मनू हा माझा मला न टाळता येणारा सहचर आहे हे वाक्य जेव्हा मला सुचलं तेव्हा मी स्वत:वर जामच खूष झालो.नाहीतरी काळ्यावर पांढ- माफ करा- पांढरय़ावर काळं करणारे किंवा आजच्या जमान्यात हवेतल्या हवेत ब्लॉगपोस्ट्सरूपी बार उडवणारे स्वत:वर खूष असतातच म्हणे!
एरवी जगात इतक्या वेगवेगळ्या नात्यांमधे मनू मला भेटतो की तो म्हणजे कोण याची व्याख्या करणं कठीण.ह्या नात्यांच्या गुंतागुंतीत अडकून माझाच मनू होतोय की काय असं वाटायला लागलं आहे.
मी लिहितो.आपल्या भाषेलाच घरघर लागली आहे असं म्हणताना मी काय तारे तोडतोय ते तुमच्या समोर आहेच.तारे तोडता येईनात आभाळच वाकडं अश्या एका संभ्रमित सर्जनावस्थेत (?) मी एक कादंबरीच लिहिली आहे असा एक दिवस माझा समज झाला.सालं हे एक मोठं धाडसंच होतं.झालं! मला झोप लागेना.
याच दरम्यान कधीतरी मनूची आणि माझी भेट झाली.
“दिवाळी अंकाची तयारी करतोय!” चेहेरा लांबट करून तो तसाच ठेवत, केसांच्या रूपेरी बटांशी खेळत तो म्हणाला आणि टक लाऊन माझ्याकडे पहात राहिला.
“व्वा! व्वा! अरे तू म्हणजे-” भानावर येऊन मी म्हणालो.
“तू नाही! तुम्ही-तुम्ही!!” आख्ख्या डाव्या हाताने बटा कपाळावरून डोक्यावर सरकवत तो आत्मविश्वासाने म्हणाला.हसलाही नाही.
“हो…हो…तुम्ही-तुम्ही...अभिनंदन…आणि-आणि ऑल द बेस्ट!” एवढं बोलून झाल्यावर मनूच्या एकूण अवतारा-अविर्भावाकडे बघून मी गप्पच झालो.तो टक लाऊन बराच वेळ माझ्याकडे पहात राहिला आणि गाल वाकडा करणारं संपादकीय स्माईल करून दिसेनासा झाला.
मजा म्हणजे त्या दिवसांत आम्ही बरय़ाच वेळा भेटलो.वेगवेगळ्या छायाचित्रणस्थळी त्याच त्या संवादांचे प्रसंग सादर व्हावेत तसे तोच तोच सीन सादर होऊ लागला.मनू तसाच करडी टक लाऊन ’दिवाळी अंकाची तयारी करतोय’ असं सांगतोय, त्याच्या टक लावण्याने हैराण होऊन मी गप्पं होतोय, तो दिसेनासा होतोय!
बरय़ाच गोष्टींचे अर्थ मला झोपेतून दचकून जाग आल्याशिवाय कळतंच नाहीत.मनूच्या टकीचा अर्थ असाच लागला. ’मी माझं लिखाण तुला देऊ का?’ असं मी होऊन मनूला विचारायला हवं होतं.मी प्रथितयशच काय एखादा बनचुकाही लेखक झालेला नसल्यामुळे मी गरीबडा बापडा गप बसत होतो.त्यात मी आधीच केलेलं नको ते धाडस.हातातल्या लिखाणाला कादंबरी समजण्याचं.
मनू माझा जिवलग.तो मला थेट का विचारत नव्हता?... याचा अर्थ मला गरज होती!!! हा साक्षात्कार झाल्यावर मात्र मी बैचेन झालो.संधी एकदाच येते व दार ठोठावते हे व अशा अर्थाची देशी मॅनेजमेंट गुरूंची अनेक मुक्ताफळं माझ्याभोवती दिवसरात्र पिंगा घालू लागली.शेवटी मी मनाचा हिय्या केला.मागच्या अनेक वेळच्या तू-तुम्ही मुळे मनूला प्रत्यक्ष भेटण्याचं धाडस म्हणजे आणखी एक नको ते धाडस आणि मी पडलो मध्यमवर्गीय.शेवटी हो-ना करता करता माझी कादंबरीची संहिता कुरियरद्वारे मनूच्या पत्त्यावर पाठवून दिली.अर्थात तू-तुम्हीच्या खेळामुळे हा कोण? असा वाजवी प्रश्न पडून संहिता न वाचताच (केराच्या टोपलीत) पडू नये म्हणून सोबत माझा परिचयही जोडला.
आठ दिवसातच स्वत: मनूचा फोन आला आणि माझा आनंद गगनात मावेना.परिचय जोडण्याचा विक्षिप्तपणा का केलास म्हणून त्याने सर्वप्रथम माझी हजेरी घेतली.मी ते ही वाचलं असं त्यानं मुद्दाम नमूद केल्यासारखं सांगितलं.माझ्या अक्षराचं त्यानं मनापासून कौतुक केलं.हा मनू की डेल कार्नेजी ते मला कळेचना.तो मला चक्कं अहो-जाहो करत होता.मी ताबडतोब हरभरय़ाच्या झाडावर चढलो.
“पण सॉरी… माझं या वर्षीच्या अंकाचं काम झालंय-”
“एवढ्यातच?ऽऽऽ” मी जोरात किंचाळून खजुराच्या झाडावर लटकलो.
“यावेळी काय? नेहेमीच! एक दिवाळी अंक छापून आला की लगेच पुढच्या अंकाची तयारी!”
“सहा महिने आधीच अंकाचं काम पूर्ण?” माझ्या पडण्याला आता बुचकळाही कमी पडत होता.
“माझी पद्धतच आहे तशी! न छापलं गेलेलं चांगलं साहित्य मी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवतो.” मनूचा स्वर अधिकाधिक मृदू, मुलायम होत होता.अशावेळी आवाजात थोडी बायलेपणाची छटाही डोकावते.माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती.
“मग?” मनूनं जरा चढ्या स्वरात विचारलं.
“…पण…कसं वाटलं तु-तुम्हाला?” मी.
“चांगलंए…वेगळंए…पण कायए…पुढच्या वर्षीचंसुद्धा प्लानिंग झालेलंए त्यामुळे-”
अरे बापरे! मी मनातल्या मनात म्हणालो.मनूच्या अंकाला खरंतर बाजारात कोणी विचारत असण्याची शक्यता कमी होती.खरं तर म्हणूनच मी एवढं मोठं धाडस करायला धजलो होतो.मग मी फोन ठेवण्याच्या बेताला आलो.
“तरीही मला भेटा तुम्ही…संहिता परत घेऊन जा.आणखी कुठे जरूर प्रयत्न करा…संहिता घ्यायला प्रत्यक्षच आलात तर बरं होईल…कायए…दुसरा एक अंक काढतोय…कृषीविषयक…द्या तीन-चार पानी काही.चांगलं लिखाणए तुमचं…अक्षर सुंदरए-”
“कृषीविषयक काहीही लिहिता येणार नाही हो मला! काळ्या आईचा आणि माझा आयुष्यात कधी संबंधच आलेला नाही!” मी केविलवाणा होऊन कळवळून म्हणालो.
“मला भेटा!” आयुर्विमा एजंटच्या अविर्भावात मनू म्हणाला, “सोपं आहे हो मी तुम्हाला ब्रीफ करीन.काही कठीण नाही.तुम्ही सहज लिहाल.” मनूनं मला डायरेक्ट पंखाखालीच घेतलं पण माझं मन मला शंभर पानांवरून एकदम चार पानांवर येऊ देईना.शिवाय मागणीनुसार लेखन अर्थात ऑन डिमांड रायटिंगमधे सापडून डोक्याचं जे भजं होतं त्याच्याशीही मी परिचित होतो.
“केव्हा भेटता?” –मनू
“भेटतो…लवकरच…” –मी
“हं!...एरवी काय करता?”
“नोकरी”
“कुठे?”
“सरकारी खात्यात आहे…कारकूनच…नुकताच जाहिरात आणि प्रसिद्धी विभागात बदलून आलोय…” “तिथे ते हे आहेत का हो अजून…”
मी हो हो म्हटल्यावर मनूने मग ते कसे माझ्या चुलतबहिणीच्या मामेनणंदेचे मावसदीर आहेत, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत वगैरे पद्धतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम मांडला.मला हो ला हो करणं भाग होतं.
“एनी वे…भेटा मला.बोलू आपण.”
“थॅंक्यू व्हेरी मच साहेब! हल्लीच्या साभार पोच इत्यादी सगळं काही नामशेष झाल्याच्या जमान्यात आपण आवर्जून फोन केलात त्याबद्दल!”
मनू मनापासून कौतुकाने हसला.या! असं म्हणून त्याने फोन ठेवला.
नकार पचवणं खूप अवघड असतं.तुम्ही सामान्य असलात तरीही.नैराश्याचं मळभ दाटून रहातं.अश्यावेळी मी अधिक सर्जनशील कामांकडे वळतो.कपड्यांच्या घड्या घालणं, घरातला पसारा आवरणं, मुलाचा अभ्यास आता मी घ्यायलाच पाहिजे असं स्वत:च्या मनाशी म्हणणं…
यावेळी बाहेरगावीच जायचं असल्यामुळे निर्धास्त झालो.त्या आधी मनूच्या घरी माझ्या कादंबरीची संहिता परत घेण्यासाठी फोन केला.मनूच्या कोण्या नातेवाईकाने तो घेतला.चुकतमाकत अमुक वाजता या, भेट होईल, संहिता मिळेल असा निरोप त्याने दिला.घरी गेलो.मनू नाही.दुसरय़ाच दिवशी गावी जायची तयारी बाकी असल्यामुळे अजून अर्धा तास वाट बघणं मला शक्य नाही.मग भ्रमणध्वनीचा सहारा.संहितेची शोधाशोध.संहितेचं सापडणं (एकदाचं!) आणि शोधणारय़ा पात्राचे आभार मानून माझं तिथून निघणं.बाहेरगावी जाणं आणि सगळं विस्मृतीत ढकलणं जाणं…
“हॅलोऽ–”
“हॅलो…”
“हॅलो मी बोलतोय!”
“कोण मी?” बाहेरगावाहून आल्यापासून हा तिसरा प्रथमपुरूषी एकवचनी.दोघांना मी आधीच गारद केलेलं.आता मी हातघाईवर.
“मीच!”
“च्यामारी-”
“कृषीविषयक लिखाणाचं कुठपर्यंत आलंय?” आधी पारा चढू द्यायचा मग त्यावर बायकी शैलीत पाणी- संपादकी हतकंडे- माझ्यातला होतकरू आणि जागरूक लेखक लगेच जागा झाला.
“सा- साहेब- झालाच-झालाच आहे- शेवटचा हात फिरवतोय-” माझी लोणकढी.
“हं…दोनच पानी झाला असता-”
“हो- होईल-” माझ्यातला अगतिक लेखक.
“पण माझं त्या पुढच्या वर्षाचंही काम झालंय…”
आता माझ्यातला होतकरू, जागरूक, अगतिक लेखक इतकंच काय सज्जन माणसाचाही कडेलोट झाला आणि माझ्या मनात फुल्या फुल्या आणि फुल्याच.त्यात मध्यमवर्गी विवेकाचं आगमन.या सगळ्यामुळे माझ्याकडून भला मोठ्ठा पॉज.
“ऑफिस काय म्हणतंय?” मनूचा आवाज आणखी बायकी.आणखी खवचट.
यापुढे मात्र चमत्कार झाला.माझ्यातोंडून दत्तगुरू वदले असतील- नसतील- आमच्या गल्लीतले बापू तरी नक्कीच वदले असणार!
“एक जाहिरातदार भेटले होते ऑफिसात.कुणी दिवाळी अंक काढत असेल-” माझी लोणकढी मला पूर्ण करावीच लागली नाही.
“आहात तिथेच थांबा.मी ताबडतोब येतोय!” खट्ट!- रिसीवर आपटल्याचा आवाज!
पर्वतच महंमदाकडे येत होता.
यशस्वी साहित्यिकाची सगळी बीजं माझ्यात होती तर!
निदान कृषीसाहित्यिकाची तरी!
संमेलनाध्यक्ष होणं आता मला अजिबात कठीण नव्हतं!
मी लगेच स्वत:वर खूष झालो आणि माझ्यातल्या साहित्यधर्माला जागलो!
1 comment:
एकदम भारी झाली आहे पोस्ट!
Post a Comment