romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, September 27, 2008

पुलाखालून बरंच, प्रकाशित कादंबरी, अक्षर मानव, पुणे (०२०-६५२२९२७६)


उड्डाणपूल आणि आम्ही
आमच्या जवळच्या महामार्गावर उड्डाणपूल होणार अशी बातमी आली आणि कितीही स्थितप्रज्ञ असलो तरी आमचा आनंद गगनात मावेना.आमच्यातल्या पायी चालणाऱ्यांची महामार्ग ओलांडतानाची कसरत, सर्कस बंद होणार म्हणून ते खुश झाले.आमच्यातले सौंदर्यवादी, महामार्गाच्या त्या परिसराला एक वेगळंच आर्किटेक्चरल परिमाण मिळणार म्हणून खुश झाले.गाडीवाले आता सुखद प्रवास, वाहतूक कोंडी नाही, या विचारानं पावलोपावली होणाऱ्या मानसिक कोंडीवर विजय प्राप्त करू लागले.आपल्याकडे पॉझिटिव्ह विचारसरणी नाहीच! उशीरा का होईना या शहरावरचं ओझं कमी करणारी योजना कार्यान्वित होतेय तर त्यात बिब्बे घालणारे अनेक.मग वाहनांची संख्याच कशी बेसुमार वाढेल, प्रदुषणच कसं वाढेल, खर्च किती होईल, कर्जं कशी फेडणार, काय गरज आहे या अव्यवहारी योजनेची, त्यापेक्षा हे शहर आता मरायला टेकलंय, त्याला जगवण्यासाठी इतर अनेक अधिक महत्वाच्या उपाययोजना करायच्या तर… अशी राळ उडवली गेली.राळ नाही तर काय?शहराची दोन वेगवेगळ्या दिशांची टोकं क्षणार्धात एकमेकाला मिळणार ते कुठेच गेलं!मंत्री हटले नाहीत, सरकार हटलं नाही, थोडा काळ, “मी असं विधान करतो, मग तू असं विधान कर, त्यावर-” असा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचा सामोपचाराचा हुतुतू झाला.पण एकूणच, उड्डाणपूल झालेच पाहिजेत आणि तेही आत्ताच यावर सगळ्यांचं एकमत झालं.मंडळाच्या हसऱ्या जाहिरातीत सगळे नेते एकसारखे दिसत होते आणि हसत होते.मंडळही नुसतं नव्हतं, “महा” होतं.एवढं सगळं झालं तरी आम्हाला या प्रकाराची पुरेशी झिंग अजून आली नव्हती.झिंग नाही तर मग मजाच नाही!किती नेते, उपनेते, गटप्रमुख, उपप्रमुख, विभाग असतात राजकारणात!उड्डाणपुलांचे उदघाटन समारंभ सुरू झाले आणि तेव्हाच आम्हाला ही माहिती झाली.अज्ञानात सुख असतं असं कोण म्हणतं?तर झिंग.आमच्या जवळच्या त्या महामार्गावर सिमेंटच्या पोत्यांचे ट्रक आले, सळ्या आल्या, विटा आल्या, गर्डर्स आले.सिमेंट मिक्सिंगची ती अवाढव्य मशिन्स आली, इतकंच नव्हे तर शेकड्यानं कंत्राटी कामगार दिसायला लागले.एका उड्डाणपुलाच्या कामात किती दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना रोजगार मिळणार होता!काहींचं म्हणणं हे कामगार परप्रांतीय आहेत.मग काय करणार?कंत्राटदार माणसं कुठून आणणार?खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा स्वप्रांतीयांचा बाणा!असोअसो!आम्ही या सगळ्या प्रकाराची झिंग पुरेपुर अनुभवायला लागलो होतो हे नक्कीच बिनमहत्वाचं नव्हतं…
(संपादित अंश)

Sunday, September 21, 2008

घाटी दरवाजा

कोपऱ्यात, अंधारात असलेल्या त्या कार्तिकेयाच्या देवळाबद्दल अढी मात्र कायम राहिली.कोपऱ्याबाहेर उजव्या दिशेला पसरलेली छोट्या देवळांची रांग.शेजारी शेजारी असलेल्या दुकानांसारखी.पुढे खरंच अश्या गाळ्यांमधून पेढे, फुटाणे, बत्तासे, साखरफुटाणे, हळदीकुंकू, गंध, उदबत्त्या, नारळ, ओटीचं साहित्य विकणारी दुकानं.कार्तिकेयाच्या देवळानंतरची ही रांग घाटी दरवाज्यापर्यंत.दरवाज्याअलिकडच्या रिकाम्या कमानीत देवीचा भला मोठा रथ "पार्क" केलेला.त्याला झोंबणारी, वरपर्यंत चढणारी मुलं.घाटी दरवाज्याजवळ असलेल्या त्या गाळावजा देवळांच्या भल्या मोठया एकचएक लांबलचक ओटीवर बसलेल्या बायका, मुलं, बायकांचे हास्याविनोद, खेळणारी मुलं.या ओटीच्या घाटी दरवाज्याजवळच्या टोकाला कोपऱ्यात सुरू होणाऱ्या आणि दरवाज्याच्या माथ्यावरच्या भल्यामोठया घंटेपर्यंत पोहोचवणाऱ्या दगडी पायऱ्या.वर मोठी घंटा असलेली भव्य कमान असलेला म्हणून हा घाटी दरवाजा,आम्हाला घरच्यांनी वर या घंटेपर्यंत कधीच पोहोचू दिलं नाही पण कित्येक मुलं जायची.आजी त्यांना वांड म्हणायची.अगदीच रागावलेली असली की उंडगी म्हणायची.ही भली मोठी घंटा-घाट वाजलेली मी प्रत्यक्ष कधीच पाहिली नाही.भल्या पहाटे काकडआरती होण्याआधी तिचा आवाज कधीतरी ऐकला आणि त्यापेक्षा जास्त ऐकले ते परिसरात त्या पहिल्या घाटेशी निगडीत वाक्प्रचार.घाटी दरवाज्याच्या कमानीत दोन दुकानं.समोरसमोर.पूजाविधिंसाठी साधनं, देवांच्या तसबिरी, प्रसाद वगैरेंची.इथे आलं की बाहेर काय आहे याची उत्सुकता.बाहेर एक देऊळ.त्या देवळासमोर लोखंडाची जाळी लाऊन बंद केलेली विहीर.त्यात कासव.या विहीरीचीही पूजा.देऊळ शुभ्र पांढरं.चुना लाऊन रंगवलेलं.त्या देवळाच्या भिंतीत १फूट बाय १फूट असेल अशी शंकरपाळ्यांचा आकारांची भोकं असलेली जाळी.ही जाळी, देवळाच्या दरवाजाची कडा, कळसाकडे जाणाऱ्या पायऱ्यांसारख्या रचनेच्या प्रत्येक कोपऱ्यावर असलेले छोटे दगडी चौकोन, कळसाआधीचं घुमट आणि कळसाचं टोक हे सगळं शेंदरी.देवळावरची ही शुभ्र आणि शेंदरी रंगसंगती ठसठशीत, उठून दिसणारी.या देवळाच्या आगेमागेही एक छोटसं देऊळ.ही देवळं कायम बंद असल्यासारखी.आत कधीच जाता आलं नाही.

Saturday, September 13, 2008

देवळाची भीती...

पुढे कितीही मंदिरं बघितली तरी माझ्या आजोळच्या राममंदिराची मजा काही औरच.पुजारी भरपूर तीर्थ द्यायचे.त्यात पंचामृत आणि थंड पाणी.ते पिऊन उजवा हात मोठ्या माणसांसारखा केसांवरून फिरवायचा.तरीही हात ओला राहिला तर मग चड्डीला.राम,लक्ष्मण,सीतेकडे बघत बघत(पुन्हा एकदा) घंटांकडे जायचं.त्या चार-पाच घंटांमधली खणखणीत वाजेल अशी डेरेदार गट्टूचा टोल असलेली घंटा निवडायची.उड्या मा-मारून ती वाजवायची.ती वाजली की निघताना मोठ्या माणसांप्रमाणे छातीशी हात जोडून किंवा साष्टांग नमस्कार.रामाच्या देवळातनं चटकन पाय बाहेर निघायचा नाही पण बाहेर जाणंही हवंच असायचं.मग पुन्हा रामाच्या सोप्यात…सगळी मंडळी तल्लीन.बुवा तल्लीन.बुवांच्या आवाजाची पट्टी वर चढलेली.आता तो सोपा उतरावा असं वाटायला लागायचं.त्याचवेळी त्या सोप्याच्या अर्ध्या भिंतीच्या पलिकडे आई,मावशी कुणीतरी दिसायच्या.रामाचा सोपा आणि तो वडाचा भला मोठा पार यांच्या मधून वाट निघायची.या वाटेने रामाच्या देवळाच्या उजव्या बाजूला गेलं की अनेक छोट्या देवळांची रांग लागायची.या रांगेअलिकडे एक अंधारा बोळवजा कोपरा.आई-मावशीला बघून मी लगेच त्यांच्याकडे धावलो की त्या मला त्या कोपरय़ातल्या बोळवजा अंधारात एक देऊळ होतं तिथे पिटाळायच्या.मला आत जायला भीती वाटायची आणि त्या सारख्या जा!दर्शन घेऊन ये! असा आग्रह करायचा.मी म्हणायचो तुम्हीही या! त्या म्हणायच्या बायकांनी तिथे जायचं नसतं.मुलींनीही नाही…कोपरय़ातल्या त्या अंधारात दोन-तीन देवळं.एकमेकाला लागून.अंधारात जटा वाढवलेले,भस्माचे पट्टे ओढलेले,काळे काळे साधू!मी आत जायला जाम तयार नसायचो.त्यांचा आग्रह चालूच.माझी अवस्था बघून त्यांचं मला हसणं,माझी खिल्ली उडवणं.अंधार,साधू,बायकांना बंदी असलं कसलं देऊळ?...गणपतीच्या मोठ्या भावाच्या, कार्तिकेयाच्या त्या देवळाबद्दल मनात भीती राहिली.भीतीमुळे अढी.देवानं असला कसला निश्चय करायचा?स्त्रीचं तोंड न बघण्याचा?त्यानं बघायचं नाही म्हणून बायकांना बंदी?...डोक्यात प्रश्न चालू व्हायचे…

Thursday, September 11, 2008

रामाचं देऊळ

मी शहाण्या मुलासारखा त्या गोष्टीतल्या… गोष्टीकडे एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचो पण माझ्या नजरेचं एक अग्र आजीच्या दिशेने असायचं.हळूहळू आजीची उजवी मांडी उभी व्हायची आणि डावी मांडी आडवी.तिचं लक्ष पुराणाकडे.मग हळूच तिचा हात,हाताचं कोपर आडव्या मांडीवर रूतायचं.हाताच्या पाच सुरकुतलेल्या पण मांसल बोटात तिचा गोबरा चेहेरा टेकायचा.गोबरय़ा गालावर तर्जनी रूतली की डाव्या गालातला चेंडू नाहीसा व्हायचा.उजव्या गालातला चेंडू डब्बल!मजा वाटायची.आजी स्थिर झाली की जरावेळाने मजा संपायची.मग पुन्हा इकडे तिकडे…रामाचं देऊळ हे त्या संकुलातलं अगदी अलिकडचं,चकचकीत,लख्ख!जुनाट असं काहीही नाही.फरशी चकचकीत राखाडी रंगाची,गुळगुळीत.तिच्यावर हात फिरवत तसाच बसायचो.मग खूपच कंटाळा याय लागायचा.रामाच्या देवळातलं तीर्थ प्यावसं वाटायला लागायचं.उडी मारून घंटा वाजवावी असा फारच मोह व्हायला लागायचा.मी आजीच्या गालातल्या त्या डब्बल चेंडूकडे बघत बघत हळूच उठायचो.आज्जी गुंग.मी हळूच आत देवळात जायचो.रामाच्या देवळात आवडण्यासारखं खूप होतं.पहिलं म्हणजे लखलखीत प्रकाश.अंधार अजिबात नाही.मुख्य म्हणजे राम,लक्ष्मण,सीता यांच्या पांढरय़ाशुभ्र संगमरवरी मूर्ती.बघतच बसाव्यात अश्या.टक लावून पाहिलं की त्या हसताहेत असं वाटायचं.त्यांची नेहेमी बदलत रहाणारी रेशमी वस्त्रं!रेशमाचे गर्द लाल,निळे,जांभळे,पिवळे,हिरवे असे रंग त्या शुभ्र मूर्तींना खुलून दिसणारे.दृष्टं लागण्यासारखे.राम लक्ष्मणाच्या खांद्यावरचे धनुष्यबाण,सीतेचे दागिने,पुढ्यात हात जोडून बसलेला मारूती.असं देऊळ कुठेच असणार नाही असं मी पैजेवर सांगायचो.ठाकुरद्वारचं गोराराम मंदिर बघेपर्यंत…

Tuesday, September 2, 2008

गोष्टीतली गोष्टं पुढे चालू...

पुराण सांगताना गाडगीळबुवाचं गोष्टीतल्या गोष्टीची गोष्टं असं सुरू झाल्यावर आम्हा मुलांचं आजुबाजूचं निरीक्षण चालू व्हायचं… डांबरी रस्ते व्हायच्याही आधी मातीचे रस्ते होते.मळलेल्या पाऊलवाटांवर मऊ मऊ माती असायची.त्या मऊ मऊ मातीत आम्ही किड्यांची घरं आणि मग किडे शोधायचो.हातात बारीकशी काडी घेऊन.माती नाजुकपणे उकरून.हळूवार भोवरा फिरवल्याप्रमाणे त्या लहान भोकांभोवती मऊ मातीचा भोवरा किड्यांनी आधीच तयार केलेला असायचा.या घरात ’मोर’ असं नाव असलेले किडे असतात असं मोठी पोरं सांगायची.मग त्या भोकात हळूहळू ती काडी गोल गोल फिरवत ’मोरा,मोरा ये! ये!’ असं म्हणत आम्ही त्या ’मोरा’ला शोधायचो.मोर किडा सापडला की आणखी बरंच काही अनपेक्षित आणि मौल्यवान(त्या वयात तसं वाटणारं)मिळणार असायचं.मोर त्याच्या त्या घरात क्वचितच सापडायचा.मऊ मातीचे भोवरे सोडलेली भोकं मात्रं जागोजागी दिसायची… पुराणातल्या गोष्टीतल्या गोष्टींच्या गोष्टी ऐकत आत आत जाणं तसं असायचं आम्हा लहान मुलांना.मग आम्ही कुठे वर झुंबरांकडे बघतोय,देवळात कोण जातंय,कोण कोण बाहेर येतंय,देवळातली घंटा कोण कशी वाजवतंय ते बघत,ऐकत बसायचो.आणखी कंटाळा आला की आळस देताना लक्ष पाठीमागे जायचं.भला मोठा दगडी पार.भल्या मोठ्या वडाच्या झाडाखालचा.त्याच्या पारंब्या जाडजूड,लांबलचक,जमिनीवर लोळणारय़ा.चिक्कार वांड पोरं या पारंब्यांना सतत वाघळांसारखी लटकलेली.झोके घेत असलेली.वडाला लालभडक फळांचे गुच्छ.झाडाखाली,पारावर आणि त्याही खाली सिमेंट कॉंक्रीटच्या आवारावर पक्षांनी चोचून आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या लालभडक फळांचा खच.त्यांचा वास.कुणीतरी बद्द झालेले घुंगरू झाडावर बसून अखंड वाजवत असल्यासारखी पक्षांची कुचकुच… ते बघत असताना माझ्या तोंडून चुकून आळस दिल्याचा आवाज निघायचा.आजीचं लक्ष जायचं.डोळे मोठे व्हायचे.मग मी शहाण्या मुलासारखा त्या गोष्टीतल्या,गोष्टीतल्या… गोष्टीकडे एकाग्र(?)होण्याचा प्रयत्न करायचो...