मित्रांनों “वसा” दिवाळी अंकात माझ्या खालील दहा कविता घेण्यात आल्या आहेत!
“वसा”तलं इतरही साहित्य आपण वाचण्याजोगं आहेच!
माझं
खेळणं
झालं स्वतंत्र
शोधतोय
आठवणींचा फडताळ
उसनी समज पांघरून
म्हणतो
आजपासून
फिसकारणं बंद केलं आहे
खरा बाप होण्याच्या प्रयत्नात आहे...
निळूभाऊ! तुमच्याबद्दल किती बोलू आणि काय बोलू? तुमच्या व्यक्तिमत्वानं रंगमंचावर, पडद्यावर आणि त्याबाहेर भाराऊन जाणं या व्यतिरिक्त काहीच भावना मनात रहात नाही.तुमचं काम डोळेभरून फक्तं पहात रहाणं, बारकाईने पहात रहाणं एवढंच.एकदाच तुम्हाला भेटायचा योग आला तेव्हा तुम्ही सांगत होता ते नाटक बघितल्यामुळे तुम्हाला आठवलेल्या पुस्तकाबद्दल.नाटकातले तुम्ही आणि एरवी वावरणारे तुम्ही.एरवीचं तुमचं निर्व्याज हसणं, तुमचं रिलॅक्स्ड चालणं-बोलणं आणि नाटक-चित्रपटातल्या भूमिकांमधे शिरल्यानंतरचं तुमचं संमोहित करणारं वावरणं.निळूभाऊ! चांगलं, उत्तम असं संपत चाललं आहे असं काहीसं नकारात्मक मनात येत रहातं तुमच्या जाण्यानं.तुम्हाला ते कधीच आवडलं नसतं.नाट्यशिक्षण वेगळं काही नसतं तर आयुष्यभर मिळवलेल्या शिक्षणाचा तो एक भाग असतो.हे आयुष्यभराचं शिक्षण मिळवायला शाळेत जावं लागत नाही तर बरंच काही देण्याच्या मोबदल्यात ते निष्ठेने मिळवायचं असतं.तुमच्या पिढीकडून हे शिकलो आम्ही तरी खूप आहे... सततची तगमग हे चांगल्या माणसाचं भागधेय असतं... ती तगमग शांत व्हावी... तुमच्या आत्म्याला शांती लाभावी... तुमचं काम नक्कीच पुढे चालू रहाणार एवढं वचन आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला द्यावं हीच तुम्हाला श्रध्दांजली...
Listen To Me!
Listen To My Childhood Tales in SAHITYA SAURABH!!
On ASMITA Channel of All
"Mazya Ajolchya Goshti" @ 10 PM On Tusday, 30th June!!!!
पुन्हा एकदा त्यानं आपला रस्ता पकडला.
आपला रस्ता पकडणं हा त्याचा स्वभावधर्म होता.
सरळसाध्या माणसाचा असतो तसाच.
रस्ता पकडणं आणि पुन्हा नव्या रस्त्याकडे ओढलं जाणं,
ही कुतरओढ, हे त्याच्या जीवनाचं भागधेय होतं.
त्या कुतरओढीत नको तेवढं गुंतून निष्क्रीय झालो आहोत,
असं सतत स्वत:बद्दल निदान करणं हे ही.
सरळ साधा माणूस म्हणजे सर्वसाधारणपणे सरळ साधा.
निखळ सरळ साधा असणं कुणाला झेपतं?
त्यानं पहिल्यांदा आपला रस्ता केव्हा पकडला?
परत परत नव्या वाटणाऱ्या रस्त्याला तो लागत होता,
तो त्याचा आपला रस्ता होता की
ज्याला तो आपला रस्ता समजत होता तो?
हल्ली त्याचा जाम गोंधळ उडतो आहे...
“अभिलेख” वरचं हे माझं शंभरावं पुष्पं(?)
Listen To Me!
Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!
On ASMITA Channel of All
AS A LAST MINUTE CHANGE MY PROGRAMME HAS BEEN POSTPONED!! NEW TIME: GUDHIPADWA, FRIDAY, 27th MARCH @
Listen To Me!
Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!
On ASMITA Channel of All
MARATHI BHASHA DIN i.e. Friday, 27th February, @
For Details Just Click
http://vinayak-pandit.blogspot.com/2009/01/blog-post_31.html
२७ फेब्रुवारी, रात्री १० वाजता, आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर“साहित्यसौरभ” मधे माझ्या कविता ऐका! क्लिक करा-
http://vinayak-pandit.blogspot.com
२१ जानेवारीला आकाशवाणीला पोचलो ते हुरहुर घेऊनच.ज्या दिवाळीअंकात मी सातत्यानं लिहित आलो त्या अंकाच्या संपादकांनी, श्री राजेंद्र कुलकर्णी, यांनी माझं नाव साहित्यसौरभ कार्यक्रमासाठी सुचवलं.कार्यक्रम अधिकारी बाईंचा फोन आला.दहा मिनीटांच्या ध्वनिमुद्रणासाठी साहित्य पाठवावं असा.लेखक म्हणून एक स्वतंत्र कार्यक्रम तोही पुन्हा बहराला आलेल्या आकाशवाणीवर.मन हवेत तरंगावं असे आयुष्यातले हे क्षण असतात.मी लवकरच पोचलो.
आधीचं कुरियरने पाठवलेलं साहित्य उत्तम आहे पण आकाशवाणी या पूर्णपणे श्राव्य माध्यमाला साजेल असं आणखी चांगलं काही घेऊन या असाही निरोप नंतरच्या संपर्कातून मिळाला होता.दहा मिनीटं एरवी आपल्याला चुटकीसारखी वाटतात.श्राव्य माध्यमात श्रोत्याला आपल्यासोबत ठेवण्या आणि नेण्यासाठी या दहा मिनीटांच्या अवधीचेही छोटे आशयपूर्ण भाग असावेत.ते दृष्यात्मक असावेत.केवळ ऐकत असताना दृष्यं डोळ्यासमोर ठळकपणे उभी रहावीत असे असावेत ही समज नाटक माध्यमात असल्यामुळे आपोआप विकसित होत असते.लेखनातून नेमकेपणे हे मांडणं हे आव्हान असतं, तो एक सततचा अभ्यास असतो.
तेव्हा आता सोबत चार कविता होत्या आणि त्या आवडतील का ही हुरहुर.पण ही हुरहुर एवढ्या प्रमाणातच मर्यादित होती का?
आकाशवाणीचा आणि माझा संबंध १९८६ पासूनचा.कारणही वेगळंच.मी नाटक माध्यमाला परिचित झालो होतो आणि आयुष्यात व्यापून टाकणारं काही मिळालंय असं वाटत असताना, नाटकाच्या मुख्य प्रवाहाच्या जवळपास असताना आयुष्यात एक दु:ख आलं.फार वेळ नाटकाला देता येणार नाही अशी अनिश्चितता सामोरी आली.मग आपण मर्यादा घालून घेऊन काही चालू ठेवू शकतो का या विचाराने अंतर्मनाने शोधाशोध चालू केली.
एक गोष्टं पार स्मृतीआड झाल्याचं आज लक्षात येतंय.काही केल्या ते आठवत नाही.मला आकाशवाणीवर जाऊन काम माग अस कोणी सुचवलं! काही केल्या आठवत नाही!
मी भिडस्त, आकाशवाणीवर पोचलो.नाटक विभाग बघतात म्हणून ज्या कुणाचं नाव मला सांगितलं गेलं होतं त्यांची तिथून बदली झालेली.नव्यांनी नभोनाट्यात भाग घेण्यासाठीच्या आवाजचाचणीबद्दल सांगितलं.ती नुकतीच होऊन गेलेली!आता काय?मग त्यानीच विज्ञान कार्यक्रम विभागाला भेट द्या, काही करता येईल का बघा असं सुचवलं.मी तिथून उठलो.काही ठिकाणी विशेषत: केबिन्समधल्या कुणाला भेटायला गेल्यावर निरोप घ्यायला नक्की कधी उठायचे हे समजत नाही.आता समजलं.उठलो.
मग भिडस्त मी माझ्या स्वभावाला अनुसरून दोन-चार केबिन पलिकडे असलेल्या विज्ञान कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या केबिनपर्यंत गेलो, परत फिरलो.शेवटी हिय्या करून गेलोच.समोर बसलेले गृहस्थ बघितले आणि चाटच पडलो.अरे, हे! हे तर सकाळच्या आपल्या लोकलचेच सहप्रवासी! श्री.जयंत एरंडे! त्यांचा चांगुलपणा इतका की मला बोलतं करून त्यांनी मला चक्कं एक नाही तर दोन मुलाखतींचे कार्यक्रम दिले.दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती!
आकाशवाणीसारख्या नव्या माध्यमात प्रवेश झाला.कुठलीही अश्या प्रकारची पार्श्वभूमी नसलेला मी, माझा आवाज आकाशवाणी वरून ऐकणार होतो.
कालांतराने नाटक विभागाची आवाज चाचणी दिली.श्री.चंद्रकांत बर्वे तेव्हा नाटक विभाग प्रमुख होते आणि माझ्या आवाज चाचणीच्या वेळी माझ्या बरोबर होता आकाशवाणीवरचा दैवी आवाज श्रीमती करूणा देव.मी श्री रत्नाकर मतकरींच्या “माझं काय चुकलं” या नाटकातला संवाद नेला होता.”अहो, यात माझं म्हणजे स्त्रीपात्राचंच बोलणं आहे!” आवाज मंजुळ दैवी असूनही माझ्या छातीत धाकधुक सुरू झाली.नायक आत्महत्येचा निर्णय घेतो त्यावेळचा तो संवाद होता. “पारसिकचा बोगदा आला की दरवाज्याजवळच्या खांबावर घट्टं धरलेला हात हळूच सोडून द्यायचा” असा पुढे नायकाचा एक परिच्छेद होता तो मी त्याना दाखवला.त्यानी हो, ठीक आहे! अश्या अर्थाची मान हलवली असं मलाच वाटलं आणि माझी वेळ आल्यावर माझ्याकडून तो संवाद न थांबता म्हटला गेला.मग चाचणी कशी झाली काय झाली यावर दोन्ही मान्यवरांचं मत ऐकलं.ते बरंच बोलले.काही समजलं, काही नाही.आवाज चाचणी पास होऊ का अशी धाकधुक नंतर बराच काळ पुरली.
पास झालो; अविनाश मसुरेकर, करूणा देव, कै.वसंत सोमण, प्रदीप भिडे यांसारख्या कलाकारांबरोबर नभोनाट्यं करायला मिळाली.एका नभोनाट्यात चक्कं रमेश देवही होते.“रास” हे बंगाली नभोनाट्य आठवतं, अमिताभ-नूतनचा “सौदागर” नावाचा सिनेमा होता त्या गोष्टीवरचं नभोनाट्यं.
मी स्वत: नाट्यदर्पणच्या कल्पना एक अविष्कार अनेक स्पर्धेत केलेली “रोमानी” ही एकांकिकाही (माझ्या या ब्लॉगवर जिच्यातले काही फोटो आहेत ती) मूळ संचात आम्हाला सादर करायला मिळाली, श्रीमती तनुजा कानडे या निर्मात्या असताना.
पुढे इतरत्रं जाहिरातींसाठी आवाज देणं, रेडिओच्या व्यापारी कार्यक्रमात भाग घेणं हेही करायला मिळालं.
आकाशवाणीचा संपर्क दुरावत गेला, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं, नोकरी या चाकोरीत अडकून…
प्रचंड हुरहूर घेऊन आलेला मी वेळेआधीच आकाशवाणीवर पोचलो.प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या श्रीमती गद्रे भेटल्या. त्यानी नव्या चार कविता वाचल्या आणि त्याना त्या आवडल्या!श्रीमती नीता गद्रे स्वत: साहित्यिका आहेत. “एका श्वासाचं अंतर” हे त्यांचं आत्मकथन यापूर्वी साप्ताहिक सकाळच्या अंकातून क्रमश: प्रसिध्द तर झालंच पण लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवतं झालं.याचं याच नावाचं पुस्तकही प्रसिध्द झालं आहे आणि ते आवर्जून वाचावं असं झालं आहे.फिनिक्स पक्षाप्रमाणे श्रीमती गद्रे यांनी आपल्या आयुष्याला नव्याने सुरवात केलेली आहे, जे लोकविलक्षण आहे!!!
ध्वनिमुद्रण करणाऱ्या श्रीमती सुचेता आल्यावर दुसऱ्या मजल्यावरच्या ध्वनिमुद्रण स्टुडिओत गेलो.माझ्यासोबत श्री गो.मं.राजाध्यक्ष होते.जे अनेक वर्षं जे.जे.महाविद्यालयाचे डीन होते, जाहिरात क्षेत्रातले ते मान्यवर आहेत! माझ्यानंतर त्यांचेही जाहिरात या विषयावरचे भाषण ध्वनिमुद्रित झाले.आकाशवाणीने मला नुसती संधीच दिली नाही तर दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचा परिचय करून दिला!
अभिनेता म्हणून या आधी चंचूप्रवेश केलेला मी आज एक लेखक म्हणून ध्वनिमुद्रण करून स्टुडिओतून बाहेर पडलो ती नवी हुरहूर घेऊन.कसं झालं असेल ध्वनिमुद्रण?
दिनांक २७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून साहित्यसौरभ या कार्यक्रमात माझ्या या कविता सादर होणार आहेत आणि योगायोग असा की २७ फेब्रुवारी ही श्रेष्ठ कवि कुसुमाग्रजांची जयंती आहे आणि ती मराठी भाषा दिन म्हणून सादर होणार आहे!!!
माझी हुरहूर प्रचंड वाढली आहे!!!
Listen To Me!
Listen To My Marathi Poems in SAHITYA SAURABH!!
On ASMITA Channel of All
AS A LAST MINUTE CHANGE MY PROGRAMME HAS BEEN POSTPONED!! NEW TIME: GUDHIPADWA, FRIDAY, 27th MARCH @
“शब्दछटा” अर्थात जावे शब्दांच्या गावा हा एकपात्री अभिवाचनाचा तास-दीड तासाचा कार्यक्रम मी सध्या सादर करतो.
२१जुलै’०७ कोल्हापूर, १२ऑगस्ट’०७ अत्रे कट्टा, गोरेगाव; १९ जानेवारी’०८ शब्दब्रह्म,प्र.ठाकरे मिनी थिएटर, बोरिवली; ४मे’०८ अंबरनाथ असे याचे प्रयोग आजवर झालेले आहेत.
अधिक माहितीसाठी आपण बघू शकता “लोकसत्ता” मधली खाली दिलेली लिंक-
“आवर्त”_प्रवेश तिसरा
(वेळ दुपारची.रंगमंचावर झगझगीत उजेड येतो, तेव्हा प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला माई आणि बंटू जमिनीवर बसल्या आहेत.माई बंटूला गोष्टं सांगतेय)
माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?
बंटू: (गोष्टीत रंगलेली) काय?
माई: तिनं-(’बोकील’ असं नाव पुकारलं जाऊन घराच्या प्रवेशद्वारातून पोस्टाचं मोठं पाकीट आत पडतं.बंटू पटकन उठते.) उठली! उठली लगेच! बस! बस तू! गोष्टं सांगतेय ना मी? एक मिनिट जागेवर बसायला नको!
बंटू: काय गं आजी! (बसते)
माई: हं! मग तिनं काय केलं माहितेय?
बंटू: (अनिच्छेनेच) कॅऽऽय?
माई: तिनं किल्ल्यावरून उडी मारली-
बंटू: (डोळे विस्फारून) बाप रे!... पण किल्ला किती उंच असतो गं?
माई: (तिची लिंक तुटते, जराशी रागावून) आता किल्ला! (काय सांगावं ते समजत नाही) असेल… आपल्या चाळीएवढा!
बंटू: बाप रे! त्याच्यावरून उडी मारली?
माई: (डोळे मोठे करून) होऽऽ मग!
बंटू: आजी! आणि तिचं बाळ?
माई: हो तर! तिचं बाळ होतं नं-
बंटू: तिच्याबरोबर?
माई: मग! पाठीशी घट्ट बांधून घेतलंन होतं तिनं तिच्या शेल्यानी!
बंटू: बाप रे काय ग्रेट असेल नं ती!... पण काय गं?एवढ्या उंचावरून… तिला-बाळाला काही झालं नाही?
माई: अगं (हात वरून खाली आणून, डोळे मोठे) डायरेक्ट घोड्यावरून उडी मारलीन तिनी! मऽऽग! (बंटू भारावल्यासारखी पहातच रहाते.तेवढ्यात उघड्या प्रवेशद्वारातून बंटूचे आजोबा, बापू येतो.चपला काढतो.समोर पडलेलं पोस्टाचं पाकीट दिसतं, ते उचलतो.उलटसुलट पहातो.कॉटवर टाकतो.माईचं तिकडे लक्ष गेलंय, बंटूचं नाही.)
बंटू: (तंद्रीतून बाहेर येत) पण काय गं आजी, त्या बाळाचे बाबा गं?
माई: (बाथरूमकडे जाणाऱ्या बापूकडे पहात) गेले असतील गं कुठेतरी उलथायला! (बापू स्वैपाकघरात जाऊन थांबतो, मग बाथरूमकडे जातो)
बंटू: असं काय बोलतेस आजी?युध्दं चालू होतं नं?
माई: (बापू गेला त्या दिशेने नजर टाकत) हो बाई, रात्रंदिन युध्दंच!
बंटू: मग त्या बाळाचे बाबा-
माई: (चिडते) काय गं? बाबा! बाबा! इथे मी गोष्टं कुणाची सांगतेय?... त्याच्या बाबांबद्दल काही बोलतेय का मी? (बंटू वरमते, “नाही” अशी मान हलवते) नाही नं? मग? तुझे नं आपले नसते प्रश्न.तू जरा मी सांगते ते ऐक! (बापू बाहेर आलाय) कळलं ना? (माईचं बापूकडे लक्ष जातं) मी सांगतो तसं वागतो ना, त्याचंच भलं होणार, ऐक तू बंटू!
बंटू: आजी, भलं म्हणजे? (बापू गालातल्या गालात हसतो, माई वैतागते)
माई: झालं मेलं तुझं सुरू!... का? कसं? कुठे? कुणाला? कशाला? तुला काय करायचं गं हे सगळं? सांगितलं नं मघाशी? मोठ्या माणसाचं (लक्षात येऊन) म्हणजे माझं-ऐकायचं! (उठत) चऽऽला बाईऽऽ…
बंटू: आता कुठे गं? आणि गोष्टं अर्धीच राहिली! (बापू ते पोस्टाचं पाकीट उघडून वाचतोय, त्याच्याकडे लक्ष जाऊन) अय्या! आजोबा, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही! (त्याच्या अंगाला झोंबते.तो ’अगं अगं थांब वाचू दे’ असं म्हणतो.माई तिटकाऱ्याने पहातेय)
माई: (गरजते) बंटू! (बंटू घाबरते.आजोबाला आणखी घट्ट मिठी मारते.माई हातवाऱ्याने) चल! पहिले आत चल! हातपाय-तोंड धू! बाथरूममधे दुसरा फ्रॉक ठेवलाय! बदल! आणि चल माझ्याबरोबर! (बंटू आजोबांकडे पहाते) चल म्हणते ना! (बापू बंटूला थोपटतो.तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.’आत जा’ अशी खूण करतो.बंटू आत जाते.माईही तरतरा आत जाते.)…
(प्रकाशक: मृदगंधा प्रकाशन, भोसरी, पुणे ३९, प्रकाशन दिनांक: गुढीपाडवा २६ मार्च, २००१)
त्याला जेव्हा बाशिंग बांधायचं ठरलं
तेव्हा तो एकसारखा आपला गुडघा लपवायला लागला
आणि त्याचवेळी
कुणी जबाबदारीतून मोकळं व्हायला बघत होतं
कुणी टवाळी करायला विषय मिळवत होतं
कुणी म्हणत होतं, “बांधलं असतंस तेव्हा तर
गुढघ्याएवढी अंगणात खेळली असती इतक्यात”
कुणी मायेनं, आस्थेनं विचारपूस करत होतं
तर कुणी न बोलता बाशिंग सजवण्याच्याच मार्गाला लागलं होतं
या सगळ्याचा परिणाम होऊनच की काय
त्याच्या गुढघ्याला रग लागली आणि
तो “डोकं” वर काढू लागला,-
ते कुणी अगदीच ऐकत नाहीत म्हणून आणि
हल्ली आतून अगदी घणाचेच घाव बसतात
वर काहीतरी बांधलं
तर ते थांबतील तरी म्हणून
छुप्या बाशिंगहुडक्यांना आता मोकळं रानच मिळालं
जोसात येऊन ते चौखूर उधळले
रानातली रानफळ चकचकीत होऊन बाजारात यायला लागली
त्याला गिर्हाईक बनवलं गेलं अक्षरश:
आणि बोली अडतेच बोलू लागले
अडत्याना थोपवता थोपवता
त्याच्या नाकी दम यायला लागला
करतो काय! नाक मुठीत धरून गेला बाजार
त्याला बाजाराचा दिवस तरी
साजरा करणं भागच होतं
त्याच्या उकीरडा फुंकण्याच्या सवयीचा
आणि त्याच्या बार्गेनिंग पॉवरचा
बाजारात आधीच अक्षरश: ढोल वाजला होता
त्यामुळे आंबा, सफरचंद, काजू वगैरे
त्या रानात उगवणं शक्यच नव्हतं
रान तसं त्याच्या परिचयाचं नव्हतं असं नाही
पण फळं हस्तगत करायची जाळीच त्याच्याकडे नव्हती
होते ते नुसतेच रेशमाचे धागे
आतल्या आतच तटातटा तुटणारे
जोडले तरी गाठींचं प्रदर्शन करणारे
काही फळं दुसऱ्यांच्याच जाळ्यात अडकलेली
आणि उरलेल्यांपैकी एकानं स्वत:हून झाड सोडून
आपल्या हातावर यावं असा याचा अव्यवहारी हट्ट
तेव्हा, हल्ली बाजारसुध्दा नेमानं भरत नाही
सगळं रान भोवती नुस्तं गरागरा फिरत राहतं
धागे रेशमी असूनही फळं त्यात येतच नाहीत
हा याचा हट्ट सोडत नाही
वरचं रिकामं होऊन ते
गुडघ्यात आहे की काय असं वाटायला लागतं
रिकाम्या वर घण ठणाणायला लागतात
आणि हे सगळं थांबवायला
चुकीचे उपचार तरी सुरू होतात किंवा
क्रिएशनच्या नावाखाली घड्याळाचे काटे
निरूद्देश पुढे सरकवणं तरी सुरू होतं
यातून सावरायला तो स्वत:च
मुकुट बनवण्याच्या तयारीला लागतो
भीड सोडून हजारो कारागीरांची मदत घ्यायची
त्याच्या कृपादृष्टीची सतत भीक मागायची
कपाळावरचा घाम गाळून झटकून
मुकुट ठेवायला जागा तयार करायची
आता फळं मुकुटाभोवती डोलायला लागतील
बाशिंग बांधणं मग अगदीच कठीण असणार नाही
शिवाय मुकुट आल्यावर त्याच्यावर
ते पक्कं बसेल, शोभून दिसेल
वाजणारे घण आतातरी थांबतील
निदान
मुकुटाचं जबरदस्त आवरण तरी तयार असेल…