romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, September 3, 2015

'गुरुजनां प्रथमं वंदे' पुस्तक उपलब्ध...

अभिलेख प्रकाशनातर्फे ''गुरुजनां प्रथमं वंदे'' या कादंबरीची पुस्तकं पुस्तकवाले डाॅट काॅम, आयडिअल-दादर, मॅजेस्टिक-शिवाजी मंदिर, पीपल्स बुक हाऊस-फोर्ट, शब्द द बुक गॅलरी- बोरिवली, बुकगंगा-पुणे, रसिक साहित्य-पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत...
           
               प्रस्तावना  : श्रीनिवास हेमाडे

मराठी व्युत्पत्ती कोशकार कृ पां. कुलकर्णी यांच्या नोंदीनुसार 'प्रस्ताव' या संज्ञेचा अर्थ शोधण्यासाठी ज्ञानदेवांपर्यंत प्रवास करावा लागतो. ज्ञानदेवांनी सांगितलेला अर्थ उपक्रम, प्रसंग (occasion) असा असून 'प्रस्तावणे' चा अनुषंगिक अर्थ 'सांगण्यास आरंभ करणे'. गेल्या काही दशकापासून 'ठराव' (resolution) हा प्रशासनीय अर्थ जोडला गेला आहे, असेही कृपां. नमूद करतात. उपोद्घात, आरंभ हे अन्य समानार्थी मराठी शब्द. Preface, Prelude, Precursor, Preamble, Prologue, Forward, Protasis, Prolusion, Prolepsis, Prolegomena, Prefix हे आणखी काही आंग्ल भाषेतील समानार्थी शब्द. या प्रत्येक शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करणे शक्य आहे (पण त्या जंजाळात शिरण्याची ही जागा नव्हे). Preface, Prelude इत्यादी संज्ञा शोधनिबंध, प्रबंध इत्यादी ज्ञानक्षेत्रात (academic field) वापरले जातात आणि तेथे ते फिट बसतात.
मी येथे 'प्रस्तावना' हा शब्द Forward या अर्थाने घेत आहे. पुढे जाणे, जात राहणे, सरकवणे, विद्यमान स्थिती ओलांडून प्रगत दिशेन जाणे या अर्थाने Forward  उपयोगात येतो. या कादंबरीत जे काही वास्तव (वास्तवातील किंवा कल्पितातील) वाचकाच्या समोर येईल, त्या पलीकडे त्याने जावे, काहीएक विचार करावा; असे सूचन येथे अपेक्षित आहे.
तस्मात, ही प्रस्तावना म्हणजे या कादंबरीत काय आहे याचा गोषवारा देऊन तिचा परिचय देणे नाही. त्याचप्रमाणे समीक्षा करणेही नाही. ग्रंथ परिचय व समीक्षा यात फरक आहे, हे आपण जाणतो. या दोन्ही मूलतः स्वतंत्र साहित्यिक कृती आहेतच. ग्रंथ परिचय देण्यात समीक्षा नसते, पण समीक्षेत परीक्षणासह ग्रंथाचा, कलाकृतीचा परिचय तिच्या विविध अंगासह येतो. समीक्षा परिचयापेक्षा व्यापक असते. त्यामुळे परिचय देणे, समीक्षा करणे हाही प्रस्तावनेचा हेतू नसतो.
           प्रस्तावना म्हणजे लेखनाची जाहिरातही नसते. त्यासाठी बाजार खुला आहे.
'प्रस्तावना' हा शब्द Forward या अर्थाने घेतला तर प्रस्तावनेच्या निमित्ताने लेखकाने, कवीने, साहित्यिकाने हाताळलेला विषय वाचकासमोर आणणे, लेखनाची समकालिन उचितता आणि विद्यमान काळात तिचे महत्त्व अधोरेखित करणे, असे मी मानतो. पण येथेही  न थांबता प्रस्तुत कादंबरीच्या विषयाचा, आशयाचा आलेख पाहता ती सामाजिक वास्तव मांडणारी असल्याने त्या वास्तवाचा प्रथमपुरुषी एकवचनी वाचकाने स्वतःशी कोणते नाते आहे, याचा शोध घ्यावा, हे अपेक्षित आहे. म्हणजेच वाचन आणि मनरंजन या पलिकडे वाचकाने जाणे अपेक्षित आहे.
           लेखक म्हणून विनायक पंडितांना हा विषय सुचला, भावला. याचा अर्थ त्यांच्या अंर्तमनात कुठेतरी खोलवर त्यांना यातील भंपकपणाची जाणीव झाली. त्याचवेळी माणूस विचारापेक्षा विकारांपुढे, अंध रूढी, परंपरापुढे  झुकतो, या कटू वास्तवाची जाणीवही झाली. ती सगळी अस्वस्थता त्यांच्या लेखनातून, त्यातील उपहासात्मकतेतून पुढे येते. हे एका संवेदनशील मनाचे जाणवणे आहे. त्यांच्या या भावनेशी आपण समरस होऊ शकतो का ? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे.
            कादंबरीचे कथानक म्हणजे धर्मभावनेचे होणारे औद्योगिकीकरण. पाच गुरुजनांनी मांडलेला जीवघेणा खेळ- गुरुपंचक ! एक आधुनिक गुरुरिसॉर्ट. 'रिसॉर्ट' म्हणजे विश्रांतीस्थळ. ही आधुनिक मूलतः पाश्चात्य-युरोपीय बाब आहे. आठवडाभर मरमर काम करून आठवड्याच्या शेवटी शरीर, मन, बुद्धि यांना विश्रांती देणे, पुढील काळासाठी त्यांना ताजेतवाने करणे हे आरोग्यविषयक सूत्र यात सामावलेले आहे. गुरुसंकुल किंवा गुरुरिसॉर्ट ही काय संकल्पना आहे?
गुरुरिसॉर्ट हे आजच्या भीषण भारतीय समाजाचे वास्तव आहे. भारतीय धर्मजीवन कसा अधिकाधिक अवनातीकडे प्रवास करीत आहे, याचे हे भेदक चित्रण आहे. ते करताना लेखक विनायक पंडित यांची आतील जाणीव त्यांच्या भाषेला उपहासाची, तिरकसपणाचा आविष्कार देते. भाषेचे अनेक नमुने प्रगट करण्यास प्रवृत्त करते.मद मोह काम या रिपुंच्या विळख्यातून बाहेर न पडलेल्या या गुर मंडळींचं सत्य रिपुग्रस्तरूपदर्शन घडवित लेखक अखेरीस लोकशाही प्रशासन, विज्ञान- तंत्रज्ञान कसं उपकारक ठरत, याचा पुरावा देतो.
हा खेळ भारतीय भूमीत घडतो. भारतीय मानसिकता प्राचीन काळापासून आगतिक आहे. भारत विज्ञानवादी देश असल्याचा, वैज्ञानिकता या मातीत असल्याचा दावा करणारी ही संस्कृती वास्तवात वैज्ञानिक वृत्ती विकसित करू शकली नाही. हे घडते, कारण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मानवी गरजेचा आपण धंदा करण्यास शिकलो आहोत ! विशेषतः १९९० नंतरच्या तथाकथित जागतिकीकरणाच्या लाटेने मुलभूत मानवी भावना बाजारू बनविल्या गेल्या. त्या कशा याचे दर्शन लेखक विनायक पंडित येथे तपशिलासह घडवितात.
संस्कृतीची विक्री करता येते का ? तिला बाजारपेठेत उभी करता येते का ? तिचा धंदा, उद्योग करता येतो का ? तसे करणे किती नैतिक आहे ? संस्कृती उद्योगाची नैतिक पातळी कोणती ? या सारखे प्रश्न उपस्थित करता येणे आवश्यक आहे, तरच आपण योग्य 'प्रस्तावना'(Forward) करीत आहोत, असे वाचकांना वाटेल, अन्यथा नाही. प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे पुढे सरकणे, योग्य दिशेने कूच करणे.
संस्कृतीची व्याख्या करता करता जगातील तत्त्ववेत्ते , विचारवंत , क्रांतिकारक, राज्यकर्ते, राजकीय तत्त्ववेत्ते थकून गेले. जगण्याची रिती असलेली संस्कृती बाजारपेठेत वस्तू म्हणून आली तर तिचे स्वरूप काय राहील ? या कृतीला संस्कृतीचे स्वरूप मानता येईल का ? मग अशी संस्कृती ही कोणती संस्कृती ?
            उत्तर शोधता येईल.
            'संस्कृती उद्योग' या संकल्पनेची मांडणी प्रथम थीओडोर अडोर्नो (१९०३ -१९६९ Theodor Ludwig Wiesengrund, Adorno)  आणि मॅक्स हॉर्कहायमेर (१८९५-१९७३ Max Horkheimer) या दोन जर्मन ज्यू समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्त्यांनी केली. जर्मनीतील फ्रॅन्कफूर्ट स्कूल (Frankfurt School) या नावाने प्रसिद्ध पावलेल्या विचारसरणीशी दोघेही निगडीत होते. समीक्षात्मक सिद्धान्त ( critical theory) हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.  
   'संस्कृती उद्योग' (The Culture Industry) हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या डायलेक्टीक ऑफ एनलायटेनमेन्ट (Dialectic of Enlightenment १९४४) या ग्रंथातील "दि कल्चर इंडस्ट्री : एनलायटेनमेन्ट अॅज मास डिसेप्शन" (“The Culture Industry: Enlightenment as Mass Deception”) या प्रकरणात वापरला.
'संस्कृती उद्योग' (The Culture Industry) ही संज्ञा 'अस्सल संस्कृती' (authentic culture) च्या विरोधी अर्थाने ते वापरतात. संस्कृतीचे बाजारीकरण करणे म्हणजे 'संस्कृती उद्योग'. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा काही प्रमाणात व्यापारी तत्त्वावर उपलब्ध होणे, ही समाज व्यवस्थेचे अंग होऊ शकतात. पण त्यांचे व्यापक प्रमाणावर बाजारीकरण होणे आणि शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, यासारख्या लोकशाहीने मान्य केलेल्या गरजांचे उद्योगीकरण होणे यात फरक केला पाहिजे.
       'संस्कृती उद्योग' या संकल्पनेतील 'उद्योग' चा अर्थ समजावून घेतला पाहिजे. प्रत्येक सांस्कृतिक कृतीला बाजारपेठीय मूल्य देणे, म्हणजेच ती पैसे देवून विकत घेता येईल आणि विकता येईल, अशी एक वस्तू बनविणे, हे या उद्योगाचे स्वरूप आहे. एकदा ती खरेदी-विक्रीची वस्तू बनली की तिला बाजारपेठेचे विपणन, जाहिरात, वितरण यांचे नियम लागू होतात. मग अनेक ठिकाणच्या लाखो ग्राहकांना ती उपलब्ध व्हावी, यासाठी ती एकसाची बनविली जाते. यात त्या वस्तूची मौलिकता आणि विविधता मारली जाते. MACDOLAD, KFC, PIZZAHUT, किंवा असेच काहीतरी अथवा मॉल्स ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. कोणत्याही दुकानात खरेदी केलेली वस्तू त्या कंपनीच्या अन्य कुठल्याही दुकानात कुठेही बदलता येण्याची सवलत याचा अर्थ सर्वत्र एकसाची वस्तू मिळतील, असा होतो.  
          अडोर्नोच्या मते, प्रगत भांडवलशाही हाच सामान्य जनतेविरुद्ध एक मोठा  कट आहे आणि 'संस्कृती उद्योग' (Culture Industry) हा त्याचा अनिवार्य हिस्सा आहे.
          अडोर्नो संस्कृती उद्योग आणि जनसंस्कृती यात फरक करतो. जनसंस्कृती ही साऱ्या समाजाचा सहभाग असणारी, प्रत्येक माणूस ज्याचा निर्मिक, वाहक व उपभोक्ता आहे, जो पुढच्या पिढीला आपल वारसा म्हणून संक्रमित करतो अशी असते. त्या उलट अस्सल संस्कृती अशी स्वयंमेव मूल्यवान असते. ती उत्क्रांत झालेली आहे, ती दीर्घकालीन मानवी सर्जक प्रक्रिया आहे. ती मानवी कल्पकता, जगण्याचा संघर्ष करते. धर्म, तत्त्वज्ञान निर्माण करते. ती अशी काही पूर्वनियोजित रचित नसते. जनसंस्कृती ही उत्क्रांत झालेली अवस्था आहे तर 'संस्कृती उद्योग' अनेक कृत्रिम गरजांना जन्म देतो. त्यात साधा पाव ते पिझ्झापासून धार्मिक समजला जाणारा उन्मादक अनुभव यांचा उद्योगधंदा करणारी वस्तूंच्या यादीत समावेश होतो.
कुठल्याही उद्योग धंद्याप्रमाणे संस्कृती उद्योगाचाही एकच हेतू राहतो- केवळ नफा ! म्हणजे या उद्योगाचे स्वरूप सांस्कृतिक न राहता निव्वळ आर्थिक बनते. खाणे, पिणे, कपडेलत्ते, घरे, रस्ते प्रत्येक गोष्ट विकणे आणि विकत घ्यावयास लावणे हा संस्कृतीचा उद्योग करणे असते. जी जी गोष्ट सांस्कृतिक म्हणविली जाईल ती प्रत्येक कृती, वस्तू, घटना म्हणजे सण, उत्सवासह रोजचे दैनंदिन खानपान सुद्धा विक्रीला आणणे. साध्या गप्पा मारणे ते घरचा गणपती, मंगळागौर, घटस्थापना, या साऱ्याचे सार्वजनिकरीत्या साजरे करणे, त्या करण्याची कंत्राटे घेणे हा उद्योगधंदा बनतो. मंगलाष्टकं, भटजी ते साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ लग्नाची पहिली रात्रीची तयारी यांचे कंत्राट बनते. मग त्यात एकसाचीपणा आणला जातो. अशा कार्यक्रमात, समारंभात घरच्या प्रत्येक माणसाचा, मित्र, आप्तेष्टांचा असलेला सहभाग नष्ट होतो. 'संस्कृती' या नावाने जी विविध वस्तूची दुकाने, हॉटेल्स पहिले की लक्षात येईल.  
             मानवी संस्कृतीचाच अनोखा आविष्कार असलेला 'धर्म' सुद्धा 'धंद्याच्या' विषारी विळख्यातून सुटत नाही. प्रत्येक धर्म जणू काही दुकान बनला आहे. परिणामी,
(१)धर्म ही अमूर्त मूळ भावना, त्यास जोडून येणारा धार्मिक अनुभव, धर्मविषयक ज्ञान ही बाब
     एक उत्पादन' बनते.
(२) गुरु, शिष्य ही माणसे विक्रेते बनतात.
(३) गुरुशिष्य परंपरा ही व्यवस्था विक्रीव्यवस्था बनते.
(४) मंदिरे, मशिदी, चर्च,गुरुद्वारा इत्यादी प्रार्थनास्थळे म्हणजे दुकाने बनतात.
अशा  रीतीने समग्र धर्मसंस्था हा एक उद्योगसमूह बनतो.(उदा. पीके हा चित्रपट )
माणसाची जगण्यासाठीची होणारी लढाई निरर्थक आहे, त्याऐवजी त्यांनी देवी-देवता, बाप्पा, बजरंगबली, महादेव,गुरु महाराज, योगी पुरुष, अम्मा, माताजी, बापू, तांत्रिक, मांत्रिक यांना शरण जावे, त्यांना जगणे समर्पित करावे अशी योजना 'संस्कृती उद्योगसमूहा' कडून आखली जाते. माध्यमे केवळ त्याचसाठी वापरली जातात, असे अडोर्नो स्पष्ट करतो. व्यक्तीची आणि जनसमूहाची सामाजिक जाणीव, सामाजिक नैतिकता नष्ट होऊन समाज जास्तीत जास्त अंधश्रद्धा बाळगणारा होईल, आंधळा, बहिरा, अविचारी शिष्यवर्ग तयार होईल, असे पहिले जाते. "वर्तमान समाज व्यवस्था ही एक सकारात्मक, विधायक व्यवस्था असून ती ईश्वर निर्मित आहे, ईश्वर सर्वांचा तारणहार आहे" हे ठसविण्यासाठी मधले दलाल म्हणून समस्त अण्णा बापू महाराज मंडळीची स्थापना केली जाते.        
 अडोर्नो- हॉर्कहायमेरच्या मते, संस्कृतीच्या उद्योगीकीकरणाचे माध्यम कोणते ? तर चित्रपट, रेडीओ, टीव्ही, टेलीफोन ही लोकमाध्यमे. या जनमाध्यमांनी "लोकप्रिय संस्कृतीला' (पॉप्युलर कल्चर) ला जन्म दिला. ही संस्कृती लोकांना मनोरंजनाच्या गुंगीत ठेवते आणि समाजातील खऱ्या समस्यांपासून त्यांचे परात्मीकरण करते, त्यांना निष्क्रिय बनविते. लोकांची आर्थिक परिस्थिती कशीही कितीही हलाखीची असली तरी ही जनमाध्यमे लोकांना अंधानुयायी आणि आत्मतुष्ट करून टाकते. स्वातंत्र्य, सर्जकता आणि आनंद या माणसाच्या अस्सल मानसिक गरजा असताना त्यांना मिथ्या उच्च कलांमध्ये आणि चंगळवादी भांडवली गरजांमध्ये गुरफटवून टाकते. या गरजा केवळ भांडवलशाहीच पूर्ण करू शकेल, असा खोटा विश्वास त्यांना देते.  
            हे कोण करतं ? तर जगातील विविध कंपन्या, मोठाले उद्योगसमूह. आधुनिक भांडवलशाहीचे अपत्य असणारी ही कंपनी संस्कृती हे कारस्थान करते. मोबाईल, वडापाव ते गृहनिर्माण संकुले यांचे ते जणूकाही मॉल्स उभे करतात. अडोर्नोच्या म्हणण्यांनुसार आधुनिक भांडवलाचा एकमेव हेतू संपूर्ण मानवी समाज कह्यात घेणे, त्यासाठी विविध मानव गटातील बारीकसारीक मतभेद मिटविणे, त्यांना एका समान गरजेच्या एका सूत्रात गोवणे हा आहे. गरज समान झाली की माणसाची चिकित्सक वृत्ती नाहीशी होते किंवा ती नाहीशी करणे सोपे जाते. हे काम 'संस्कृती उद्योग' नावाचा उद्योगसमूह उभारून करता येते. संस्कृती उद्योगधंद्यामधूनच 'सुखासीनतेचा उद्योग' (The leisure industry) विकसित झाला. पर्यटन, हॉटेल व्यवस्थापन हे उद्योग त्यातून आले. त्याचाच भाग म्हणून सेक्स टुरिझम आला.
            'मानवी संस्कृती' एकदा 'उद्योग' म्हणून मान्य झाली की काय घडते ? तर ती लोकांमधील मुळची संस्कृती निर्माण करण्याची नैसर्गिक अभिवृत्ती, प्रवृत्ती, इच्छा यांची हत्या होते. ते एकसाची जीवन जगू लागतात. हा नवा सर्वंकषवाद (Totalitarianism) बनतो.
          दुसरीकडे संस्कृती निर्माण करण्यावर मक्तेदारी निर्माण होते. भांडवलशाही संस्कृती उत्पादकाची जागा घेते. तीच 'संस्कृती म्हणजे काय ? " ते ठरविते. म्हणजे  जी गोष्ट सर्वांची असते ती काही मूठभरांची होते. या प्रक्रियेत संस्कृती नष्ट होऊ शकते. लोकांच्या हाती केवळ उपभोग घेणे राहाते आणि लोक मग तेच करीत राहतात. परिणामी सर्व चित्रपट, टीव्ही वरील कार्यक्रम एकसाची होतात. उत्पादनातील एकसाचीपणा हे यांचे वैशिष्ट्य बनते. परिणामी मॉल्समध्ये एकसारख्या वस्तू उपलब्ध होतात.
           'संस्कृती उद्योग' या संकल्पनेची सांगड भारतीय समाजाशी घातली तर 'आधुनिक भारतीय संस्कृती उद्योग' या नावाची नवी गोष्ट मिळते. पण यातील आधुनिक म्हणजे लोकशाहीप्रधान असे नसून 'नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाने युक्त केवळ उपभोगी समाज' असा अर्थ लावावा लागतो. वैज्ञानिक दृष्टी विकसित झालेला समाज असा अर्थ लावता येत नाही. तसे झाले असते तर विनायक पंडितांची हीच कादंबरी काय, पण अशा प्रकारे रहस्यभेद करणारी कोणतीही कादंबरी अथवा  कलाकृती निष्पन्न होण्याची वेळ आली नसती !
        भारतात भांडवलशाही आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो. वास्तवात हिंदुत्ववादी विचारसरणीत भांडवल नावाची गोष्ट नाही. तेथे सत्ता आहे आणि ती सांस्कृतिक स्वरुपाची आहे. ज्ञान हे या सत्तेचे मुळरूप आहे आणि समग्र संस्कृती हा तिचा आविष्कार आहे. पुरुषार्थ व्यवस्था, आश्रम व्यवस्था आणि वर्ण-जाती-जमाती व्यवस्था यांचा एक अत्यंत गहिरा अंर्तनिहित तार्किक संबंध दाखविता येतो. आर्थिक भांडवल या विचारसरणीत कधीही महत्वाचे नव्हते आणि नाही. ज्या हिंदुत्ववादी घटकांना अर्थ हेच बल वाटते, ते खऱ्या अर्थाने हिंदूत्ववादी  नसतात. ज्यांची नावे आर्थिक व्यवहारांशी म्हणजे भ्रष्टाचार, गुप्त-सुप्त गुंतवणुकी, इत्यादीत जे गुंतलेले असतात, ते हिंदू असतील पण अस्सल हिंदुत्ववादी नसतात.
       पण हिंदुत्ववादी, इस्लामवादी इत्यादी धर्मगुरूंना वर्ण-जात-लिंगभेद व्यवस्थेत 'संस्कृती उद्योग' गवसला आणि कमाल हीनतम राजकारण सुरु झाले. संस्कृती हा 'उद्योग' खरे तर नफेखोरीचा धंदा (trade)  बनल्याचा परिणाम भारतात अतिभीषण झाला. एकतर,  प्राचीन  काळात विविध कारणांमुळे भयंकर प्रसिद्ध झालेली अवैदिक-वैदिक अशा दोन्ही परंपरेतील गुरु-शिष्य पद्धती, गुरुकुल रिती बदनाम झाली.  मुळात ही पद्धती वर्ण, जात, लिंगभेदानीं ग्रस्त झालेली, पक्षपाती होतीच. पण आज विसाव्या शतकात तिला थेट धंद्याचे स्वरूप दिले गेले आणि पुन्हा एकदा ती 'आहे रे नाही रे' च्या विळख्यात सापडली. दुसरीकडे, साईबाबासारखे सर्वधर्मसमभाव असणारी सुफी संतपीठे म्हणजे धार्मिक उद्योगसमूह झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र या सारख्या सणांना तर उघडपणे उद्योगाचे स्वरूप दिले गेले आहे.
          आपण हे लक्षात घेतले पाहिजे की  धर्म, धर्मभाव, धार्मिकता, धर्मसंस्था, धर्मगुरू, धर्मसंप्रदाय यांचे मुलभूत सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक कार्य पाहता आणि भूमिका लक्षात घेता धर्म भावनेने मानवी मनाची, मानवी बौद्धिकतेची, त्याच्या प्रज्ञेची रचना केली आहे. 'धर्म' ही संस्कृत किंवा देवनागरी भाषेत मांडली जाणारी वैदिक हिंदू संकल्पना आणि तिची समांतर असणारी Religion ही ग्रीक-पाश्चात्य संकल्पना   इस्लाम, ख्रिस्ती,शिंतो इत्यादी धर्म कल्पना याही आणखी इतर वैशिष्ट्यांनी सजलेल्या आहेत.
        'धर्म' या संकल्पनेचे विवेचन, विवरण, त्याचा अन्वय, मुलार्थ, लक्षार्थ या तत्त्व जंजाळात पडण्याचे येथे काही कारण नाही. तो पंडितांचा, विद्वानांचा, अभ्यासकांचा अभ्यासाचा प्रांत आहे. अर्थात अभ्यास आणि जगणे यात फरक करता येणे आणि या दोन जीवन पद्धतींना एकमेकांपासून अलग करता येणे शक्य आहे. या अभ्यासाचाच एक भाग म्हणून धर्माचे तत्त्वज्ञान ही अधिपातळीवर जाणारी आणि नेणारी अन्य एक चिंतन शाखा आहे.    
        इथे एक फरक लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. सर्वधर्म अध्ययन केंद्र आणि सर्वधर्मसंकुल या दोन भिन्न गोष्टी आहेत. तसेच धर्मातील तत्त्वज्ञान आणि धर्माचे तत्त्वज्ञान या दोन स्वतंत्र  बौद्धिक घटना आहेत. धर्मातील तत्त्वज्ञान म्हणजे त्या त्या धर्मातील तत्त्वे, जीवनरिती, त्यांचे नियंत्रण सांगणे. धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे धर्म या संकल्पनेची सर्वांगीण काटेकोर तार्किक चिकित्सा करणे. सर्वधर्म अध्ययन केंद्र ही  चिकित्सा करते तर सर्वधर्मसंकुल धर्माचे दुकान मांडते, धार्मिक दहशतवाद निर्माण करते. त्यात आणखी प्रगत टप्पा नमूद करावयाचा असेल तर धर्माचे नीतिशास्त्र  ही  बौद्धिक घटना देखील आणखी वेगळी आहे.      
            जगाकडे नसलेला एक अहिंसक उपाय भारताकडे गांधीवाद रूपाने अस्तिवात होता आणि आहे. तो स्वदेश, वीर-झारा, चक दे  इंडिया,  लगे रहो मुन्नाभाई, ओ माय गॉड,  देऊळ आणि आजचा पीके  सारख्या चित्रपटात आढळतो.
           धर्मसंकुल काय भीषण परिणाम करते, कोणता अमल चालविते, याचे चित्रण करण्यात लेखक विनायक पंडित यशस्वी झाले आहेत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो...

Tuesday, June 16, 2015

जुळी

कारण, कार्यकारणभाव चित्रपटकृतीसाठी कितपत आवश्यक असतो?...
चित्रपटकृतीची रचना करताना आशय, कंटेंटमधे डिवाईसेसचं महत्व किती?...
बाय डिवाईसेस आय मीन लाॅस्ट अँड फाऊंड फार्म्युला, फ्लॅशबॅक तंत्र, बॅक अँड फोर्थ पद्धतीची रचना (उदा. रंग दे बसंती), डाॅ जेकील अँड मि. हाईड फाॅर्म्युला आणि गेलाबाजार वेषांतरं, डबल रोल...
डबल रोल हे साधन कुठून आलं असावं?... परदेशी कलाकृती हा इथल्या तमाम कलाकृतींचा आदर्श, कच्चामाल, चोरी करण्यासाठीचं उत्तम, आधीच तावून सुलाखून सिद्ध झालेलं साधन...
एखाद्या कलाकृतीची चोरी ही चोरी पण कल्पना एकासारख्या एक कुणालाही सुचू शकतात हे मान्य झालं की संपलंच... चित्रपटसृष्टीसाठी तर नक्कीच... इथल्या चित्रपटसृष्टीसाठी तर... असो!
बिमल राॅयच्या दर्जा सांभाळून रंजन करणार्‍या शिष्यांमधल्या एका शिष्याच्या कलाकृतींच्या मूळ स्फूर्ती बर्‍याचशा बंगाली आणि एखाद परदेशीसुद्धा... त्याने त्या आपल्या कुशलतेने त्या त्या काळात परिणामकारक ठरवल्या. आजही त्याचे चहाते त्या नावाजतात...
याबाबतीत मूळ प्रेरणेपेक्षा तुम्ही तिचा वापर तुमच्या कलाकृतीत कसा केलाय हे निदान व्यावसायिक चित्रपटसृष्टीत तरी महत्वाचं मानलं गेलंय...
मुद्दा आहे डबलरोल या डिवाईसच्या वापराचा. नुकत्या नावाजल्या गेलेल्या एका चित्रपटातला नायिकेचा डबलरोल जास्तीत जास्त खरा वाटेल असा वठलाय. एरवी नायकाचं पडद्यापेक्षा मोठं असणं आणखी कॅश (?) करणं, केवळ श्वेतधवल सुष्टदुष्ट संघर्ष दाखवणं यासाठी डबलरोल हे साधन वापरलं गेलं. वर उल्लेखलेल्या नुकत्याच आलेल्या चित्रपटात दुसर्‍या भूमिकेतली व्यक्तिरेखा ही आपल्या मोडक्या संसारातल्या बायकोसारखी दिसणं हा नायक पुरुषाच्या अंगानं आणि एकूणच भारतीय पुरुषी मनाच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. आपला नवरा पुन्हा लग्न करतोय हे कळल्यावर त्या बायकोनं हे दुसरं लग्न लागेपर्यंतचा काळ सतत त्या नवर्‍याच्या नजरेसमोर असण्याचा अट्टहास करणं हा वेगळा भाग इथे आहे... बायकोसदृष व्यक्तिरेखा व्यवहारी रोखठोक तर मुळातली बायको प्रचंड मानसिक गोंधळ असलेली...
सदृष व्यक्तिरेखांमधला फरक दाखवताना ढोबळ सुष्टदुष्टपणा दाखवणं (गोरा और काला), विशिष्ट मॅनेरिझममधला फरक दाखवणं, एक लाचार, दुसरा सेव्हिअर- रक्षणकर्ता दाखवणं... अशी सतत वापरलेली म्हणून लोकप्रिय आणि लोकप्रिय म्हणून सतत वापरली गेलेली आवर्तनं लगेच आठवतात...
एकसारखे दिसणारे बाप, दोन मुलगे आणि त्याहीपुढे नवरसांच्या धर्तीवर नऊ भूमिकाही सादर झाल्या. लोकप्रिय झाल्या...
गुलजारच्या मौसम (loosely based on the novel, The Judas Tree, by A.J. Cronin.) नायकाच्या आयुष्यातली प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी यांतलं कमालीचं सादृष्य आणि नायक, प्रेयसीच्या आठवणी आणि वेश्येच्या रुपातली मुलगी हा तिढा परिणामकारक ठरण्यात डबलरोल साधनाचा महत्वाचा भाग आहे.
गुलजारनं त्याही पुढे महानाटककाराच्या ’काॅमेडी ऑफ एरर्स’चं देशी रुप सादर केलं. यात दोन- खरं तर चार- व्यक्तिरेखांमधलं ढोबळ वेगळं रुप, स्वभाव इत्यादी न दाखवता एका जुळ्या जोडीच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीत दुसरी जोडी आणून छान गोंधळ घातला गेला होता. (mistaken identity) 'दो दुनी चार' हा जुना सिनेमा याच थीमवरचा, जो गुलजार यांनीच लिहिला होता. किशोरकुमार, असित सेन यांच्या यात भूमिका होत्या...
त्यामुळे डबलरोलचं मूळ शेक्सपियरपर्यंत जाऊन पोहोचतं किंवा त्याही आधीच्या लोककथांमधे. शेक्सपियरची बहुतांश नाटकं अशा परंपरागत कथांवर आणि जुन्या नाटकांवर आधारित होती असं म्हटलं जातं...
’तनु वेड्स मनू रिटर्न्स’ या ताज्या चित्रपटात दुसर्‍या भूमिकेच्या रंगभूषेत सरळ केसांचा विग आणि समोरच्या दातांमधे अगदी हलका बदल केलाय. बॉलिवूडमधे अलिकडे ’इन’ असलेल्या हरयानवी बोलीचा वापर केलाय. त्याहीपुढे कंगना रानावत या अभिनेत्रीचं कौतुक म्हणजे कुसुम- दत्तोच्या भूमिकेत ती तिचे डोळे पूर्णपणे ब्लॅंक, भावनाहीन वाटतील असे ठेवते. आणि तरीही होत असलेल्या लग्नाला बाणेदार नकार दिलेली कुसुम- दत्तो, लग्नवेदीवरुन तडक निघते आणि एका कुडाच्या भिंतीआड बसकण मारते, ओक्साबोक्शी रडते तेव्हा ती वास्तवातलीही वाटते. पहिली भूमिका नको तेवढी संवेदनशील असणारी, सहज चक्रम या सदरात मोडेल अशी. तिचे डोळे वेगळे... कंगनाने हे खूप सहज दाखवल्याचं जाणवतं... पुढचं काम संवादांनी केलंय... कुर्सीकी पेटीकाय किंवा हारजीत आणि कन्सोलेशन प्राईजकाय...
एकूण व्यावसायिक ढाच्यात प्रयोगशीलतेला, वास्तवतेला वाव असतो. असे प्रयोग प्रेक्षकांना रुचतात. 
मनुष्य, त्याचा स्वभाव हा चित्रपटकृतीसारख्या कलेचा कच्चा माल आहे. तो भाबडेपणे, अतिरंजीतपणे मांडणं आजच्या दिग्दर्शकांनी टाळलेलं दिसतं. भारतीय प्रेक्षकांच्या सरासरी बौद्धिक वयाबद्दलही नेहेमी एक विधान केलं जातं, ते वय आता उंचावलं आहे असं म्हणता येईल. मल्टिप्लेक्समुळे विविध जॉनरच्या चित्रपटांना वाव ही सुद्धा महत्वाची बाब.
जुळ्या व्यक्तिरेखा दाखवण्यामधे माणसातले परस्परविरोधी पैलू उजेडात आणणं हा सुप्त हेतू असू शकतो. एक तर दृकश्राव्य माध्यम आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, व्यवसाय साधणं म्हणून जुळ्या भूमिकांची संकल्पना ढोबळमानाने सहाय्यभूत ठरु शकत असेल...
मानवी मन हे एक अधिक एक दोन असं निश्चित नाही. हा एक कॅलिडोस्कोप आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा किंचितसा प्रयत्न आपल्याकडे होतो आहे का? हे बघणं महत्वाचं आहे...
जगभरात असे प्रयत्न झालेले दिसतात. मराठीत ’देवराई’ हे नाव या पद्धतीचा सिनेमा म्हणून लगेच सुचतं. त्या आधी मला आठवतो तो श्वेतधवल ’पेडगावचे शहाणे’ मधला राजाभाऊ परांजप्यांचा कातरी बघितल्यानंतरचा टाईट क्लोज... अजय फणसेकरांचा ’रात्रआरंभ’... आणखी काही चित्रपट मराठीत आहेत?...
’ब्लॅक’ या चित्रपटात हेलन किलर पासून स्फूर्ती घेतलेल्या व्यक्तिरेखेबरोबरच तिचा शिक्षक असलेल्या व्यक्तिरेखेच्या अल्झायमर या स्मृती संदर्भातल्या आजाराचं प्रत्ययकारी चित्रण आढळतं. 
नुकत्याच दिवंगत झालेला थोर गणितज्ज्ञ जॉन नॅशच्या पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया या आजारातलं, त्याच्या सुरवातीचं आयुष्याचं चित्रण ’ब्युटिफुल माईंड’ या २००१ सालच्या चित्रपटामधे मांडलं गेलंय...  DISSOCIATIVE IDENTITY DISORDER ह्या मानसिक आजारामधे रोग्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिमत्वं आळीपाळीने ताबा घेत असल्याचं दिसतं... या विषयावरची इंग्रजी कादंबरी चाळल्याचं आठवतं...
हे झालं मानसिक आजारासंदर्भात. व्यवहारात, एकच माणूस अनेकांना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा दिसतो, भासतो किंवा एकच माणूस वेगवेगळ्या परिस्थितींमधे वेगवेगळा वाटतो अशासारखी विधानं सर्वसाधारपणे आपण करत असतो...
केवळ दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदृष्य व्यक्तिरेखांची गोष्टं ते एकाच मानवी मनातल्या दोन किंवा बहुसंख्य व्यक्तिमत्वांचं आणि पर्यायानं होणार्‍या गुंत्याचं, तिढ्याचं चंदेरी पडद्यावरचं प्रकटीकरण हा कुठून कुठे झालेला प्रवास वाटतो...
मानवी मनातल्या अनेक व्यक्तिमत्वांचा असा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरात झालेला असू शकतो. जाणकार यावर निश्चित प्रकाश टाकू शकतील... 
(संदर्भ, छायाचित्र साभार: विकीपिडिया)

Tuesday, April 28, 2015

मित्र, सुहृद, मार्गदर्शक...

 खरं तर हा उलटा प्रवास आहे... इथे प्रकाशित केलेलं आणखी वाचकवर्गासाठी इतरत्र प्रकाशित करतो आपण. एकटं वाटण्याच्या अवस्थेत आणि एकाकी न होण्याच्या प्रयत्नात काही ऋणानुंबध आठवतात. ते सहज पोचण्यासाठी आभासी जगात जवळचे झालेले, ज्ञात जगात आभासी झालेले इत्यादी इत्यादी, त्यांच्या त्यांच्या सवडीने का होईना आणि आभासी का होईना सहवेदनेत सामील होत असतात... त्यातून नवीन वास्तवातले ऋणानुबंधही अस्तित्वात येतात.. जग जवळही येतं, ते लांबही असतं... आभासीही असतं आणि वास्तवही असतं... माणूस आहे तोपर्यंत भोवताल असणार, जग असणार... त्याच्या अस्तित्वातली व्यामिश्रताही असणार.
भूतकाळातल्या अनेक सुहृदांना बरंच काही सांगायचं राहून गेलेलं असतं, आत्ता आवर्जून सांगावं असं काही... त्यावेळी सहज वाटणारं काही आता कृतज्ञतेच्या स्वरुपात दाटून येत असतं...
तुकड्या तुकड्यानं व्यक्त होण्याची सवय भिनत चाललेली असली तरी ते सगळं कुठेतरी संग्रहित असावं असंही वाटत असतं...
मूळात व्यक्त व्हायला माध्यम सहज हाताशी असतं...
असे काही तुकडे जोडण्याचा प्रयत्न... पुन:प्रकाशित स्वरुपात... 


माणसं जमवणारा- पेक्षा मुलं जमवणारा, समूह तयार करणारा, संघटनकौशल्य असलेला आणि अर्थातच नेता असणारा एक मित्र... उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनयाची उपजत देणगी असणारा, लेखक, दिग्दर्शक, निर्माता... उरापोटी धडपडून वर्षानुवर्षं प्रायोगिक संस्था चालवत रहाणारा... मी काहीही प्रयत्न न करता मला सामोरा आलेला, मला हाताला धरुन एकांकिकेच्या तालमीच्या हाॅलमधे घेऊन आलेला... मीच काय कोणीही बसून राहील, सहजासहजी उठणार नाही इतकं सहज मार्दव त्याच्या चालण्याबोलण्यात होतं... त्याचं बोट धरलं आणि मी त्या लखलखत्या गुहेत शिरलो...
त्यानं कै प्रा. कृ रा सावंत यांच्याकडे नाट्यशिक्षण घेतलं होतं... एकांकिका स्पर्धा तेव्हा उपनगरात जोशात होत्या... ग्रीक पद्धतीची नाटकं आणि पर्यायानं नाट्यशिक्षण हा सावंतसरांचा -आता ज्याला युएसपी असा शब्द आहे- तो होता... हा मित्र स्वत: हे रंगकर्मी अष्टपैलुत्व शिकला, त्याच्या शाळेतल्या त्याच्या बरोबरच्या, मागच्या वर्गातल्या, आमच्यासारख्या कित्येक, कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्यांना रंगमंचावर आणलं, तयार केलंच पण माजी विद्यार्थी संघासारख्या संस्थेला कार्यरत ठेवून या मुलांना सामाजिक कामाची ओळख करुन दिली... नेता असूनही मित्रत्वाचं नातं संपर्कातल्या लहानथोरांशी आजतागायत टिकवणं ही तुझी खासियत... तुझा 'समुद्रशिकारी' नाटकातला न-नायक, तुझं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्यसंकल्पना, उत्कृष्ट निर्मितीमूल्यं.. बघणा-या आम्हालाही स्वप्नवत होतं सगळं... शाळेच्या इमारत निधीसाठी त्यावेळी कोप-यातल्या उपनगरातल्या, आपल्या कोप-यातल्या वसाहतीत होणारे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग म्हणजे पर्वणी असायची... 'समुद्रशिकारी' बघताना मला त्या नाटकांची आठवण झाली होती... मग 'संभूसांच्या चाळीत' बघतानाही... सरकारी पुस्तक आणि प्रकाशने खात्यात तू असताना, ओल्ड कस्टम्स हाऊसमधे, दुपारच्या भेटींदरम्यान तू सतत अस्वस्थ आहेस हे जाणवायचं... ती सुरक्षित नोकरी तू सोडलीस, नव्याने संघर्ष केलास... पत्रकारितेसारख्या, तुला आवडणा-या पण त्यावेळी बेभरवशाच्या असलेल्या क्षेत्रात शिरलास...
आज तू जो काही आहेस त्या आधीचा प्रवास आम्ही जवळून पाहिलाय आणि त्या प्रवासाचा आणि तुझा अभिमान वाटतो संजय डहाळे...


...आयुष्यातला काळोखी काळ असतो. मित्राच्या, आपल्या. घनिष्ठता निर्माण होते. तसा एक मित्र होता. 'नेमाडे' हे नाव त्याच्याकडून पहिल्यांदा ऐकलं.. दोघेही ओवरड्यू 'कारे'. मला असं काही जवळचं वाचायला पहिल्यांदा सापडलं. मग अनुक्रमे 'चातुष्टयं' वाचणं, भारावणं आलंच... या मित्रानं मला एका उपक्षेत्राचा परिचय करुन दिला. हाताला धरुन नेलं. ही व्यावसायिक कामं होती... वाचन, विचार करणं, एकूण भान, मनन ह्या दृष्टिनं मी एका निश्चित वळणावर त्याच्यामुळे आलो...
त्याचं दु:ख माझ्या मानाने खूपचखूप दारुण होतं... मी सुरक्षित वातावरणात होतो त्या मानाने...
दु:ख असणं, गहिरं असणं आणि नंतर ते आपण जास्त गडद करत नेणं, कुठेतरी आत्मकरुणा आपला कब्जा घेते आहे की काय?... असं त्याच्या बाबतीत जाणवायला लागलं. माझं दु:ख त्यामानाने जेमतेम असून मी आत्मकरुणेत वहावतोय की काय असं वाटायला लागलं...
कालांतराने दोन ओंडके वेगळे झाले. त्यानंतर काही काळाने मला कळलं, त्यानं मला 'डिलीट' केलंय. आता ब्लाॅक करतात तसं... तो नेहेमी म्हणायचा अमुक एक कालाने मी त्यावेळचे घनिष्ठ संबंध स्वत:हून तोडून टाकतो आणि नवीन संबंध जोडतो... पहिल्यापासून मला असं काही घाऊक स्वरुपात करणं अघोरी वाटायचं... हे शक्य असतं?... हे आपल्याला, इतरांना सोपं जातं?... भावस्थितीची मशागत करायला हा योग्य, उत्तम उपाय आहे?...
आज तो चांगल्या पदावर काम करतो. अचानक रस्त्यात भेटला आणि त्याचा 'डिलीट' प्रतिसाद बघून तो मला पूर्वीसारखाच वाटला...
बाबा, सतीश तांबे वरचे काही प्रश्नं... या घटनेतला मित्र तुझा चांगला मित्र होता. एका व्यावसायिक क्षेत्रात तू, त्याला आणलंस असं तो म्हणायचा... तू माझा शेजारी होतास. तुझ्या 'छापल्या कविता' तेव्हा प्रकाशित झाल्या होत्या. तू कवि आहेस, विद्यापिठाचा सुवर्णपदक विजेता आहेस आणि हे तू कशाकशातून जाऊन केलएस ह्या माहितीमुळे तुझ्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाली. मला नोकरी लागल्यावर तू मला बोलवून याच पदावर राहू नकोस. पुढची परिक्षा, त्याचे फायदे सांगितलेस. एक जाहिरात उतरवून घ्यायला सांगितलीस. तो जमाना कटपेस्ट, फाॅरवर्डसेंडचा नव्हता...
आपण तिघे, कालांतराने एकदा भेटलो. हे सगळं तुला आठवेलच असं नाही. या भेटीत मी एका क्षेत्रात वहावत जाणारे एका क्षणी विमनस्क होतात, तसा होतो. तू तुझ्या प्रश्नांनी मला स्वत:चं पुनरावलोकन करायला प्रवृत्त केलंस... ’तुझं वय काय? आता तू कुठे आहेस? जिथे जायचंय तिथे आता तू कुठे असायला हवंस?...’
भानावर आणणं हे ख-या मित्राचं  काम असतं. तू अनेकांशी या स्वरुपाचं वागला असशील.
घनिष्टता, जवळीकीसारख्या प्रसंगांबरोबर हे प्रसंग आठवतात. आपला परिचय तरी होता. काही वेळा अकस्मात जुजबी ओळखीचा किंवा पूर्णपणे अनोळखी कुणी ख-या मित्राचं काम बजावतो हे आठवलं, लक्षात आलं तेव्हा 'मैत्र जिवाचे' चा अर्थ नव्याने कळला. आज स्टे कनेक्टेड वर्च्युअली असं असलं तरी या भिंतीचा उपयोग असा संवाद साधायला होतो हे लक्षात येतं आणि आनंद होतो..


कुवतीप्रमाणे जमेल ते करत राहिलो असताना मुख्य, महत्वाचा जोडधंदा कुणातरी अवलियाला पकडून समूहानं ख्या ख्या खी खी करत रहाण्याचा राहिला... तेव्हाही उच्चभ्रू की कसले भ्रू नटवे, नटव्या 'काय ह्ये' म्हणून हिणवत राहिल्या तरी घेतला वसा सोडला नाही... सोडणार नाही...
गजू तायडे, तुमच्या पोष्टी वाचून मला गतायुष्यातल्या माझ्या दोन मित्रांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही...
एक कै. सुहास बावडेकर, दुसरा रवि कुरसंगे...
सुहास जेजेला होता. कमल (शेडगे) त्याचा गुरु. त्याच्या खांद्यावर याचा हात. तो अरेतुरे करायचा म्हणून इथे शेडगेंचा उल्लेख एकेरी केला... एरवी त्यांचा मोठेपणा मी काय सांगू. ही दोस्ती टाइम्समधली. चित्रकार माळी, सायन्स टुडे करणारा नाना शिवलकर, अरविंद मुखेडकर... नानाचे भंकसचे किस्से रॅगिंगच्या जवळपास जाणारे. पायाला पँटवर दोरखंड बांधणारा... माळींच्या डब्यावर त्यानं काढलेलं हुबेहूब डालडाचं चित्रं, ते माळींना माहित नाही पण इतर सगळ्याना माहित. नानाची 'ष्टा' ने संपणारी अत्रंग म्हण... सुहास आमच्या परिसरातला भांडणाचा किस्सा सांगायचा. 'नून' हा शब्द एकानं वापरला म्हणून दुस-यानं वापरुन त्यात आख्खं खानदान कसं आणलं... आम्ही रिपीट प्रेक्षक रात्रीबेरात्री ख्या ख्या करत उभे...
दुसरा रवि... हाफ मर्डरमधे अंदर, आणिबाणीत समाजवाद्यांना भेटला जेलमधे... क्युबिझम चित्रशैलीत चित्रं काढायचा. 'झुलवा' चं नेपत्थ्य त्याने केलं. त्याहीपेक्षा धारावीतून जोगते, जोगतिणी तालमीत आणले त्याने... कीच, रांडपुनव हे त्या जमातीतले कुणालाही प्रवेश निषिद्ध असलेले विधी वामन (केंद्रे) ला दाखवले त्याने... संस्थेच्या डबक्यात इगोबिगोची लपडी होऊन वातावरण तंग झालं की तो संस्थेतल्या ए पासून झेड पर्यंत सगळ्यांच्या अप्रतिम नकला करायचा... आम्हाला ख्या ख्या पर्वणी... तो परे मधे कॅटरिंग इनचार्ज होता. दौ-यात जेवणाची सोय त्याची... सतीश काळसेकर, राजन बावडेकर यांनी भालचंद्र नेमाडेंची घेतलेली आणि नेमाडेंनी रिस्ट्रिक्ट केलेली पानबैठक चर्चगेटला कॅन्टिनवरच्या अर्ध्यामाळ्यावरच्या रविच्या केबिनमधे झाली होती. त्यात माझ्यासारख्याला प्रवेश मिळाला रविमुळे... चाळीशीनंतर त्यानं लफडं केलं, मग लग्न केलं दुसरं. सध्या मुक्काम 'मामाचा गाव' ला...
असे दोन अत्रंग... माझ्यावर जीव होता त्यांचा असं वाटून माझी छाती फुगवून आणि कितीतरी इंच होते...
आपण केलेलं काम दुस-याला दाखवायची हौस प्रत्येक काही करणा-याला असते... म्हणून असेल पण ज्या आपुलकीने हे माझे मित्र मला आपली कामं दाखवायचे त्यातून माझ्यासारख्या कलेशी काही संबंध नसणा-याला किंवा नंतर नटवा बनून चमकायचीच खुजली निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना, त्यांच्यामुळे मला वेगळं जग बघायला मिळालं...
सुहास आमच्या नगरातल्या गणेशोत्सवात वेगवेगळ्या गणेशमंदिरांच्या प्रतिकृती इतक्या बेमालूम करायचा की भल्याभल्यांची गर्दी जमायची आणि तो त्यांच्यासमोर आम्हाला त्यातले बारकावे समजाऊन सांगत असायचा... कमलच्या खांद्यावर जसा त्याचा हात असायचा तसा आपल्या अमोलच्याही. बाप लेकाच्या खांद्यावर हात टाकून त्याला गाण्याचे प्राथमिक धडे देत गल्ल्यांतून फिरतोय हे माझ्यासारख्यासाठी तरी विलोभनीय होतं... अमोलला नंतर त्याने वाडकरांकडे शिकायला पाठवलं. अभिषेकी नगरातले सामान्याना माहित नसलेले थोर गायक रत्नाकर पै यांच्याकडे गाणं शिकायला यायचे. त्या दोघांकडे सुहास शिकला होता...
रविचं झुलवापेक्षा अनिल बांदिवडेकरांच्या एकांकिकांचं नेपथ्य अफलातून असायचं. एका एकांकिकेत त्याने दोन दरवाज्यांच्या फ्रेम्स, सभोवताली अनेक सुशोभित कुंड्यांची रचना करुन टाळ्या घेणारा सेट बनवला होता. त्याहीपेक्षा त्याने त्यात निरनिराळ्या अभिनयक्षेत्रांचा विचार करुन मग एकसंध सेट तयार केला ह्याचं अप्रूप जास्त...
सुहासनंही शेवटच्या काही वर्षांत व्यावसायिक नाटकांसाठी नेपथ्यं केली होती...
वामन आमच्यासाठी हाडाचा शिक्षक, दिग्दर्शक राहिला. केवळ त्याच्यामुळे माझ्यासारख्याला अशोक रानड्यांच्या भाषा, वाणी शिबिरात प्रवेश मिळाला. पीटर ब्रुक महाभारत घेऊन आला तेव्हा त्याच्या वर्कशाॅपसाठी वामननं शिव्या घातल्या पण घरातल्या आजारपणामुळं ते हुकलं... त्या वर्कशाॅपमधे रविने त्याच्या भलत्या भाषेतल्या इंप्रोवायझेशन्सनी धमाल उडवली होती म्हणे...
सुहास आणि रविसारखी हरहुन्नरी, अप्रतिम विनोदबुद्धी आणि टॅलंट असलेली माणसं लवकर विस्मृतीत गेलेली बघून वाईट वाटतं...
आमच्यासारख्या को-यांवर त्यानी आपुलकीनं केलेल्या संस्कारातून त्यांची आठवण तरी निघावी...
सांगावं तेवढं कमी... दोघांबद्दल...
पिपल्स बुक हाऊस, फोर्ट मधे भारतीय बैठकीवर मर्यादित रसिकांसाठी कवि नारायण सुर्व्यांची मैफल झाली होती... तोंडाचा आ वासून सुर्व्यांना थेट बघितलं, ऐकलं ते रविमुळे... दिलिप चित्रे, अरुण कोलटकर त्याच्यामुळे माहित झाले.. फोर्टमधून जाताना त्याने लांबून कोलटकर दाखवून त्यांचे किस्से सांगितले होते. रविनं 'इंद्रियारण्य' नावाचा स्वत:चा कवितासंग्रह प्रकाशित केला स्वखर्चानं. त्या 'अविसुर' प्रकाशनातल्या वि मधे मी होतो. ’झाल पल्ल्यावर’ ही त्याच्या आदिवासी भाषेतली कविता त्यात होती. इराणचा म्हातारा, बशी हा संदर्भ सांगून त्याला जमेल तशी त्यानं केलेली एक कविता त्यात होती. चित्रे, सारंग मला माहित झाले त्याच्यामुळे... मी कवडा झालो तेव्हा माझ्यापेक्षा त्याला बापासारखा आनंद झाला होता. त्यानं वही घालून दिलेली मी जपून ठेवलीए अजून...
सुहासमुळे दूरदर्शन केंद्र बघितलं पहिल्यांदा. रमण रणदिवेंच्या कविता सुहासच्या आवाजात रेकाॅर्ड झाल्या. सुहासची ती पहिली स्वतंत्र दोन गाणी अजून माझ्या स्मरणात आहेत. निर्माता कै. अनिल दिवेकरसारखा अत्रंग माणूस त्यानं दाखवला... केंद्रावरच, नविन आहे म्हणून निश्चल आहे, अभिनय करत नाही हा जोकही ऐकवला... वर तो असे जोक करणा-या प्रथितयश साहित्यिकानं तो केला असता तर डोक्यावर घेतला गेला असता हे ही... ;)
सुहासचे आजोबा चं वि बावडेकर साहित्यसंघाशी संबंधित होते. त्यावेळचं एक प्रसिद्ध नियतकालिक- आलमगीर- त्याचे संस्थापक, संपादक. त्यांचा थेट फायदा सुहासला मिळाला नाही. मधली पिढी वेगळ्या क्षेत्रात. (अमोल पालेकर सुहासच्या वडलांचा मित्र झाला. त्याच्यावरुन या अमोलचं नामकरण) संगीत नट अरविंद पिळगावकर सुहासचे मामा अजून हयात आहेत...
रवि भटकाविमुक्त... तो या मातीतला नाहीच... त्याला त्या फ्रेंच की काय जीवनपद्धतीचं आकर्षण. तेव्हा ती त्याची चूष वाटायची पण तो जगला तसा. आताही एका अर्थानं कोप-यातल्या मामाच्या गावात मॅनेजरकी करताना तो आवर्जून मित्रांना बोलवतो. आम्हीच गद्धे अजून जात नाही... रविनं एक अबसर्ड नाटक लिहून, त्याचं वाचन करवलं होतं चर्चगेट बुकिंगच्या वरच्या मजल्यावरच्या त्याच्या विश्राम केबिनमधे. हे असं काही असतं ते त्याच्यामुळे कळलं. इथेच त्याचं क्युबिझम पेंटिंग होतं. हे तो कालिना चर्चमधल्या फादरकडून शिकला... कालिनातल्याच एका मारामारीत तो आत गेला... तेव्हा आणिबाणी होती... रविला आणिबाणीमधल्या बंदींची मैत्री लाभत गेली...
कवि भुजंग मेश्राम, युवराज मोहिते यांच्या भेटी त्यानं इथे घडवलेल्या आठवतात...
रविबद्दल माझ्यापेक्षा जास्त जवळ असणारा अजित आचार्य.
तर सुहासबरोबरचा सुरेश कुलकर्णी.
असो... आता खरंच इत्यलम्...
(चित्र: आंतरजालावरुन साभार...)

Wednesday, April 1, 2015

"मी मराठी Live" वर्तमानपत्रात "दिवेलागण" या "अभिलेख" वरील नोंदीची दखल...

मी मराठी Live हे वृत्तपत्र मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुरु झालं... १५ मार्च रोजी मी मराठी लाईव वृत्तपत्राच्या फीचर्स विभागाच्या उपसंपादक शीतल गवस यांचा ’दिवेलागण’ ही ’अभिलेख’ वरील नोंद रविवार मी मराठी लाईवच्या ’सप्तमी’ या सदरासाठी परवानगी मागणारा मेल आला. लगतच्या रविवारी २२ मार्च रोजी "दिवेलागण" लेख स्वरुपात प्रसिद्ध झालं...
मी मराठी लाईव आणि शीतल गवस यांचे अगदी मनापासून आभार...

Wednesday, February 11, 2015

आम आदमी करतो सुपडा साफ????

मतदार राजा टोकाचा कौल देऊ लागला आहे...
आदिकाली पर्यायी पक्षच नव्हता... मग विरुद्ध पक्षांमधे प्रत्येकी एखाददुसरं नेतृत्व तयार झालं. आणिबाणीनंतर विरोध्यांना सत्तेची चव कळली. ती लगेच उलटली. पुन्हा मतदारराजानं आणिबाणीवालीचीच लाट आणली... आपल्याकडचा लोलक चांगलाच झुकतो.
राजकीय मृत्यू हे अपघात असतात, कारस्थानांची फलितं असतात, की दहशतवादाची?...
पुन्हा प्रेमाची लाट येते... साऊथला कटाऊटस्, मंदिरं, आत्महत्या असे विशेष मतदारराजा दाखवतो. त्याचीच जराशी पातळ प्रतिमा देशपातळीवर दिसते?...
हे आवर्ती होतंय म्हणून की काय धर्म ह्या मुद्याचे पद्धतशीर आणि संवेदनाहीन राजकारण आणले जाते?... चेहेरा, दाखवण्याचा वेगळा, मुळातला वेगळा... पाडापाड, दंगली, जाळपोळ... अजूनही दंगलीनंतरची छायाचित्रं आठवली, स्त्री, भृणहत्यांच्या बातम्या आठवल्यावर सामान्यातला सामान्य मतदार चरकतो? की 'आपलं' बरोबर आहे, 'त्याना' असंच शासन पाहिजे हे त्याच्या जाणिवरुपी अस्तित्वात मुरुन गेलंय?
राजकारणातलं वेगळं वळण आणि शेजारी शत्रू या दोघांमुळे पराकोटीचा दहशतवाद माजला, की कुणा एकामुळे?... यात सगळ्यात जास्त सर्वतोपरी हानी कुणाची झाली?...
मग पुन्हा जोरदार पलटी... त्या आधीची काही त्रिशंकू मध्यंतरं... कसरती, सारवासारव्या...
मतदारराजानं पुन्हा घराणेशाही, परित्यक्तासमान विधवेबद्दल सहानुभूती अशी जुनीपुराणी मतं कवटाळली? त्या विजयाला सत्ताधारिणीने त्यागाचं कोंदण घालून स्वप्रतिमा उजळवली? वर त्याला मुस्काट दाबलेला, सज्जन विकासाचा चेहेरा दिला? ज्या चेहे-यानं परंपरागत विकसनशील देश विकसित जगात पाय रोवू लागला होता, त्याच चेहेर्‍याला वापरुन घेऊन? अशा प्रतिभा, कर्तृत्ववान चेहेर्‍यानं मंद, निब्बर दगडी कवचाआड स्वत:ला वापरुन देऊन देशाला कुठे आणून ठेवलं?....
सामान्यातला सामान्य राजा सगळंच स्वीकारतो?...
पैसे खा पण आमची कामं करा... हे सगळे येतात ते तुंबडी भरायलाच हो... असं दर राज्यकर्त्याला म्हणतो...
धोरणलकव्याने तरी किंवा दुहीच्या बीजाने तरी आल्टूनपाल्टून रसातळाला दोन बोटं उरताहेत...
लकवा खूपच मारलाय आता जालिम डोस शोधायला लागला मतदार राजा. लकवेकर खूब दिला लकवा म्हणून माजात होते आणि कथित दंगल, जाळपोळीचा कथित सूत्रधार, कथित बनावट चकमककिंग वगैरे बिरुदावली मिळालेला अंडरडाॅग हळूहळू उभा राहिला. आपला मतदार राजा हुशार, चाणाक्ष. त्याने काट्यावर नायट्याचा हिशोब केला. प्रचंड विजयामुळे, त्या विजयाअलिकडच्या पलिकडच्या भल्याभल्यांच्या प्रतिक्रियांपुढे मतदार राजा समूहात काहीशी भांबवाभांबवी झाली का? की नाही? रोगापेक्षा इलाज भयंकर असं वाटून?....
पुढचं तर अगदी अलिकडचं... नमोंकीत सूट इत्यादी... महर्गता, वेतनकरार, सवलती... यात काही अनुकुलता?
मतदार राज्याचं सुपडा साफ करण्याचं व्रत चालूच आहे...
राज्य पातळीवर नवनिर्माणाचंच खळ्ळं खट्याक करत आता तर तो सोन्याचा झाडू हातात घेऊन राजधानीवरच उभा आहे...
'सुसा'ट मतदार राजा आणि अप्पलपोटे राजकारणी यांतला हा विळ्याभोपळ्याचा खेळ केवळ खेळाचा आनंद देत-घेत रहाणार की आपली लोकशाही, पोरखेळातून बाहेर पडून सज्ञान होणार? की सरळ ठोकशाहीच येणार?...
केंद्रात ज्याचं सरकार आहे त्याची शत्रूसरकारं राज्यात आली की प्रगतीच प्रगती, हे पुस्तकी राजकारण अजून मतदार राजाचा कब्जा घेऊन आहे?... सत्ताधीश, त्यांचे कथित स्पाॅट इत्यादी नाना काही वेगळे उजले रंग दाखवणार?....
असा हा सामना दोन राजांमधला...  हे कलगीवाले आणि तुरेवाले दोघेही, तटस्थ निरीक्षकाला सारखेच अनप्रेडिक्टेबल- अनाकलनीय वाटतात?....
मुळात ताटस्थ्य इत्यादी खिजगणतीत आहे?
नाही... एक मॅगसेसे विजेता, भूतपूर्व आदर्श नोकरशहा, सुवर्णपदकविजेता, मुख्यमंत्रीपदी असतानाही चौकात धरणं धरुन बसणारा... राजधानीद्वारी सोनियाचा झाडू धरुन शड्डू मारता झाला आहे... या पार्श्वभूमीवर या सगळ्याच प्रश्नांचं मूल्य काय आहे?...
उद्या महासत्ता होण्याच्या दिशेवरचा सोपान दृगोचर झालाच तर... म्हणून विचारतोय...
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

Tuesday, February 10, 2015

ज्ञानपिठ...

प्रेषिताचेच काय
प्रत्येकाचेच पाय मातीचे
कुणी काय करायचं
ते आणखी कुणीतरी ठरवायचं
कोणात नक्की केवढं आहे तेही
एखादा वांड मुलगा असतो
मला वाटेल, पटेल ते मी
त्या त्या वेळी करीन
काय करायचं ते घ्या करुन म्हणतो
प्रत्येकाचा एक काळ असतो
वेळ असते
पाणी अमुक वळणावरच जातं
शिमगा जातो, कवित्व उरतं
विचार पक्के हवेत
विरुद्ध विचार पक्के हवेत
एकमेकांबद्दलचा आदर चिरंतन रहावाच
गळ्यात गळे, तत्व वेगळी
वर्ग की वर्ण संघर्ष डोकं वर काढत रहावा
अंतर्विरोध का काय तो असतोच
झुक्या... त्याला किती लवकर कळलं
पार नाहीसे झाले 
लोकलमधे चावडी कसली 
घुसमट शरीरांची, श्वासांची, प्रसंगी प्राणाची
वर्तमान पत्र बाद, संजयी वाहिन्या उद्बोधक
व्यक्त होण्याची, लढत रहाण्याची असोशीच असोशी
झुक्यानं सगळं घरात आणलं, हातात दिलं
त्याला किती लवकर समजलं
आयुष्य...

Sunday, February 8, 2015

समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा...


व्यक्तिमत्वाची समृद्ध जडणघडण नाट्य आणि साहित्य या माध्यमांतल्या घटकांचा प्रत्यक्ष उपयोग करुन दिलेल्या प्रशिक्षणामुळे परिणामकारकपणे होत असते...
सभाधीटपणा, संवादकौशल्य, संघभावना, भाषेची ओळख, शब्द, शब्दांमागचे विविध अर्थ, भाव, भावना प्रकटन... 
अशा गोष्टींचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी "अभिलेख" येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रीकृष्णनगर, बोरिवली (पूर्व) परिसरात 'समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा' आयोजित करत आहे...

Monday, January 26, 2015

एकटेपणा, अवकाश, कला, मैत्र... इत्यादी इत्यादी...

लहान मुलाला झोप आल्याचं कळत नाही. ते त्रासतं, त्रासवतं, कंटाळतं, ओरडा खातं. पालकालाही अनेक वेळा समजत नाही, ते असं का करतं?
आता एकेकट्या मुलांची कुटुंब अनेक आहेत. किमान दोन मुलं असावीत या विचाराला जोडपी पुन्हा लागली अाहेत. बरोबर कुणी असणं महत्वाचं वाटतं. सहवास, सह अनुभूती, एकमेकाला सहभागी करुन घेण्याची वृत्ती. मिळून काही करण्याची उर्मी महत्वाची अाहे...
जाणत्या माणसाला अनेकदा खुटखुटत रहातं. लहान मुुलाची बैचेनी... किर्केगोर- किर्केयोर, नित्शे माणसाच्या एकटेपणाचं तत्वज्ञान मांडतात. फ्राॅईड म्हणतो, कामप्रेरणा आणि मोठं होण्याची इच्छा सतत मानवी मनाचा कब्जा घेऊन रहातात.
हल्ली मुलांना निरनिराळ्या क्लासना घातलं जातं. व्यक्तिमत्वविकासासाठी... कला, खेळ, ज्ञान... हे सगळं शिकवण्याची घाऊक केंद्रं तयार आहेत... त्यातून काही चांगलं, काही वाईट निश्चित घडत रहाणार...
संगणक, आंतरजाल, भ्रमणध्वनी, लॅपटाॅप, टॅब... हात जोडून उभंच आहे...
बाजूलाच पोकळीही आहे... ती वाढते आहे असं निरीक्षक म्हणताहेत...
कितीही काही केलंत तरी पोकळी अविभाज्य आहे. ती कशी भरायची हा निर्णय ज्याचा, त्याचा... विचारवंत, स्वयंविकास शिकवणारे तज्ज्ञ या दिशेने सांगू पहाताहेत...
निर्णय घ्यायला लागणं ही माणसामागे लागलेली एक ब्याद आहे, निर्णय घ्यायला लागणं पेक्षा निर्णयापश्चात घडणार्‍या परिणामांची जबाबदारी घ्यायला घेणं...
मग धर्म, कला, खेळ... इत्यादीत मानवी इतिकर्तव्य शोधायचं... कुणी कसं, कुणी कसं...
स्वातंत्र्य ही आणखी एक ब्याद... त्याचं काय करायचं?... विचार बंद करता येतात? झापडबंद रहाता येतं?... मग अातून नाही नाही ते कढ येतात, त्यांचं काय करायचं?...
झोकून द्यायचं स्वत:ला आयुष्याच्या प्रवाहात?... ते कधी न कधी करावंच लागतं!... पालकांचं वाढतं सुरक्षाकवच अंतिम समृद्धपणे जगण्याच्या आड येतं का? समृद्धी म्हणजे नेमकं काय?...
मग पूर्वी एका अर्थानं नाळ तोडून जगात टाकलं जात होतं; परिस्थितीमुळं, जाणीवपूर्वक, नाईलाजानं, जन्मदात्यांच्या परस्पर असामंजस्यामुळं, प्रत्यक्ष किंवा लाक्षणिक... ते सुदृढ जगण्याला पर्यायानं उपकारक ठरत होतं का?... परिणाम करणारे विविध घटक काही ठाम विधानं करु देतात की नाहीच?...
हा सगळा पट डोक्यात सुरु झाला तो दोन मित्रांच्या आठवणीमुळं. मित्र म्हणायचे तर समवयस्क नव्हेत. मी भिडस्त म्हणजे चुचकारल्याशिवाय कुण्याच्या अध्यातमध्यात नाही. एकदा मध्यात आलो की वहावणार... ज्याचा, त्याचा स्वभाव. तर ह्या मित्रांनी ज्ञात नव्हतं त्याचा परिचय करुन दिला. चित्रं, गाणं, नेपथ्य, साहित्य, व्यसन जडेल अशा गोष्टी...
वास्तव्य आहे ते शहरात असलं तरी गावासारखं. हद्दीला नदी. त्या नदीपलिकडं नेलं या महाभागांनी. नदीपलिकडं जाणं म्हणजे सर्वार्थानं. मग अलिकडच्या कशातच मन रमत नसल्यासारखं. मोठ्ठी दरी... अपसमज, गैरसमज... त्यांचीही सवय...
दोन्ही मित्रं वेगवेगळ्या पार्श्वभूमीतले. माझं वर्तुळ मर्यादित.
कुठल्याही नव्या क्षेत्रात गेलं की समवयस्क, शिक्षक, मित्र... अशी वेगवेगळ्या तर्‍हेची नाती जडतात. अनुभवी, हाताला धरुन अमुक दिशेने नेणारा जवळचा होतो. मैत्रीची त्याची ओढ आपल्यापेक्षा त्याला जास्त प्रसंगी. त्यानं आपण सुखावून दबलेलो. तो हे दबलेपणही नाहीसं करतो आणि संस्कारांची दालनं उघडत जातो, शिक्षकाचा अविर्भाव न आणता.
असे गतायुष्यातले दोन मित्र चटकन् आठवले...
कालांतराने त्यांच्यातले आपल्याला वाटणारे दोषही जाणवले. आपल्यातही त्याना काही दोष जाणवले असतील हा विचार मनातच आला नाही...
खूप काही असून ते तसे विस्मृतीतच गेले... ते का? याचं ढोबळ मूल्यमापन केलं मनाशी... स्वस्थ झालो आपल्या मार्गावर... जैसे थे राहिलं नातं...
वय वाढत जातं तशी भिडस्त माणसं आणखी आणखी आत्मकेंद्रित होत जातात?...
मग खुटखुटत रहातं... ते का हे समजत नाही, लहान मुलासारखं... नकळत समजतं... मग संबंध जोडायची धडपड चालू होते... ते रक्तात नसल्यामुळे ती पाहिजे तशी जमत नाही...
आजुबाजूला व्हर्च्युएलिटी वाढलेली... तिथले संबंध हाडामांसाचे वाटतात? असतात?...
गतायुष्यात योगायोगाने मिळालेल्या समूहाची आठवण प्रकर्षाने होते. अनेक प्रकारची नाती तिथे जमली होती हे जाणवतं. सगळं सहज होतं. अनेक तरंगणारी ओंडकी योगायोगाने एकत्र अाली... आपापली वेळ झाल्यावर अलग विलग झाली...
एकटं अपरिहार्य अस्तित्व आणि सोबतीची आस. फुटकळ सोबत असली तरी समूहाच्या सोबतीची आस... सोबत, सोबतच सोबत, सोबतीचं अजीर्ण... मग सोबतीशीचीच झुंज... हेच आयुष्य... रुटिन होणं अाणि ते प्रयत्नपूर्वक तोडत नव्या अनुभवाकडे झेपावणं यात कुठेतरी काही हाती लागत असावं... समृद्धपण?...