romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, May 30, 2011

हुबळी ते सिरसी आणि मधुकेश्वर, मरिकांबा...

रात्री साडेनऊ ते दुसरय़ा दिवशी सकाळचे साडेनऊ असा प्रवास करून हुबळीला पोचलो.सकाळचे विधी आटपले.हुबळीच्या हॉटेल स्वाती (Swathi) मधे ही सोय केली गेली होती.इडली सांबार, उपमा आणि रसम वडा नव्हे पण तसाच आणि त्यापेक्षाही उत्कृष्ट चवीचा वडा खाल्ला.बारीक पाऊस पडतोय की काय असं वातावरण.तरीही पुढचा हुबळी-सिरसी हा अडीच तासाच प्रवास अंगावर आला होता. अनुभवच्या चार-पाच टेंपो ट्रॅवलर्स सज्ज झाल्या आणि आमचं छप्पन्न जणांचं कुटुंब सिरसीच्या दिशेने निघालं.हुबळी शहर मागे पडलं आणि जाणवलं की प्रवासानंतर जिथे पोचायचं आहे त्या शेवटच्या मुक्कामापेक्षा प्रत्यक्ष प्रवास किती गुंगवून टाकतो.असं काही आम्ही अनेक महिन्यांनी, वर्षांनी पहात होतो!
सिरसीला पोचलो.हॉटेल शिवानी या हॉटेलमधे सहा रात्रींचा मुक्काम असणार होता.प्रत्येकाला त्याच्या त्याच्या सहा रात्रींसाठीच्या जागांचं वाटप झाल्यावर आंघोळ आणि त्यानंतर हॉटेलच्या डायनिंग हॉलमधे दुपारचं जेवण.हे पहिलं जेवण.जेवणाची सुरवातच पुरणपोळीनं झाली आणि इथपासून आम्हा सगळ्यांचा आहाराचा अफलातून सिलसिला सुरू झाला.नाश्त्यात कधी वाटीतली गुबगुबीत इडली, कधी कुरकुरीत मेदूवडा, कधी उपमा, अननसाचा शिरा, पोहे वेगवेगळ्या प्रकारचे जवळ जवळ रोज! आम्लेटब्रेड, ब्रेडबटर रोज, डोसे असं सगळं पोट भरून.ज्याला जे आवडेल ते आणि मनसोक्त.अरुण भटांचा आग्रह आणि त्यांच्या सगळ्याच सहकारय़ांची तत्परता.जेवण झाल्यावर मेसच्या प्रमुख दाराला जणू कायमचाच टांगलेला वेलची केळ्यांचा घड.तो असतानाही चार-पाच दिवस चोखून खाण्याचे आंबे!
जेवणातही तसंच.शाकाहारी, मांसाहारी दोन्ही.पोळ्या, पुलाव, रोज दोन-तीन प्रकारच्या भाज्या, आमटी.डाळ.कारवार-कर्नाटकातला सासम हा प्रकार.हे सासम अननसाचं, आंब्याचं आणि अगदी कारल्याचंसुद्धा! कुठलीही चव बिघडलेली नाही.मीठ कमी जास्त नाही.मांसाहारीसाठी जवळ जवळ रोज तळलेला मासा तर शाकाहारींसाठी वांग्याचे, बटाटयाचे तळलेले काप! वर प्रेमाचा आग्रह आणि आग्रह! नको नको! फार होतंय! असं म्हणत मंडळी आडवा हात मारतातच आहेत! नूडल्स, चिकन, फिशकरी, कर्नाटक पद्धतीचा घी राईस, बासुंदी, श्रीखंड, खीर! रोज नवीन! रिपीट मेन्यू नाहीच! चं.. ग.. ळ!..
पहिल्या दिवशी आडवा हात मारेस्तोवर अडीच वाजलेच.साडेचार वाजता स्थलदर्शनाला टेंपो ट्रॅवलर्स निघणार होत्या, शिरसी जवळच्या ’बनवासी’ या स्थळाकडे, मधुकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी.
“शांत झोप काढा! साडेचारला जमा! आपल्याला घाईगडबड करायची नाही!”अरूण भट सांगत असतात आणि हे घाई गडबड न करण्याचं तत्वं ते सहल संपेपर्यंत पाळतात हे विशेष!
’बनवासी’ ही जुन्या कर्नाटकाची राजधानी.सिरसी पासून २२ किमी.जिला दक्षिण काशीही म्हटलं जात होतं.कानडी किंवा एकूणच दक्षिणेला मंडपाला मंटप किंवा मंटपा अशी संज्ञा आहे.असे एकूण पाच दगडी मंटप इथे आहेत.मधुकेश्वर मंदिर पुरातन.इथल्या शिवलिंगाचा रंग मधासारखा म्हणून हे मधुकेश्वर.या लिंगाला मधाचाच अभिषेक केला जातो.मुगलांच्या आक्रमणाच्या वेळी हे लिंग नाश पावू नये म्हणून त्याच्या असंख्य प्रतिकृती करण्यात आल्या आणि मूळ लिंग जपून ठेवण्यात आलं, म्हणून ते वाचलं अशी कथा आहे. मंदिर प्रशस्त आहे.मंदिराचं आवार विस्तीर्ण आहे.आवाराच्या कडेला रांगेने या टोकापासून त्या टोकापर्यंत विविध देवतांची मंदिरं आहेत.ह्या देवतांच्या मूर्ती कर्नाटकाच्या वेळोवेळीच्या राज्यांनी स्वारीला जाऊन विजय संपादन केल्यावर, त्या विजयाची आठवण म्हणून भारतवर्षातून कुठून कुठून आणल्या.आवारात अर्ध गणपतीचं देवालय आहे.ही भग्नं मूर्ती नाही तर खरंच घडवलेला अर्ध गणपती आहे.आवारातल्या देवालयांवर देखावे कोरलेले आहेत.त्यात राक्षसमंथन असा एक देखावा आहे.देवीदेवतांची चित्रंही आहेत.मंदिराच्या आवारातल्या एका गाळ्यात एक पलंग आहे.हा ग्रेनाईटचा प्रशस्त पलंग भारतातला एकमेव असं सांगितलं जातं.
मधुकेश्वराच्या मंदिरातल्या नंदीचीही चित्तचक्षुचमत्कारिक म्हटली जाते अशी हकीकत आहे.मंदिरात प्रवेश केल्याकेल्याच हा नंदी नजरेस भरतो.महादेवाच्या अर्धांगिनीला, पार्वतीला नंदीचं महादेवावरचं हे तिच्या दृष्टीनं भलतंच प्रेम आवडत नव्हतं.नंदीला तिच्या वागण्याचा राग आला.परिणामी पार्वतीला मंदिराच्या आवारातल्या दुसरय़ा छोट्या देवालयात जाऊन बसावं लागलं.तरीही हा नंदी तिच्याकडे आजही एक डोळा रोखून बघतो आहे! अशी हकीकत सांगितली जाते.रचनाकारांचं कौतुक ह्यासाठी की खरोखरंच पार्वतीच्या मूर्तीजवळ जाऊन नंदीच्या दिशेने बघितलं तर मधल्या सगळ्या दगडी खांबांच्या जंजाळातून नंदीची एका डोळ्याची वक्रदृष्टी ठळकपणे नजरेस भरते!
अत्यंत पुरातन अशी ही वास्तू निरखताना पावसाळी वातावरण झाल्यामुळे एक वेगळाच परिणाम जाणवत होता.अंधार पडायलाही सुरवात झाली होती.
परतताना सिरसी गावात शिरल्यावर ग्रामदेवता मरिकांबेचं दर्शन घेतलं.कर्नाटका एकूणच याआधीही जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे टापटीप आणि सुव्यवस्थित नियोजन.एकही घर जुनाट, भग्नं दिसणार नाही.सगळी घरं आताच रंगरंगोटी केल्यासारखी.आपल्याकडे एका गावातून बाहेर पडल्यावर वाटेत छोटे छोटे बसथांबे दिसतात.कधीकाळी बांधलेले, भंगलेले, उकीरडा झालेले.या प्रवासात हे सगळे थांबे जाहिरातीने रंगवेलेले का असेना पण अगदी कोरे करकरीत!
ग्रामदेवता मरिकांबेचं देऊळही तसंच.प्रशस्त वास्तू.प्रवेश केल्याकेल्या भलामोठा हॉल किंवा सोपा लागतो त्याचा छान दुहेरी उपयोग करून घेतलेला.देवीसमोरच्या भक्तांना दर्शन किंवा आरतीला जमण्यासाठी उभं अवकाश आणि आडव्या अवकाशात त्याच हॉलच्या उजव्या बाजूला एक स्टेज, छोटा रंगमंच बांधलेला.आडव्या अवकाशात बसून शंभर एक माणसं सहज किर्तन, व्याख्यानादी कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतात.
मंदिरात टांगलेल्या भल्यामोठ्या तसबिरी फक्तं देवीरूपांच्याच! कुणी कुठल्याही देवाची तसबीर भेट दिली, दिली टांगून, असं नाही.देवीच्या वेगवेगळ्या रूपांच्या, लक्ष्मी, सरस्वती, अंबाभवानी इतकंच काय भारतमातेचीही एक तसबीर! सगळ्या तसबिरी भल्यामोठ्या आणि एकसारख्या.
पूर्वी ग्रामस्थांकडूनच चालवलेलं हे देऊळ आता रितसर ट्रस्ट स्थापून चालवण्यात येतं.ह्या देवळाच्या उत्पन्नातून दहा बालवाड्या चालवल्या जातात.केवढा मोठा आणि कौतुकास्पद असा हा उपक्रम!

Friday, May 27, 2011

स्काय वॉक याने की ढगात जाणे?

परवा सलूनात माझी हजामत :) चाललेली असताना एक तिशीचे गृहस्थ आपल्या दोन-चार वर्षाच्या ’आदू’ला केस कापायला घेऊन आले.आदू गावाला जाणार होता, केस आधीच बारीक, क्रू कटच करा अश्या सूचना त्यांनी कारागीराला दिल्या.मग त्यांचा भ्रमणध्वनी वाजला.बराच वेळ ते राधेश्यामला फोन लावायचा प्रयत्न करत असावेत.आलेला फोन राधेश्यामचाच होता.
राधेश्यामला त्यानी ’अपन बना रहे स्काय वॉकका वो सेंटर का माप अब्बी के अब्बी दे!’ म्हणून हुकूम सोडला.पलिकडे राधेश्याम का कू करत असावा. “एक घंटा फोन होल्ड करो! तुम्हारा क्या जाता है, मुजे अब्बी के अब्ब्बी अपना स्काय वॉकका वो सेंटर का माप चाहिए” राधेश्याम कसा बसा तयार झाला असावा.
इतक्यात गृहस्थांना सूरजचा फोन आला. “हां बोल सूरज! अरे त्याच्याच पाटी आहे रे! स्साला तिकडे कुणी माहितगार फिटर वगैरे नाहीये! मी करतो तुला, करतो पात मिन्टात! करतो!”
इकडे कारागीरासमोर बसलेला दोन-चार वर्षाचा आदू डुलकायला लागला.गृहस्थांचं लक्ष तिकडे गेलंय.
“अरय़े आदीऽऽ अरेऽऽ हा हाऽऽ अरे झोपतोएस काय? उठ! अरे-”
“साब! इतना लुडक रहा है ये!ऽ”
“अरे आज मैं घरपे था नं! ये दोपरको सोयाही नई है! आदीऽऽ-”
इतक्यात गृहस्थांना राधेश्यामचा फोन आलाय.तो त्याला सांगितलेलं स्कॉय वॉकच्या सेंटरचं माप घेता येत नाहीये म्हणून रडतोय.
“ऐसा क्या बोल रहे है राधेश्यामजी! कोशीश करो यार! क्या यार तुम! कोशीश करो! देखो! देखो! थंडे दिमागसे ले लो सबकुछ! थंडे दिमागसे लो! जाओ! फिरसे जाओ! मुजे कैसा बी करके माप चाहिए! एक घंटा होल्ड करता हूं! कुच जल्दी नई! तुम्हारा खुदका फोन है क्या ये? तुम्हारा क्या जाता है? चलो! चलो!”
गृहस्थ पुन्हा पेंगणारय़ा त्यांच्या आदीकडे बघून रेस्टलेस झालेत.
“अरे आदित्यऽऽ अरे बाबा तुला मला आता रिक्षानेच न्यावं लागणार घरीऽऽ-”
आदित्य थोडासा जागा होतो, “का.. बाबा..”
“अरे तू बाईकवर कसा बसणार? किती झोप येतेय तुला? तुला सांगितलं होतो नं दुपारी झोप म्हणून!- हॅलो-हॅलो- हां बोल सुरज! अरे हो सांगतो! त्याच गडबडीत आहे! पात मिन्टात माप सांगतो तुला!- नाय् यार घरीए मी! नाय् नाय् आज नाईट आहे यार! नाईट आहे! तुला सांगतो पात मिन्टात! अरे ड्रॉईंग आहे ना तुझ्याकडे? अं? बघ! तुला सेंटरचं माप सांगतो आपल्या स्काय वॉकच्या.. बाकीचं सगळं तुला अडजेस्ट करावं लागेल! अं- तुला बाकीचं- हां करतो तुला! करतो”
गृहस्थांनी दुसरा मोबाईल डायल केलाय.
“हॅ-हॅलो शोएब! शोएब यार तू नीचे है ना? देक् न जरा वो राधेश्याम क्या कर रहा है?- अं? जल्दी यार! जल्दी! अपना तारापूरका फॅक्टरीमें वो पार्ट बन रहा है यार! अब्बी के अब्बी मुजे वो माप देना है! देक् जरा देक्!”
गृहस्थ पुन्हा पहिल्या फोनवर!
“हां राधेश्यामजी! बोलो! बोलो! क्या? कितना? पाच मीटर? पयला मुझे बोलो माप कैसा लिया? पयला तुम बोलो यार! फिर मैं बोलता हूं! कैसा लिया? सेंटरसे अं? कैसा? वो छोडके? कैसा कैसा? आं? हां हां! बराबर! बराबर! वो छोडके! बराबर! लेकीन! पाच मीटर कैसा? वापस लो! जाओ! अरे यार! राधेश्याम थंडा रखो दिमाग! थंडा रखो! शांतीसे काम करनेका ये सब! जाओ अब्बी जाओ!- और होल्ड करो! होल्ड करो!”
गृहस्थ दुसरय़ा फोनवर.
“शोएब यार! देक् देक् वो राधेश्याम क्या कर रहा है! अरे पाच मीटर माप है बोलता है सेंटरसे! बल्की पूरा माप तो चार आठसो है! तो ये सेंटरसे पाच मीटर कैसा आएगा! देक् देक् जरा!”
तो पर्यंत आदित्य कुरकुरायला लागलाय, “बाबा.. बाबा.. पानी पानी...”
“अरे आदू काय पायज्ये तुला! थांब! थांब! आणतो पाणी! -अरे यार इसका नींद जाएगा पानी पिएगा तो- आणतो रे!”
आदूला मिनरल वॉटरच लागत असावं.ते आणायला गृहस्थ सलून शेजारच्या दुकानात जाण्यासाठी बाहेर पडतात.
दुसरा कारागीर आदूला तासणारय़ा कारागीराला.
“आहिस्ता यार! आहिस्ता! उस्तरा लिया है हातमें! काटगा उसे!”
“बेटा! आपका नाम क्या है बेटा!- जरा बात करता हूं यार! नींद उडेगी इसकी!”
आदूचं डोकं दोन्ही बाजूला डुलत राहिलंय!
मी हे सगळं ऐकतो, बघतो आहे.तांत्रिक गोष्टींशी माझा जन्मात फारसा संबंध आलेला नाही.गृहस्थांचा हा साईड बिझीनेस होता की आपल्या नोकरीतलीच जबाबदारी ते अशा रितीने निभावत होते? की त्याना ती अतिव्यग्रतेमुळे अशी निभवायला लागत होती? कळायला मार्ग नाही!
आजच्या वेगवान घडामोडी, भ्रमणध्वनीची उपयुक्तता हे सगळं मला समजतं.
स्काय वॉक अशा पद्धतीने बनवले जातात? हा एकच प्रश्न मनाला व्यापून राहिला आहे.
असं असेल तर जनता जनार्दनाच्या दृष्टीने ’स्काय वॉक याने की ढगात जाणे!’ हाच पर्याय उरतो असं माझं मत बनलंय! थोडक्यात जनतेची अवस्था ’आदू’सारखी!!
माझं मत टोकाचं असू शकेल, तेव्हा या घडामोडीवर कुणी प्रकाश टाकू शकेल?

Monday, May 23, 2011

सिरसीतला सुसह्य ग्रीष्म! (कूलर समर)

सिरसी हे उत्तर कर्नाटकातले एक गाव.कर्नाटकातलं महाबळेश्वर असं त्याला म्हणायचं ते तिथल्या वातावरणाची कल्पना येण्यासाठी.महाबळेश्वरमधेही हल्ली मे महिन्यात दुपारचं उकडतंच, सिरसीलाही अगदी तसंच.संध्याकाळी, रात्री आणि पहाटे मात्रं अतिशय सुखद गारवा!
सिरसीचा उच्चार बरेच वेळा शिरशी असा केला जातो.पण सिरसी हे अधिकृत नामाभिधान आहे असं इथे आल्यावर लक्षात येतं.अशा या ठिकाणी सहा रात्री नुकत्याच सहकुटुंब घालवल्या.आम्ही एकूण छप्पन्न पर्यटक होतो आणि हा अप्रतिम आनंद आम्ही सगळ्यानीच घेतला अनुभव ट्रॅवल्स या मूळ मुंबईतल्या पण कर्नाटकात पाय रोवलेल्या एकमेव पर्यटनसंस्थेद्वारे.मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे इथले हे पर्यटक वय वर्षं पाच ते सात पासून वय वर्षं सहाऐंशी पर्यंतचे होते.हे एक मोठं कुटुंबच होतं आणि या कुटुंबाला कुटुंबासारखंच ठेवलं अनुभव ट्रॅवल्सचे सर्वेसर्वा श्री अरूण भट यांनी.
अरूण भटांचा उल्लेख एक वल्ली असा करावा लागेल.हे खरं तर मुळचे हाडाचे शिक्षक.साधारण चाळीस वर्षांपूर्वी गिरगावातल्या साहित्यसंघ इमारतीत भटसरांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वर्ग (कोचिंग क्लासेस) चालत आणि ते अतिशय सुप्रसिद्ध होते.एकोणतीस वर्षं भट सरांनी हे वर्ग एखाद्या व्रतासारखे चालवले आणि एप्रिल-मे महिन्यात हिमालयात पर्यटक न्यायला सुरवात केली.अरूण भटांची कर्नाटकमधल्या किनार्‍यांची सफर अर्थात कोस्टल कर्नाटका चांगलीच गाजली.इतकी गाजली की अरूण भट किंवा अनुभव ट्रॅवल्स पेक्षा नुसतं ’कोस्टल’ म्हणूनच ती जास्त प्रसिद्ध झाली.आम्हा सगळ्या पर्यटकांचा योग असा की या दौरय़ात श्री भट, त्यांच्या पत्नी डॉ.शीला भट आणि कन्या प्राची भट आमच्या बरोबर होते.हे सगळं कुटुंब भट सरांचा मुलगा श्री मयुरेश भटसह अनुभव ट्रॅवल्सचं काम बघतं.कुणी म्हणेल पर्यटनसंस्थेबद्दल हे एवढं काय सांगत बसायचं? तर- भट यांचं मूळ जरी कर्नाटकातलं असलं तरी ते पूर्णपणे मराठी कुटुंब आहे.सगळं कुटुंब पर्यटनक्षेत्रात आहे.सगळ्यात महत्वाचं म्हणजे नको इतकी जाहिरातबाजी करून लोकांच्या खिश्यावर डल्ला मारण्याचा पवित्रा घेण्यापेक्षा त्यांचा भर मौखिक प्रसिद्धी, कौटुंबिक वातावरण, खाण्यापिण्याची प्रचंड रेलचेल यावर आहे.आम्ही सगळेच या दौरय़ावर खूष आहोत.स्वत: श्री अरूण भट हा हाडाचा परफॉर्मर आहे! अशा दौर्‍यांवर त्यांचे पूर्वीचे विद्यार्थी असतातच.ते सांगतात की भटसरांच्या वागण्याबोलण्यामधे इतक्या वर्षात काडीचा फरक पडलेला नाही.आज करोडोंची उलाढाल असूनही हा माणूस जश्याचा तसा आहे, जमिनीवर आहे.समूहासमोर अनेकविध मनोरंजक मार्गांनी व्यक्तं होणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे.ते सतत माणसांबरोबर असतात, समूहाला आपल्या आयुष्यातल्या घटनांनी, विनोदानं, कवितांनी गुंगवून टाकतात.वैयक्तिक प्रसिद्धीपासून जाणूनबुजून लांब रहातात.खाण्याची आणि खिलवण्याची त्याना जन्मजात आवड आहे.आपला परफॉर्मन्स त्यानी रंगमंचावर सादर करण्याची हाव धरलेली नाही.आयुष्यावर ’बरंच काही’ बोलू शकण्यासाठी आवश्यक असणारं भलं मोठं रंगीबेरंगी गाठोडं त्यांच्याजवळ आहे.ते व्यक्तं करण्याची प्रथमश्रेणीची पात्रता त्यांच्याकडे आहे (एवढंच काय सुयोग या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा श्री सुधीर भट हे त्यांचे सख्खे लहान भाऊ!) पण आपल्या पर्यटक मित्रांसमोर मित्रत्वानं उघडपणे व्यक्तं होणं त्यांनी कायमसाठी स्विकारलं आहे.ह्या व्यक्तं होण्यात व्यावसायिक भाग आहेच पण मानवी संवेदना जपणं हे हल्ली कुठल्याही व्यवसायात दुरापास्त होत चाललेलं वैशिष्ट्यं त्यांनी अजून जपलेलं आहे.
तर ह्या अशा दौरय़ावर मी मुंबईहून सहकुटुंब निघालो विडीयोकोच बसमधून रात्री साडेनऊला.बारा वाजेपर्यंत बस चेंबूरजवळंच ठाण मांडून होती.सकाळी साडेसहावाजता कोल्हापूर आणि हुबळी या कर्नाटकातल्या महत्वाच्या, पुण्याची आठवण करून देईल अशा शहरी पोचलो सकाळी दहाच्या सुमारास.उशीर झाला होता.हुबळीत एका हॉटेलमधे सकाळचे विधी आटोपून उरलेला प्रवास करायचा होता.सिरसी अजून रस्त्याने अडीच तासाच्या अंतरावर (१०० किमी.) होतं!...

Wednesday, May 11, 2011

मोहिनी आणि कबीर (३)

भाग २ इथे वाचा
जेलच्या अंधारकोठडीत कबीर स्थिरावलाय.अंधुक उजेडात एक सुतळी गजांना अडकवून तो काही विणायचा प्रयत्न करतोय.अंधारकोठडीच्या दुसरय़ा कोपरय़ात हालचाल होतेय.एक जिना प्रकाशमान होतो.त्या जिन्यावरून टाईट जीन्स, लांब कॉटन फुलशर्ट घातलेली स्त्री खाली उतरतेय.फुलशर्टचा रंग हलका गुलाबी असल्याचं स्पष्टं होत जातं आणि ती स्त्री, सिविल ड्रेसमधली लांबसडक केस मोकळे सोडलेली मोहिनी असल्याचंही स्पष्टं होत जातं.
कबीरची तंद्री भंगली आहे.तो समोर पहातच रहातो.अगदी टक लाऊन.स्वत:च्या नकळत तो उभाही राहिलाय.त्याचवेळी त्या मागच्याच जिन्यावरून दणदणणारी पावलं.हा किर्तीसिंग आहे, युनिफॉर्ममधला, धावतपळत आलेला, त्याच्या हातात शाल.तो जोरजोरात ’मॅडम! मॅडम!’ म्हणून मोहिनीला पुकारतोय.मोहिनी शांतपणे मान वळवते.
“अरे! सिंगजी?... क्या हुआ?”
सिंग हातातली शाल पुढे करतोय, “ये शॉल-”
“शॉल?”
“तुम्ही मागितली होतीत मॅडम!” मोहिनी चकीत.
“मी?”
त्या दोघांकडे बघणारा कबीरचं छद्मी हसतोय.
सिंग रागारागाने कबीरकडे पहातोय, प्रयत्न सोडत नाहीए.
“असं काय करताय मॅडम! तुम्ही-”
मोहिनी हात पुढे करते, “द्या!... या तुम्ही!" तरीही सिंगचं समाधान झालेलं नाही.तो आळीपाळीने त्या दोघांकडे बघत तिथेच थांबलाय, “सिंगजी!... तुम्ही जाताय नं वर?”
“ये-येस-मॅडमसाब!” सिंगला कसातरी काढता पाय घ्यावा लागलाय.तरीही जाता जाता वळून ’दिलेली शाल ओढून घ्या!’अशी खूण त्याच्या मॅडमसाबला केल्याशिवाय त्याला रहावत नाही.कबीरचं त्याच्याकडे बारीक लक्षं असल्यासारखं.कबीर पुन्हा तसंच हसतो.त्याच्याकडे नजर रोखत सिंग तिथून निघतो.
मोहिनीनं आपला मोर्चा आता निश्चितपणे कबीरकडे वळवलाय.उजव्या हातात धरलेली शाल उंचावून मोहिनी ती आपल्या डाव्या आडव्या हातावर टाकते आणि जरब असलेला तिचा आवाज अंधारकोठडीत घुमतो.
“हॅलो मिस्टर कबीरलाल!”
कबीरचं लक्षं अजून सिंग नुकताच गेलाय त्याच्या जाण्याकडे आहे.मोहिनीचा आवाज ऐकल्यावर तो नजर वळवतो आणि मोहिनीकडे रोखून बघायला लागतो.
“हॅ-हॅलो-मिस-मिसेस-”
“जेलर!”
“ओह! ऑफ कोर्स! जेलर!... जेलर!"
“काय चालंलय?”
“का-काही नाही! काही नाही!” दीर्घ श्वास घेऊन कबीर मोहिनीवर रोखलेली आपली नजर काढून घेतो.वळून पाठमोरा होतो, “आता काय चालणार?”
मोहिनीचं लक्षं गजांकडे गेलंय.
“विणकाम करताय!”
“असंच! सुतळीचा तुकड मिळाला... हात स्वस्थं बसून देईनात... काहीतरी-"
“स्कूल ऑफ आर्ट सोडून किती वर्षं झाली?”
“झाली... त्याचं काय आता...” तिच्याकडे वळतो.पुन्हा तेच रोखून बघणं, “माझे पेपर्स वाचले असतील तुम्ही तर माझं सगळं चरित्रं लिहिलंय त्यात- ते सगळं पुन्हा माझ्या तोंडून ऐकायचं असेल तर आय एम सॉरी मी तुम्हाला-”
“कबीर!... एकेकाळी तुम्ही खूप नावाजलेले कमर्शियल आर्टिस्ट होतात, खूप कमी वेळात आर्ट डायरेक्टरही झालात आणि-”
“हे सगळं तुम्ही मला का सांगताय?”
मोहिनी हसतेय.हसता हसता वळते.गजांपासून दूर चालायला सुरवात करते.कबीरला पाठमोरी, “माझा अजूनही विश्वास आहे!”
कबीर पाठमोरय़ा मोहिनीकडे टक लाऊन पहातोय.तितक्यात ती थांबते आणि त्याच्या दिशेने वळते.कबीर हडबडतो.
“क-कशा-कशावर विश्वास आहे?”
कबीरकडे, त्याच्या हडबडण्याकडे लक्ष जाऊन मोहिनीला हसू आलंय,
“माणसावर!”
कबीर तिच्यावरची नजर काढून घेतो, “मी एक जन्मठेपेचा कैदी आहे!”
“हे मान्य आहे तर तुम्हाला!” कबीर तिच्याकडे बघू लागलाय, “हेच- तुम्हाला पश्चातापाची एक संधी मिळतेय- अजूनही वेळ गेलेली नाहिए- अजुनही तुम्ही-”
“हे तुम्ही सांगताय? हंऽऽ... अडकलोय आता मी!... पुरेपुर!”
“का? अजूनही पळवाटा आहेतच की! सुप्रिम कोर्ट, मग जन्मठेप कमी व्हावी म्हणून दयेची याचना-”
“आता दयेची याचना...” वर बघतोय, “त्याच्याकडेच!”
मोहिनीला आता हसू आवरेनासं झालंय. “काय म्हणता?” मोहिनी खिल्ली उडवल्यासारखं हसतच राहिलीय.
“तुम्ही हसा! हसा!... सगळेच!-”
मोहिनी त्याच्याकडे बघत अचानक झाल्यासारखी गंभीर, कठोर दिसू लागते.एका एका शब्दावर जोर देत बोलू लागते.
“मिसेस रितू शिवदसानी आठवतेय?”
कबीरची मान खाली.तो पुटपुटतोय, “रितू... रितू...” चिडल्यासारखा दिसायला लागतो.
“का?... आठवतेय तर!”
कबीरची बोलती बंद झाल्यासारखी.
“नो आर्ग्युमेंट्स?”
“मॅडम जेलर... मला बरंच काही आठवतंय... तुम्हाला ऐकायचंय?...
IPS Beret

Sunday, May 8, 2011

मोहिनी आणि कबीर (२)

भाग १ इथे वाचा.
“कबीर?” सिंगचा चेहेरा सगळ्या जेलची काळजी डोक्यावर पडल्यासारखा झालाय...
“होय सिंगजी, कबीर!”
सिंग अचानक घाईघाईने निघलाय.
“पण तुम्ही आत्ताच कुठे निघालात?”
“माझा चोवीस घंट्याचा पहारा सुरू झालाय मॅडम!”
“कुठे?”
“इथे मॅडमसाब!”
“माझ्यावर?” मोहिनी हसायला लागल्यावर सिंग नर्वस.
“मॅडम तुम्हाला काळजी नाही वाटत कशाचीच!”
“वाटते ना! तुमची, बाईजींची-” मोहिनीचं हसू आणखी वाढलंय आणि सिंग कपाळाला हात लावतो.मोहिनीची लकेर वाढत चाललीए.
“नाही वाटत का सिंगजी? आणि- तुम्ही या जेलची ड्युटी करायची!”
“माफ करा मॅडम मी जेलचीच-”
“तुम्ही माझी जास्त काळजी घेताय!”
“ते काय आपल्याला समजत नाय्! गेली तीस वर्षं मी या जेलची आणि जेलचा सबसे बडा साब या दोघांचीही हिफाजत करतोय, तिच माझी ड्युटी!” मोहिनी गंभीर झालीय.IPS Beret“सिंगजी... फार करता तुम्ही माझ्यासाठी... तुमच्या सारख्यांमुळेच माणूसकी हा शब्द तरी अजून जिवंत आहे असं वाटतं! नाहीतर...”
“तो... कधी येणार आहे इथे?”
“कोण?” मोहिनी अजून त्याच तंद्रीत आहे.
“कबीर, मॅडम!”
“येईल इतक्यात-”
“इतक्यात?”
“हो! का?... जन्मठेपेचा कैदी हायकोर्टातून सरळ इथेच येतो सिंगजी! आणि- ते कितीसं लांब आहे!”
सिंगचे डोळे चमकतात.तो मान वेळावतो.
“छान! जन्मठेप झाली तर!”
“हायकोर्टात!... कबीरलाल हे काही साधंसुधं प्रकरण समजू नका तुम्ही!... सुप्रीम कोर्ट, मग राष्ट्रपती या पुढच्या पायरय़ा त्याच्या दृष्टीनं फार कठीण नाहीत!...” मोहिनी विषय संपलाय असा संकेत देते.पुन्हा टेबलावरची विशिष्टं कागदपत्रं चाळू लागलीए.
सिंगचा चेहेरा स्थिर.डोळे रोखलेले.
“हिफाजत करणारय़ाना कुठल्याच पायरय़ा नाहीत मॅडम!”
मोहिनी हातातल्या पेपर्सवर एकाग्र.तंद्रीत, “काय?” सिंग मुद्दा स्पष्टं करण्याच्या तयारीत असतानाच, “एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये असं तत्वं आहे-”
सिंग आता चर्चा करण्याच्या मूडमधे आलाय.
“निरपराध! खरंय मॅडम! पण कडक शिक्षा दिलेल्या आरोपीची शिक्षा सौम्य करणं, शिक्षेत सवलत देणं-”
“सिंगजी... तुम्ही म्हणताय ते अजिबात चूक नाहीए! पण सिस्टीम- यंत्रणा- ही जी गोष्टं आहे त्याच्याबाहेर-”
सिंग मधे बोलायचा प्रयत्न करतोय, त्याला अडवते,
“माहितीए मला सिंगजी- तुम्ही म्हणाल मी नेहेमीचं कारण पुढे करतेय पण हे तुम्हालाही निश्चित माहित झालंय की आपल्यासारख्यांच्या सेवांना एका मर्यादेतच काम करावं लागतं.त्या बाहेरच्या गोष्टी-”
मोहिनीला बोलणं थांबवणं भाग पडलंय.
केबिनच्या बाहेर गडबड सुरू झालीए.सिंग दरवाज्याजवळ पोचतो.मोहिनी स्वत:च्या नकळत उभी रहाते.प्रथम एक पोलिस अधिकारी केबिनमधे आलाय.तो मोहिनीला सॅल्यूट करतो.त्या पाठोपाठ एक शिपाई.त्याच्या एका हातातल्या बेडीत अडकवलेला कबीर- सहा फूट उंच, पांढरा फटक गोरा, डोक्यावर आणि चेहेरय़ावर केसांचे फक्तं खूंटं, घामानं थबथबलेला, सावकाश आत येतो.मागे आणखी दोन शिपाई, त्याच्या हातातली दुसरी बेडी पकडून.कबीर मोहिनीकडे पहातो.तिच्यावरून त्याची नजर सापासारखी फिरायला लागते.मोहिनी प्रथम आक्रसून गेलेली.मग मुठी घट्टं आवळते.रूबाबात खुर्चीत बसते.तिच्या हालचालीने कबीरची तंद्री भंगलीय.तो स्वत:शीच हसतो.शर्टाच्या बाहीने घाम पुसू लागतो.मोहिनीला सॅल्यूट करणारा तो अधिकारी आणखी पुढे झालाय.त्याच्या हातात एक जड फाईल.ती तो मोहिनीकडे सुपूर्द करतो.अदबीनं वाकून हलक्या आवाजात ब्रीफ करायला सुरवात करतो...

Saturday, May 7, 2011

मोहिनी आणि कबीर (१)

IPS Beretमोहिनी सरकार ही पस्तिशीची, अत्यंत आकर्षक अशी जेलर स्त्री आपल्या केबिनमधे बारकाईने कागदपत्रं चाळत बसली आहे.तिच्या टेबलजवळ उभा आहे हवालदार किर्तीसिंग.निवृत्तीचं वय जवळ आलेल्या किर्तीसिंगमधला कडक वर्दीतला सतत ऑन द टोज असलेला शिपाई आजही तरूण आहे.प्रचंड एकाग्र झालेल्या मोहिनीचं लक्ष कधीतरी किर्तीसिंगकडे जातं.
“अरे! सिंगजी! किती वेळ उभेच आहात! बसा! बसा!”
सिंग बसायला तयार नाही, आणखी अदबीनं तो ’मी ठीक आहे!’ हे नेहेमीचं वाक्य बोलतो.मग त्याचा पुतळा झालाय.
मोहिनी आज त्याच्याकडे पहात रहाते.मग मोठ्याने हसते.सिंग बावचळलाय.आपलं नक्की काय झालंय त्याला कळत नाही.त्याचं मन त्याच्या कोर्‍याकडक युनिफॉर्मच्या कानाकोपरर्‍यात जलद फिरून येतं.’सगळं तर बरोबर आहे! सकाळी आरश्यात बघून चारचारदा खात्री करून घेतलीवती मी!’ तो स्वत:शीच अचंबा करतोय.तो अचंबा आपल्या कडक सैनिकी शिस्तीतून बाहेर पडू नये याचं रितसर शिक्षण त्याने सर्वीसच्या सुरवातीलाच घेतलंय.
“सिंगजी! तुम्ही आज्ञापालन करत नाही!” मोहिनीच्या हसण्याचं आता वाक्यात रूपांतर झालंय.सिंगचं सैनिकी रूप आज पार मोडून टाकायचं असा मोहिनीचा खेळ दिसतोय पण बावल्या किर्तीसिंगपर्यंत तो कितीसा पोचणार? त्याच्या तोंडून त्याचा मगासचा अचंबा ’अं ऑ उ ऊं’ च्या बारखडीच्या स्वरूपात आता मार्ग शोधतोय.मग तो म्हणतो,
“ना- नाही मॅडम- मी उभाच आहे- अटेंशनमधे- कधीचा-”
“अहोऽऽ मी तुम्हाला बसायला सांगितलंय!”
“आपण जेलरसाब आहात मॅडम! मी साधा हवलदार, मी-”
मोहिनीला आता आवाज उंचावल्याशिवाय गत्त्यंतर नाहीए.ती ’बसा!’ एवढंच ओरडते आणि प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखा सिंग पटकन् बसतो.मोहिनीला मोठ्या कष्टानं हसू आवरायला लागतंय.मग कनवाळू होऊन ती सिंगच्या बायकोबद्दल, जिला मोहिनी ’बाईजी’ म्हणते तिच्याबद्दल विचारते, “बाईजी... कशा आहेत आता?”
“तिला काय धाड भरलीए!”सिंगमधला पुरूष फुत्कार सोडून आपण नॉर्मल झाल्याचे संकेत देतोय.मोहिनीला अचानक झालेला हा बदल खुपलाय.पण ती आणखी मायाळू होते.
“सिंगजी... काल बुखार होता त्याना!”
“इथल्या या समुद्री वातावरणात बुखार काय नवीन आहे का मॅडमसाब? गेले कित्येक वर्षं येतोय तो.औषधं वेळेवर घेतली नं तर काहीही होणार नाय! पण ऐकतो कोण?”
मोहिनीचं लक्षं पुन्हा हातातल्या कागदपत्रांवर गेलंय पण ती संभाषणाचा धागा तोडत नाही, “तुम्ही द्यायची सिंगजी त्याना औषधं वेळेवर!”
“काय काय करू मी मॅडम? ही ड्युटी करू की-”
“बाईजी किती काळजी करतात तुमची सिंगजी! -तुमचीच काय सगळ्या जगाची काळजी करते ही बाई!” मोहिनीच्या हातातले कागद आता बाजूला ठेवले जातात. “आठवतंय नं मला! मी इथे जॉईन झाले तेव्हापासून तुम्ही आणि बाईजी अगदी माझ्या आईबाबांसारखी काळजी घेताय माझी!”
“आमची ड्युटीच आहे ती मॅडम!”
“तुमची ड्युटी इथे! या ऑफिसमधे!”
“माणूस म्हणून जी ड्युटी, ती सर्वात जास्त महत्वाची मॅडमसाब!”
“सगळेच असा विचार करत नाहीत सिंगजी! या जगातली माणूसकी नष्टं होण्याच्या मार्गावर आहे असं माझं स्पष्टं मत होत चाललेलं आहे!”
सिंगला आपली बसण्याची सैनिकी पोज आता नकळत मोडावी लागलीय.
“तुम्हीच असं म्हणताय मॅडम? आपल्यासारख्यांचाच विश्वास जर असा डळमळीत झाला- मला माफ करा मॅडमसाब- म्हणजे मी-” काही स्पष्टं करू न शकण्याची सिंगची नेहेमीची अडचण वाजणार्‍या फोनने तत्परतेने ओळखलीए.तो वाजतो आणि सिंग नको तेवढ्या तत्परतेने रिसीव्हर उचलतो, “हालोऽहा-हालोऽ–जी-जी-” सिंग तत्परतेने उठून उभाच राह्यलाय, “जी-देतो-” सिंगनं माऊथपीसवर हात ठेवलाय आणि तो कुजबुजतो, “मॅडम! कमिश्नरसायबांचा फोन आहे!”
मोहिनी चटकन् फोन घेते, “येस सर! येस!... योर ऑर्डर्स सर!... राईट सर! राईट! आ’ईल डेफिनीटली टेक द नेसेसरी प्रिकॉशन्स सर!... माय रिस्पॉन्सबिलीटी सर!... थॅंक यू-थॅंक यू सर!” मोहिनीनं रिसिव्हर ठेवलाय.सिंग पुन्हा नको तेवढा सैनिकी होतो.
“सिंगजी!”
“येस मॅडमसाब!”
“कबीर... येतोय इथे अ‍ॅट लास्ट!”
“कबीर!” सिंगचा चेहेरा सगळ्या जेलची काळजी आपल्या डोक्यावर पडल्यासारखा झालाय...

Wednesday, May 4, 2011

वांझ बेचैनीचं कंत्राट!

बेचैन व्हायला आजच्या युगात तसं म्हटलं तर काही कारणच लागत नाही.आपण बेचैन आहोत हे समजायला आपल्याला वेळ मिळतो का? बेचैनी हा स्थायीभाव झालाय का आज सर्वसामान्यपणे? सतत बेचैन असल्याचे धोके काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज प्रत्येकाकडे आहेतही आणि ती असून प्रत्येक जण ह्या अपरिहार्य बेचैनीकडे कानाडोळा करतोय! का? मग आरोग्याला धसका लागला की जागा होतो.उपाय करायला लागतो.सारांश, बेचैनी, बेचैन असणं नाकारता येत नाहीए.काही प्रमाणात झुगारताही येत नाहीए.सर्वसामान्यपणे म्हणतोय.अपवाद आहेत.त्यांचं स्वागत आहे.

’सतत बेचैन असतो, अस्वस्थ असतो, चळवळ्या आहे नुसता!’ काय बरं वाटतं तेव्हा, लहानपणी असं कुणी म्हटलं की! थेट बाळाचे पाय पाळण्यात दिसून तो थोरामोठ्यांच्या पंक्तीत विराजमान झाल्यासारखं! ’सृजनशील’ वगैरे बिरूदावली चिकटायची ही सुरवात. ’नाहीतर बसलाय आपला अजगरासारखा सुस्त!’ हा आणखी टोकाचा प्रतिसाद.अजगरासारखा सुस्त असूनही तो आत बेचैन असतो का? की नाही? बेचैनी ही नुसती शारीरिक की मानसिकसुद्धा? मानसिक बेचैनीचं रूपांतर मग शरीराच्या आवश्यक-अनावश्यक हालचालींमधे होतं, शारीरिक बेचैनीमधे होतं की एखाद्याची मानसिक बेचैनी बाहेर दिसतंच नाही, ती आतल्याआतच घुसमटत रहाते?

बेचैन असणं म्हणजे प्राप्त असलेल्या परिघात खूष नसणं.बदलाची अपेक्षा करणं.बदलासाठी प्रयत्न करणं आणि बदल घडवणं अशा सकारात्मक प्रवासाचा एक प्रवाह दिसतो.सर्जनशील असणारा.
प्राप्त परिघामुळे आलेली बेचैनी विचार करायला लावणारी आहे.काही सकारात्मक दिसत नाही, वैयक्तिक आयुष्यात.सामाजिक आयुष्यात.चांगले बदल घडलेलेच दिसत नाहीत.मिडिऑकर माणसं धो धो यश कमवतात.पात्रता असून, मेहेनत करून सरळ मार्गाने काही होत नाही किंवा जे होतं त्यापेक्षा वाममार्गानं जाऊन होतंय.
आणखी एक प्रवाह म्हणजे यश मिळतंय.प्रचंड मिळतंय पण त्यासाठी काय काय करावं लागतंय त्यानं बेचैनी कायमची चिकटून राहिली आहे.ही बेचैनी आज जास्त आढळते आहे असं दिसतंय.

मग ’वांझ बेचैनीचं कंत्राट!’ हे काय खटलं आहे?
ही नुसतीच बेचैनी आहे.सगळं काही आहे.मध्यवस्तीत तीर्थरूपांच्या पुण्याईने मिळालेली सदनिका आहे.सुस्वभावी पत्नी आहे.अभ्यास करा! करा! म्हणून मागे न लागता त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात स्थिर होत असलेली मुलं आहेत.स्वत:ला स्वत:च्या आस्थापनात स्वत:ची अशी नोकरीतल्या कामाव्यतिरिक्त असलेली चांगली प्रसिद्धी आहे! मग?
प्रचंड गोंधळ आहे आत.तो दुसर्‍या कुणाला कळण्याच्या पलिकडचा आहे.स्वत:ला तरी तो कितपत कळतो, किंवा तो कळावा अशी इच्छा आहे, माहित नाही! संवेदनशीलता आहे पण ती ताणली गेली की ती उघडी पडते.ती पूर्णपणे स्वकेंद्रित आहे.इतकी की पार मोठ्या झालेल्या मुलांना अजून ती लहान असल्यासारखं जपणं आहे.हे जपणंही निखळ जपणं आहे? की आपला इगो, आपला हक्कं, आपलं स्वामित्व टिकवण्यासाठी ते आहे? स्वकेंद्राला जरा धक्का लागला की मग समोरचा कितीही वाईट परिस्थितीत असो त्याच्याबद्दल पूर्णपणे निब्बरपणा असणारी अभिवृत्तीही आहे.निखळपणा असणारं काहीच नाही? सगळं काहीतरी स्वकेंद्रित, काही कुरघोडी करायच्या हेतूनं? का?
उच्चपद स्विकारायचं तर अजिबात नाही पण बरोबरचे चार आपल्यापेक्षा सेवाज्येष्ठतेत कमी आहेत, तर त्यांच्यावर साहेबगिरी करायचा आगाऊपणा आहे.सगळं मी करून वरचढपणा करण्याची सोय करून ठेवायची वृत्ती आहे.कारण नसताना सगळं मी केल्यामुळे ते कारण नसताना आक्रमकपणे बोलून दाखवणंही आहे! त्यानं कुणी दुखावला तर झक मारत गेला!
समोरचा जो अजिबात हिंगलत नाही त्याला शरण जाण्याचं कसब आहे आणि जो समजून घेतो, सरळसोट आहे त्याला नामोहरम करायची जिद्द आहे.
आपण चुकतो हे कबूल करायचंच नाही हा हट्टी खाक्या आहे.आपण चुकलो म्हणून समोरच्या एखाद्यानं निषेध नोंदवला, काही बोलून किंवा संबंध जेवढ्यास तेवढे ठेऊन, तर त्याला कामाच्या ठिकाणी कसं कॉर्नर करायचं हे कौशल्यं(?)ही आहे!
हे सगळं तुम्ही म्हणाल की फार वरच्या पातळीवर, चढाओढीच्या, फायद्याच्या, कर्तृत्वाच्या अपेक्षेने आहे तर तुमचा कयास चुकलाय.हे सगळं एखाद्या डबकं म्हटल्या जाणार्‍या ठिकाणी आहे.

…आणि या सगळ्याला वेढून टाकणारी ती वांझ बैचेनी आहे.हे सगळं असल्यामुळे ती आहे? की तो एक जन्मजात स्वभाव आहे? नुसती फुटकळपणे येणारी वांझ बैचेनी नाही.वांझ बेचैनीचं कंत्राट घेतलेलं आहे.हृदरोगाला आमंत्रण दिलेलं आहे.वर दुसर्‍यानीही हे कंत्राट घेतलं पाहिजे असा आग्रह वाटावा असं वागणंही आहे.
आपण घेतलेलं कंत्राट ही चूक अजिबात नाही असं ठाम मत असल्यामुळे त्यावर उपाय करण्याचा मुद्दाच निकालात निघतो.
बरं, प्रचंड बडबड्या स्वभावामुळे, स्वत:ला वाटेल तेव्हा कृती करण्याच्या किंवा कृतीच न करण्याच्या स्वत:च घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे समोरच्याला सतत धडा शिकवल्याचं समाधान मिळूनतरी ह्या कंत्राटाचं विरेचन होत असेल, कधीतरी ते पूर्णपणे होईल असा कयास केलात तर तेही होत नाही.
देव आहे आणि तो काय एकेक नमुने घडवतो ह्याचं आश्चर्य करत बसलो तर आणि तरच काही संगती(?) लागते.नाहीतर... तुम्ही सांगा.तुम्हाला काय वाटतं?

Sunday, May 1, 2011

बेलूर मठ

बेलूर मठाची अचानक आठवण यायचं कारण काय? कधीही काहीही आठवतं.मन कुठेही सैर घडवतं आणि आपण आश्चर्य करत रहातो, हे कुठून आलं म्हणून! सुट्टी, नेहेमीपेक्षा वेगळं रूटीन (!).आळस, झोप, आराम, वर्तमानपत्रं, जेवण, वामकुक्षी, दुपारचा चहा इत्यादी प्राथमिकता पार पडल्यावरच विचार या गोष्टीला जाग येते.एरवीच्या रूटीनमधे उठलो की आज काय करायचंय, काय होणार आहे, काय वाढून ठेवलेलं असणार आहे असे प्रश्न विचार या तत्त्वाला चालना देतातच.
आज सगळं झालं आणि नंतरच घड्याळाकडे लक्ष गेलं.पाच वाजलेत.घामानं कोंदटल्यासारखं झालंय.अजून दोन तास आहेत सूर्याचं तेज पूर्णपणे निवायला.मग कदाचित थोडं सुसह्य होईल.
पाच वाजले म्हटलं आणि कुठलीतरी कळ दाबल्यासारखी झाली.पाच वाजता सूर्यास्त होऊन अंधार पडायला लागला होता बेलूर मठात पोचलो तेव्हा! बेलूर मठ! तिथे जाऊन झाली आता जवळ जवळ वीस वर्षं!
झुलवाचा दौरा होता कलकत्त्याचा.कलकत्ता तेव्हा कोलकाता झालेलं नव्हतं.हावडा रेल्वे स्थानकाबाहेर पडलो.चाळीस जणांच्या आसपास असलेला ग्रुप.एक ठिकाण आलं की सगळे एके ठिकाणी जमायलाच पाच दहा मिन्टं लागायची.तोपर्यंत जागच्या जागेवर उभं राहून दृष्टी पोचेल तिथपर्यंतचं स्थलदर्शन.बाहेर उभे होतो रेल्वेचा लांबलचक प्रवास आटपून.पहिलं जाणवलं ते धूसर वातावरण.प्रदूषण असावं असं धुकं.लांबवर दिसणारा हावडा ब्रिज.टक लाऊन बघत बसलो.सगळा ग्रुप जमलाय चला आता बसकडे असा रेटा जाणवेपर्यंत.मग बस, महाराष्ट्र भवन, तिथे जागा उपलब्ध नाही म्हणून गावभर फिरत सॉल्ट लेक सिटी या नव कलकत्त्यातल्या भागाकडे.आख्ख्या कलकत्त्यातून.जिथे ट्रॅम, माणसं, इतर वहानं, अगदी माणसांनी ओढायच्या रिक्षांसकट अशी सगळी भेळ असते- असायची- आता काय झालं असेल ते देव- कालिमाताच जाणे!
रुद्रप्रसाद सेनगुप्ता नावाचा ज्येष्ठ प्रायोगिक रंगकर्मी.त्याची नांदीकार नावाची संस्था.त्यांनी भरवलेला राष्ट्रीय नाट्यमहोत्सव.रवींद्र भवन या नाट्यगृहात.रवींद्र भवन हे तिथल्या मेट्रो रेल्वेचं स्थानक आहे.मेट्रो रेल्वे कलकत्त्यात कधीच आली.
झुलवा या प्रायोगिक नाटकाचे देशभरात आणि महाराष्ट्रात अनेक दौरे झाले.दौर्‍यावर एक दिवस स्थलदर्शनासाठी ठेवलेला असे.त्यादिवशीची संध्याकाळ बहुदा खरेदीसाठी राखून ठेवलेली.बाहेर गेल्यावर स्थलदर्शनापेक्षा खरेदीसाठीचीच झुंबड जास्त.काय काय घ्यावं? बांबूच्या चटया करतात तश्या पद्धतीने चार घट्टं पाय विणून आणि वर चौकोन विणून छोटे मोडे विकायला होते.हीऽऽ झुंबड.आमचा एक मित्र बहुदा तो या मौल्यवान खरेदीबद्दल अनभिज्ञ असावा.त्याला ते ज्ञान प्राप्त होईपर्यंत उशीर झाला असावा.बसमधून सगळा चमू खरेदी आटपून परतताना हा आपला सारखा त्या इतरांनी खरेदी केलेल्या मोड्यांकडे टक लाऊन पाही आणि अस्वस्थं होई.आम्ही काही टारगट ’कारे’ होतो.संसार नव्हता.खरेदी-बिरेदी म्हणजे भंपकपणा असा आमचा समज.आमचं लक्षं आता नवीन कुणाला लक्ष्यं (टारगेट) करायचं याकडे असायचंच.मोडा न मिळालेल्या मित्राची अस्वस्थता आमच्या डोळ्यात भरलेली.हा अनुनासिक होता.प्रत्येक मोडेमालकाकडे जाऊन हा आपला चौकशी करी आणि आपल्याला इतका स्वस्तं आणि मस्त मोडा मिळाला नाही म्हणून चुकचुके.कलकत्त्यातल्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस म्हणजे आत आजूबाजूनी सीट्स आणि मधे मोकळी जागा.अशा मोकळ्या जागेत माणसांची गर्दी उभी.आमच्या मोडेप्रेमी मित्राला त्या जराश्या विरळ गर्दीत खाली ठेवलेला एक मोडा दिसला.तो त्या मोड्याजवळ गेला आणि त्या मोड्यावर बसला.मग घाईघाईने उठून, “च्यांयला फांलतूं आंहे!”असा जोरदार रिमार्क मारून आमच्याजवळ आला.आम्हाला हसायला कुठलंही कारण चालायचं.या मित्राच्या मनात नक्की काय चाललं होतं त्याचं तोच जाणे.पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट असं म्हणत सगळ्या ग्रुपला एकमेकांना सांगायला तो किस्सा बरेच दिवस पुरला.
आज स्थलदर्शनाचा दिवस! अशी घोषणा झाली आणि सगळे रंगकर्मी (!) उंडारायला तयार झाले.समस्त स्त्री वर्ग ’खरेदी’ या विषयावर ठाम होता.खरं तर आम्ही- म्हणजे चाळीसबिळीस जणांच्या ग्रुपमधे सबग्रुप्स पडतात तसा ग्रुप- कोण नेईल तिथे जाणारे.दौर्‍याआधी प्रचंड प्लानिंग करून दौर्‍यात काय काय बघायचं ते पक्कं ठरवून ते पूर्ण करायचं म्हणजे करायचंच असला मुशाफिरी खाक्या आमच्याकडे नव्हता.आम्ही आपले रेंगाळत, पुन्हा कुणी ’लक्ष्यं’ बरोबर असेल तर दिवस मस्त जाईल या इच्छेने ते शोधण्याचा प्रयत्नात.इतक्यात आमचाच एक गायक मित्र जोरदार कॅनवासिंग करतात तसं, “ए, बेलूर मठला जाऊया बेलूर मठला! येताय का? खरेदीबिरेदी कधीही कराल.आपण रहातोय तिथपासून जरा लांब आहे.विचारत विचारत, दोन-तीन बसेस बदलत जावं लागेल.अप्रतिम ठिकाण आहे! पुन्हा इथे कधी यायला मिळेल सांगता येत नाही.खरेदी करणार आहात का? ती काय कुठेही करता येईल तुम्हाला पण बेलूर मठ बघता येणार नाही! दक्षिणेश्वर कालीमातेचं मंदिरपण अप्रतिम आहे.येताय का?” असं सांगून सांगून आख्ख्या ग्रुपला हैराण करत होता खरंतर.असं कुणी जास्त सांगायला लागलं की लोक उगाचच सावध होतात आणि जायचं की नाही असा विचार करायला लागतात.अशा बर्‍याच जणांच्या मनात खरेदी करणं ठाण मांडून बसलेलं असतं.खरेदी न करता वेळ घालवायचा म्हणजे जरा अतिच वगैरे... आमचं तसं नव्हतं.आम्ही तयार झालो.बेलूर मठाकडे जाणारा आमचा ग्रुप छोटाच झाला, मोठा खरेदी करायला निघून गेला.
विचारत विचारत पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस बदलत आम्ही दक्षिणेश्वर कालिमातेच्या मंदिराजवळ पोचलो आणि मंदिराचे दरवाजे दुपारभरासाठी बंद झाले.आता?... मित्र म्हणाला, “पुढे जाऊ.इथे बोटींग असतं.बघूया!”बोटींग स्थानकाजवळ गेलो.चौकशी केली.तिथे एका स्थानिकानंच आयडिया दिली की तासादीडतासाचं बोटींग करा.परत येईपर्यंत देवळाचे दरवाजे उघडलेले असतील.मग बोटींगच्या तिकीटांची घासाघीस.बोट म्हणजे बंगाली वातावरणातली होडी दाखवतात तशीच.तुटकंमाटकं शीड आणि भली मोठ्ठी वल्ही घेऊन उभ्याने वल्हवणारे ’मांझी रेऽऽ’आणि ती होडी डुचमळत, हिंदकळत नदीच्या पात्रात वेग घेतेय.नदी म्हणजे जवळ जवळ समुद्रासारखीच लांबलचक आणि आडवीतिडवी.बरोबर होडी हलली रे हलली की चित्कारणारा स्त्रीवर्ग.आम्ही (टगेही) सुरवातीला जरा जीव मुठीत धरूनच.बोटींग क्लबवर बोटींग करणं वेगळं आणि हे असं नदीत होडी सोडून देणं वेगळं.जरा वेळानं वारा.मग सगळ्याना कंठ फुटून गाणी.मग माझ्या अंदाजे कधीतरी हावडा ब्रिजच्या खालून प्रवास.अपरिहार्यपणे ’अमर प्रेम’ शक्ती सामंता-राजेश खन्ना-शर्मिला टागोर-आनंद बक्षी-एस डी-किशोरकुमार या सगळ्याची आर्त आठवण.
हा प्रवास संपूच नये असं आता वाटायला लागलेलं आणि आमचा गायक गाईड मित्र बैचेन.अंधार पडायला सुरवात झालेली.नदीकाठची एकाकी हवेली पुन्हा बंगाली वातावरणातल्या चित्रपटांकडे घेऊन जाणारी.मित्राला वेगळीच काळजी.पूर्ण अंधार झाल्यावर किनार्‍यावर जाऊन जे बघायचंय ते शोधायचं कसं?
नौकानयन संपलं.काठावर आलो.सूर्यास्त होऊ लागलेला.किती वाजले? फक्त पाच? हो! इथे डिसेंबरमधे संध्याकाळी पाचला सूर्य मावळतो! घंटा वाजू लागलेल्या.आमची पावलं त्या दिशेने.Belur Math
तो... बेलूर मठ! मित्र सांगतो.आम्ही जवळ जातो.स्वर्गीय असं दगडी बांधकाम.लांबलचक.पायर्‍या.आत गर्दी बसलेली.घंटांचा आवाज वाढून आता गजर होऊ लागलेला.बाहेर चपला काढून आणि त्या कुणी उचलणार नाहीत ना? हा विचार कायम ठेऊन आम्ही सगळे आत.हा भला मोठा दगडी मंडप.ही गर्दी आत बसलेली.समोरच्या टोकाला रामकृष्ण परमहंसांची ध्यानस्थ मूर्ती, पद्मासनातली.आरती करणारे येतात.त्यांच्या हातात मोठमोठ्या ज्योती असलेल्या पंचारत्या.काही जणांच्या हातात पांढर्‍याशुभ्र चवर्‍या.मृदुंग, टाळ वाजू लागतात.सगळ्यांचा एकच सूर त्या विशाल दगडी मंडपात घूमू लागतो.परमहंसांची आरती सुरू होते.ते विशिष्टं बंगाली उच्चार.बंगाली संगीत.खरं तर आम्ही भाविक नव्हे पण ते तिथलं वातावरण.ते सूर.ती चाल, ताल, त्या पंचारत्या, त्यानी तेजाळून गेलेली खरी वाटणारी रामकृष्ण परमहंसांची मूर्ती.पाय निघेना तिथून.स्वप्नवत, स्वर्गवत वातावरण.आरती संपल्यावर पुढे गेलो.अजूनही परमहंसावर चवर्‍या ढाळणारे कुणी.फार पुढे जाऊ न देणारे.बाहेर पडताना मित्र काही सांगत होता.बेलूर मठ संस्थानाविषयी.तिथल्या व्यवहाराविषयी.
तो संध्याकाळी पाच वाजताचा सूर्यास्त, तेव्हाचा तो अथांग नदीतला होडीचा प्रवास आणि मग बेलूर मठातली ती आरती... हे सगळं इतकं मनात ठाण मांडून बसलेलं की इतर काही आत येतंच नव्हतं...
आजही ती संवेदनशील कळ कधीमधी सहज दाबली जाते आणि सगळा पट समोर उभा रहातो.त्या तोडीचं दृष्यं आजवर दुसरं पाहिलं नाही...