’वस्त्रहरण’ नाटकात तात्या सरपंच मेटाकुटीला येतो.जोशी मास्तरांनी दिग्दर्शनाच्या नावाखाली घातलेला धुमाकूळ पाहून कपाळाला (स्वत:च्या) हात लावतो.म्हणतो, “मास्तरऽ ह्यां तुमचा दिग्ददर्शन?ऽऽ” तात्या मास्तरांना दिग्ददर्शकच म्हणत असतो, दिग्दर्शक नव्हे! माझ्यावर कधी अशी पाळी येईल, असं मी कुणाला तरी म्हणेन असं तुम्हाला वाटलं असतं?
दरवर्षी गल्लीत सत्यनारायणाची महापूजा असते.मनू- आपला मनू- दरवर्षी मागे लागतो, नाटक लिहून दे! नाटक लिहून दे! मी म्हणतो, “अरे, गल्लीतल्या रहिवाशी संघाची पत्रकं लिहिणं वेगळं, नाटक लिहिणं वेगळं.नाटक लिहिणं म्हणजे काय खाऊ आहे? शिवाय अगदी stratford upon avon इथल्या शेक्सपियरपासून ते कुलुपवाडी, बोरिवलीतल्या आपल्या जयंत पवारांपर्यंत सगळ्यांनी एवढं लिहून ठेवलंय, मी काय नवीन लिहिणार?” मनू माझं ऐकेल त्या दिवशी आपल्या मराठी सिनेमाला नक्की ऑस्कर मिळेल! त्याचा हेका एकच.मला खूप मोठा दिग्दर्शक व्हायचंय, तू नाटक लिहून दे! मनू म्हणजे आपला पंचरंगी, सप्तरंगी की नवरंगी म्हणतात तसला कलाकार.त्याला कोण उभं करणार? शेवटी या वर्षी नाईलाजानं मला तयार व्हावं लागलं.
मनू सुटलाच.म्हणाला, “नाटकाची स्टोरी?” मी म्हणालो, “हे बघ! नवीन नवीन असं काहीही नसतं.जगात असतं, दिसतं, वर्षानुवर्षं जे सांगितलं जातं तेच लिहायचं!” हे मी काय बोलून गेलो ते मलाच कळलं नव्हतं.कदाचित कुणा तृप्त नाटककाराचा आत्मा माझ्यात संचारला असावा.मनूला तर ते कळण्याच्या पलिकडचंच होतं.पण आपल्याला सगळं कळतं असा भाव चेहेरय़ावर आणणं त्याला सहज जमतं.
माझ्या तोंडून स्टोरी सुरू झाली, “एक कासव असतं-” माझं वाक्य पूर्ण व्हायचा आधीच मनू वा! वा! वा! म्हणून ओरडला.म्हणाला, “कोल्हटकर आणि कालेलकरांना मागे टाकलंस! पुढे!” मी लगेच म्हणालो, “एक ससा असतो-” मनू गडबडा लोळायचाच बाकी राहिला.म्हणाला, “कानेटकर आणि तेंडुलकरांच्या तोडीचा नाटककार होणार तू! पुढे!” आता अलिबाग ही काय माझी नेटिव्ह प्लेस नव्हे.मनूला काय आज ओळखत होतो? मनूला म्हणालो, “स्पर्धेत कासव जिंकलेलं आजच्या युगात कुणालाही पटणार नाही.तेव्हा ससा जिंकेल.” झालं.मनूला मोठा दिग्दर्शक व्हायची स्वप्नं पडायला सुरवात झाली.
मी इमानेइतबारे मला जमेल तसं नाटक लिहून दिलं.म्हणालो, “लोकांसमोर वाचतो.” मनूनं तोंड कडवट केलं.वाचनाला फार कुणी येणार नाहीत अशी दक्षता घेतली.नाटक हातात पडल्याबरोबर मनूचं वागणं बदललं.आता तो आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन माझ्याकडे टुकार माणसाकडे बघावं तसं बघायला लागला.पुढे कसं कसं होणार याची माझी उत्सुकता वाढायला लागली तशी तो एकेक गोष्ट माझ्यापासून लपवू लागला.मी काही विचारायला गेलो की तो त्याचा तो सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मख्खं चेहेरा तरी दाखवायचा किंवा पुजेला ज्याम डेकोरेशन करू, झेंडूच्या माळा सोडू, दुधातला शिरा करू म्हणून विषय बदलायचा.जाऊ दे म्हणून मीही सोडून दिलं.नाटक लिहिलं ते कुणीतरी करतंय म्हणून उत्सुकता मात्र ज्याम होती.
लोक जमायला लागले.हे पात्र मिळत नाही, ते नाही करत सगळा संच मिळणं कधीच सोपं नसतं.मी सारखा सारखा काय झालं, काय झालं म्हणून विचारतोय म्हणून शेवटी एके दिवशी मनूनं मला बोलवलं.मनू दिग्दर्शकाच्या खुर्चीवर.मी येताच कुणाला तरी आणखी एक खुर्ची आणण्याचं फर्मान.ओळखीपाळखी न होताच वाचनाला सुरवात.पात्रं बनलेल्या कलाकारांनी माझं नाटक आळीपाळीने वाचायला सुरवात करताच मी भारावलो.त्या सगळ्यात रंगायला लागलो.चुकलं- माकलं सांगायला लागलो.मी समजत होतो लेखक म्हणून मला काय सांगायचं आहे हे कलाकारांपर्यंत पोचणं जरूरी आहे.मला कळेना.वाचणारे सगळे घाबरलेले.त्यांचा एक डोळा मनूकडे.मी सूचना करतोय हे मनूला आवडत नाहिए.मी मनूकडे बघत राहिलो.
खुर्चीवर बैठक मारूनच दिग्दर्शन करणारय़ा दिग्दर्शक घराण्यातली मनू ही कितवी तरी यशस्वी कडी असावी.बसून बसून तो चांगलाच फुगला होता.मला त्या गोष्टीतल्या बेडकीची आठवण झाली.बैलाएवढा आकार व्हावा म्हणून पोरांना आपलं शरीर फुगवून दाखवणारय़ा बेडकीची.मनू खुर्चीत ठाण मांडून बेडकासारखा- म्हणजे झोपलाय की जागाय ते न कळेल असा बसून.तेव्हाच मला सगळी कल्पना यायला हवी होती, पण सामान्य माणूस असलेला लेखक आशावादी असतो.
दरम्यान मनूने नाटकात असंख्य बदल सुचवले.तो लिहिलेलं समजून न घेता सगळं उलटं-पालटं करणं म्हणजेच दिग्दर्शन या घराण्यातलाही दिसत होता.मी त्याला म्हटलं, “यापेक्षा एक नवीनच नाटक लिही!” तो म्हणाला, “मी लिहिलेलं बाजूला टाकून तुझं करतोय हे उपकार समज.” मनू माणसं जमवत होता.तो निर्माताही होता.मी लिहिलेलं रंगमंचावरून पहिल्यांदाच दिसणार होतं.मी गप्प बसायचं ठरवलं.
मी रिहर्सलला गेलो की मनू अगत्याने बसलेल्याला उभं करून मला खुर्ची द्यायचा.मला त्या खुर्चीत मुसक्या बांधल्यासारखा बसवून जाम करायचा.माझ्यात आणि नाटकातल्या कलाकारांत काहीच संपर्क राहू नये याची काळजी घ्यायचा.पुढे पुढे त्याने कलाकारांना दम भरल्याचं माझ्या कानावर आलं, “मी मोठा दिग्दर्शक आहे.मला सगळं कळतं.प्रश्न विचारायचे नाहीत.” नटमंडळी भलतीच आज्ञाधारक.चूपचाप सगळं ऐकणारी.
पूजेची- म्हणजेच नाटकाची तारीख जवळ आली.अजून नाटक उभं रहात नाही.मी ते मनूच्या लक्षात आणून दिलं.तो पुन्हा बेडूक होऊन समाधीत गेला.
अचानक पूजेची तारीख ठरली.मनू नाटकात बदल करण्याची घाई करू लागला.ऐनवेळी नाटकात बदल करून लेखकासमोर दुसरा कुठलाही पर्यायच न ठेवणारय़ा आणि पर्यायाने आपल्याच मनासारखं करणारय़ा दिग्दर्शक घराण्यातलाही तो दिसत होता. “आता अजिबात वेळ नाहिए.बदल करू नकोस.कलाकारांचा गोंधळ उडेल.आहे ते सरळ सोपं आहे.” मी समजावून बघितलं.
नाटक झालं.मी लिहिलेलं त्यात ’काहीही’ नव्हतं. “नाटकातली पात्रं एखाद्या संघर्षात सापडलेली सामान्य माणसं दिसत नाहीत.ती वेड्याच्या हॉस्पिटलातून बोलवून आणली आहेत का?” बघणारय़ा माणसांच्या या सवालाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. “हे काय लिहिलंएस?” या प्रेक्षक वर्गाच्या त्या पुढच्या प्रश्नाला माझ्याकडे काय उत्तर असणार होतं?
पूजेच्या निमित्ताने मनूने किमानपक्षी दोन पक्षी तर मारलेच.साधं, सोपं, सरळ नाटक अतिशय टुकार, न कळणारं, हास्यास्पद, भडक केलं आणि स्वत: फार मोठा ’दिग्ददर्शक’ झाला!
No comments:
Post a Comment