romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, September 11, 2008

रामाचं देऊळ

मी शहाण्या मुलासारखा त्या गोष्टीतल्या… गोष्टीकडे एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचो पण माझ्या नजरेचं एक अग्र आजीच्या दिशेने असायचं.हळूहळू आजीची उजवी मांडी उभी व्हायची आणि डावी मांडी आडवी.तिचं लक्ष पुराणाकडे.मग हळूच तिचा हात,हाताचं कोपर आडव्या मांडीवर रूतायचं.हाताच्या पाच सुरकुतलेल्या पण मांसल बोटात तिचा गोबरा चेहेरा टेकायचा.गोबरय़ा गालावर तर्जनी रूतली की डाव्या गालातला चेंडू नाहीसा व्हायचा.उजव्या गालातला चेंडू डब्बल!मजा वाटायची.आजी स्थिर झाली की जरावेळाने मजा संपायची.मग पुन्हा इकडे तिकडे…रामाचं देऊळ हे त्या संकुलातलं अगदी अलिकडचं,चकचकीत,लख्ख!जुनाट असं काहीही नाही.फरशी चकचकीत राखाडी रंगाची,गुळगुळीत.तिच्यावर हात फिरवत तसाच बसायचो.मग खूपच कंटाळा याय लागायचा.रामाच्या देवळातलं तीर्थ प्यावसं वाटायला लागायचं.उडी मारून घंटा वाजवावी असा फारच मोह व्हायला लागायचा.मी आजीच्या गालातल्या त्या डब्बल चेंडूकडे बघत बघत हळूच उठायचो.आज्जी गुंग.मी हळूच आत देवळात जायचो.रामाच्या देवळात आवडण्यासारखं खूप होतं.पहिलं म्हणजे लखलखीत प्रकाश.अंधार अजिबात नाही.मुख्य म्हणजे राम,लक्ष्मण,सीता यांच्या पांढरय़ाशुभ्र संगमरवरी मूर्ती.बघतच बसाव्यात अश्या.टक लावून पाहिलं की त्या हसताहेत असं वाटायचं.त्यांची नेहेमी बदलत रहाणारी रेशमी वस्त्रं!रेशमाचे गर्द लाल,निळे,जांभळे,पिवळे,हिरवे असे रंग त्या शुभ्र मूर्तींना खुलून दिसणारे.दृष्टं लागण्यासारखे.राम लक्ष्मणाच्या खांद्यावरचे धनुष्यबाण,सीतेचे दागिने,पुढ्यात हात जोडून बसलेला मारूती.असं देऊळ कुठेच असणार नाही असं मी पैजेवर सांगायचो.ठाकुरद्वारचं गोराराम मंदिर बघेपर्यंत…

No comments: