romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, July 26, 2010

स्टॅंडअप कॉमेडी शो! मनू आणि मी!_“आवड”

मागच्या वेळी मनू काय उखडला बघितलंत! काय केलं मी? त्याचं म्हणणं अवघड शब्द वापरू नकोस.स्वस्तं नाही म्हणता येत, सवंग कशाला म्हणायचं? माझं पण असं होतं नं मनू समोर दिसला की! मी अशी काहीतरी चूक करतो की मनूला बोलायला कारण मिळतं.
यावेळी मी त्याला विचारलं, अगदी प्रेमानं हं, “मनू तुला कसली आवड आहे?” मनूनं जोरात “हॅऽऽऽ” केलं! आजूबाजूचे टकामका बघताएत.एकदा मनूकडे, एकदा माझ्या उतरलेल्या चेहेरय़ाकडे.मनूचा ओघ सुरू झाला, “काय येडा आहेस का तू? कसली आवड? अरय़ेऽऽ अर्धं आयुष्यं जातं पुस्तकी शिक्षणात.उरलेलं अर्धं अनुभवातून शिकण्यात.नोकरी मिळवायची, ती टिकवायची, येता-जाता लोकल ट्रेनच्या सर्कशीत जीवाला सांभाळायचं.चार तास जातात नुसत्या प्रवासात.उरलेले आठ तास कामावर, कामाच्या ठिकाणी संपतात.जेवण, झोप, हगणं मुतणं…” मनू एकदा बोलायला लागला की थांबत नाही आणि माझं असं आहे की मी नेमका त्याला चान्स देत रहातो.मी म्हणतो, “तसं नाही मनू पण जीवाला विरंगुळा- ” माझं वाक्यं अर्धवटच रहातं.
मनू ओठावर आलेली शिवी आतल्या आत दाबायचा प्रयत्न करत म्हणतो, “अरय़ेऽऽ इथे श्वास घ्यायला फुरसत नाही.मरणाचं काम असतं नोकरीत.लोकलट्रेनमधे चढायचं म्हणजे म्हणजे युद्धासाठी गडावरच चढायचं.जगलो वाचलो तर कामावर जायचं नाही तर- घरी येताना तेच हाल.नोकरीत साहेब मुळावर उठलेलाच असतो.घरी आल्यावर पोरं झोंबतात.बायको उशीरा येणार कामावरून.चहा करून करून घ्यायचा, भाजी आणायची, जमलं तर निवडायची.विरंगुळा काय म्हणतोस? एक वर्ष संपून दुसरं कधी सुरू होतं तेच समजत नाही!”
मी अडाणी.मी मनू पुढे हार मानत नाही- “मनू अरे सगळ्या गर्दीच्या गाड्या सोडून बिनगर्दीची गाडी पकडतोस.उशीर का? म्हणून सायबानं विचारलं की हसून टोलवतोस.जास्तीच झालं तर सरळ सही कॅन्सल करून घरी जातो म्हणतोस! मनू आता डोळे बारीक करून नेहेमीचं हसायला लागतो.म्हणतो, “यड्याऽ सायबाला गुंडाळतो व्यवस्थित.जमतं की नाही? डोस द्यायचा, मग गोड बोलायचं.मग पुन्हा डोस, पुन्हा गोड-” मनू ठसका लागेपर्यंत हसत रहातो.मला कसंतरीच वाटतं, मी म्हणतो, “अरे आणि मरणाचं रे कसलं काम? गप्पा तर मारत असतोस आख्खा वेळ!” आता मनू माझाच हात खेचतो आणि जोरदार टाळी देतो.खांद्यावर हात टाकून म्हणतो, “यड्याऽ इमानदारीत खाली मान घालून काम करणारे असतात तुझ्यासारखे, मी कशाला काम करू? महिन्याची अखेर चमचमीत असते माझी, फुकटचा पगार घेतो की नाही?” माझा पुन्हा यडा गोंद्या होतो.मनू धबधब्यासारखा हसतच रहातो.हसू कसंबसं आवरून तो तत्वज्ञान सांगितल्यासारखं सांगायला लागतो, “ आता तू म्हणतोस आवड.काय करायची आहे आवड, छंद? कुणाला नाव कमवायचंय, पैसा कमवायचाय आणखी?” मी त्याला थांबवून म्हणतो, “तसं नाही रे, पण मनाला समाधान मिळतं अशा आवडीतून, छंदातून.” माझ्या डोक्यात टप्पल मारत मनू म्हणतो, “मला काय मिळत नाही समाधान! याला जरासं चढवायचं, तो माझ्या वाटणीचं काम करतो.त्याला जरा थांबवलं, या! या! केलं की तो मस्त टाईमपास करतो.एखाद्याच्या एखाद्या गोष्टीविषयी उगाचच उत्सुकता दाखवायची की तो खूष.भडभडा बोलतो.तसाच अगदी साधा असला नं (पुन्हा मला टप्पल) तर गुलामसुद्धा होतो.काय आहे की सतत आपला टाईमपास झाला पाहिजे.” तरीही मी मूर्ख मनूला विचारतोच, “अरे असं कसं? आयुष्यात काही करायला नको? निदान प्रमोशन तरी घेशील?” मनू माझ्याकडे कीव आल्यासारखा बघत रहातो.कुत्सित हसत म्हणतो, “ अरे काय वाईट चाललंय माझं? बापाची जागा आहे.बायको ऑफिसर आहेच.मस्त टाईमपास होतोय लोकांशी गोड बोलून, उल्लू बनवून, कामचुकारपणा करून.करणारे करतात की रे आयुष्यात बरंच.आवड जोपासतात, छंद जोपासतात.समाधान का काय ते मिळवतात.कशाला हवेत फुकटचे ताप! चाललंय मस्त ते काय वाईट आहे? ” मग मला रहावतच नाही, “ अरे पण हे असंच किती दिवस चालणार? नोकरीत माणसं कमी करतील.खरोखरंच मरणाचं काम करावं लागेल.सक्तीनं घरीसुद्धा बसवतील पुढेमागे! मग काय करशील? कसा टाईमपास करशील?” मनू म्हणतो, “ पुढचं पुढ्ये रय़े! मी गोड बोलतो.मला मेहनत नको.आपल्याच मित्रांना उल्लू बनवून मतलब साधणं मला जमतं.मी-”
मनूचं चालू होतं आणि नेहेमीप्रमाणे माझ्या तोंडाचा वासलेला “आ” तसाच वासलेला रहातो…
Post a Comment