प्रकाश झा, राकेश ओमप्रकाश मेहेरा, विशाल भारद्वाज, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी... असे महत्वाचे मोहरे आज भारतीय चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत ही एक चांगली गोष्टं घडतेय हे नक्की! कोणी कधी अधिक कधी उणं! तरीही त्यांच्या क्षमतेबद्दल शंका घ्यायला फारशी जागा नाही!
कमीने ही माझी आधीची एक पोस्ट! विशालला यात नक्की काय करायचं होतं असा प्रश्नं मला पडला खरा! नंतरचा ’सात खून माफ’ बघायचा योग आला नाही.
’मृत्यूदंड’ हा मी बघितलेला प्रकाश झाचा पहिला चित्रपट.माझ्या आठवणीप्रमाणे त्याचा ’दामूल’ हा समांतर धारेतला सिनेमा त्या आधी आला होता.तो बघायचा राहून गेला होता.
’मृत्यूदंड’ पासून प्रकाश झानं व्यावसायिकतेशी नातं जोडलं, अर्थात स्वत:ची वैशिष्ट्य कायम ठेऊन.चांगल्या गणल्या जाणारय़ा दिग्दर्शकांच्या चित्रपटात जाणवणारी महत्वाची गोष्टं म्हणजे त्या चित्रपटाची रचना.ही रचना मृत्यूदंडमधे दिसली.मृत्यूदंड, गंगाजल, अपहरण, राजनीती.. यात बिहारी रक्तरंजितताही जाणवली.गंगाजलमधे तर उत्तर भारतातल्या एका कारागृहातल्या कैद्यांचे डोळे फोडले गेल्याच्या वास्तव घटनेचं प्रतिबिंबच दिसलं होतं.महाराष्ट्रात कोठेवाडी, मरिनड्राईव्ह बलात्कार इत्यादी घटनांपासून हिंसाचार आपल्या परिचयाचा होतोय.तो होतोय ही नक्कीच वाईट गोष्टं पण उत्तर भारतात असा हिंसाचार अगदी सर्वसाधारणपणे आढळतो.तो चित्रपटातही येतो.काही वेळा तो वलयांकित होऊन येतो.वास्तवातल्या हिंसेमुळे चित्रपटात हिंसा की चित्रपटातल्या हिंसेमुळे वास्तवातली हिंसा हा अंडं आधी की कोंबडं आधी असा सवाल.
प्रकाश झाच्या राजनीतीत तर महाभारतच दिसलं.यात वेगळं काय? असं वाटलं.पण महाभारत दरवेळी नव्याने वेगळं वाटू शकावं एवढ्या प्रचंड क्षमतेचं आहेच.
’आरक्षण’ जाहीर झाला आणि प्रकाश झानं ज्वलंत वास्तव हातात घेतलंय हे जाणवलं.चित्रपटाचा प्रकाशनकाळ हा वेगवेगळ्या संस्थाप्रवेश कार्यक्रमाचा मौसम.असं हल्ली ठरवून केलं जात असतं.मग माध्यमातून त्याचा फायदा उठवला जात असतो.असं सगळेच करत असतात.
आरक्षण!.. असं म्हटल्यावर सगळेच पेटले.आरक्षण साडे एकोणपन्नास टक्के झालंय! आरक्षणविरोधी आणि आरक्षणाच्या बाजूचे यांची रणधुमाळी चालू झाली नाही तरच नवल.त्यात राजकारणी जिथे तिथे नाक खुपसणार.सगळ्या समाजाचं हित जातं बोंबलत आणि भिजत घोंगडी पडतात सामान्य जनतेच्या गळ्यात.आजन्म.पिढ्यानपिढ्या! आरक्षण निघण्याचीच शक्यता सुतराम नाही! मग आर्थिक मागासलेपणावर ते द्या जातीवर नको! निदान एवढे दिवस झालं आता नको! यावर काही तोडगा निघणं शक्यं नाही! आण्णांचे तीर्थरूप असते तरी त्याना ते जमलं नसतं!
चित्रपटासाठी एक भक्कम पार्श्बभूमी तयार होते.तसं करणं हा एक धोरणीपणा असतोच.प्रकाश झानं हे सगळं जमवलं असं दिसतं.कोर्ट खटले, अनेकांसाठी चित्रपटाचे खेळ आयोजित करणं.मग हे काढून टाकतो, ते काढून टाकतो करत मांडवळ करणं हे ही झालं.
वाहिन्यांवरच्या प्रोमोजमधे आणि इतरत्रं आरक्षण टीम सांगू लागली की आमचा चित्रपट हा आरक्षणावर असण्यापेक्षा शिक्षणाच्या होत असलेल्या बजबजपुरी बाजारीकरणावर आहे.तेव्हा इतरांप्रमाणे प्रकाशही कलटी खातोय असं वाटायला लागलं.सोबतीला धीरगंभीर आणि हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व असलेला, साहित्याची जाण असलेला बुढ्ढा अमिताभ होताच!
तेव्हा आरक्षण हे कॅची टायटल देण्यात व्यवसायाचा भाग आहेच.वाद संपताना किंवा संपवताना आम्ही शिक्षणाच्या बाजारीकरणावर भर दिलाय हा पुढचा धोरणीपणा आहे! खरी परिक्षा पुढेच होती!
प्रकाश झाचा चित्रपट हा मी तो चित्रपट बघण्याची पहिली पायरी आरक्षणनं पार केल्यावर मला दिसलं की आरक्षणची पटकथा प्रकाश झा आणि अंजूम राजबली यांनी मिळून लिहिली आहे.अंजूम राजबली हा एक अभ्यासू पटकथाकार आहे.पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत तो हा विषय शिकवतोही.
आरक्षणच्या पटकथेची वीण मला आवडली.फार गुंतागुंत करायची आणि तरीही प्रत्येक व्यक्तिरेखा व्यवस्थित मांडायची.समस्या मांडलेली असेल तर समस्येचा धागा सोडायचा नाही आणि त्याव्यतिरिक्त प्रेक्षकाला खुर्चीत बसवून ठेवण्याचे सगळे हतकंडे वापरायचे ही पटकथा मांडायची सर्वसाधारण पद्धत.ती इथे चांगल्या पद्धतीने आलेली दिसली.
इथे एक नाजूक विषय होता.ह्या विषयानं निर्माण केलेले प्रश्नं कायम अनुत्तरितच रहाणार आहेत हेही नक्की होतं.प्रकाश झानं आरक्षणवादी आणि त्या विरोधातली अशी दोन्ही मतं एकाबाजूला दीपक (सैफ अली खान) आणि दुसरय़ा बाजूला सुशांत (प्रतीक), पूर्वी (दीपीका पडूकोण) आणि ’पंडित’ इत्यादी व्यक्तिरेखांद्वारे रास्त पद्धतीने मांडली आहेत असं दिसलं.विशेषत: त्या त्या क्षणी चपखल बसणारे आणि पटणारे स्वत: प्रकाश झानं लिहिलेले संवाद. “या तो आप आरक्षण के साथ रह सकतें है या उसके खिलाफ! और रास्ता आपके पास अब नही!” अशा पद्धतीने महाविद्यालय प्रमुख प्रभाकर आनंद (अमिताभ) ला ठणकवणारा आणि संयत पद्धतीने आरक्षणवाद्यांची मानसिकता मांडणारा दीपकही पटतो आणि आरक्षणामुळे अन्याय झालेला सुशांत शेठ, पंडित हेही पटतात. ’पंडित’ या छोट्याश्या व्यतिरेखेचा संपूर्ण प्रवासही या गुंतागुंतीत चांगला मांडला गेलाय.
या दोन्ही ’वाद्यां’च्या कचाट्यात सापडलेल्याचं काय? नुसत्या एकमेकाच्या कॉलरी पकडून दंगे करायचे, राजकारण्यांनी ते घडवायचे, खाजगी शिकवणीवर्गवाल्यांनी त्याचा संपूर्ण फायदा उठवायचा हे सगळं उघड्या डोळ्याने समजणारय़ा आणि हतबलपणे बघत रहाणारय़ा एखाद्या, एखाद्याच सारासार विवेक असलेल्या माणसाचं काय? हे प्रकाशनं उत्तम रितीने दाखवलंय.प्रिन्सिपॉल प्रभाकर आनंदला वादापेक्षा प्रॉब्लेमबद्दल बोलायचं आहे.त्याचं मत हे प्रश्नाबद्दलचं समतोल मत आहे पण ते कुण्णाकुणालाच ऐकून घ्यायचं नाही.कुठल्याही प्रश्नावर असं कुणी बोलू लागला की त्याला डबल ढोलकी बनवण्याची सर्वसाधारण परंपरा आहे.आजच्या आक्रमक, एवढ्या तेवढ्याने पेटून उठणारय़ा आणि मग लढण्यासाठी ’अण्णा’ शोधणारय़ा अनेकांची खरं तर ही गोची आहे पण कुठलीतरी एक बाजू तुम्ही घेतलीच पाहिजे असा जालिम आग्रह आज केला जातोच! नाहीतर तुम्ही डबल ढोलकी, षंढ, अतिशहाणे.. इ.इ. प्रिन्सिपॉलच्या पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीच्या प्रसंगात प्रकाशनं आणि मग अमिताभनं हे संयतरित्या पण परिणामकारकरितीने दाखवलंय.पत्रकाराला तुमच्याकडून त्याला हवी असलेली उत्तरं पायजे असतात.इथला नायक ते ओळखतो.तो त्या अर्थानं सात्विक संतापाने पेटून उगाच हाराकिरी करणारा नाही.तो सगळं जाणून आहे.पुढे त्या मुलाखतीमुळे कसं कसं काय काय होत जातं ते उत्तम पद्धतीने चित्रपटात येत रहातं.हा आणि असे इतर कुठलेही धागे गुंतागुंतीत तुटत नाहीत.
आणखी एक महत्वाचा आवडलेला मुद्दा.दीपक, सुशांत, पूर्वी हे कॉलेजमधले मित्रं.तरूण.तिघांच्याही बाबतीत त्यांचा प्रिन्सिपॉल प्रभाकर आनंदशी संघर्ष होतो.या संघर्षाच्या प्रसंगात हे तिघेही त्यांच्या त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या तरूणाईतल्या समजुतीनुसार अगदी बरोब्बर असतात.प्रभाकर आनंदशी त्या त्यावेळी त्यांचे संबंध तुटतात.नंतरच्या प्रवासातलं त्यांचं आपली चूक समजून ती सुधारणं हा महत्वाचा भाग बघण्यासारखा आहे.हे ट्रॅक्स केवळ नायकाशी जुळवून घेऊन चित्रपटाचा पुढचा प्रवास सुकर करण्यासाठी नाहीत तर तरूणाईनं आपली चूक झाली असेल तर ती स्वत:शी आणि मग त्या मुद्याशी, व्यक्तीशी कबूल करून योग्य कामात सहभागी व्हावं हे सांगण्यासाठी आहे असं जाणवतं.वास्तवात एकूणच असा अनुभव येतो की आजकाल चूक कबूल करणं म्हणजे आपली पोझिशन आपणंच डाऊन करून घेणं.असं अजिबात करायचं नाही.तसंच रेटायचं.अशी प्रवृत्ती सर्रास दिसते.परिस्थिती एकूणच बिघडल्यामुळे, संघर्षमय झाल्यामुळे असेल, मूल्यांचं अवमूल्यन झाल्यामुळे किंवा टोटल सिस्टीम फेल्युअरमुळेही असं असेल पण ते लॉंगटर्ममधे उपयोगाचं नाही.काही चांगलं घडवायचं असेल तर नाहीच नाही.
व्यक्तिरेखा! सगळ्याच माणसांचा संपूर्ण प्रवास गुंतागुंतीतूनही व्यवस्थित दृष्टीस पडतो.समस्या मांडायची असली, मनापासून मांडायची असली तरी चित्रपट ही डॉक्युमेंटरी होऊन चालत नाही.चित्रपट हा व्यक्तिरेखांचा असतो.त्यात एक प्रथम व्यक्तिरेखा किंवा protagonist असतो.सर्वसाधारणपणे त्याच्या दृष्टीनं, point of view नं चित्रपटाचा प्रवास चालू रहातो.नॅरेशनचे इतर प्रकार नसतात असं नाही पण मग पुन्हा सगळ्यांना समजावा अश्या व्यावसायिक चित्रपटात हाच प्रकार सर्वसाधारणपणे वापरला जातो.आरक्षणमधला कोचिंग क्लासवाला खलनायक मिथिलेश सिंगही (मनोज बाजपेयी) पूर्ण लॉजिकने पडद्यावर येतो.त्याचं कूळ, मूळ, शेवट कुठेही सुटत नाही.तो खलनायक आहे म्हणून बलात्कार, पळवापळवी वगैरे करत सुटत नाही.तो नायकाच्या जरूर मागे लागतो पण खलनायकाचं नायकाशी तसं वैयक्तिक आयुष्यातलं काही वैर आहे अशी तद्दनगिरीही टाळली गेलीय.दोन टोकाच्या प्रवृत्तींमधलाच तो संघर्ष वाटतो आणि तरीही तो माणसामाणसातलाही वाटतो.आधीच्या पिढीतला मूल्य जपलेला नायकाचा प्राचार्य मित्र आणि कोचिंग क्लासवर उखळ पांढरं करून घेणारी त्याची सद्यपरिस्थितितली मुलं.कमी मार्क पडूनही चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवण्याचा हट्टं धरणारा राजकारण्याचा भाचा अशी उपकथानकं एकूण मांडणी समर्पकच करतात असं वाटतं.
सगळे मार्ग खुंटल्यावर नायक तडक निघतो आणि.. हा प्रवास बघण्यासारखा आहे.तो त्याच्या व्यक्तिरेखेला साजेसंच वागतो.
अमिताभ हा समृद्ध अभिनेता आहे.त्याच्याजागी इतर कुणाची कल्पना मी करू शकलो नाही. ’ओंकारा’ पासून सैफ अली खानकडे लक्ष ठेऊन आहे.तो अजिबात निराशा करत नाही.वेगळ्या गेटपमुळे तो ती व्यक्तिरेखा वाटतो.भूमिकेचं बेअरिंग तो कुठेही सोडत नाही.बारकावेही सोडत नाही.दीपिका पडूकोण अभिनयाच्या पातळीवर सुखद आश्चर्याचा धक्का देऊन जाते.यात प्रकाश झाने घेतलेल्या संवांदांच्या रिहर्सलचा भागही असावा पण तिनं काही प्रसंगात कमाल केली आहे म्हणण्याइतपत अभिनय केलाय.मनोज वाजपेयी! त्यानं हिरो बनण्याचा प्रयत्न सोडून दिलाय हे अगदी चांगलं केलंय.प्रोमोजमधून तो राजनीतीतल्यासारखाच आहे की काय असं वाटलं.ती भूमिका गाजली होती.पण मनोजनं यात अगदी वेगळ्या पद्धतीनं काम केलंय.त्याचा तुफान गेटप आणि त्याचे एक्सप्रेशन अफलातून.राजनीतीत तो संवादांवर भूमिका पेलतो तर इथे आवाज संयत ठेऊन चेहेर्यावरच्या नेमक्या भावांवर.काही ठिकाणी कॅमेराही त्याच्या मदतीला आलाय.प्रतीकनं (बब्बर) मात्रं निराशा केली.मला तो फद्याच वाटला.एका धूर्त, राजकारणी आणि स्वार्थी प्राध्यापक, विश्वस्ताचा चांगल्या मनाचा खंबीर मुलगा- तो कुठेही वाटला नाही.तो डोळ्यांची अवाजवी उघडझाप करत रहातो त्यानं आणखीच रसभंग होतो.विशेषत: ’जाने तू या जाने ना’ आणि ’धोबीघाट’ मधे प्रतीकने खूपच अपेक्षा निर्माण केल्या होत्या.तो चांगला अभिनेता वाटतो.पण इथे..
शेवट.. धो धो चालणारय़ा कोचिंगक्लासच्या समोर तबेला क्लासरूपी मोफत शिक्षणसंस्था उघडणं फिल्मी वाटणं शक्य आहे पण इथे दिग्दर्शक काही म्हणण्याच्या प्रयत्नात आहे असं माझ्या चित्रपट बघण्याच्या प्रवाहात मला पहिल्यांदा जाणवलं.एक कशोशीने मूल्य जपणारा शिक्षक आपला लढा चालू कसा ठेवणार? असाच! तो हा लढा चालू ठेवतोय म्हटल्यावर त्याला आपला नेता मानणारे त्याच्या कामात आपला वाटा उचलतातच.पण आख्ख्या यंत्रणेसमोर, जी एकवटून भयंकरपणे निस्वार्थीपणे काम करणारय़ाच्या अंगावर येणारंच.मग? इथून पुढे जनता काय करणार हा प्रश्न येतो.प्रभाकर आनंद समोरासमोर तसं आवाहन करतो.बुलडोझरची क्रेन चालवणारा अगदी शेवटच्या थरातला कामगार क्रेन बंद करून पुढे होतो.त्याच्यापेक्षा वरच्या थरातले मध्यमवर्गीय अजून नुसते बघत बसलेले असतात!
चित्रपटाला वेळेची मर्यादा आहे.दृष्यात्मकतेची चौकट आहे.त्यात एरवी सोप्या करून दाखवल्यासारख्या वाटणारय़ा गोष्टीतूनच दिग्दर्शकाला काही म्हणता येत असावं.
’आहे रे’ नी ’नाही रे’ ना उचलून वर घेतलं तरच त्यांचं उत्थान होणार अन्यथा...
आजच्या गुंतागुंतीच्या वास्तवात, टोकाला गेलेल्या, प्रसंगी परस्परांच्या स्वार्थासाठी टोकाला नेल्या गेलेल्या समस्यांवर कोण सोल्युशन देणार? काय देणार?
निदान ही समस्या समग्रपणे मांडायचा प्रयत्नं करणं आणि तेही व्यावसायिक चौकटीत (जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं) हे तसं महत्वाचं, फारसं सोपं नसणारं काम ’आरक्षण’ करतो.एक चांगला अनुभव देतो हे नक्की!
3 comments:
मला अजिबात नाही आवडला आरक्षण... निव्वळ मसालापट वाटला, खूप अपेक्षा होत्या प्रकाश झांकडून, असो :(
मी पण लिहिलंय त्यावर दोन दिवसांपूर्वी...
” कमीने ’हा काय प्रकार होता खरच मला कळलाच नाही. :( प्रकाश झा ने अपेक्षा उंचावल्याने आरक्षण पाहण्याचा मोह होतोय. परंतु बर्याच प्रमाणात निराशादायक सूर उमटलेला पाहून उत्साह कमी झालाय तरीही सगळे कलाकार व झा साठी पाहीन बहुतेक.
@सुहास: तुमचं स्वागत सुहास! आवर्जून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मन:पूर्वक आभार!
आपलं दुमत असू शकतं सुहास.माझं ठाम मत मी वरच्या पोस्टमधे मांडलंय.तुमच्या मताबद्दल मला निश्चित आदर आहे! आभार!
@भानस: स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार भाग्यश्री! सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया निश्चित उमटणार.माझं मत मी मांडलंय!:)
Post a Comment