romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Wednesday, January 18, 2012

आमच्या मुलांना सांभाळाऽऽ (१)

निमामावशीच्या पाळणाघरासमोर लागलीए रांग. रांगेतले पुरूष वेगवेगळ्या वयाचे रंगेल, अपटूडेट पोषाखातले, केसांचे कोंबडे वगैरे काढलेले. निमामावशीच्या पाळणाघराचे लोखंडी ग्रील उघडून शिडशिडीत, उंच असे रिकामजी तिरूपती कडले बाहेर येतात. डोक्यावरच्या फॅशनेबल विगमुळे त्यांचं नक्की वय कळत नाहीए. तलवारकट मिशी आणि हातात रंगीबेरंगी वेष्टन असलेली वेताची छडी आहे.
“चला! चला! ऑफिस क्लोज्ड! आता आपली भेट उद्या सकाळी नऊ वाजता!”
हात जोडून दोन पाय एकमेकांना क्रॉस ठेऊन वाकतात.
“तो पर्यंत कळावे लोभ असावा ही विनंती!”
रांगेतल्या लोकांमधे कुजबुज सुरू होते.
“थांबा! थांबा!- म्हणजे तुमचं बोलणं थांबवा!”
जीभ चावतात आणि “ईऽऽक!” असा आवाज काढून उडी मारतात. कपाळावर हात ठेऊन न्याहाळतात.
“एवढी मोठी लांबलचक रांग! काय आहे काय आज?”
“ओ कडलेसाएब! निमाताईंना आणा ना बाहेर!” रांगेतला पहिला.
कडले पुन्हा उडी मारून वेताची छडी नाचवतात.
“एऽऽयऽऽ काय आणा? कुठे आणा? माझ्यासाठी आणलीये मी तिला! तुमच्या निमा’ताई’ला! हॅ हॅ हॅ हॅ.. पंधरा वर्षापूर्वी! तुम्ही निघायचं बघा! ऑफिस बंद झालं आता! किती वाजलेऽ हां! पाच वाजून पाच मिन्टं एकोणपाच- आपलं हे एकोणपन्नास सेकंद!-”
रांगेतला दुसरा आता पुढे झालाय.
“असं काय करता सायेब! दुपारी दोन वाजल्यापासून लाईनीत उभे आहोत आम्ही
आणि आता असेच कटवताय?”
कडलेंची सटकलीए. ते त्या माणसाजवळ जातात. त्याला न्याहाळतात.
“असेच म्हणजे? असेच म्हणजे? निमाताईंना भेटल्याशिवाय अं?.. मूल केवढं आहे
तुमचं?”
रांगेतला दुसरा लाजतो, “पाच.. सहा वर्षाची मुलगी आहे..”
कडलेंची आणखी सटकते.
“लाजताय? वयात आलेल्या मुलीसारखे?… आणि हे काय? हा फॅशनेबल शर्ट!
पार्क अवेन्यू!- अं? आणि ही चुण्या न पडणारी चकचकीत पॅंट? केसांचा हा कुठला
कट? चमकायला, शाईन मारायला येता काय इते? आंऽऽ- एऽऽ काय आहे? काय
आहे?”
रांगतेला तिसरा केव्हांपासून चुलबुळतोय. ’काय आहे?’ असं ऐकल्यावर तो पुढे
होतो. त्याचा आवाज चांगलाचा वरच्या पट्टीतला.
“ओऽऽ काय उद्येग न्हाईत काय आम्हास्नी?-”
“एऽऽ-” इति कडले.
“ओऽऽ जोकर!ऽऽ” तिसरा कडलेनी उगारलेली वेताची छडी पकडून धरतो,
“जो-जो-जोकर?” कडले वेताची छडी सोडवायच्या प्रयत्नात आहेत,
“अहोऽ सोडा! सोडा!... सोडा! सोडाना!...”
कडलेंचा आवाज आर्जवी झाल्यावर तिसरा छडी सोडून देतो आणि घाबरलेले कडले
धडपडून कसेबसे सावरतात.
“आदूगर बाईस्नी बोलवा!”
“त्याचं काय आहे घाटीसाहेब- आपलं हे घाटेसाहेब-”
“घाटे न्हाई धोटे! धोऽहोऽट्ये!ऽऽ”
“हं! धोटे!.. त्याचं काय आहे-”
“कऽऽहाऽऽय ह्ये?ऽऽ”
“अ-ब-ब-ब-अहो-अहो ऑफिस झालंय आता बंद! आता उद्या सकाळी उघडणार ते!
 तेव्हा-”
“मग काय उद्या सकाळी यू?” धोटे अंगावर येतात. मग रांगेतला पहिलाही पुन्हा
सरसावतो.
“अहो कडले, दोन दिवस झाले दांड्या होताएत ऑफिसला! आता पुन्हा उद्या?”
“आता उघडा!” इति दुसरा.
“काऽय?” व्हिलनीश कडले छडी नाचवत ओरडतात आणि स्वत:च दचकतात.
“अहो दार उघडा! आमचे अप्लिकेशन्स भरून घ्या-” इति दुसरा.
कडले आता संगीत संयोजकासारखी हवेत छडी हलवत नकारार्थी मान हलवताएत.
“नो! नो! अजिबात नो! आता टुमारो! टुमारो ऑल्वेज कम्स यार!”
आता धोटेंचा प्येशन संपलाय.
“येऽऽ चला रंऽऽ घुसूयाऽऽ हेऽऽऽ”
सगळे धावत जाऊन निमामावशीच्या पाळणाघराच्या लोखंडी ग्रीलशी झटू
लागलेत. कडले गर्भगळीत होत सैरावैरा नाचू लागलेत.
“एऽऽ ओऽऽ अरय़ेऽऽ अहोऽऽ माझं ऐकाऽ माझं ऐकाऽऽ मंडळी! मंडळी!.. बापरे!
आता माझ्या घराच्या दाराचं काय होणार? आतल्या माझ्या नवसानं लाभलेल्या
अतिसुंदर निमाचं काय होणार? आणि हे सगळे वळू आत घुसले तर?-”
कडले जोरात “अगं आई गं!ऽ” अशी आरोळी ठोकतात. छातीशी हात धरत खाली
पडतात.
“आईऽऽ आई गं!ऽ”
मग एक डोळा मिटून कानोसा घेतात. सगळे धावत त्यांच्या जवळ.
“आईऽऽ आईऽ मि-मित्रांनो माझं ऐका! आता काय मी फार दिवस जगत नाय!”
सगळे आनंदाने उड्या मारत एकमेकाला टाळ्या देतात, “होऽऽ”
कडले दचकून उठून बसलेत.
“नाही! एवढ्या लवकर काय मी जात नाय! तुमच्या खुषीचं कारण कळलंय मला!
जरा हात द्या! तु-तुम्ही नको! फार ओरडता तुम्ही! हां! तुम्ही- अगं आई गं! हात
जोडतो! माझ्या मित्रांनो उद्या सकाळी सात वाजता ऑफिस उघडतो!”
सगळे नाही! नाही! अशी ओरड करतात. कडले आपली छाती चेपताएत.
“अगं आई गं!.. अं.. तुमच्या निमाताईला बरं नाहिए आज!”
“काय झालंय? काय झालंय?” सगळे उत्साहाने आणखी जवळ आलेत.
“आई गं! भलतेच उत्साही दिसताएत हे! आई!ऽ नाही! तेवढं काही सिरियस
नाहिए!”
खिशातून कागदाची टोकन्स काढतात.
“मित्रांनो! माझ्यावर दया करा! ही टोकन्स घ्या नंबराची आणि उद्या या! प्लीज!”
धोटेच्या अक्षरश: पाया पडतात. उठून टोकन त्याच्या हातात कोंबतात.
धोटे दाराकडे बघतो, “शी:!”असा उद्‍गार काढतो, निघू लागतो. कडले एकेकाच्या
हातात टोकन्स कोंबताएत तसतसे जमलेले सगळे पाळीपाळीने दाराकडे वळून पहात
नर्वस होऊन निघू लागलेत. कडले रांगेत टोकन्स वाटत रांगेच्या बाजूबाजूने बरेच
पुढे आलेत.
“चोर साले! मुलांना पाळणाघरात ठेवायला येतात की पाळणाघरवालीला पहायला
येतात!- नाही! नाही तुम्हाला नाही!- हो! हो! येईल ना! उद्या येईल तुमचा नंबर! या!
या आता!- आशाळभूत साल्ये!- घ्या! घ्या!”
घाम पुसतात. कपाळावर हात ठेऊन रांग न्याहाळतात. त्याचवेळी घरातून
खणखणीत हाक ऐकू येते.
“रितिकऽऽ आवरलं का तुमचं?”
“हो! हो! आलो! आलो! झालं हं! -तुम्हाला नाही! मला! मला! रितिक नाम है मेरा!
रिकामजी तिरूपती कडले!”
घाम पुसत टोकन्स मोजताएत.
“घ्या! पंचाण्णव, शहाण्णव- अगं आई गं- नव्याण्णव-”
थकले भागलेले कडले टोकन वाटप संपवून घराच्या दरवाज्याकडे निघतात. ते
दरवाजा उघडून आत शिरून सेकंद दोन सेकंद झाले नाहीत तोवर अगदी शेजारच्या
फ्लॅटमधल्या जावडेकरांचा पाच-सात वर्षाचा अंकित शाळा सुटून धूम ठोकून पळत
पळत आलाय. आपल्या घरासमोरच्या पॅसेजमधल्या कट्ट्यापर्यंत येऊन तो दम
खात थांबतो. मागे वळून बघत हसतो.
“हऽहऽ.. आऽजीऽऽ हाऽहाऽएऽऽ आज्जडऽ येऽ लवकर येऽ”
आजीच्या चालण्याची नक्कल करतोय.
“चाललीए आपली डोलत डोलत! हा हाऽऽ हाऽ एऽ आज्येऽ”
लांबवरून येत असलेल्या आजीचा ’आल्ये रेऽऽ’ असा पतिसाद त्याला ऐकू आलाय.
अंकित हसत इकडे तिकडे पहातो. त्याचं लक्ष निमामावशीच्या पाळणाघराच्या
ग्रील्सच्या दरवाज्याच्या कडीकडे गेलंय. आजी अजून लांब आहे असं पाहून तो
पाळणाघराच्या आतला कानोसा घेतो आणि पटकन ती कडी बाहेरून लावून घेतो.
हसत हसत पुन्हा आपल्या घराच्या बंद दाराकडे येतो. अजून लांबच असलेल्या
आजीकडे बघत मोठमोठ्याने हसू लागतो, “होऽऽ आज्याऽहोऽऽ”        
(क्रमश:)           


Monday, January 16, 2012

कॉमेडी शो: यल आणि डिविट्री (की यम आणि सावित्री?)

Saturday, January 14, 2012

कॉमेडी शो: रिझर्वेशन!

शाहीर:   सोंगाडे सायेब ओ सोंगाडेसायेब अवं थांबा की वाईच!
सोंगाड्या: कश्यापाय थांबू?
शाहीर:   आवो आवो आसं आंगावर काय येताय?
सोंगाड्या: मंग काय करू?
               शाहीर:   आरं! आरं! काय झालंय काय मला सांगा! आवो संध्याकाळ झाली. दिस सरला. गुरं रानाकडनं घराकडं परतायला लागली –
सोंगाड्या: मला बी जाऊद्या
शाहीर:   काटी न घोंगडं घेटल्याबिगर जाऊद्या हा हा हा...
सोंगाड्या: (चिडवत) हॅ हॅ हॅ हॅ. शाईर तुमास्नी सांगतोय ही चेष्टा करायची येळ न्हाई!
शाहीर:   (हाताचा आंगठा वर करत) मग कस्ली येळ ह्ये?
सोंगाड्या: च्या मायला आता काय करू?
शाहीर:   थांब थांब थांब गड्या. वाईच निवांत हो. काय झालंय? कोन चचलं? का कुनी अपघातग्रस्त हाय का? कुनी आजारी हाय का माज्या सोन्या?
सोंगाड्या: (रडत) काय सांगू शाईर. मला रिजर्वेशन दिना हो कुनी!
शाहीर:   रिजर्वेशन? हातिच्या! आत्ता दिऊ की! काय म्हनून पायजी रिजर्वेशन? म्हंजी कुटल्या कॅटॅगरीत पायजी त्येवडं सांग! मी द्येतू रिजर्वेशन!
सोंगाड्या: म्हॅनॅ मॅ द्यॅतू! अवो काय द्येताय? सोपं हाय व्हय त्ये?
शाहीर:   आरं येकदम सोपाय. हा हा हा... आंदोलन करायचं. पब्लिकच्या मालमत्तेची लुस्कानी करायची. पत्रकारांच्या दरवाज्यावर डांबर ओतायचं. तुला सांगतो आग्दी म्येट्येकुटीला म्हन्त्यात बग – म्येट्ये –
सोंगाड्या: म्येटाकुटीला. काय शाईर तुमी आशुद बोलायलाय.
शाहीर:   आरं म्येट्ये का म्येटा कायतरी कुतीला- आपलं ह्ये कृतीला याचं- आन आरक्षन मिळवायचं म्हंजी मिळवायचंच. आरक्षन मिळवणं म्हंजी माजा जन्मसिद्द हाक्कं हाय आन त्यो मी –
सोंगाड्या: ओय. इस्टॉप. आगुदर ही गाडी थांबवा.
शाहीर:   आदी हात दाकवा. हात दाकवा –
सोंगाड्या: आन आवलक्षान करून घ्या-
शाहीर:   ये थोबाड फोडीन. हात दाकवा गाडी थांबवा.
सोंगाड्या: अव पर तुमची गाडी तर भरधाव पळायाच लाग्ली!
शाहीर:   आरं आरक्षन हा मुद्दाच तसाय बाबा. भल्याभल्यांची गाडी पळाय लाग्लीया. हाईस कुटं?
सोंगाड्या: शाईर मला माज्या फ्यामिलीला आरक्षन पायजी. पर ह्ये नव्हं.
शाहीर:   आरक्षन पायजी! ह्ये नव्हं! म्हंजी मी काय समाजलो न्हाई गड्या!
सोंगाड्या: मला उन्हाळ्याच्या रजंत बायकूपॉरास्नी आमच्या हीच्या म्हायेरी घिऊन जायाचं ह्ये. मला त्ये आरक्षन पायजी.
शाहीर:   आरं मग जा की! लाईनीत उबं राह्याचं. तिकीट काडायचं का सपलं!
सोंगाड्या: काय सपलं? सोपं हाय व्हय त्ये?
शाहीर:   जगात काय सोपं आस्तंय राव. म्हेनत! म्हेनत! ती करायाच लागती!
सोंगाड्या: तीच करून करून घ्येरी याला लाग्ली. आता घरी जायलाग्लोय.
शाहीर:   भ्येटलं रिजर्वेशन?
सोंगाड्या: भॅटलॅ? अव आसं भ्येटायला त्ये काय वरच्या आळीचं गंप्या हाय व्हय? सदानकदा आपलं चावडीवर पसारल्यालं.
शाहीर:   मग पॉईंटाचा मुद्दा काय ह्ये?
सोंगाड्या: तुमास्नी काय राव सरकारी कोट्यातून भ्येटत आस्तील तिकीटं. तुमी ये ग्रेड आर्टिश्ट. आमची तिच्या मारी ग्रेड कंदी ठर्नार कुनास ठाऊक!
शाहीर:   सोंगाडे! मुद्याचं बॉला!
सोंगाड्या: मुद्याचं काय ह्ये मुद्याचं? दिसभर लायनीत उबं
राह्यलो. मी ज्या लायनीत उभा राह्यलो त्या खिडकीवरचा बाबू म्हन्ला मी दीड वाजता म्हंजी दीड वाजता माजी खिडकी बंद करनार!
शाहीर:   लंच टाईम आसंल.
सोंगाड्या: अव लंचटाईमला खिडकी बंद आस्तानाच मी
जाऊन उभा राह्यलो. चाळीसावा.
शाहीर:   अव लवकर जायाचं. काम कुनाचं ह्ये?
सोंगाड्या: समदी कामं आपलीच की वो! ती करून जाऊन
उभा राह्यलो. चाळीसावा लंबर.
शाहीर:   मंग?
सोंगाड्या: मंग काय मंग? त्यो म्हने दीड म्हंजी दीडला-
शाहीर:   त्ये समाजलं. पर का?
सोंगाड्या: आमी समद्यानी इच्यारलं पर का? ह्येड बाबू म्हनला हिशोबासाटी बंद. बंद म्हंजी बंद! दुसरे खिडकीम्ये जाव!
शाहीर:   हिंदीत?
सोंगाड्या: दम द्याला हीच भाषा वापरतात समदी!
शाहीर:   दुसर्‍या खिडकीच्या सामनं किती मानसं?
सोंगाड्या: आनकी चाळीस पन्नास.
शाहीर:   अवं गप काय बस्लात! आंदोलन करायचं!
सोंगाड्या: कटाळलेत लोक शाईर कटाळलेत! घुसनारे
घुसले. आंदोलन करनारे भांडत बस्ले आनि लायनीला मुकले!
शाहीर:   आनी तुमी?
सोंगाड्या: रांगंच्या शेवटी जाऊन बस्ले. आमचा हिंसेवर इश्वास
न्हाई शाईर!
शाहीर:   मंग कश्यावर ह्ये?
सोंगाड्या: पेशनवर ह्ये शाईर प्येशनवर!
शाहीर:   म्हंजी वाट बघन्यावर!
सोंगाड्या: वाट लागस्तंवर वाट बघन्यावर!
शाहीर:   आसं म्हनू नगा सोंगाडे. अव मग दीड वाजल्यापास्नं आता ह्ये संद्याकाळपातुर काय क्येलंत?
सोंगाड्या: (दुर्वा उपटल्यासारख्या खुणा करत) लोक लायनीत
हुबं राहून करत्यात त्येच!
शाहीर:   अवं यापरीस मंग दुसरं काय तरी करायचं. येकादा एजंट गाठायचा. त्ये ई तिकीट का काय म्हन्त्यात त्ये काडायचं. अव मायंदाळ सोई हाईत हात जोडून!
सोंगाड्या: तुमास्नी हात जोडतो शाईर. आता तरी घरी
जाऊद्या.
शाहीर:   आरं पर त्या रिजर्वेशनचं काय झालं श्येवटी?
सोंगाड्या: टोकनं दिल्यात टोकनं उद्यासाटी. आता परत उद्या
भीक मागायची रिजर्वेशनसाटी!
शाहीर:   आर रा रा रा... काय रं ही सामान्यं मानसाची
आवस्था. सादं सुटीत गावाला सुकासुकी जाता यिनाऽऽ
सोंगाड्या: काय सांगू शाईर. काय तरी करा शाईर! तुमच्यासारक्या सरकारदरबारी वजन आसनार्‍या मानसानं कायतरी कराया पायजी!
शाहीर:   करतू मी . करतू मी. या आदीवेशनात मांडतू
मी. नायतर आसं करतो आमच्या निवडनूक जाहिरनाम्यात-
सोंगाड्या: त्यापरीस आसं करा माजं मानधनाचं पाकीट –
शाहीर:   (विंगेत हात उंचावून) आरं गनपा ये गनपा आरं तुजं काय जालं बाबा? तुजा काय प्राब्लम जालाय? आसं काय तुजं तोंड? (निघून जातात)
सोंगाड्या: (मागे धावत) शाईर! शाईर! माजं पाकीट! पाकीट! थूत तिच्या मारी! येकांद डाव “त्ये” रिजर्वेशन सहज भ्येटंल तिच्यामायला. पर गावाकडचं रिजर्वेशन आनि शाईरांकडनं पाकीट भ्येटनं म्हंजी-छ्या छ्या: च्या मारी... (कपाळ बडवून घेत उभा रहातो)  
        ह्याच प्रहसनाचं अभिवाचन ऐकण्यासाठी इथे टिचकी द्या!

Thursday, January 12, 2012

स्कीट: बाटली आणि बाईसुद्धा!

बंडू आणि गुंडू अजूनही नववर्षाच्या जल्लोषात नेहेमीप्रमाणे फूल टाईट होऊन बारच्या बाहेर झुलत आहेत.बंडूला सॉलिड काहीतरी सांगायचंय पण गुंडू वाकून वाकून रस्त्यावरून जाणार्‍या व्यक्तींच्या चेहेर्‍याकडे, त्या उजवीकडून डावीकडे दिसेनाश्या होईपर्यंत आशाळभूतपणे बघतोय.

बंडू:   हाहाहाहा!(तोंडावरून हात फिरवत, डोळे स्थिर करण्याच्या प्रयत्नात) च्यामारी चांगला झाला सेशन!(ढेकर देतो) ए! ए! तू कुटे ग्येलास? ए! ए!
गुंडू:   (वाकूनच) छया! छया! छया छया छया!
बंडू:   अर्‍ये कुटे, काय, काय छया? (वाकून शोधत) अर्‍ये इथे आहेस तू? वाकून वाकून काय शोधतोयस असा? तुला दिसतंय? दिसतंय तुला आजुबाजूचं? (डोळे चकणे होताहेत) अर्‍ये मला तर, (आंगठा वर करून) तर्रर्र तर्रर्र काहीच दिसत नाय एकतर्रर्र झाल्यावर नायतर्रर्र तर्रर्र चार चार दिसतात च्यामारी! ए! तू खरा कुटला ए! पयला? ए! दुसरा? ए! खर्रर्र! हे आपलं तर्रर्र! ए यार बोअर करू नको यार!
गुंडू:   (कॉन्सन्ट्रेट करण्याच्या प्रयत्नात, तोंडावर बोट ठेवताना त्रास होतोय) शू:ऽऽऽ (नजर रस्त्यावरच्या व्यक्तींना फॉलो करतेच आहे)
बंडू:   (आपल्या बुडाशी बघत) ए! ए! हवा कोणी सोडली यार! ए! मी? ए! तू? (वैतागत) ए! शी: शी: यार! शी:ऽऽऽ तू यार हे काय लावलंएस आज?
गुंडू:   शू:ऽऽ (हाताचा आंगठा उंचावत) तू लावलंएस तेच! आपण आत्ता आतमधे सोबतच लावत बसलो होतो ना रे ए! थांब यार मला जरा कॉन्सन- कॉन्सन- ते हे-
बंडू:   तेच तेच म्हणतोय मी मगासपास्नं! तुला काय कॉन्सनशेश- कॉनशेश- कॉन छया: यार! (कंटाळून गुंडूची गचांडी धरत) च्या मारी! तू काय शोधतोएस मगासपास्नं? (त्याची नक्कल करत) अथ अथ करून? ते कॅलिडो कॅलिडो त्ये बांगडयांच्या काचा घालून फुटया- फुटयाच्या सुरनळी- सुरनळीत घालून लहानपणी फिरवायचो त्ये, रंगीत नक्षी बघायचो ना आपण कॅलिडो! कॅलिडो! शी: यार स्कोपच द्येत नाय! च्या मारी कॅलिडोस्कोप! आठवलं! एऽऽ
गुंडू:   एऽऽ शू: शू: थांब यार! शू: शू: ऽऽ
बंडू:   (करंगळी वर करत) तुज्या येऽऽ तू जाऊन नाय आला काय आत? शूशूशूशू कॅय? जाऊन ये तू!
गुंडू:   शू:ऽऽऽ
बंडू:   आता फार झालं ये फार्रर्र फार्रर्र (स्वत:शीच) नाय नाय यार! जरा डिप्लोमॅटिकली घेतलं पायजे हां हां यार! आख्खी आख्खी ही येवडी डिप्लोमॅट घश्यात खाली केलीय शी: (डोकं झटकत) तू साल्याऽ (वाकून गुंडू कुणाकुणावर नजर फिरवतोय ते बघून चकीत होत) बाब् बाब् बाब् बाब्! अर्‍ये ह्ये काय करतोएस तू?ऽऽऽ तू साल्या नजर ठेऊन राहतोएस? (सात्विक संतापाने बेभान होत) वाईट नजर! वाकडी नजर! या आयाबहिणींवर! आपल्या! तुझ्या माझ्या! अर्‍ये आदीच आपण बदनाम झालोय! ब्येवडे म्हणून! ब्येवडे! ब्येवडये म्हणतात लोक आपल्याला! बाटलीत बुडालेले आणि तू आता बाईच्याही मागे लागलाएस! शिव शिव शिव शिव! शांतम पापम! आणि पुढे काय? (जोरात गुंडूला धरून आपल्याकडे वळवत) एऽऽ तुला बोलतोय मी तुला! अर्‍ये हा आपला टॉवरवर उभा! दुर्बिण फिरवत! एऽ उभा र्‍हा! उभा र्‍हा आधी! असा! माझ्याकडे तोंड वळवून! असा नाय र्‍ये! असा माझ्या तोंडावर भपकारा सोडून नाय र्‍ये! असा! हां हां असा! तू ह्या- ह्या- (खूप प्रयत्न करून उजव्या नाकपुडीवर बोट टेकवत) ह्याच्याही मागे लागलास? बाईच्या? अर्‍ये-
गुंडू:   (भेसूर आवाजात रडत) मग काय करू दादा!ऽऽ
बंडू:   दादा? अर्‍ये! काय करू म्हणजे? काय करू म्हणे काय करू? अर्‍ये जिंकू किंवा मरूच्या लेवलला जाऊन ह्ये आसं दुर्बिण लाऊन बसतोएस? आपली काय लेवलबिवल आहे की नाय? का आपलं काहीही ऍवेलेबल आहे म्हणून फोकस लाऊन उभं र्‍हायचं? ह्ये असं? अर्‍ये तुला काय लाज, शरम, बेशरम! (चिडत) नामोहरम करून टाकीन तुला हरमखोर!- हे आपलं- हरामखोर!
गुंडू:   (डोळे पुसत) काय करू र्‍ये मी! मी काय करू?
बंडू:   पर्रर्रत त्येच! आर्‍ये लाज वाटते र्‍ये मला तुझी! लाज! आपल्या जातीला- ब्येवडयांच्या- कलंक आहेस तू कलंक! अगदी कळकट कलंक! शी:
गुंडू:   (ओक्साबोक्शी रडत) मला कळतं र्‍ये दादा! मला कळतंऽ
बंडू:   (दोन्ही हातांनी जोरात स्टेअरिंग व्हील फिरवल्यासारखं करून तोल सावरत) मग वळव! वळव स्वत:ला! तसं नव्ह्ये र्‍ये बाबा माज्या सोन्या तसं नव्ह्ये उजवीकडून डावीकडे हा असा फोकस धरून नव्ह्ये! च्य्क! च्यक्! च्यक्! (कपाळाला हात लावत) कसं सांगू तुला यार! (पटकन उडी मारत) कसं काढू तुला या चिखलातून बाह्येर! कसं काढू! की (हात उंचावत) येकच काढू तुज्या कानाखाली? गणपती? संताप! संताप होतो र्‍ये मला! संताप! तुज्या असल्या करणीमुळे! अर्‍ये लोक काय म्हणतील मला? येवडं माजं स्टेट-स्टेट-स्टेटस आहे! (मागच्या बाजूला हात करत) आतमधे! तो वेटर काय म्हणेल? तो चकणा आणणारा काय म्हणेल? तो बेचेनवाला काय म्हणेल? आईस आणणारा काय म्हणेल? ढूस झालो फूल टू की ग्लासात पाणी ओतणारा आणि ग्लास तोंडाजवळ आणून आपल्याला पाजणारा तो काय म्हणेल? अर्‍ये येवडंच काय बाह्येर- बाह्येर- तो (घडयाळात बघण्याचा प्रयत्न करत) आत्ता आत्तापर्यंत उघडा असणारा, मावा, शिग्रेट द्येणारा तो लोंढयांबरोबर आलेला परप्रांतीय काय म्हणेल? तो गल्ल्यावरचा आण्णा काय म्हणेल? (हळू आवाजात) बिल भरलंयस न तू आत्ताचं? (गुंडू रडत रडत मान डोलावतो) तू यार काळीमा फासलास यार! आपल्या ब्येवडयांच्या जातीला! छया!
गुंडू:   दादू!
बंडू:   (उचकी देत) दादू?
गुंडू:   मला माप कर यार! माप कर! पण मला सुदरत नाय यार! गल्ली, मार्ग, रस्ता, वे, हाय वे, एक्सप्रेस वे काय काय काय पण सापडत नाय यार!
बंडू:   म्हणून सागरी सेतू शोधलास तू? हा! (वाकून कुतर्‍यासारखी जीभ बाहेर काढून हलवत, उजवीकडून डावीकडे नजर फिरवून गुंडूची नक्कल करत) अर्‍येऽ टोल द्यावा लागेल! टोल! टोलवाटोलव करशील तू तेव्हा? असं तुला वाटतं? अर्‍ये आसं रस्त्यावरच्या प्रत्येक बाईवरनं नजर फिरवत तिचा मागोवा घेत उभं र्‍हाणं बेकायदेशीर आहे! गुन्हा आहे तो गुन्हा! आत टाकतील तुला! वर फटके द्येतील!
गुंडू:   (रडत भेकत) अर्‍ये मला माहित का नाही दाद्या!ऽ
बंडू:   म्हंजे? माहित का नाही म्हंजे? माहित आहे का नाही? नसेल तर का नाही आणि असेल तर- द्येऊ काय तुज्या आता येक थोतरीत ठयेऊन! द्येऊ?
गुंडू:   (ओक्साबोक्शी रडत) माहितीये र्‍ये मला ह्ये सगळं मलाऽ माहित्येयऽ
बंडू:   (प्रचंड चकीत होऊन डोळे गरागरा फिरवत) माहित्येय? तुला माहित्येय? आणि तरीही? छया छया छया आआक् थू थू थू! अर्‍येऽ छी थू होईल र्‍ये तुझी थू!ऽऽ थू थू थूत् तुझ्या जिनगानीवर! मला येक सांग (खांद्यावर हात ठेवत) शायनी व्हायचंय तुला? शायनी? आं? पोलिस तर फोडतीलंच, आतमधे ते ढुपर असतात ना! हाप मर्डर, फूल मर्डर, गेम वाजवलेले, अतिरेकी, दहशतवादी! ते पण फोडतील!
गुंडू:   होर्‍ये!
बंडू:   (पुन्हा डोळे गरागरा फिरवत) होर्‍ये?
गुंडू:   होर्‍ये म्हणजे माहिती आहे र्‍ये! पण नाय र्‍ये! पण मला कंट्रोल नाय करता येत र्‍ये स्वत:ला!
बंडू:   (पुन्हा प्रचंड चकीत होऊन डोळे गरागरा फिरवत) कंट्रोल करता नाय येत? नाय येत? ब्येवडयांच्या जातीला डांबर फासलंस र्‍ये डांबर! ब्येवडा असून कंट्रोल नाय? मी बघ! (तोल जातो, घश्यात उलटी येऊ लागते) ऑऽ- आहे की नाय कंट्रोल! आहे की नाय घट्टं उभा! स्वत:च्या पायावर! आणि तू हे काय चालवलंयस! फ्रस्ट्रे- फ्रस्टे्र- फ्रस्ट्रे-
गुंडू:   स्टेशन!
बंडू:   आलं? स्टेशन आलं? च्यक्! अर्‍ये अजून लोकलमधे बसलो पण नाय 
              आपण छया! शीट यार!
गुंडू:   सहन होत नाय आणि सांगता पण येत नाय यार मला! 
              (बंडूच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागतो)
बंडू:   (डोळे पुन्हा मोठे आणि चकणे होतात) बाब् बाब् बाब् बाब्! म्हणजे येवडी प्रगती क्येलीस तू या क्षेत्रात? मला न विचारता? ए बाजूला हो! बाजूला हो! सहन होत नाय, सांगता येत नाय म्हंज्ये तुला येडस् झालाय ए येडस्! (बंडू गुंडूला एकसारखा झिडकारू लागतो आणि त्यामुळे गुंडू आणखी भावनाविवश होऊन बंडूला बिलगू लागतो) आर्‍ये हाड! हाड! हाड! हाड! (गुंडू भडक साऊथ इंडियन सिनेमातल्यासारखा साऊथ इंडियन भाषेत आतडं पिळवटून रडू लागतो तो रडताना काय बोलतोय हे न कळून बंडू आणखी हैराण आणखी वैतागलेला) अर्‍ये मर्‍हाटीत मर्‍हाटीत बोल! मर्‍हाटीत बोल नायतर मी मनसे- आयशप्पत मनसे फोडीन तुला!ऽऽ
गुंडू:   (फायनली मर्‍हाटीत रडत) तुला काय वाटलं रे ए ए ए! मी येणार्‍या जाणार्‍या बायकांना ’त्या’ नजरेने बघतोय येवडं कॉन्सन्- कॉन्सन्-
बंडू:   स्टेशन!-
गुंडू:   आलं? लोकलमधे बसल्याशिवाय? एऽएऽएऽ तू कन्फ्यूज करून माजा फ्यूज उडवू नको एऽएऽएऽ! मी त्या नजरेने बघतो असं वाटलं तुला? तुला? एऽएऽए राम आणि श्याम, चंगू आणि मंगू, बंडू आणि गुंडू अशी आपली नामचीन जोडी असूनसुध्दा? तुला आसं वाटलं?
बंडू:   येऽऽऽ मेलोड्रामा बंद कर तुझा! डेलिसोपमधेसुध्दा बरं रडतात, भेकतात र्‍ये याच्यापेक्षा! मऽग मला सांऽग! भर रात्री, असा फोकस लाऊन, भर रस्त्यात तू कुठल्या नजरेने बघत होतास तुज्या आय- तुज्या आया भयणींकडेऽऽऽ
गुंडू:   त्येच ना त्येच ना! तुला काय माहित माझं दु:ख काय आहे तेऽऽ
बंडू:   ओक र्‍ये माझ्या बाबा ओक आता काय त्ये!
गुंडू:   मला शायनी म्हणालास तू शायनीऽ
बंडू:   मग काय बाबा रामद्येव म्हणू?
गुंडू:   अर्‍येऽ बाबाऽ रामाऽ द्येवाऽ येक बाई टिकत नाय रे घरात कामवालीऽऽ
बंडू:   अर्‍ये ह्ये तर शायनीपेक्षा खतरनाक झालंऽऽ
गुंडू:   तू शायनी मारायच्या बंद कर यार! माझं ऐक! किती कामवाल्या बायका लागतात घरी! येक जेवण बनवायला, येक वॉशिंग करायला! येक भांडी घासायला! येक पोराला आंघोळ घालायला, एक आंघोळ झाल्यावर पुसायला, एक पुसून झाल्यावर त्याला भरवायला-
बंडू:   म तुझी आई आणि तुझी बायको काय करतात
घरात बसून?
गुंडू:   भांडतात र्‍ये भांडतात त्या! आईला ही बाई नको, बायकोला तीच पायजे! बायकोला दुसरी नको तर आईला तीच पायजे! र्‍येऽ ह्ये सगळं आता आईच्या मावस चुलती पर्यंत आणि बायकोच्या चुलत मामे खापरपणजीपर्यंत गेलंय! ह्या सगळया मिळून फुल्या मारतात र्‍ये मी कष्टाने शोधून आणलेल्या कामवाल्या बायकांवर!
बंडू:   बाब् बाब् बाब् बाब्! असा प्रॉब्लेम आहे काय तुझा?
गुंडू:   तुला बरंय र्‍ये तुझं सगळं गावाला पाठवून तू मोकळा! मी काय करू? कुठून शोधून आणू सकाळसंध्याकाळ नवीन नवीन कामवाली बाई? म्हणून फोकस लाऊन उभा होतो! अर्‍ये शायनीचं आणि माझं वेगळं आहे र्‍येऽ
बंडू:   आं? म्हंज्ये?ऽऽ
गुंडू:   तसं नाय यार! समजून घ्ये तू तरी! समजून घ्ये!
बंडू:   उगी उगी उगी! उपाय आहे आपल्याकडे! चल्! परत आत चल्! आणखी दोनचार टाकू घश्यात! चल्! 
गुंडू:   (डोळे पुसत) चल्!
      (दोघेही पुन्हा बारच्या दरवाज्याकडे जातात.)