भाग २ इथे वाचा!
जावडेकरांच्या घरात, हॉलमधे, अंकित टीव्ही बघतोय. शांताबाई स्वैपाकघरात. महेश आणि गौरी सोसायटीच्या गेटमधून आत येताहेत. गौरी तशी ठीकठाकच दिसतेय पण महेश तिला नको तेवढं सांभाळत घेऊन येतोय, “हं! सावकाश! हळू! हळू चल!” गौरी सॉलिड लाजतेय, “ईऽऽश्श काय हे महेश! आख्खी सोसायटी बघतेय!”
“बघू दे! बघू दे! माझ्याच बायकोला धरलंय मी! तू, गौरी चालण्याकडे लक्ष दे! सावकाश! सोसायटीवाल्यांचं बघतो मी! हं!”
तरीही गौरी लाजतेय, “अरे पण- शी:”
“नव्या नवरीसारखी लाजतेएस हं अगदी!”
“तू करतोएसच तसं!”
महेश आवाज चढवतो, “आता काय केलं मी?”
“गप रे! शी बाबा!”
“हं! चला बाबा- आपलं हे- आई! पायरय़ा आहेत पुढे! हळू-”
महेशचा पायच पायरीवरून सरकतो, “अगं आई गं!”
गौरी त्याला धरते पण तिला हसू आवरत नाही.
“आईऽऽ- हं हस तू हस लगेच!”
“मग काय करू? मला सावकाश सावकाश चालायला सांगतोस आणि तू-”
महेश पाय चोळतोय, “बेल वाजव! बेल वाजव!”
गौरी हसत हसत बेल वाजवते. आत, हॉलमधे टीव्ही बघणारा अंकित डिस्टर्ब झालाय.
“एऽऽ आज्येऽऽ इस्त्रीवाला आला बघऽऽ”
महेश बाहेर खूष आहे, “आईला अगदी सरप्राईज आहे हं!”
गौरीला ते काय, ते कळत नाहिए, “काय रे काय काय?”
महेश कपाळाला हात लावतो, “आता, काऽऽय?”
तेवढ्यात शांताबाईंनी दार उघडलंय, “काय रे झालंय काय? कपाळाला हात लावलाएस?”
महेश झपकन कपाळावरचा हात काढतो, “क- कुठे- काही नाही! काही नाही!”
पुन्हा गौरीला धरतो, “चल सावकाश! हळू! हळू चल!”
शांताबाईंचा चेहेरा त्रासिक, “हीला काय झालंय आणखी?”
आता अंकितही पुढे झालाय, “ममा ममा काय झालं? काय झालं तुला?”
महेश लाडात, “अंकिऽऽत त्रास द्यायचा नाही ममाला आता!”
गौरी ’ईऽऽश्श!” करून पुन्हा सॉलिड लाजतेय आणि शांताबाई बारकाईने तिच्याकडे पहाताएत.
“चला! हं! गौरी पाया पड बघू आईच्या!”
“म- माझ्या???”
गौरी आणखी लाजत बेडरूमच्या दिशेने पळते.
“हऽऽहऽऽ लाजतेय आई ती लाजतेय! लाजतेय ती!.. मी आलोच हं आलोच!”
महेशही बेडरूमच्या दिशेने बघत गौरी पाठोपाठ धावत सुटतो.
“आजी! मी पण जाऊ?”
“मी नाही म्हणाले तर थांबणार आहेस?”
’येऽऽ’ असं ओरडत अंकितही त्यांच्या मागोमाग धावतो.
“जा तू!.. आई लाजतेय आणि बाप घोड्यासारखा धावतोय! काय जगावेगळंच एकेक! मी चौथ्या वेळेला गरोदर राहिले, तर आमचे हे लाजले होते!” हैराण झालेल्या शांताबाई कपाळाला हात लावत स्वैपाकघरात निघून जातात…
बेडरूममधे अंकित खूप एक्साईट झालाय, नाचतोय; “पपा काय झालं? काय झालं? काय झालं?”
“अरे नाचणं थांबव अंकित! आपल्या ममाला किनई बरं नाहिये!”
“पण पपा ती तर लाजतेय!”
“अरे बरं नाहिए म्हणून!”
“हॅट हॅट! बाळ होणारे तिला! हो किनई गं ममी?”
गौरी चकीत होऊन महेशकडे बघतेय, “अरेऽऽ अंकू!.. पण तुला कसं कळलं हे?”
“पण तुझं पोट तर छोटूसंच आहे अजून!”
आता महेश चकीत, “ अरे अंकित-”
“त्या ’बडी बहू’ सिरियलमधे नाही का तो टकलू असाच हळूहळू घेऊन येत असतो त्या बाईला! पण ती त्याची बायको नसतेच आणि.. तिचं पोट तर-”
तोपर्यंत शांताबाई स्वैपाकघराच्या दारात आल्याएत, “अंकिऽऽत! एऽऽअंकित! चल! जेवायला चल!”
अंकितचं त्यांच्याकडे लक्ष नाही, “अशी अशी चालत असते ती-”
“अंऽऽकितऽऽ”
शांताबाईंच्या दुसरय़ा हाकेने महेश सावध झालाय, “चला! चला! चला! अंकुबाळ जेऊन घ्या हं आता तुम्ही! खूप जेवलं नं-”
“काय होतं? पोट मोठं होतं!”
महेशला स्वत:च्याच तोंडावर हात ठेवणं भाग पडतं, “अरे!.. नाही! खूप जेवलं नं की खूप अक्कल येते! आम्हाला दिसतेय ती! खूऽऽपऽऽ चला!”
शांताबाई फणकारय़ात आहेत, “तुमचं झालं की तुम्ही या!”
महेशच्या ते लक्षात येतं, “काय?”
शांताबाई आता चिडल्याच आहेत, “लवकर जेऊन घ्या!” तरातरा स्वैपाकघरात निघून जातात..
(क्रमश:)
2 comments:
चांगलं चाल्लंय! ;)
आशिर्वाद असूद्या म्हणजे झालं! :p
Post a Comment