romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, September 21, 2008

घाटी दरवाजा

कोपऱ्यात, अंधारात असलेल्या त्या कार्तिकेयाच्या देवळाबद्दल अढी मात्र कायम राहिली.कोपऱ्याबाहेर उजव्या दिशेला पसरलेली छोट्या देवळांची रांग.शेजारी शेजारी असलेल्या दुकानांसारखी.पुढे खरंच अश्या गाळ्यांमधून पेढे, फुटाणे, बत्तासे, साखरफुटाणे, हळदीकुंकू, गंध, उदबत्त्या, नारळ, ओटीचं साहित्य विकणारी दुकानं.कार्तिकेयाच्या देवळानंतरची ही रांग घाटी दरवाज्यापर्यंत.दरवाज्याअलिकडच्या रिकाम्या कमानीत देवीचा भला मोठा रथ "पार्क" केलेला.त्याला झोंबणारी, वरपर्यंत चढणारी मुलं.घाटी दरवाज्याजवळ असलेल्या त्या गाळावजा देवळांच्या भल्या मोठया एकचएक लांबलचक ओटीवर बसलेल्या बायका, मुलं, बायकांचे हास्याविनोद, खेळणारी मुलं.या ओटीच्या घाटी दरवाज्याजवळच्या टोकाला कोपऱ्यात सुरू होणाऱ्या आणि दरवाज्याच्या माथ्यावरच्या भल्यामोठया घंटेपर्यंत पोहोचवणाऱ्या दगडी पायऱ्या.वर मोठी घंटा असलेली भव्य कमान असलेला म्हणून हा घाटी दरवाजा,आम्हाला घरच्यांनी वर या घंटेपर्यंत कधीच पोहोचू दिलं नाही पण कित्येक मुलं जायची.आजी त्यांना वांड म्हणायची.अगदीच रागावलेली असली की उंडगी म्हणायची.ही भली मोठी घंटा-घाट वाजलेली मी प्रत्यक्ष कधीच पाहिली नाही.भल्या पहाटे काकडआरती होण्याआधी तिचा आवाज कधीतरी ऐकला आणि त्यापेक्षा जास्त ऐकले ते परिसरात त्या पहिल्या घाटेशी निगडीत वाक्प्रचार.घाटी दरवाज्याच्या कमानीत दोन दुकानं.समोरसमोर.पूजाविधिंसाठी साधनं, देवांच्या तसबिरी, प्रसाद वगैरेंची.इथे आलं की बाहेर काय आहे याची उत्सुकता.बाहेर एक देऊळ.त्या देवळासमोर लोखंडाची जाळी लाऊन बंद केलेली विहीर.त्यात कासव.या विहीरीचीही पूजा.देऊळ शुभ्र पांढरं.चुना लाऊन रंगवलेलं.त्या देवळाच्या भिंतीत १फूट बाय १फूट असेल अशी शंकरपाळ्यांचा आकारांची भोकं असलेली जाळी.ही जाळी, देवळाच्या दरवाजाची कडा, कळसाकडे जाणाऱ्या पायऱ्यांसारख्या रचनेच्या प्रत्येक कोपऱ्यावर असलेले छोटे दगडी चौकोन, कळसाआधीचं घुमट आणि कळसाचं टोक हे सगळं शेंदरी.देवळावरची ही शुभ्र आणि शेंदरी रंगसंगती ठसठशीत, उठून दिसणारी.या देवळाच्या आगेमागेही एक छोटसं देऊळ.ही देवळं कायम बंद असल्यासारखी.आत कधीच जाता आलं नाही.
Post a Comment