romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, September 5, 2011

राज्य (१०)

भाग ९ इथे वाचा!
दुपार झालीय.आई पदर बांधून खोलीतला केर काढतेय.राजूच्या नेहेमीच्या बसण्याच्या जागी त्याची पुस्तकं तेवढी दिसताएत.गठ्ठा केलेली.राजू बाहेरून आत येतोय.त्याच्या डोक्यावर तसाच मोठा गठ्ठा.दमलेला.डोळे लाल.आई त्याला बघते आणि जागच्या जागी उभी रहाते.
 “आलास राजूऽ तुझीच वाट बघत होते! सकाळी लायब्रीत कधी गेलास कळलंच नाहीऽ
राजू दाराजवळच्या खुर्चीजवळ ऍडजस्ट होतोय.
“काय करतो!.. रात्री काही अभ्यासच नाही मग- अगं आई गं! बसतो जरा!.. रात्रंभर अभ्यास होत नाही म्हणून तोंडात मारून घेत होतो-”
“आणिऽ_”
“डास मरत होते!.. माझ्या हातांचा आणि डासांचा पाठलाग! आणि येणारा जाणारा मी काय करतोय ते वाकून वाकून-”
वाकून वाकून दाखवतो मग त्यामुळे खोकल्याची उबळ आलीय ती आवरतो.आईचं झाडून झालंय.ती झाडणी कोपरय़ात ठेवते.
“झोप नाही ना अजिबात?”
“पण स्वप्नं होती पडत..”
“आं?”
“होय! मधेच लांबलचक शेंडी दिसायची.. नंतर कधीतरी घोड्याच्या तोंडाला बांधलेला नुसता तोबरा.. त्यानंतर नुसता लाल लाल रंग!”
“बाईऽऽ रक्ताचाऽऽ?”
“नाही! पानाच्या पिचकारय़ांचा.. पिचकारय़ा पिचकारय़ानी तयार झालेलं लालेलाल तळं!”
“तुला किती वेळा सांगितलं राज्याऽऽ? सारखं डोळ्याला पुस्तक लाऊन बसू नकोऽ
“काल कुठे वाचत होतो?”
“कालचं नाही रे सांगत! रोजचंच!”
“नाही नाही! असं कसं? पुस्तकं वाचल्यामुळेच अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी माणूस कसा ठाम उभा रहातो!”
खुर्चीतून उठून उभा रहातो.
“बस खाली!.. कोणी सांगितलं तुला?”
“आजोबानी!”
“त्याना नव्हता धंदा आणि काम करायचा वांधा! काय करतील? थोबाडासमोर पुस्तक धरणं सोपं सगळ्यात!”
“छे! छे! असं कसं? ते तर म्हणायचे- वाचाल तर वाचाल!”
“ते वाचले.. अरे गप झालास पटकनी! बोल ना! वाचले का ते? चचलेच न शेवटी वेळ आल्यावर?”
“आसं काय गं बोलतेस आई?”
“मग काय? व्यवहार पाहिजे बाबा माणसाला! व्यवहार!”
“ते खरं! पण आजोबा चचले- आपलं.. ते आजारी पडून वारले ते बाबांमुळे!”
आई कोपरापासून हात जोडते.तसं करत असताना तिची टाळी वाजते.मग जोडलेल्या कोपरांखालून डोकं बाहेर काढते.
“तुझ्या बाबाने.. सगळ्यांचे पांग फेडले रे बाबा!”
“नाही- एवढे आजारी होते ते आपल्या गावातल्या घरी, पण बाबांनी ज्याम त्याना इथं आणलं नाही!”
“ते वारल्यावर मग इस्टेटीसाठी मात्रं हाणामारय़ा केल्या! जाऊ दे!.. झालं ते झालं मेलं! तू जेवणार आहेस नं? भूक लागली असेल, रात्री जेवलासच नाहीस व्यवस्थित!”
स्वैपाकघरात जाण्यासाठी वळते आणि थबकते.
“अरे राजूऽऽ हेऽ बघितलंस का?ऽऽ
तिच्या ओरडण्याने राजू थबकून उभाच रहातो आधी, मग त्याचं लक्षं ती दाखवत असलेल्या भिंतीकडे जातं.
“बघण्यासारखं काय आहे आई त्यात! ताईला बघायला येणार आहेत ना? फोफडे उडालेल्या भिंती बघून परत जायचे म्हणून भिंतीवर चादर पसरलीएस तू! नेहेमीप्रमाणे!”
“हांऽऽ तेच! आता बघच तूऽऽ.. ढॅणऽ टऽ ढॅणऽऽ
भिंतीवरची चादर ओढून काढते आणि राजू टाळ्या पिटत नाचू लागतो.
“आईऽऽ आईऽऽ हाय डेफिनेशन! फ्लॅट स्क्रीन! स्मार्ट टीव्हीऽऽऽऽ ये ये ये येऽऽ काय काय आहे गं यात! आ हा हा हा.. वाऊवऽऽऽ मू मू मू मूऽआ..”
भिंतीवरच्या फ्लॅटस्क्रीन टिव्हीचे मुके घेऊ लागतो.
“आई आई आई! आता मॅचेस हरलो तरी बेत्तर! पण दिसतील कसल्या भारी! हूऽऽऽऽ
राजू वेडा झाल्यासारखा स्वत:च्या मांड्यांवर, पार्श्वभागावर जोरजोरात चापट्या मारून, जंगलातल्या वेगवेगळ्या प्राण्यांसारखा ओरडू लागलाय.
“येऽऽऽऽ आमच्याकडे पण आला लेटेष्ट एचडीऽऽ”
“राजूऽ अरे चल! जेऊन घेतोएस नं?”
राजू आईचा हात घट्टं पकडतो.
“नाईऽऽ आईऽऽ नाईऽऽ आधी लाऊया! आधी लाऊया नाऽऽ तू लाव आईऽ तुझ्या हस्ते लाव ना! ऑन तर कर तो! रिमोट माझ्याकडे दे! मी दाखवतो तुला! लाव!”
“अरे पण आधी जेवशील-”
“मरू द्ये गं! लाव तू! आधी लाव!”
आई टीव्ही ऑन करते.राजू तो ऑपरेट करण्याची हाय डेफिनेशन मजा चाखत असताना आई स्वैपाकघरात जाते आणि राजूचं ताट वाढून आणते.
“बघ बघ बघ आईऽ हा चॅनेल बघ! आईऽ.. आई हाऽ बघ!
“राजूऽ.. जेव आधी! कालपासून जेवलेला नाहिएस तू!”
“जेवतो गं! तू बघ नाऽऽ
“तो आधीचा लाव ना! अं हं! त्या आधीचाऽ आं!ऽऽ अगं बाई बापूऽऽ क्षमस्व परमेश्वर.. क्षमस्व परमेश्वर.. क्षमस्व परमेश्वर.. रोज येतात का रे हे इथे?”
“अगं रोज काय! चोवीस तास असतात इथे चोवीस तास! ठाण मांडून!”   
आईने मनोभावे हात जोडलेत.भावनाविवश.
“गुंड्याने माझ्या आगदी.. पांग फेडले बाबा!..”
डोळ्यातून ओघळणारं पाणी तिला पुसावं लागतं.मग ती पुन्हा हात जोडते.
“बघितलंस ना? मी म्हणत नव्हतो!.. बाबांनी ते आधीचं डबडं नुसतं रिपेअरसुद्धा करून आणलं नव्हतं! बघ! बघ!”
मायलेक भिंतीत नजर गुंतवून गुंग झालेत आणि ऑफिसमधून आलेली गार्गी त्यांच्या मागे येऊन उभी.डोळे विस्फारून त्या भिंतीकडे नुसती बघत राह्यलेली..

2 comments:

prathmesh said...

very good story keep it up. Pleses give pdf format of story "rajya." so we can downloaded.

विनायक पंडित said...

प्रथमेश! तुमचं स्वागत!:-) तुमच्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार! सध्या अनेक कामं एकत्र आल्यामुळे थोडा व्यस्त आहे तेव्हा तुम्ही म्हणताय ते व्हायला जरा वेळ लागेल! क्षमस्व..