“बसा! खाली बसा इटक्याल! फ्रीडम फायटर कोण आहे इथं? तुम्ही का मी?.. बसा!.. अहो भडकायला काय आता नवतरूण नाही राहिलात तुम्ही!”
“सॉरी सर! पण तुम्ही एकदम वेगळ्याच ट्रॅकवर-”
“हाच ट्रॅक खरा आहे इटक्यालसाहेव! हाच ट्रॅक! आणि आमचे आदर्श होते आमचे नेते!”
“काऽऽय?” इटक्यालचं तोंडच विस्फारलं. राधाबाईंना त्याची काळजी वाटू लागली. दहिहंडीसाठी हुकमी उतरंड रचावी तसे आण्णा बोलत होते.
“नारे द्यायचे आणि बाजूला व्हायचं! मग त्यात सत्राशेसाठ आहुत्या पडल्या की स्वदेशीची चळवळ सुरू करायची. ती लोकांनी डोक्यावर घेतली की अचानक मागे घ्यायची. वसाहत म्हणून मान्यता द्या, चालेल! संपूर्ण स्वातंत्र्य कशाला? पोरांना फाशी जाहीर झाली, त्यानी उपोषण केलं.. आपण आपल्याकडे लक्ष वेधून ठेवायचं देशाचं. आपल्यापेक्षा मोठं कोणी होता कामा नये. ते त्यांचं राष्ट्र मागताहेत, देऊन टाका झालं, उगाच.. हे.. माझे तरी आदर्श होते इटक्यालसाहेब आणि मी योग्य ते संकेत घेण्यात-”
“काय बोलताय तुम्ही हे? कुणाबद्दल बोलताय? हे-हे-हे कसं-”
“छापायचं! असं म्हणायचंय ना तुम्हाला इटक्याल?.. की खरंच तुमच्याकडे ती वस्तू आहे?.. सात्विक संताप का काय म्हणतात ती? आत्तासारखंच सगळं होतं तेव्हा.. दरोडे घातले जात होते, राजकारणात एकमेकांच्या अपेक्षांची कापाकापी होती, ताम्रपट वाटपात भ्रष्टाचार झाले ते पुढे पण चळवळीचं नेतृत्व कुणी करायचं-”
“हे..हे-हे-हे भयंकर आहे! भयंकर!.. तुमच्यासारख्या माणसानं हे असलं सगळं- मॅडम-हे-हे तुम्हीतरी-”
“हे जास्त सनसनाटी आहे नाही मिस्टर इटक्याल! खरं नाही वाटत तुम्हाला? की तुमच्या उपयोगाचं नाहीए हे?.. आता पुढे सांगतो. ब्रिटीश काही आपल्याला घाबरून नाही पळून गेलेऽ.. आपल्यासारख्यांच्या या अवलादीची पूर्ण कल्पना होती आणि खात्री होती त्याना-”
“क-कसली? कसली?”
“पुढच्या पन्नाससाठ वर्षांत पुन्हा देश विकायला ठेवणार आहे ही अवलाऽऽदऽ पुन्हाऽऽ.. आणि तेव्हा सगळी तरूण पोरं परदेशात स्थाईक झालेली असणार आहेत.. राहिलेली स्वत:त, चंगळवादात आणि बुवाबाजीत अडकलेली असणार आहेत.. घोटाळे हा सरकार आणि नोकरशाही यांचा हक्क होणार आणि.. उथळ मनोरंजन आणि सनसनाटी याशिवाय वर्तमानपत्रात काहीही उरणार नाही.. अन्य माध्यमांची बातच सोडा! छापणार आहात तुम्ही हे सगळं?”
अचानक लालबुंद होऊन आण्णा थरथरत उभे राहिले. प्रतिध्वनिसारखा तोच तोच प्रश्नं विचारत राहिले, “छापणार आहात तुम्ही हे सगळं?”
इटक्याल अचानक शांत झाला. पत्रकारितेचं कातडं पांघरून तो पूर्ण भानावर आला. आपलं जे काही सामानसुमान होतं ते आवरून तो तितक्याच शांत, सावधपणे मार्गस्थ झाला तेव्हा आण्णासाहेब थरथरत होते. त्यांचा चेहेरा अजुनही तांबडालाल होता. राधाबाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होतं. आण्णासाहेबांना त्यांनी घट्ट धरून ठेवलं होतं.
इटक्याल रस्त्त्यावर आला. त्यानं तेच ते आपलं बहुउद्देशीय अत्त्याधुनिक यंत्र बाहेर काढलं. त्यावरचा एकच नंबर दाबला. त्या नंबराखाली प्रत्यक्ष संपर्क क्रमांक साठवलेला होता.
“हॅलोऽहॅलो सर, म्हातारा बराच तिरसट निघाला. आपल्या लिस्टवर दुसरं नाव कुणाचं आहे सांगा. आज रात्रीची डेडलाईन आहे!” (समाप्त? की पुढे असंच चालू? कधीपर्यंत?)