romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, October 29, 2011

विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या खरय़ाखुरय़ा नायकास...

प्रिय अरुण,
                 तू माझ्या वयाचा नव्हेसच, खरं तर माझ्या वडलांच्या वयाचा.तुला काय म्हणून संबोधायचं इथपासून माझी तयारी.बरं तुझी व्यक्तिगत माहिती काहीच नाही, म्हणजे तुझा जन्म कधीचा, तू.. तू गेलास ती तारीख.परवा तुझा सिनेमा बघितला एक चॅनलवर.खरय़ा अर्थाने तो तुझा सिनेमा नव्हता अर्थात. पण तुझं ते फेटा, जाकीट घातलेलं, धोतर नेसलेलं रूप.पडद्यावरचं ते तुझं अप्रतिम ढोलकी वाजवणं.तुझ्या मनगटावरचा काळा धागा.. तुझा हातखंडा असलेला नायिकेबरोबरचा तुझा प्रेमप्रसंग.. तुझं हसणं, तुझं बोलणं.. त्या तुझ्या सहजतेला अभिनय म्हणणंसुद्धा व्यर्थ वाटलं.तुझं आणि माझं गाव एक हा फक्तं बादरायण संबंध जोडून तुला लिहायला बसणं अपरिहार्य झालं मला.हा भावनेचा खेळ तूच समजून घेशील.
                 तुझा सगळ्यात अप्रतिम सिनेमा कोणता? माहित नाही.तुझं पडद्यावरचं दिसणं अधिक चांगलं की हसणंच चांगलं, तुझा आवाज उत्तम की तुझं बघणं, तुझी नजर वेधून घेणारी.तुझं गावरान रूप अधिक चांगलं की शहरी जास्त प्रभावी.असलं काहीही मला डिफरंशिएट करता येणार नाही.मा.विठ्ठलना मी अगदीच थोडं बघितलं, तुला जास्त बघितलं ते माझ्या लहानपणी पण त्यानंतर ’नायक’ म्हणून कुणीच रूचलं नाही.तुम्ही दोघेच फक्त.अभिनेत्यांची यादी डॉ.लागू, निळू फुले, विक्रम, नाना, अशोक सराफ, दिलिप प्रभावळकर अशी लांबलचक होईल.पण नायक तुम्ही दोघंच.हे माझं मत.
                 तुझ्या एवढी प्रचंड सहजता आणि चार्म अरूण, नाही बघितला कुणात.तू आज असतास तर अनेक प्रश्नं विचारता आले असते प्रत्यक्ष.तू हिंदीत का गेला नाहीस? आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे नायक, अभिनेते आहोत असं तुला वाटतं का? तू ’तुघलक’ केलंस पण तेंडुलकरांचं तुझ्यासाठी लिहिलेलं ’अशी पाखरे येती’ तू नाकारलंस हे खरं का?.. 
                 तुझी कोणतीही विशिष्टं लकब नव्हती, जशी बलराज सहानी, मोतीलाल यांचीही सांगता येणार नाही.आता इथेच थांबतो.तुझी अमुक कुणाशी तुलना करायची नाहिए पण माझ्यामते तू उत्तम अभिनेता होतास.स्टाईलाईज्ड न होता व्यावसायिक चित्रपटांमधून तू लोकप्रिय झालास.
                ’थांब लक्ष्मी कुंकू लावते’ लहानपणी थिएटरमधे बघितलेला तुझा पहिला चित्रपट.मग टिव्हीवर बघितलेले ’संथ वाहते कृष्णामाई’, ’घरकुल’, ’मुंबईचा जावई’, ’सिंहासन’ शिवाय नाव न आठवणारे काही ग्रामीण चित्रपट, तमाशापट.हवालदार नायक आणि त्याच्यासारखाच दिसणारा नायिकेचा पाठलाग करून तिचा खून करू पहाणारा खलनायक असा दुहेरी रोल असलेला चित्रपट.. सिनेमांच्या नावापेक्षा तू लक्षात राहिलास.तुझ्या नायिकांची तुझ्याबरोबर प्रेमप्रसंग करताना काय अवस्था होत होती?
                 तुझा नायक मिष्कील असायचा.तो कधी व्यसनी व्हायचा, मग पश्चातापदग्धही व्हायचा.तो गर्विष्ठही असायचा आणि त्यात खलनायकी रंगही कधी असायचा.हे सगळं तू तुझ्या डोळ्यातून, आवाजातून आणि मुख्य म्हणजे सर्वांगातून आणायचास.आणायचास! दाखवायचास नव्हे! तुझ्या भूमिकांमधून चांगलंच वैविध्य असायचं.तुझ्या प्रेमात असल्यामुळे कदाचित पण तू खूप चांगला माणूसही असावास या माझ्या मतावर मी ठाम आहे.मध्यंतरी, जयश्रीबाई असताना, एका मुलाखतीमधे तुझ्याबद्दल बोलताना त्यांचा गळा भरून आल्याचं मला आठवतंय.तू चांगला माणूसही असल्याचं त्या सांगत होत्या.संभा ऐरा नावाचा तुझा सहकारी तुझ्या माणूसपणाबद्दल खूप आवर्जून बोलला होता माझ्याशी तेही आठवतं.कचकड्याच्या या दुनियेत, मिन्टामिन्टाला रंग बदलणारय़ा सरड्यांमधे तू कसा वावरला असशील? पण तू खरंच मर्दानीही होतास.राजामाणूस होतास.तुझं स्थान तू निर्माण केलंस.
                 सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक निवृत्तीबुवा सरनाईकांचा तुला वारसा.तू गाण्याकडे का तितकंस लक्ष दिलं नाहीस? ’घरकुल’ मधलं ’पप्पा सांगा कुणाचे’.. त्यातलं तुझं गाणं आणि विशेषत: गात गात हसणं.सहज हसणं.हसणं हा कितीतरी अभिनेत्यांचा आजही प्रॉब्लेम आहे.’चंदनाची चोळी..’ मधलं तू गायलेलं ’एक लाजरा न साजरा मुखडा’, ते सुद्धा सुप्रसिद्ध पार्श्वगायिकेबरोबर.कोण विसरू शकेल? ’मुंबईचा जावई’ मधलं रामदास कामतांनी म्हटलेलं ’प्रथम तुज पाहता’ पडद्यावर तुझ्याइतकं चांगलं कोण म्हणू शकलं असतं? तू मात्रं तुझ्यातलं गाणं फारसं मनावर घेतलं नाहीस!- आणि आज गाणं न येणारेही गात सुटलेत.स्वत:चे ढोल तू स्वत:च कधी बडवले नाहीस.तुला त्याची गरज नव्हती.पण तू विस्मृततही लवकर गेलास.तुझा जन्मदिवस, तुझा मृत्यूदिन कोणीही नुसता उधृत केलेलाही आठवत नाही.तुझ्यावर कुणी पुस्तकही लिहिलं नाही.तू मागे सोडलेल्या तुझ्या एकट्या लेकीकडे तुझं बरचसं संचित असेल.ते ती जपत राहिली असेल.
                आजच्या भाषेत सांगायचं तर तू तेव्हा नंबर वन होतास मराठी चित्रपटात.तसं असूनही केवळ शोबाजी केल्यासारखं न करता इमानदारीत नाटकंही केलीस. ’लवंगी मिरची कोल्हापूरची’, ’अपराध मीच केला’, ’तरूण तुर्क म्हातारे अर्क’, ’गुड बाय डॉक्टर’, आणि अगदी ’गोष्टं जन्मांतरीची’सुद्धा.तू छबिलदासला ’तुघलक’ही केलास, जो बघायला मिळाला नाही म्हणून मी आजही हळहळतोय.
                 मी एकदाच तुला हाताच्या अंतरावरनं पाहिलं.एका नाटकाच्या कॉन्ट्रॅक्ट शोच्या वेळी स्वत: बसमधून उतरून तू बस वळवून घ्यायला मदत करत होतास...
                तू आणखी जगला असतास तर काय काय केलं असतंस? मालिकांमधे काम केलं असतंस? जे काय केलं असतंस ते नक्कीच दर्जेदार केलं असतंस.तू चांगल्या चरित्रभूमिका केल्या असत्यास ’सिंहासन’ मधल्या मुख्यमंत्र्यासारख्या आणि आंगापेक्षा बोंगा जड विग लाऊन, आरडत, ओरडत, छातीवर हात दाबून किंचाळी, कंठाळी अभिनय करणारय़ा नेहेमीच्या यशस्वी चरित्र अभिनेत्याना धडे दिले असतेस.कुणीही शेंबडकोंबड्यानं उठून नायक बनण्याच्या आजच्या जमान्यात खरा नायक कसा असतो हे आजच्या तुझ्यासारख्या म्हातारय़ाकडे बघून कळलं असतं त्याना.कळलं असतंच पण वळलं असतं की नाही याची मात्रं मी काहीही खात्री देत नाही.तू आज असतास तर बरंच काही झालं असतं.मुख्य म्हणजे मला खूप बरं वाटलं असतं.पण तू गेलास.गेलास तो ही..
                 काही वर्षांपूर्वी एका आत्मचरित्रात तुझ्याबद्दलचा एक प्रसंग वाचून वाईट वाटलं होतं.पुण्याला तुझ्या नाटकाचा प्रयोग आणि तू पूर्णपणे ’आऊट’.प्रयोग रद्द करण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही.वाईट वाटलं.तुला खरंच खूप दु:ख होतं? कुठली चूक झाली होती तुझ्या हातून डोंगराएवढी म्हणून तू स्वत:वर आणि तुझ्या चाहत्यांवर सूड उगवत होतास? की कलाकार आणि व्यसन ह्यांचं अद्वैत असल्याचा न्याय तूही सिद्ध करत होतास?.. काहीही असलं तरी अगतिक व्यसनाधिनता ही कुणीही मान्य करण्यासारखी गोष्टं अजिबात नाही!
                 नियतीचा डावही असा की या व्यसनातूनही तू पूर्णपणे बाहेर आलास आणि ’पंढरीच्या वारी’ला निघालास. त्याचवेळी एका निर्घृण अपघातात तुला काळानं ओढून नेलं.तुला, तुझ्या पत्नीला, तुझ्या मुलग्यालासुद्धा! त्या भीषण अपघातात आपल्यालाही का नेलं नाही असं मागे राहिलेल्या तुझ्या मुलीला वाटलं असेल.तुमची मरणं अनुभवल्यानंतर ती आजतागायत काय जगली असेल याची मी फक्तं कल्पनाच करू शकतो.
मग हे अरूण नुसतं स्मरणरंजन नाही रहात.मग प्रश्न पडायला लागतात.कलावंताचं कलेसारखं त्याचं आयुष्यसुद्धा नाट्यमय किंवा सिनेमॅटिकच असतं का?.. कलाकार खरंच कलंदर असतो?.. कला शापित असते?.. की मरण अटळ असतं?.. संदर्भ असलेले, नसलेले असंख्य प्रश्नं..
                एका सिनेमात तुला अचानक पाहिलं.वावटळीसारखा माझ्या आठवणींमधे घुसलास तू.माझा नेहेमीचा हळवेपणा म्हणून अनेकवेळा तुझ्या आठवणींना काढून टाकण्याचा प्रयत्न केला.घुसमटत गेलो.तुला लिहायलाच बसलो.ते अपरिहार्य झालं.मला समानधर्मी मिळण्याचे अनेक चान्सेस दिसायला लागले, तुझ्याबद्दल माझ्यासारखंच वाटणारे.
                 अरूण.. तेव्हा.. वेगळ्या रूपात पृथ्वीवर आला असशील तर भेटूच! अन्यथा.. जरूर भेटू!
                 मी निदान तुझ्या गावचा आहे हे पुन्हा एकवार आठवून द्यायची आणखी एक संधी मी निश्चितच सोडू शकत नाहीए.तू काहीही म्हण!
                                                                    तुझा
                                                                              मी

8 comments:

sanket said...

खरंच विस्मृतीत गेलेला गुणी अभिनेता... माझी आणि त्यांची ओळख ही लहानपणी पाहिलेल्या चित्रपटांतली, अंधुक अंधुक.. पण त्यांचे ते रुबाबदार चित्र अगदी मनात भरून राहिलेय.. या लेखातून परत त्या स्मृती चाळवल्या गेल्या.

विनायक पंडित said...

स्वागत संकेत! खूप दिवस साचून राहिला होता आत! लहानपणी ओळख झाली.दूरदर्शन झाल्यावर त्याच्याशी मैत्री झाली.त्याची ताकद कळली.हे पत्रं लिहिल्यावर खूप बरं वाटलं संकेत.मनापासून धन्यवाद!

Anonymous said...

लहानपणी 'डीडी' च्या राज्यात पाहिले होते अरुणजींचे अनेक चित्रपट..ते सगळे विसरलो तरी त्याचं रुबाबदार ठसकेबाज व्यक्तिमत्व भावल होत तेव्हा...तुमच्या लेखामुळे खूप वर्षांनी आठवण झाली त्यांची ...

विनायक पंडित said...

स्वागत देवेन! :)होय तेव्हा डीडीचंच राज्य होतं.एकत्र बसून कृष्णधवल दूरदर्शन बघणं हा तर एक महत्वाचा कार्यक्रम होता! :) अरूण सरनाईकांचे चित्रपट म्हणजे मेजवानी होती.एकूण व्यक्तिमत्वाबरोबर जाणारी त्यांची अप्रतिम सहजता फार लोभसवाणी होती.प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार देवेन!

Shriraj said...

माझ्या वडिलांचा हा एक आवडता अभिनेता ....ते बऱ्याचवेळी बोलत असतात त्याच्याबद्दल.

विनायक पंडित said...

स्वागत श्रीराज!:) अभिप्रायाबद्दल मनापासून आभार!

mau said...

सुंदर लिहिले आहे विनायकजी.
खरचं गुणी अभिनेता ..मला ही ज्याम आवडायचे चित्रपट.एकदा कोल्हापुरला माझ्या बाबांबरोबर गेले असताना भेट घेतली होती.आपण एका अभिनेत्याला भेटलो आहोत ह्याचा अतिशय आनंद झालेला.खुप छान लिहिले आहे तुम्ही.

विनायक पंडित said...

स्वागत उमा! अरे वा! तुम्हाला त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायला मिळाली! खूपच छान! मस्त! अभिप्रायाबद्दल आभार!:)