romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, January 24, 2012

२) डेडलाईन (प्रजासत्ताकाची?)


इटक्यालला ’हो’ म्हणणं भाग पडलं. त्याला हे काम झटपट उरकायचं होतं पण म्हातारा खट वाटत होता. इतर फ्रीडम फायटर्ससारखा गलितगात्र नव्हता. उतावीळ नव्हता स्वत:बद्दल बोलायला. आण्णा त्याला निरखत होते
तुम्ही, इटक्याल, टेलिफोनबूथ वाटपाचं प्रकरण धसास लावलंत खरं पण तुमचे सहकारीच काय तुमचे मालकसुद्धा नाराज झाले तुमच्यावर. एकदम सगळ्यांपेक्षा खूपच मोठे झालात हो तुम्ही! ‍हाऽहाऽहाऽहाऽऽऽ.. शोध पत्रकारितेच्या महत्वाच्या खात्यातून तुम्हाला टाकलं जनरल इंटरव्ह्यू सेक्शनमधे. आमच्यासारख्या थडग्यांच्या मुलाखती घ्यायला! हा हाऽहाऽऽ.. राधाबाईंनी चपापून इटक्यालकडे पाहिलं. ही तर सुरवात होती आणि कदाचित इटक्यालच्या मदतीला राधाबाईच धावून येणार होत्या. इटक्याल काही लेचापेचा गडी नव्हता. त्याचा चेहेरा भावनाशून्य झाला. त्यानं आपलं ते भ्रमणध्वनिवजा अत्त्याधुनिक यंत्र टेबलावरून पुन्हा आपल्या हातात घेतलं आणि ज्याला आण्णासाहेब आजकालच्या जनरेशनचं मोबाईल टुचुक्‍ टुचुक्‍ करणं म्हणायचे तसं करत तो त्याच्याशी खेळू लागला. आण्णासाहेबांच्या ते लक्षात आलंच. हऽहऽहऽहऽऽ.. पत्रकारितेत गोपनीयता फारच महत्वाची असते नाही इटक्याल? तरीही विचारतो, ज्या मुलाच्या प्रतिज्ञापत्रावरून हा घोटाळा तुम्ही उजेडात आणलात त्या मुलाला मिळाला का हो बूथ?- म्हणजे भविष्यात तसं काही होण्याची शक्यता? हऽहऽ.. नाही!- जवानांच्या विधवा, अपंग, स्वातंत्र्यसैनिक या सगळ्यांचेच बूथ परत मागितलेत हो सरकारनं! त्या मुलाला प्रतिज्ञापत्र द्यावं लागलं म्हणजे असंख्य प्रयत्नं करून पैसे खरचून त्याला बूथ मिळालाच नाही, तेंव्हा-
मिस्टर कुरूंदवाडकर! मे वुई स्टार्ट वुईथ योर इंतरव्ह्यू? आज मला प्रजासत्ताकदिनाची अर्ध्याच्यावर पुरवणी कव्हर करायची आहे ऍंड यू नो आय ऍम अ सॅलरीड पर्सन. नोकरीवर लाथ मारणं हा वाक्प्रचार इतिहासजमा झालाय आता. उलट गदा येऊ नये म्हणून- तुम्ही जे काही विचारताय त्याचं उत्तर काळच देईल असं मला वाटतं. ’स्वातंत्र्य चळवळीतले तुमचे दिवस’ हा तुमच्या मुलाखतीचा विषय. जवळजवळ अर्ध पान तुम्हाला ऍलोट केलंय. तुम्ही प्रसिद्धीपासून सतत दूर राहिलात. महाराष्ट्रातल्या महत्वाच्या उठावांमधे तुमचं नाव सतत घेतलं जात होतं. महाराष्ट्रात ताम्रपट दिल्या गेलेल्या पहिल्या तुकडीत तुमचं नाव होतं. सत्तेत, पक्षकार्यात तुम्ही सामील झाला नाहीत. विधायक कार्यांना पाठिंबा देण्यात आणि विधायक विरोध करण्यात तुम्ही नेहेमीच आघाडीवर राहिलात. खरं तर पेपरवाल्याना उभं न करण्याबद्दल तुमची ख्याती पण निदान आम्ही तुमची भेट घेण्यात तरी यशस्वी ठरलो. आपण तुमच्याबद्दल बोलूया! चला! हे मी दाबलं या माझ्या यंत्राचं बटण. हे चालू झालं ध्वनिमुद्रण. बोला!
हाऽहाऽहऽहऽ.. इटक्याल गृहपाठ चांगला आहे तुमचा. खरंच चांगला आहे. चलाखही आहातच. एवढा.. घोटाळा उजेडात आणलाय तुम्हीऽ.. माझ्याबद्दल बरंच बोलायचंय मला.. कधी नव्हे ते! राधाबाई.. तुम्हीही ऐका.. हरकत नाही ना इटक्याल तुमची? राधाबाई इथे असल्यातर? आं?.. हाऽहाऽहऽहऽ.. तर.. ’चलेजाव’च्या वेळी मी जेमतेम वीस वर्षाचा होतो. नुकताच म्याट्रिक झालेला. कुणाचंही लक्ष वेधून घेण्याचं मला अप्रूप. कुणाचंही. मग काय करायचं?.. म्हटलं मारूया उडी. भित्रे काही कमी नव्हते गावात. म्हटलं उडी मारली चळवळीत तरच उठून दिसू! हाऽहाऽहाऽहाऽ..”
इटक्याल उडालाच. हे असलं काही अनपेक्षित होतं त्याला. तो राधाबाईंकडे बघायला लागला. राधाबाई विस्मयचकीत, डोळे विस्फारून आण्णांकडे बघत होत्या. आण्णासाहेब हसतच होते. इटक्यालला रहावलं नाही.
सर!.. म्हणजे राष्ट्रप्रेमानं भारून-
छ्याट्‍!.. अजिबात नाही! खोटंय ते!
आता दचकण्याची पाळी राधाबाईंची होती. त्यांनी पदर तोंडाला लावला.
काय कुणास ठाऊक कुठून माझ्यात ती लक्ष वेधून घेण्याची प्रवृत्ती आली. मी सतत बैचेन असायचो. अभ्यासात, खेळात फारशी गती नव्हती. ’चलेजाव’ आलं, मी वाटच पहात असल्यासारखं. मोठी रिस्क होती इटक्यालसाहेब मोठी.. पण मी घेतली. लाठ्या घेतल्या, काठ्या झेलल्या.. सगळे बरोबर आहेत ना हे बघून तुरुंगातही जाऊन आलो. अभ्यासाची पुस्तकं घेऊन.. लक्ष वेधून घेण्याचा आणखी एक प्रयत्न. अभ्यासात खंड पडू दिला नाही. इतरांची बैचेनी मला नव्हती. जलेजाव म्हणूनही ’ते’ जात नाहीएत, देशावरची गुलामगिरी संपत नाहिए.. गावाचं लक्ष मी माझ्याकडे वेधून घेतलं होतं, माझं काम मार्गावर होतं मला कसली बैचेनी?-
इटक्याल आता पॅनिक झाला. राधाबाईंचा तोंडावरचा हात आता कपाळावर गेला. आण्णा तंद्रित जाऊन स्वत:शीच हसत होते. वेड्यासारखे.
सर!.. सर!.. मग कलेक्टर कचेरीवर तिरंगा फडकवलात युनियन जॅक उतरवून त्या प्रसंगात तुमचं नाव अग्रेसर-
का असणार नाही? का असणार नाही! हाऽहाऽऽहाऽहाऽ कामाला होतो मी तिथेच. कलेक्टरला बदली हवी होती. त्याचं सगळं तुंबलेलं काम मी पूर्ण करून दिलं. ब्रिटीश असे होते, तसे होते, शिस्तीचे भोक्ते होते हे आपलं फुकाचं कौतुक! कंटाळला होता बिचारा. म्हणाला, मी जातो, पुढचा विलायतेहून यायच्या आत काय़ वाट्टेल ते करा. मी आतल्या गोटात लगेच खबर पोहचवली-
सर हे फार होतंय! म्हणजे हे तिरंगा फडकवणं, युनियन जॅक उतरवून, हे आजच्या कुठल्याही राजकीय नेत्यानं ध्वजारोहण करण्याइतकं सोपं होतं म्हणायचंय तुम्हाला? फ्रीडम फायटर्सनी जीवाची बाजी लावून-
इटक्याल संतापून कधी उभा राहिला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. 
बसा! खाली बसा इटक्याल! फ्रीडम फायटर कोण आहे इथं? तुम्ही का मी?.. बसा!..”    (पुढे चालू)

2 comments:

निसर्गवार्ता said...

छान लिहिलं आहे ! तुमच्या ब्लोग ला शुभेच्छा !

विनायक पंडित said...

तुमचं मनापासून स्वागत प्रवीण! निसर्गवार्ता चाळला, सावकाश वाचेनच. आवडला. वेगळा ब्लॉग आहे आणि तो तुम्ही मांडलायही छान! तुमच्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार!