मनू काल सकाळी रेल्वेस्टेशनवर भेटला.जरा भडकलेलाच दिसला.मला बघितल्यावर किंवा कुणालाही बघितल्यावर त्याच्या चेहेरय़ावर हसू येतं.डोळे बारीक करून, जिवणी जमेल तितकी फाकवून तो हसतो.लाचार वाटावं असं ते हसू.काल सकाळी ते नव्हतं.मी मानेनेच काय झालं असं विचारलं.मनू म्हणाला, “यार संघटित व्हायला पाहिजे आपण लोकांनी!” मी यड्यासारखा आ वासून त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिलो.नेहेमीप्रमाणे.तो म्हणाला, “हे लोक मुसंडी मारून कसे जागा पकडतात बघितलंस!” मी लगेच आजूबाजूला बघायला लागलो.”आता नव्हे रे! लोकल स्टेशनमधे आल्यावर! शेवटच्या स्टेशनपर्यंत आपण आपले उभे!” “हो तर!” मी तत्परतेने मान डोलावली.मनू म्हणाला, ”यार आपल्याला पण जमायला पाहिजे! वर्षानुवर्षं आपण लोकल पकडतो.पास संपला की इमानेइतबारे नवीन पास काढतो.आपल्यला बसायचा हक्क नाही?” मनूच्या या बोलण्यामुळे मी आणखीनच भडकलो.खरं म्हणजे लोकलट्रेनमधे उडी मारून जागा पटकावणं मला बापजन्मी शक्य नाही हे मला पूर्णपणे पटलंय.पण मनू बोलायला लागतो आणि मी भडकतो.असं जवळजवळ नेहेमीच होतं.मी रागारागानं प्लॅटफॉर्मवर टवाळक्या करत उभ्या असलेल्या नेहेमीच्या ग्रुप्सकडे पहात राहिलो.मनू माझ्या आगीत तेल ओतत होताच.लोकल आली तशी त्वेषाने मी आज तिच्या दरवाज्याकडे झेपावलो, तेव्हा मनू शांत होता.
पुढे कसं कसं काय काय झालं मला कळलं नाही.पण नेहेमीप्रमाणे दोन-चार जणांनी मला दोन सीट्सच्या मध्येही पोचू दिलं नाही,पॅसेजमधेच ज्याम केलं.त्यांच्या दोन-चार ढुश्यांनी आणि चार-पाच कोपरखळ्यांनी माझ्यातला अन्यायाविरूद्धचा अंगार साफ विझवून टाकला.आता आणखी पुढे जाण्याच्या प्रयत्न सोडून देऊन शांत उभा राहिलो नाही तर दोन-चार थपडा पडतील अशी भीती वाटून माझा पुतळा झाला.माझी नजर डोळे फिरवून फिरवून आता मनूला शोधू लागली.
बरय़ाच प्रयत्नांनंतर जेव्हा माझी बुबुळं मनूवर स्थिर झाली तेव्हा तो जागा पटकावणारय़ा एका ग्रुपमधे घुसला होता.मनूच्या बोलण्यातल्या अद्भुत शक्तीमुळे त्यातला एक जण नागासारखा डोलायला लागलेला मी पाहिला.जरा वेळाने तो डोलणारा उभा राहिला आणि मनूला त्याने आपल्या जागेवर बसवलं.मनूनं आढेवेढे घेतले पण तो डोलणारा नाग त्याला प्रसन्नंच झाला होता.मनू छान ऐसपैस बसला.डोळे बारीक करून, जिवणी फाकवून हसत हसत इकडे तिकडे पहात राहिला.मी दोघा-चौघांच्या आडून डोकं काढून आशाळभूतपणे ते पहात शेवटपर्यंत उभाच राहिलो.
लोकलमधून उतरल्यावर मनू नेहेमीप्रमाणे माझ्यासाठी थांबला नाही म्हणून दुपारी मी मनूच्या ऑफिसमधे पोचलो तेव्हा त्याच्या कचेरीत मिटींग चालली होती.मनू मला नेहेमी चहा पाजतो.त्याच्या आजूवाजूला बसलेला कोणीतरी नेहेमीच कसा आमच्यासाठी चहा मागवतो याचं कोडं मला कधीच सुटत नाही.सगळे मिटींगमधे गुंतल्यावर हळूच तो मला घेऊन बाजूला झाला.म्हणाला, “लोड खूप आहे रे कामाचं.पोरांना जरा जाणीव करून दिली.संघटित व्हायला नको, मला सांग!” मी मान डोलावली.माझ्या डोळ्यांसमोर नेहेमीच एक कागद आणि एक पेन्सिल हातात घेऊन कागदावर खुणा करत बसलेला मनू आला.मागे एकदा मी त्याला विचारलंही होतं त्याबद्दल.नेहेमीसारखं हसून तो म्हणाला होता, “नुसतं मान खाली घालून काही होत नाही राज्या,सगळ्या खाणाखुणा खाचाखोचा यांचा अभ्यास पाहिजे!” तेव्हाही मी यड्यासारखा त्याच्याकडे पहात राहिलो होतो.
यावेळी तो पुढे म्हणाला,“खातेबदलाचं- डिपार्टमेंट चेंजचं- महत्व पटवून दिलंय यावेळी पोरांना!” पोरं म्हणजे मनूचे सहकारी.“ पोरं चार्जड् झाली आहेत.” सहकारय़ांकडे बघत मनू म्हणाला, “आता बघ सगळी केबिनकडे धावतील.” मी बघत होतो, खरंच ती धावली.मनू म्हणाला, “त्यांचा आवाज ऐकून साहेब बाहेर येईल.” मी बघितलं.साहेब आला.मनू म्हणाला, “आता धूमशान.” मी पाहिलं.खरंच धूमशान.मनू माझ्या कानात म्हणाला, “बघितलंस संघटित होण्याचा परिणाम!” मी मनूला म्हणालो, “अरे पण तू इथेच! ते बापडे झगडताएत साहेबाशी!” मनू डोळे बारीक करून हसला.माझा हात ओढून त्याच्यावर टाळी दिली.आपला कागद, पेन्सिल, कागदावरच्या खुणा यावर हात फिरवला.मला म्हणाला, “आता रात्री घरी भेट.मी आता घुसतो यांच्यात.” माझ्या पाठीवर थापटून तो पुढे झाला, घोळक्यात घुसून लाचार हसत साहेबासमोर उभा राहिला.मी तिथून निघालो तेव्हा तो साहेबाला काही सांगण्याऐवजी आपल्या पोरांना़च डोस पाजत होता.
गेली वीस वर्षं मनूनं आपला बसायचा कोपरा सोडलेला नाही.खातेबदल काय मनूच्या नोकरीत त्याचा शाखाबदलही झालेला नाही.सगळ्या सायबांचा तो आवडता आहे.
रात्री मनूनं बोलवलं म्हणून मी त्याच्या घरी गेलो.मला उशीरच झाला होता.मनू आपल्या बिल्डिंगच्या गच्चीत सोसायटीच्या मिटींगमधे होता.मी तिथे पोचलो तेव्हा इतर सगळे मेंबर्स एकमेकांच्या उरावर बसायचे बाकी राहिले होते.मनू कठड्याला टेकून त्यांच्याकडे बघत उभा होता.मला बघितल्यावर पुढे झाला.म्हणाला, “बिल्डरनं साल्यानं काम पूर्ण केली नाहियेत रे! संघटित केलंय बघितलंस सगळ्यांना.” तोपर्यंत ’पोरं’ शिवीगाळीवर उतरली होती.चल, जरा खाली जाऊन सिगारेट ओढू म्हणून मला मनू खाली घेऊन गेला तेव्हाही संघटित होण्याचंच महत्वं तो पटवून देत होता.त्याच्या पानाचे, सिगारेटचे पैसे फेडून मी ते गुंग होऊन ऐकत होतो…
No comments:
Post a Comment