मनू शेवटी समारंभ व्यवस्थापनातही शिरला.काय? समारंभ व्यवस्थापन म्हणजे काय? अहो, पूर्वी घरातली एखादी म्हातारी कोतारी बारशाची तयारी करायची आणि बारसं घडवून आणायची.पुलंच्या ’व्यक्ती आणि वल्ली’ मधला नारायण लग्नं घडवून आणायचा.याच प्रकारच्या कामाला हल्ली ’इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणतात.आता तुम्हाला कळलं असेल! इंग्लिश शब्द वापरला की आपल्याला लगेच कळतं!
हल्ली बरेच समारंभ, समारंभ व्यवस्थापक घडवून आणतात.पैसे आणि नाव कमावतात.मनू कसा मागे राहील? आणि मनू समारंभ व्यवस्थापक व्हायला कारण मी!
झालं काय मुलीला रात्री गोष्टं ऐकल्याशिवाय झोप येत नाही.मग मी तीच ती जुळवाजुळव करून नवीन नवीन गोष्टं तयार करून तिला सांगायला लागलो.ती म्हणायची, “पप्पा! या गोष्टीत कालचं ते हे होतं!” मग मी तिला प्रेमाने समजवायचो, “अग जग असतं न जग!” ती लगेच ’हो’ म्हणायची.मी पुढे म्हणायचो, “या जगात नवीन असं काहीच नसतं! सगळं तेच तेच तर असतं!” तिचा अंगठा तोंडात जाऊन ती एकाग्र व्हायची आणि हुंकार द्यायची.
बायकोला झोपताना एफएम ऐकायची सवय.तिच्या त्या अफलातून चिनी बनावटीच्या भ्रमणध्वनीवर.झोप येतेय असं वाटलं की ती तो पालथा की कसा काय तो कसाबसा करते.
एके सकाळी मनू चहाला माझ्याकडे आला.रोजची बरीच घरं संपवून तो लवकरच माझ्याकडे आल्यामुळे मी त्याचं योग्यं प्रकारे आगतस्वागत केलं.बायकोची झोप पुरी झाली नसावी किंवा ’आमची झोप पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही कसे हो चार चार दिवसांनी चहा घटळायला सकाळी सकाळी टपकता!’ असा काही अप्रत्यक्ष संदेश तिला तिच्या मनूभाऊजींना द्यायचा असावा.जे काय असेल ते.तिनं चायनीज बनावटीचा तिचा तो भ्रमणध्वनी सुरू केला आणि अचानक देववाणी ऐकू यावी तशा नको तेवढ्या गंभीर (!) आवाजात कुणा महामानवाचे अध्यात्मिक बोल कानी पडताएत असं आपलं मला वाटायला लागलं.मी हातातल्या चहाकडे आणि तोंडातल्या चहाच्या घोटाकडे पंचप्राण एकाग्र केले.चहा संपतो न संपतो तोच मनूनं माझ्या अंगावर उडीच मारली.मी निसटता चहाचा मग सावरतोय न सावरतोय तोवर तो आयपीएल जिंकल्यासारखा ओरडायला लागला, “व्वा! वा! क्या बात है!” माझी पाठ त्याच्या दणक्यानं हादरायला लागली.माझं लक्ष माझ्या बायकोकडे गेलं आणि मी ७.८ रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरून गेलो.म्हणजे बायको आता ज्या नजरेने माझ्याकडे बघतेय त्याला आदराने पहाणं असं म्हणतात? हे कधी शिकली ही? की पाठीवरच्या दणक्यानं मलाच दृष्टीभ्रम झालाय?
मनू आणि माझी बायको मग पुढच्या महत्कार्याला लागली.मला भानावर आणण्याच्या.त्यानी पुन्हा ती चिनी बनावटीच्या यंत्रातली वाणी सुरू केली. “अहो हे तुम्ही आहात! तुम्ही!” “मी?ऽऽऽऽ” कसाब, तहव्वूर की तस्सव्वूर? तोच तो कुणीतरी राणा किंवा थेट डेव्हीड हेडली या सगळ्यांनी मिळून जे अपराध केले त्यापेक्षाही भयंकर गुन्हे माझ्या नावावर नोंदल्यासारखा मी किंचाळलो.
मी मुलीला रात्री सांगितलेली ती माझ्या आवाजातली गोष्टं आहे.अनवधानाने ती भ्रमणध्वनीवर ध्वनिमुद्रित झाली आहे हे मला उभयता परीपरीने सांगत होते आणि तो गुन्हा कबूल करणं मला जमत नव्हतं.
बायको आणि मनू या दोन तगड्या व्यक्तिमत्वांनी माझा अगदी सहज मोरू केला असेल हा तुमचा होरा अगदी अचूक आहे! तसंच झालं.मला माझा गुन्हा कबूल करावा लागलाच.लगेच पुढचा गुन्हा, पुढचं कलम लागलं आणि माझा छळ सुरू झाला.अशावेळी दयेची याचना ज्याच्याजवळ मागायची तो परमेश्वरही कुठेतरी गेलेला असतो हो!
मनू आणि माझी बायको दोघांनी “आता पुस्तक! पुस्तक! पुस्तक! पुस्तक!” असा घोषा लावला आणि माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले.इतका हल्ला आणि कल्ला केला त्या दोघांनी की माझी ती गोष्टं ऐकता ऐकता शहाण्यासारखी झोपणारी मुलगी दचकून जागी झाली.कुणीतरी माझ्याबाजूने असणारं जागं झालंय म्हणून मी खूष व्हावं तर तीही, तिला काय कळलं कुणास ठाऊक दरवेशाच्या अस्वलाभोवती नाचावं तशी त्या दोघांमधे सामील होऊन माझ्याभोवती नाचू लागली.
माझी साडेसाती सुरू होण्याचा तो कुमुहुर्त असावा.पुढच्या घडामोडी पटापट घडल्या.
“आता रोज गोष्टी सांगून ह्या बालगोष्टींचं पुस्तक लिहायचंस! काय?” मनूनं बखोट धरून मला धडकीच भरवली.तो पर्यंत दुसरा शिलेदार म्हणजे माझी बायको, तिनं ताबडतोब थेट तिच्या आतेभावाच्या, चुलतभावाच्या, मावस मेव्हणीच्या, मामेकाकांना फोन केला.ते प्रकाशक होते.
साडेसातीतली कुठलीतरी अडीच वर्षं भयानक जातात म्हणे.मला नंतरचे अडीच महिने मनूनं, माझ्या बायकोनं आणि तिच्या प्रकाशक काकानं अर्थात शनि, राहू आणि केतू त्रयीनं तिन्ही बाजूनी चिणून चिणून मारून मुटकून एकदाचा एका पुस्तकाचा लेखक बनवलंच.मी लेखक झालो या आनंदापेक्षा माझी साडेसाती संपली, इतक्यातच संपली या विचाराने खुर्चीवर बसल्याबसल्या जोरात आळस द्यायला हात वर केले आणि मनूनं ते वरच्यावर पकडले. “आता प्रकाशन! प्रकाशन समारंभ करायचाच!” मी मनातल्या मनात स्वत:वर ज्याम चरफडलो, ’बघ! कालसर्प शांती करायची करायची म्हणून पुढे ढकललीस ना? भोग आता तुझ्या कर्माची फळं!’
झालं! मनूनं प्रकाशनाचं जाहीर केल्यावर कुंडलीतले यच्चयावत पापग्रह पुन्हा माझ्याभोवती फेर धरून नाचू लागले.
आता डोकं लढवणं भाग होतं.नसलं तरी.
मी म्हणालो, “मनू! आमच्या हिला दुधी हलवा करायला सांगतो.बिल्डिंगमधल्यांना बोलवूया.तुझ्या हस्ते करून टाकू प्रकाशन!” त्यानंतर अर्धा तास मनूनं मला ’मी मध्यमवर्गीयपणा करून कसा रसातळाला जाणार आहे’, यावर लेक्चर दिलं.वर म्हणाला, “मी सगळं मॅनेज करणार! बाजारात चलती असलेले अध्यक्ष, प्रमुख पाहुणे बोलवायचे! शहरातल्या मोठ्या सभागृहात समारंभ करायचा.फोटो काढायचे.ते दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आणायचे.अरेऽ बालसाहित्यात क्रांती केलीएस तू! ते काही नाही! ते सगळं माझ्यावर सोड! तू फक्त लाल झब्ब्याची तयारी कर!” ते सगळं ऐकलं आणि साडेसातीतले पुढचे अडीचंच काय आणखी अगणित महिने माझ्यासमोर आ वासून उभे राहिले.मला प्रचंड घेरी आली.अजून पुढचं सगळं- म्हणजे मुलीचं शिक्षण, लग्न वगैरे व्हायचं होतं म्हणून बायकोनं आणि समारंभ व्यवस्थापनाचा चान्स हुकू द्यायचा नाही म्हणून मनूनं सावरलं म्हणून नाहीतर सोफ्याची कड लागून डोक्याला पोचा तरी नक्कीच आला असता.शिवाय… तुम्ही सगळे एका होतकरू लेखकाला मुकला असता… मी धडधाकटपणे जिवंत राहिलो होतो… पुढची साडेसाती भोगण्यासाठी…
2 comments:
खुपच सुंदर लिखाण आणि ब्लोग आहे आपला. छान वाटला वाचून!!
मंदार! तुमचं स्वागत! ब्लॉगमैत्री वाढवूया! आभार!
Post a Comment