romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, June 17, 2010

बरसात

कोपऱ्यात गुंतवळ
गोळा झालेलं
वळचणीचा पक्षी
थिजून गेलेला
आभाळ अंधारानं
भरून आलेलं
...आणि इतक्यात
मळभ फुटून
धरतीवर बरसलेलं...

Wednesday, June 16, 2010

जागर!

थेंब थेंब पाऊस
सागर होतो
तुझं माझं प्रेम
एक जागर होतो...

Monday, June 7, 2010

पाऊस!

पाऊस
पाठीवर झेललेल्या गारा
गारेगार झालेलं तोंड
आभाळ फाटून कोसळणारं पाणी
“कपडे भिजले आजारी पडाल”
म्हणून आजीनं घातलेले धपाटे

पाऊस
आयुष्याची सुरवात
इमारतीचं चालू बांधकाम
त्यावरून गळणारं पाणी
ओल्या सिमेंटचे वर जाणारे जिने
वर्गात दाखल होणारा मी

पाऊस
छपरावर होणारा आवाज
रात्रीसारखा दिसणारा दिवस
नळासारख्या गळणारय़ा पागोळ्या
मधूनच चमकणारं आभाळ
दार बंद केल्यावरचा काळोख
आईच्या कुशीत
पांघरूणात गुरफटलेला मी

पाऊस
छत्री न नेणारा मी
पोटात घातलेल्या कॉलेजच्या वह्या
लोकलाजेस्तव डोक्यावर घेतलेला रूमाल
शहारून जाणारं अंग
वडलांना काही कळणार नाही याची खात्री
आईनं पुसलेले केस

पाऊस
गार हवेनं आलेली जाग
डोळे चोळत उठलेला मी
ओढ्याला आलेला पूर
कॉलनीत शिरलेलं पाणी
बंद झालेल्या लोकल्स
खिडकीत हातावर हनुवटी ठेऊन
आरपार बघत रहाणारा मी

पाऊस
भन्नाट झालेला मी
ऑफिस सुटल्यावर चालत एकटा
समुद्रावर सुरू झालेला पाऊस
ठरवून भिजत भिजत पुढे
मोकळं झालेलं मनावरचं मळभ
लाटा मोटारी रस्ता माणसं
सगळीकडे धुकंच धुकं
दाटलेली भिती म्हणजेच
जगावसं वाटणं
स्टेशनमधे शिरताना
ओथंबणारय़ा माझ्याकडे
आ वासून बघणारय़ा मुली

पाऊस
नव्या जीवनातला पहिला
स्वत:चं घर आणि माणूस
वातावरणात घरंगळलेलं आभाळ
खाली गुडघ्याएवढं पाणी
तरीही पाण्याची बोंब
गच्चीतून भरलेल्या पाण्याची
गारगार आंघोळ
पाणी नाही म्हणून
घर सोडून निघालेलो आम्ही
पावसातच

पाऊस
२६जुलैचा
महाप्रलय आणणारा
जुन्यातलं काय राहिल
आणि नव्यानं काय उगवेल
याची शाश्वती न देणारा
माणसाच्या जीवनेच्छेला
मात्र सलाम ठोकणारा

पाऊस
यापुढचा कसा?
असाच
नेमाने येणारा
वळणावणावर भेटणारा
आयुष्याचा प्रत्येक!

Friday, April 16, 2010

माझं नवीन पुस्तक- स्मरणशक्ती वाढीसाठी!


"स्मरणशक्ती वाढीसाठी!" हे मैत्रेय प्रकाशन, मुंबई यांचं स्वयंविकासमालिकेतलं ७६ पानांचं छोटसं पुस्तक!मी लिहिलेलं!!यात तुम्हाला मानवी मेंदू, मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती म्हणजे काय?, तिचं मेंदूतलं स्थान काय?, स्मरणशक्ती आणि विचारसरणी, मुलांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावं?, मोठ्यांनी, वयस्कांनी काय करावं, स्मरणशक्ती आणि व्हिज्युअलायझेशन टेकनिक, स्मरणशक्तीसाठी आरोग्यदायक सवयी, योग्य आहार. स्मरणशक्ती आणि ध्यानधारणा, स्मरणशक्ती वाढवण्याचे प्रभावी मार्ग अशी अनेक उपयुक्त प्रकरणं वाचायला मिळतील!!!मूल्य फक्त ५० रूपये.मैत्रेय प्रकाशन,दूरध्वनी- २६१०१०१६/२६१५०३५८..

Saturday, March 13, 2010

"पुलाखालून बरंच" ही महानगरातल्या एका उड्डाणपुलाची गोष्टं...


“बाळ आणि बाळंतीण आधी जगू द्या!
उड्डाणपूल नंतरच होऊ द्या!!”

“पुलाखालून बरंच” ही महानगरात तयार होत असलेल्या एका उड्डाणपुलाची गोष्टं...
उड्डाणपुलाखाली तयार होणारय़ा अवकाशावर नैसर्गिक हक्क कोणाचा?
आधीच गब्बर झालेल्या यंत्रणेचाच की महानगरातल्या अमाप वंचितांचा?
एक मनोरूग्ण भिकारिणसदृष्य कुरूप अबला आणि तिचं अनौरस मूल यांचा जीव काही दिवस तरी वाचावा म्हणून एक वृद्ध स्वातंत्र्यसैनिक, एक मानसिक अपंग, एक दिशाहिन तरूण अश्या तीन निराधार वंचितांनी छेडलेलं आंदोलन एका बाजूला आणि त्याला समांतर मध्यमवर्गानं छेडलेली तथाकथित मध्यमवर्गीय मूल्याधिष्ठित आंदोलनं दुसरय़ा बाजूला...
हे महानगर भविष्यात कशाकशाला सामोरं जाणार?????...
(मूल्य रू.७०/-, प्रकाशक : अक्षर मानव,९५९,पवनपुत्र,दुसरा मजला,शिवाजी रस्ता,राष्ट्रभूषण चौक,शुक्रवार पेठ,पुणे-४११००२,जुलै २००६, दूरध्वनी (०२०) ६५२२९२७६)

“आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...


“विनायक पंडित नुसतेच नाट्यलेखक नाहीत तर ते एक नटही आहेत.’बेडटाईम स्टोरी’ किंवा ’रानभूल’ अशा नाटकातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत.आणि मुख्य म्हणजे ’आवर्त’मधून त्यांच्या ठायी असणारा दिग्दर्शकही ठायी ठायी दिसतो.एकाच व्यक्तिच्या ठायी असे विविध गुण प्रकट होणं ही आनंदाची गोष्ट.या विविध गुणांचा उपयोग ’आवर्त’ लिहिताना विनायक पंडित यांनी पूरेपूर केल्यानं नाटकाला एक वेगळंच परिमाण लाभलेलं आहे.”...
(ज्येष्ठ नाटककार श्री.प्रेमानंद गज्वी यांनी “आवर्त” या नाटकाच्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेतून...
“आवर्त” हे नाटक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत, मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ४११०३९, दूरध्वनी: ७१२०५२६ यांनी वर्षप्रतिपदा १९२३, दि.२६ मार्च, २००१ रोजी प्रकाशित केले.)

Tuesday, February 23, 2010

“सौंदर्योपासना, आरोग्य आणि सौंदर्य”

मैत्रेय प्रकाशनानं या वर्षभरात स्वयंविकासाची जी पुस्तकं प्रकाशित केली आहेत त्यांत जाणवणारी ठळक गोष्टं म्हणजे या सगळ्या पुस्तकांतून मांडलेल्या प्रत्येक वेगवेगळ्या विषयाचा फोकस नक्की आहे, आपल्याला वाचकाला काय द्यायचं आहे हे नक्की केल्यावर ते मांड्ण्याची दिशा योग्य असावी लागते तशीही ती आहे.ही मांडणी वाचायला सोपी आहे आणि तरीही भरपूर आशय आणि एवढ्याश्या पुस्तकात तो आशयविषय साकल्यानं मांडणं हेही इथं झालेलं आहे.इथेच या पुस्तकांचं वेगळेपण ठसतं आणि मिळतं ते वाचकाला उत्तम ते दिल्याचं समाधान!
“सौंदर्योपासना, आरोग्य आणि सौंदर्य” या डॉ.सौ.विद्या जोशी लिखित पुस्तकाच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे माणसाचं प्रथमदर्शन त्याच्याबद्दलचा पहिला ठसा उमटवणारं असतं, हेही पुस्तक मैत्रेयच्या इतर सर्व पुस्तकाप्रमाणे तसा ठसा उमटवतं.सौंदर्य ही कल्पना आपल्याकडच्या या विषयाच्या अनेक पुस्तकांमधून आजतागायत बहुतेक वेळा बाह्योपचारांवरच भर देणारी राहिली आहे.प्रस्तुत पुस्तकाच्या नावापासूनच आरोग्य हे सौंदर्याच्या नाण्याची दुसरी बाजू आहे या विचारला हात घातला आहे.हा विचार सर्वात महत्वाचा आहे!मग या अनुषंगानं आपल्या सगळ्यांचाच वजन वाढणं किंवा वजन पुरेसं न वाढणं हा महत्वाचा विषय विस्तृतपणे मांडला आहे, इतका की या संदर्भात कुठलाही संदेह हे पुस्तक वाचलं तर वाचकाच्या मनात राहू नये!
डाएट हा आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यात रोज एकदा तरी येणारा शब्द! डाएट म्हणजे उपासमार का? नव्हे, डाएट म्हणजे चौरस आहार.सगळं काही खाणं पण एका मर्यादेतच! मग नुसतं डाएट केलं की झालं का? तर नाही, त्याबरोबर नियमित व्यायाम हवा आणि हे दोन्ही आयुष्यभर सांभाळण्यासाठी हवी इच्छाशक्ती! ही मानसिक ताकद मिळवायची ध्यानधारणेतून आणि योगासनांच्या नियमित सरावातून!
असं सगळं समजावत लेखिका या सगळ्याचं विस्तृत महत्वं आपल्या मनावर बिंबवत जाते.त्यासाठी पुस्तकात येतं समतोल वजनाचं गणिती सूत्र, नक्की काय खावं काय खाऊ नये याबद्दलचा सहज समजणारा, पटणारा उहापोह, वेगवेगळी योगासनं आणि त्यांच्या कृती, त्याही योग्यं त्या आकृतींसह म्हणजेच चित्रांसह!
सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण कसं असावं आणि त्यात नियमितता, आपापल्या दिनक्रमाप्रमाणे कशी आणावी हे सोप्या शब्दात जर समजलं तर आणखी काय हवं? हवं ना! तरूणींना हव्या आहेत सौंदर्यस्पर्धांतून यशस्वी होण्यासाठी उपयुक्त टीप्स! या स्पर्धा म्हणजे नुसतं सुंदर दिसण्याच्या नसतात तर स्त्रीचं सर्वोतोपरिनं समृध्दं असणं जोखणारय़ा असतात.या विषयीची प्राथमिक माहिती आणि केस, त्वचा यांची काळजी घेण्यासाठीची मिश्रणं आणि लेप यांच्या कृती असं वाचता वाचता या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या नावाची छोटीशी यादी शेवटच्या पानावर दिसते आणि आपल्याला इतकं “सुंदर” पुस्तक इतक्या लवकर संपल्याची चुटपूट लागून रहाते.मग आपण पुन्हा मागची पानं आधाशीपणानं उलटू लागतो.आपल्या मनावर जे कोरलं गेलंय ते पुन्हा शोधू लागतो.हळूहळू हे पुस्तक आपण आणखी एकदा कधी वाचून काढलं हे आपलं आपल्यालाच समजत नाही!
तुम्हाला असं पुस्तक तुमच्याकडे असल्यावाचून रहावणार नाही असं माझं मत झालंय हे पुस्तक वाचून! तुम्हाला काय वाटतं?...