गेल्या थंडीतली गोष्टं.झोपेतून खाडकन जाग आली.मी कुठे आहे तेच कळत नव्हतं.दरवाजा धाड धाड वाजतोय हे जरा वेळानं लक्षात आलं.मग कळेना नक्की कुठला दरवाजा ते.इन्कमटॅक्सवाल्यांची धाड पडल्यावर एखादा शेट जसा उठत असेल तसा खडबडून उठून, डोळे चोळत दार उघडलं.समोर मनू.जिवणी फाकवून फवारा उडवत विचारतोय,“कॅय करतोएस?” “तुझं डोंबल!” मी म्हणालो, “अरे रविवारच्या सकाळी कधी नव्हे ती मुंबईत थंडी पडलेली असताना लोक काय करतात?” माझा तिळपापड म्हणजे मनूची करमणूक.पोटभर हसून झाल्यावर मनू नाटकीपणे “गूड मॉर्निंग! गूड मॉर्निंग!” असं म्हणाला.असं म्हणताना सर्कशीतल्या मुली प्रेक्षकांना अभिवादन करतात तसं करायला लागला.माझी तार सटकलेली.हा सारखा वाकतोय हे बघून मी त्याच्या हातांकडे बघतोय तर मनूनं म्युझियममधे ठेवलं जावं असं जुनंपानं धोतर नेसलं होतं, ते दिसलं.दुटांगी धोतर नेसतात बघा.दोन पायांभोवती त्या धोतराला पंखांचा आकार येतो.मनू तसले ते दोन पंखे हातात धरून वाकून वाकून मला अभिवादन करत होता.रविवारच्या त्या भल्या सकाळी, थंडीत, डोळे चोळत, सटकलेल्या डोक्याने मला ते पहायला लागत होतं.मनूपासून मला सुटका नाही हे मला नव्याने कळलं.
मला म्हणाला, चल! मी म्हटलं, कुठे? म्हणाला, गच्चीवर! मी म्हटलं, आत्ता? आणि हा असा? सुटत आलेल्या लुंगीची गाठ मी घट्ट बांधतोय तर मनूनं पिशवीतून आणखी एक तसलंच धोतर काढलं.मी मागे मागे सरतोय तर त्याने माझ्या लुंगीलाच हात घातला, मला ते धोतर नेसवायला लागला.आमच्या बायकोला अशी ही करमणूक म्हणजे लॉटरी लागल्याचा आनंद.दोरीवरच्या उड्या माराव्यात तसा मी नाचतोय.मनू वेशभूषेचं ऑस्कर मिळवण्याच्या प्रयत्नात आणि बायको चार्ली चॅप्लीन किंवा जीम कॅरीचा सिनेमा बघावा तशी हसतेय.मस्त चहा पिणारय़ा माझ्या बायकोला बाय करून मनूनं माझा हात धरून मला खेचलं आणि पडत धडपडत ठेचकाळत मी त्याच्याबरोबर आमच्या गच्चीपर्यंतचे चार मजले चढलो.मनूनं धोतर इतकं पक्कं बांधलं होतं की माझा कपाळमोक्ष झाला असता पण कमरेचं धोतर मात्रं सुटलं नसतं.
गच्चीवर पोचल्यावर मनू कवायतीच्या मास्तरासारखं ओरडला, “धोतराचे पंखे ताणून धऽऽर!” मी धरले.“ उड्याऽऽ माऽऽर!” मला हसावं की रडावं कळेना.“अरेऽऽ उड्याऽऽ माऽऽर!” कुणी असं ओरडलं अंगावर की मी घाबरतो.मी उड्या मारायला लागलो.मनू एक उडी मारायचा.मला दहा मारायला सांगायचा.मी मनाचा हिय्या करून उड्या मारता मारता शेवटी विचारलंच, “अरे… पण… हे… कशाला?” “सांगतो!” तो म्हणाला, “कधी नाही ते थंडी पडलेली असते.छान झोपेत घड्याळाचा कर्कश्श गजर वाजतो.तो बंद करून तू पुन्हा झोपतोस.थांबू नकोस, मार उड्या! तर पुन्हा उठतोस तेव्हा उशीर झालेला असतो.बायकोवर चरफडत, आदळाआपट करत तू कामावर जायला बाहेर पडतोस.मार उड्या! हं! तू रस्त्यावर येतोस न येतोस तोच इतका वेळ पार्कींग करून झोपलेला टेंपोवाला अचानक जागा होऊन तुझ्या मागे लागतो हात धुऊन.केव्हाही तुझ्या बुडाला येऊन टेकणारा टेंपो चुकवायला तू कडेला होतोस- हं! थांबू नकोस! उड्या मारता मारता लक्ष एकाग्र होतं.ऐकलेलं चांगलं लक्षात राहील- तर तू कडेला होतोस.समोर स्पीडब्रेकर.महापालिकेच्या रस्तानिर्माण खात्याचं आणि मोटरसायकलवाल्याचं साटंलोटं आहे हे तुझ्या गावीही नसतं.तू नाकासमोर चालणारा सर्वसामान्य माणूस.समोरून भरवेगातला मोटरसायकलवाला बघून तू आणखी कडेला होतोस.मागावर टेंपो.समोरचा स्पीडब्रेकर रस्त्याच्या दोन्ही कडांना चपटा बनवलेला असतो.तसा नियम आहे.तू रस्त्याच्या त्या चपट्या भागावर आणि मोटरसायकलवाला तुझ्या पुढ्यात- कारण स्पीडब्रेकरचा झटका टाळून कडेच्या चपट्या रस्त्यानं येणं हा मोटरसायकलवाल्याचा हक्कं आहे.महापालिकेनं त्याला तो बहाल केलाय.क्षणार्धात तू ढगाला हात लाऊन येतोस.टेंपो मागून पुढे आणि मोटरसायकलवाला पुढून मागे दिसेनासा झाल्यावर तू स्वत:ला चिमटा घेतोस.अजूनही आपण हयात आहोत याचं तुला आश्चर्य वाटतं.मोटरसायकलवाल्याला जग जिंकायचं आहे आणि टेंपोवाल्यानं घाई केली नाही तर त्याचा जीव जाईल अशी स्वत:च्या मनाशी समजूत करून घेत, घड्य़ाळात बघत, स्वत:वर चरफडत तू पुढे होतोस.स्वत:वर चरफडणं नेहेमीच तुझ्या हातात असतं- अं हं! थांबायचं नाही! उड्या माऽऽर!- तर तू पुढे होतोस.वळण येताच वळतोस आणि तुझी थेट पाताळात जाण्याची संधी हुकते.कुठल्यातरी खात्याचा बोर्ड लाऊन जोरात खोदाखोदी चाललेल्या खड्ड्यात तुझा उजवा पाय मुरगाळतो.एवढ्यावरच भागलं म्हणून तू देवाचे आभार मानतोस.या सतत खोदकाम करणारय़ांना अजून पुरातन लेणी किंवा हिरय़ाच्या नाही पण मॅंगेनीजच्या तरी खाणी कशा लागत नाहीत असा विचार करत खड्ड्याच्या बाजूला केलेल्या मातीच्या डोंगरावरून तू आता ट्रेकींग करत असतोस.उजव्या पायानी लंगडत.आता नेहेमीच्या कितीतरी नंतरची तरी लोकल मिळेल? आज कामावर पोहोचू? असले सॉलिड डाऊट्स तुझा पिच्छा पुरवत असतात, ते तुझ्या स्वत:वर चरफडण्याच्या आगीत तेल ओतत असतात आणि त्याच नादात तू घसरतोस.धरणीनं तुला आज पोटात घ्यायचं ठरवलेलंच असतं पण तुझं दैव बलवत्तर असतं- मार, मार उड्या!- तू एकदाचा फूटपाथला लागतोस.पण तो तुझा आनंद क्षणभंगूरच ठरतो कारण एवढाच फूटपाथ रिकामा बघून सगळे फेरिवाले तिथे एकत्र आलेले असतात.त्यांची संघटना मोठी.तुझ्यासारखा त्यांना काय विरोध करणार? ’हा रस्ता पादचारय़ांसाठी नाही’ असा बोर्ड महापालिका तरी कुठे कुठे लावणार?...” –आता मनू उड्या मार असं पुन्हा ओरडणार हे लक्षात येताच मी नेट लाऊन जीवाच्या आकांताने बोंब ठोकली, “अरे पण मला ही उड्या मारण्याची शिक्षा का?ऽऽऽ ”
मनू समजूतदारपणे म्हणाला, “उड्या मार.धोतराच्या पंखांमधे हवा शिरेल आणि तुला उडता येईल.उड्डाणपुलांचीही गरज रहाणार नाही.असा प्रयत्न करून उडता येणं हे रस्त्यांवरून चालत जाण्यापेक्षा खूपच सोपं नाही का?”
मी मान डोलावली आणि आणखी उत्साहाने उड्या मारू लागलो!
No comments:
Post a Comment