाट्याची रसभाजी सगळं सगळं.
तोपर्यंत मनवाचा तो समुंदर आलाच.त्याच्या कडेकडेने आम्ही चालायला लागलो.मनू ताळ्यावर यायचं काही लक्षण दिसत नव्हतं.आता मला मीच पानाचा तोबरा भरलाय.मलाच भरघोस मिश्या आल्या आहेत.मी माजी शेंडी चापून चोपून वळवली आहे.असे भास व्हायला लागले.
नेहेमीसारखं अतिअसह्य झाल्याशिवाय ब्र काढायचा नाही अश्या माझ्या मराठी बाण्याला जागत मी मनूला काळजीनं विचारलं, अरे भय्ये कमी का आहेत मुंबईत हे तू काय- मनूनं मला पुढे बोलूच दिलं नाही.भय्या नही कहना हमका! हम तौ उत्तरपरदेस रहिबासी संघ के कार्यकर्ता है!- मनवा म्हणाला.आता तो भोजपुरीतून शुद्ध हिंदीकडे वळायला लागला होता.सबेरे तुम्हारा दूध कौन लाता है? तुम्हारे घर पेपर कौन डालता है? तुमको बनारसी पान कौन खिलाता है? तुमको सब्जी कौन बेचता है? पानीपुडी कौन खिलाता है? तुम्हारे घरका फर्निचर किसने बनाया? – हमने! हमारे भाईयोंने! अब ट्रेन में जरासी भीड क्या हो गई, भय्या लोग भय्या लोग करके चिल्लाते हो? इतने साल क्या किया तुम लोगो ने? पहले ’बजाव पुंगी हटाव लुंगी’ का नारा दिया.क्या सब मद्रासी भाग गए? तुम्हारा बनिया कौन है? तुमको कपडा कौन बेचता है? शेअर मार्कीट में किसकी गर्दी है? क्या उन लोगों को भगा सके हो तुम आज तक? उल्टा वो बोलते है ’मुंबई तुमची भांडी घासा आमची!’- मनू उर्फ मनवा आता पूर्णपणे फॉर्मात आला होता.समुद्रावर फिरायला आलेले लोक आमच्याकडे टकामका बघायला लागले होते.मी नेहेमीच्या हतबल चेहेरय़ाने मनू –नव्हे मनवाचं प्रवचन ऐकत होतो.मधे मी काही बोलायला तो जागाच देत नव्हता.
ये समुंदर देख रहे हो? -मनवाजीनी नवा प्रश्न फेकला.मी मगासपासून त्याच्याकडेच- मनूकडेच बघत होतो.हां! मी म्हणालो.कहॉं से आता है ये पानी? मनूनं विचारलं.आता मात्र माझ्या दृष्टीनं हद्द झाली होती.उत्तरपरदेस रहिबासी संघ काय? मनूचं हे वेषांतर काय? हे असंख्य प्रश्नं काय?- कहॉं से आता है ये पानी? काय सांगू? माझा चेहेरा आणखी (?) बावळट झाला.
बोलोऽऽ कहॉं से आता है ये पानी? मनवा दरडावलाच.आमच्या आजूबाजूचे चारजणही दचकले.मी डोक्यावर पालथा हात मारून घ्यायला लागतो.तो माझ्यावर ओरडलाच, अबेऽ×× नदियों से!ऽ सारी नदियॉं आकर समुद्रसे मिलती है! स्सालाऽ दूसरी ’ब’ में सिखाया वो भूल गए? मी तरी काय करणार? मनूसमोर माझं नेहमीच असं होतं आणि मग हसं होतं.मनू मोठी पिचकारी टाकत हसलाच.म्हणाला, उसी तरहा ये महानगर इक समुंदर है! देसभर के लोगभाग इसमें आके मिलते है.क्यों नहीं आऍं? यहॉं क्या नही है? रोजगार है.पैसा है.झोपडपट्टी है.पानी है.नाटक है.तमासा है. पिच्चर है.सबकुछ है!
आता मला रहावेना.अरे बाबा पण हमकू तकलीप होताय ना खालीपिली! हमारे पूर्वज से हम इदर रहता है, जो कोई इदर आए, हमसेही दादागिरी करताय? हमारे नेता लोक को भी तुमने-तुमने- मला ’फितवलंय’ ला हिंदी शब्द सुचेना.
मनवाने तो मौका साधलाच- तुम गिरगाव, दादर, परेल, लालबाग से नालासोपारा, विरार, कलवा, बदलापूर गया, बराबर है? अब तुम्हारे गॉंव जाओ! मालवन, सिंधुदुर्ग, नासिक, सातारा, कोल्हापूर…
आम्ही चौपटीवर पोचलो होतो.मी वर बघितलं.एक पुतळा हाताचं बोट पुढे करून जणू रस्ता दाखवत होता.मला त्याच्या जागी मनू- नव्हे मनवा- दिसायला लागला…
2 comments:
apratim !!
मन:पूर्वक आभार!
Post a Comment