Saturday, September 13, 2008
देवळाची भीती...
पुढे कितीही मंदिरं बघितली तरी माझ्या आजोळच्या राममंदिराची मजा काही औरच.पुजारी भरपूर तीर्थ द्यायचे.त्यात पंचामृत आणि थंड पाणी.ते पिऊन उजवा हात मोठ्या माणसांसारखा केसांवरून फिरवायचा.तरीही हात ओला राहिला तर मग चड्डीला.राम,लक्ष्मण,सीतेकडे बघत बघत(पुन्हा एकदा) घंटांकडे जायचं.त्या चार-पाच घंटांमधली खणखणीत वाजेल अशी डेरेदार गट्टूचा टोल असलेली घंटा निवडायची.उड्या मा-मारून ती वाजवायची.ती वाजली की निघताना मोठ्या माणसांप्रमाणे छातीशी हात जोडून किंवा साष्टांग नमस्कार.रामाच्या देवळातनं चटकन पाय बाहेर निघायचा नाही पण बाहेर जाणंही हवंच असायचं.मग पुन्हा रामाच्या सोप्यात…सगळी मंडळी तल्लीन.बुवा तल्लीन.बुवांच्या आवाजाची पट्टी वर चढलेली.आता तो सोपा उतरावा असं वाटायला लागायचं.त्याचवेळी त्या सोप्याच्या अर्ध्या भिंतीच्या पलिकडे आई,मावशी कुणीतरी दिसायच्या.रामाचा सोपा आणि तो वडाचा भला मोठा पार यांच्या मधून वाट निघायची.या वाटेने रामाच्या देवळाच्या उजव्या बाजूला गेलं की अनेक छोट्या देवळांची रांग लागायची.या रांगेअलिकडे एक अंधारा बोळवजा कोपरा.आई-मावशीला बघून मी लगेच त्यांच्याकडे धावलो की त्या मला त्या कोपरय़ातल्या बोळवजा अंधारात एक देऊळ होतं तिथे पिटाळायच्या.मला आत जायला भीती वाटायची आणि त्या सारख्या जा!दर्शन घेऊन ये! असा आग्रह करायचा.मी म्हणायचो तुम्हीही या! त्या म्हणायच्या बायकांनी तिथे जायचं नसतं.मुलींनीही नाही…कोपरय़ातल्या त्या अंधारात दोन-तीन देवळं.एकमेकाला लागून.अंधारात जटा वाढवलेले,भस्माचे पट्टे ओढलेले,काळे काळे साधू!मी आत जायला जाम तयार नसायचो.त्यांचा आग्रह चालूच.माझी अवस्था बघून त्यांचं मला हसणं,माझी खिल्ली उडवणं.अंधार,साधू,बायकांना बंदी असलं कसलं देऊळ?...गणपतीच्या मोठ्या भावाच्या, कार्तिकेयाच्या त्या देवळाबद्दल मनात भीती राहिली.भीतीमुळे अढी.देवानं असला कसला निश्चय करायचा?स्त्रीचं तोंड न बघण्याचा?त्यानं बघायचं नाही म्हणून बायकांना बंदी?...डोक्यात प्रश्न चालू व्हायचे…
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment