romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, October 27, 2011

माध्यमं.. मुलं.. समाज..

कार्टून फिल्म्स ज्यांच्या अत्यंत आवडत्या होत्या ती बालकं कालांतराने टीव्हीवरच्या कौटुंबिक मालिकांमधे रमली.आता ती बालकं सोशल नेटवर्कींग साईट्सच्या आहारी गेली आहेत.वेगवेगळी सर्वेक्षणं आणि त्यांचे प्रसिद्ध होत रहाणारे निष्कर्षं मनोरंजक असतात.त्यांमधे तथ्यंही असतंच.
लहान मुलं दूरचित्रवाणी मालिकांमधे काय बघत असतात, किंवा होती? चकचकीत घरं? सतत लग्नंसमारंभातले कपडे घालून वावरत असलेले स्त्रीपुरूष? त्यांची भांडणं? कट आणि डावपेच? असंख्य विचित्र नमुने एकत्र असलेली कुटुंबं? त्यातला कमीतकमी एखादा ते अनेक विकृत?... की मालिकांमधे दाखवल्या गेलेल्या लग्नसंस्थेतला किंवा कुटुंबसंस्थेतला अत्यंत महत्वाचा घटक अर्थात विवाहसंबंध?... आपण जाणते आहोत.जाणत्या लोकांसाठी त्यांच्यातल्याच जाणत्यांनी सार्वजनिक माध्यमांचा आसरा घेऊन केलेली प्रत्येक कृती भावी समाजमनावर परिणाम करणारी आहे हे आपल्या लक्षात येत नाही? की डेलिसोपवाल्यांनी, कॉमेडी शोजवाल्यांना, माईंडलेस (?) कॉमेडीवाल्यांनी रिऍलिटी शोजवाल्यांना बोल लावायचे आणि त्यांनी न्यूज चॅनल्सना? आणि मग त्यानी चित्रपट उद्योगाला? कलाकृती मांडण्याचं स्वातंत्र्य- फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि सामाजिक जाणीव यांची सांगड कोणी आणि कशी घालायची? साधारणत: दूरचित्रवाणीवरून सादर होणारय़ा सरासरी कार्यक्रमांना ’एक्सप्रेशन’ चा दर्जा देता येईल? असं प्रकटीकरण की ज्याचं स्वातंत्र्य धोक्यात आलं म्हणजे फार मोठा आघात झालाय मानवी मूल्यांवर वगैरे?...
एकीकडे विवाहबाह्य संबंध अपरिहार्य आहेत असं चित्र दाखवायचं आणि दुसरीकडे निरांजनातली ज्योत विझणं, करवा चौथच्या दिवशी (हा हल्ली मराठी मालिकांमधेही सर्रास साजरा होतो) नेमकं अघटित घडणं, यासारखे तेच ते अपशकुन, यातून आपली बालकं काय बोध घेणार आहेत? विनोदासाठी कुटुंबातल्या एखाद्या आदरस्थान असलेल्या माणसाची संवंग पद्धतीने खिल्ली उडवणं यातून ही मुलं काय शिकणार आहेत? माणसाचं सबंध आयुष्य घडवणारय़ा सुरवातीच्या वर्षांत, संस्कारक्षम मुलांना जे बघायला लागतंय त्याची जबाबदारी आपल्यावर नाही? ती पार पाडायला आपण पालक हतबल आहोत, असमर्थ आहोत? मुलांनी बघू नयेत असे कार्यक्रम मुलांच्या तोंडावर बंद करण्याचं धारिष्ट्य आपल्याजवळ आहे? जरा जाणत्या मुलांना ’सोशल नेटवर्कींग साईट्सची सफर बस्स झाली आता! या महाजालातून आता लवकर बाहेर पड!’ असं सांगणं आपल्याला जड जातंय? मुळात आपलं आपल्या मुलांच्या हालचालींवर योग्य लक्षं आहे का? ते नक्की काय बघतात यावर आपण सतत लक्षं ठेऊ शकतो का? नाहीतर मग काय?..
विषयाला हात घालताना असे अनेक प्रश्नं समोर येतात.नेहेमीचेच वाटणारे पण नेहेमीच अनुत्तरित रहाणारे..
मुलं कार्टून बघत होती.त्यात दाखवलेल्या अतिरिक्त हिंसेमुळे मुलं हिंसक बनतात असं मत मांडलं गेलं.ही मुलं मग दूरचित्रवाणीवरच्या मालिका बघण्यासाठी आटापिटा करू लागली. ’सतत विवाहबाह्यसंबंध ठेवायचे, मग विवाह का करायचा? संबंध असेच का नाही ठेवायचे?’ असे प्रश्नं त्यांच्या मनात, डोक्यात आणि मग कदाचित ओठांवर येऊ लागले.आता तर वर्ल्ड वाईड वेब त्यांच्यासमोर खुलं झालंय.. आता ती परस्परांमधे चॅट करतात.पडणारे प्रश्नं ते आपापसात सोडवतात.काय असतात त्यांची सोल्यूशन्स? कशावर आधारित असतात त्यांची मतं? माध्यमलोंढ्यातल्या त्या हातोडाबाज (हॅमरिंग) मतांवर? असलं हॅमरिंग की जे कुठल्यातरी वाहिनीचा, कुठल्यातरी व्यक्तीचा, कुठल्यातरी अतिरेकी राजकारणी, अतिरेकी धार्मिक समुदायाचा अल्पकाळाचा स्वार्थ साधणारं आणि सगळ्या समाजाच्या दूरगामी तोट्याकडे हेतूपूर्वक/अहेतूपूर्वक दुर्लक्ष करून सवंग पद्धतीने मांडलेलं असतं? जे कदाचित समाजाला खड्ड्यात लोटणारं असू शकतं?
मुलं परिपक्व होतील, योग्य, अयोग्य त्याना समजू शकेल अशा पद्धतीचे संस्कार आपणंच त्याना देऊ शकतो.माध्यमांमधलं चांगलं काय हे आपण मुलांना सांगू शकतो.त्याना त्या दिशेने वळवू शकतो.आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्याकडून तसं होतंय की नाही हे बघू शकतो.आपल्या दृष्टीआड असलेल्या सृष्टीबद्दल काय? जरा जाणती मुलं आपण दृष्टीआड होण्याचीच वाट बघत असल्यासारखी बसून असतात.त्याना स्वत:च्या बळावर, त्याना संपूर्ण मुक्त झालेल्या सृष्टीची मन:पूत सफर करायची असते.मग काय? त्याना तसं करू द्यायचं? असं करत करत, पडत, ठेचकाळतच ती शिकतील हे मान्य करायचं? मुलांना शिस्त कशी लावायची? मारणं, झोडणं कितपत योग्य आहे? आजच्या काळात? मग त्यांना मारण्याझोडण्या व्यतिरिक्त शिक्षा करायची? काय शिक्षा करायची?
मुलांना सतत कुठल्या न कुठल्या सकारात्मक कामात गर्क ठेवायचं!.. म्हणजे? त्यांना अनेक ऍक्टीविटी क्लासेसना, संस्कारवर्गांना घालायचं.शाळा, शिकवणीवर्ग आणि मग संस्कारवर्ग असं वेळापत्रक सेट करायचं? बस्स! मग काय चिंता? हा योग्य उपाय आहे? तो किती प्रमाणात व्यवहार्य आहे? सगळं करून झाल्यावरही आजकाल वेळ उरतोच मुलांना म्हणे! मग विरंगुळ्यासाठी त्यांनी नाही वळायचं माध्यमांकडे?..
पूर्वी वर्तमानपत्रं येतंच होती की घरी! त्यात नव्हते चोरय़ा, डाके, बलात्कार, खून? वर्तमानपत्रंही खुलीच होती की? चित्रपटही होते.नंतर ते दूरचित्रवाणीवरही आले.. पुस्तकं, मासिकं यायची की! वडलांच्या, आजोबांच्या खोलीत, कपाटात, टेबलावर विराजमान असायची! मुलं बागडायचीच की घरभर!..
जग बदलत चालंलय! मूल्यं बदलताएत! मूल्यांचा र्‍हास होत चाललाय! आणि त्याचवेळी जग आणखी आणखी जवळ येत चाललंय! एकत्र कुटुंब पद्धती उतरणीला गेलीय.कुटुंब लहान सुख महान म्हणत म्हणत घर म्हणजे एकट्या, एकाकी जीवांसाठीच्या प्रयोगशाळा झाल्या आहेत.कॉंक्रिटची जंगलं तयार झालिएत.यात रहाणारय़ा जीवांचं विरेचन कसं व्हायचं? त्यांनी व्यक्तं कसं व्हायचं? मुलांमधे जी प्रचंड उर्जा असते तिची घुसमट या मुलांना, आपल्याला, या समाजाला कुठे नेणार?
वळण, शिस्त लावणारी पालक मंडळी आहेत.टोकाची, प्रसंगी घरात टिव्ही, कॉम्प्युटरच न ठेवणारी पालकमंडळीही आहेत.वाचन, चित्रकला, नृत्य, वाद्यवादन असे छंद; छंद म्हणून जोपासायला उद्युक्त करणारी पालकमंडळी आहेत.त्यांच्या संख्येत वाढ होतेय.पण सर्वसाधारण चित्रं काय दिसतं? ’तुला शिकवणीवर्गासाठी लांब जावं लागतंय, घे हा मोबाईल!’ असं म्हणून त्याच्या हातात एकविसाव्या शतकातलं, नव्या सहस्त्रकातलं असं प्रभावी आयुध दिलं की आपलं त्या मुलावर, त्याच्या हातातल्या त्या वस्तुच्या वापरावर कितपत नियंत्रण रहातं? अपरिहार्य व्यवहारातून निरोगी मानसिकता कशी घडवायची?
मुलं चांगली असतात.समंजस असतात.पुढची पिढी अधिक समंजस आहे.त्याना जास्त कळतं.आपण सगळेच दिवसेंदिवस अंगावर येणारय़ा वेगवेगळ्या माध्यमप्रवाहांच्या लोंढ्यांशी स्वत:ला जुळवून घेत जगू शकू.आपल्या वातावरणाशी, सभोवतालाशी जुळवून घेत मानवजात आगेकूच करतेय.त्यातलं जे चिरकाल टिकणारं असेल, मानवाच्या पुढील प्रवासाला अनुकूल असेल ते टिकेल; बाकीचं नष्टं होत जाईल.
डार्विनचं तत्वज्ञान इथे लावता येईल?

6 comments:

Anonymous said...

एकूणच परिस्थिती बदलतेय ...छान आढावा घेतलात ... थोडासा समतोल आणि थोडी ऍड्जस्टमेंट हवी, काळाच्या ओघात चांगल-वाईट सर्व हळूहळू आपोआप सामावलं जात...

विनायक पंडित said...

स्वागत देवेन! मांडलेला विचार खूप दिवस पिच्छा पुरवतोय.एखादा विचार पिच्छा पुरवायला लागला की आवर्तात सापडायला होतं.आवर्ताचा वीट आला की नवं काही मत मिळावं असं आवर्जून वाटायला लागतं.हे मांडताना तसं झालं होतं.’...काळाच्या ओघात चांगलं वाईट सर्व हळूहळू आपोआप सामावलं जातं’ हे मनोमन पटलं! अभिप्रायाबद्दल खरोखर मन:पूर्वक धन्यवाद!

अपर्णा said...

मला विचारलं तर बदलत्या परिस्थितीप्रमाणे मुलांना वाढवणे हा सगळ्यात कठीण जॉब आहे सध्याचा...
हा लेख खूप छान झालाय

विनायक पंडित said...

स्वागत अपर्णा! अगदी अगदी खरंय! जग जवळ येतंय तसा हा जॉब खूपच कठीण व्हायला लागलाय.अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!

Asha Joglekar said...

TV पासून मुलांना दूर ठेवणं खठिण होत चाललंय खरं पण आई बाबांनी ही थोडा वेळ काढून चांगले माहितीपर कार्यक्रम एकत्र पाहण्याची शिस्त घालून द्यावी. कारटून फक्त रविवारी एक तास. मुलां बरोबर वेळ घालवणं अन त्यांना वाचना कडे प्रवृत्त करणं हाही एक उपाय आहेच .

विनायक पंडित said...

स्वागत आशाजी! अगदी खरंय आशाजी तुमचं. सर्वसाधारण कृती अशीच हवी. मोबाईल, टीव्ही आणि इंतरनेट या सगळ्यांची दुसरी अडथळा आणणारी बाजू सावरण्यासाठी सातत्याने लक्ष आणि प्रयत्न एकाग्र करावे लागताएत. पालकांना सतत कार्यरत असावं लागतंय. अनेक ताणांशी एकाचवेळी सामना! आपल्या अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार!