माझा फोटो पेपरमधे आला- आला म्हणजे तसा नव्हे!- त्याचं काय झालं, मी आपला नेहेमीसारखा लेट आणि त्यामुळे घाईघाईत धावत पळत चाललो होतो कामावर.आता रस्त्याने चालताना इकडे तिकडे बघायची काय सोय आहे? मग मला कसं कळणार कोणीतरी माझा फोटो काढतंय ते! अगदी-अगदी फ्लॅश जरी मारला तरी काय लक्षात येणार त्या अशा घाईगर्दीच्या वेळी! मला मनात सारखा दिसत होता आमच्या रिकामटेकड्या साहेबाचा तुळतुळीत डोक्याचा फ्लॅश.लेट येणारय़ांवर पडणारा.कुणीतरी डाव साधला.दुसरय़ा दिवशी वर्तमानपत्रात मी.खाली ओळ, ’मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा!’ आहे! म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ.दुर्दशेच्या- रस्त्यांचा- फोटो आणि त्यात नेमका ठळक दिसणारा मी.झालं घरच्यांची बोंबाबोंब सुरू!
मी तसा काही अतिविनम्र वगैरे अजिबात नाही.तसं राहून या जगात भागतं का कुणाचं? पण मला झाल्या प्रकारात काही विशेष वाटत नव्हतं.खरी गोची पुढेच होती.
मनू म्हणजे माझा जीवश्चकंठश्च वगैरे वगैरे.तो कसाही वागला तरी वेळेला तोच समोर.जिवणी आकंठ पसरवत, डोळे बारीक करत.म्हणजेच हसत.मनूला सांगावं फोटो आलाय तरी पंचाईत न सांगावं तरी वर्षभर टोमण्यांचा, कुत्सित हसण्याचा मारा.त्या दिवशी काही मनू भेटला नाही.रात्रभर मला झोप नाही.
दुसरय़ा दिवशी मनू दिसला.नर्व्हसच दिसत होता.नेहेमी तो स्वत:हून पुढे येणारा आज मीच पुढे झालो.रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबाकडे बघून मनू नर्व्हस हसला.मी, जरा चाचरतच, काल फोटो आल्याचं त्याला सांगितलं,त्यानं माझ्याकडे बघितलं.मी सावध झालो.मग तो पुन्हा हसला.काडेचिराईत, कडू कारलं आणि एरंडेल एकत्रित प्यायल्यावर माणसाचा चेहेरा जसा होईल तसं ते हसणं.त्याच्या पोटातलं ढवळणं त्याच्या चेहेरय़ावर स्पष्टं दिसत होतं.तसा तो हसला आणि पुन्हा दिव्याच्या खांबाकडे बघायला लागला.बराच वेळ काही प्रतिक्रिया नाही म्हणून मी नि:श्वास टाकला.चला म्हटलं, स्टेशनकडे चालू पडू.आज पुन्हा उशीर नको, नाहीतर साहेबच फोटो काढायचा आणि ’वर’ पाठवायचा.फोटोला आणि मलासुद्धा.
“वा! वा! वा! वा!” -हा मनूच!- एकदम याला काय झालं म्हणून चालता चालता मी मनूकडे बघितलं.जोरात हसत माझ्या पाठीवर थाप मारत मनू माझ्याबरोबर चालायला लागला. “ मोठे झालात आता! प्रसारमाध्यमांशी सलगी झाली आता तुमची!” मी बावळटासारखा त्याच्याकडे बघत राहिलो. ’प्रसारमाध्यमं’ म्हणजे ’कालचा पेपर’ हे नंतर लक्षात आलं.मनू आता आपलं हे कौतुक करतोय की आपल्याला जोड्यानं मारतोय हे काही लक्षात येईना.ते कधीच कळून द्यायचं नाही ही मनूची खासियत आहे आणि अशावेळी बुचकळ्यात, नुसतं पडणं नव्हे, पडून रहाणं ही माझी.
“मग? काय पार्टी वगैरे केली की नाही काल रात्री? ओली? सुकी?” आणि मनू पुन्हा जोरात हसला.मी आणखी बुचकाळलेला.आता माझ्या चेहेरय़ाकडे बघून मनू खूष! “अरे करायची पार्टी! मला बोलवायचंस. ओळख आहे न माझी?” माझ्या खांद्यावर हात ठेऊन मनू थोपटायला लागला. “चांगलं आहे! चांगलं आहे!” असं म्हणत पुन्हा जोरात हसला.मग नेहेमीसारखं अचानक गंभीर होत त्यानं विचारलं, “मग? प्लॅन्स काय आहेत पुढचे?” आता मला बुचकळ्यात पडून पडून वैताग आला.मी चिडून म्हणालो, “मनू काय यार! कसले प्लॅन्स? पकवायला पण लिमिट असतं यार!” – “वेडा आहेस! इथेच तुमचं चुकतं.तुमचं चुकतं ते इथेच!” मनू माझ्या कानात गरम हवा सोडत म्हणाला.बुचकळ्यात पडून पडून आता माझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. “हेच कॅश करायचं असतं!” मनू म्हणाला. “काऽऽयऽऽ?” मी जोरात ओरडलो.
मनूची म्हणजे कोड्यावर कोडी.त्याच्या खास समजुतदार आवाजात तो म्हणाला, “हे बघ! आज तू बरय़ाच लोकांना माहित झालास!” मी उगाचच इकडेतिकडे टकामका बघत राहिलो.माझ्या शर्टाची कॉलर ओढत मनू म्हणाला, “इकडे बघ! उद्या ते तुला विसरतील.तेव्हा आजच त्या प्रेस फोटोग्राफरला गाठायचं.त्याच्याशी मैत्री करायची.त्यासाठी त्याला खिलवायचं, पिलवायचं!”- “अरय़ेऽ पण कशासाठी?ऽऽ“ मी त्राग्याने विचारलं. “मूऽर्खासारखे प्रश्नं विचारू नकोस आणि आधी नेहेमी बावळटासारखा तोंडाचा आऽऽ वासलेला तुझा हा चेहेरा बदल.तुझा फोटो आलाय काल पेपरात! तर- त्या फोटोग्राफरशी मैत्री कर.त्याला विश्वासात घेऊन त्याच्याबरोबर फीर!” इथे वेळ कुठे आहे- असं मात्रं मी मनात म्हणालो.पण मनूनं ते ओळखलं.
“उद्या आणखी मोठा होणार आहेस तू! मध्यमवर्गीय विचार सोडून द्ये!ऽ त्या फोटोग्राफरला सोडू नकोस.त्याच्या फोटोंमधे या ना त्या कारणाने दिसायला लाग.तुझा चेहेरा ओळखीचा होईल.प्रत्येक फोटोमधे हाच का दिसतो असं लोक विचारणार नाहीत.त्याना तेवढा वेळ नसतो.वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या फोटोंमधे दिसायला लाग!” मनूचं हे म्हणजे फार होतं.पण मी गप बसलो.
मनू आता फूल फार्मात होता, “हळूहळू तुला टीव्ही सिरियल्स मिळायला लागतील!” मनूचा हा दणका मात्र जोरात होता.मी भारावलोच! “हां!ऽऽ असाच चेहेरा ठेऊन फोटो काढून घे! पेपरात, ’देवाशी चिटचॅट’, ’माझी आवड निवड’, ’माझं बालपण’, माझं ’हे’, माझं ’ते’ असं काहीही लिही.फोटोसकट छापून आण.हा मोठेपणाचा पहिला टप्पा! सतत, तुझं हे तुझं ते, छापून यायला लागल्यावर रिकामटेकडे लोक तुला आणखी मोठं करतील.तुझ्यासारख्याच दोघाचौघांना घे, चांगल्याश्या हॉटेलात जेवण घेत असलेले तुमचे फोटो द्येऽऽ छापूऽऽन! मिळाला तुला हिंदी पिच्चर! आहेस कुठे?”
मनू बोलायचा थांबला आणि मी वेडा झालो.किती सोप्पं होतं सगळं! माझी झोप मात्र आजपासून पारच उडणार होती! जय मनू!...
1 comment:
मनूच्या सहा सातही पोस्ट जबरी झाल्या आहेत. मला आवडल्या.
शुभेच्छा
सोनाली
Post a Comment