romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Sunday, March 30, 2008

सांग!

तू सिग्नलजवळ मरून पडला आहेस
हे या कचकड्याच्या जगानं पाहिलं
तेव्हा कुठला सिग्नल होता?-
हिरवा? पिवळा? लाल?...
त्या आधी, त्यांच्याकडे वेंगाडून
तू तुझं पोट मागत होतास
तेव्हा तू त्याना दिसला नाहीस?...
जेव्हा दिसलास
तेव्हा त्यांच्या डोळ्यात कोणता भाव होता?-
घृणेचा? कोरड्या कणवेचा? की शरमेचा?...
तुझा, फिल्मस्‍च्या तुकड्यांचा वाडगा उपडा होता?
की आ वासून तसाच उघडा?-
रंगीबेरंगी? मेलोड्रॅमॅटिक? पार अपारदर्शक?...
तुझ्याकडे असलेलं काहीच तुला सांभाळता नाही आलं?-
पैसा? ग्लॅमर? पत?...
काय सिध्द केलंस तू?-
कलाकार कलंदर असतो?
कला शापित असते?
की मरण अटळ असतं?!...

Saturday, March 29, 2008

चिरंजीव हो!

युध्दाची धग
ध्यानस्थं हिमनगसुध्दा वितळतात
असंख्य मरणांचे रतीब घालून
माणसं माणसांना जिंकतात
जिंकायचंय जग
आणि ते अंधारं अवकाशही!
मृत्युचं?...
मग तो कुणी एक
का भीक मागत फिरतोय
युगानंयुगं
भळभळणारी जखम कपाळावर घेऊन…
माणसा! त्याला साथ दे!
खरंच चिरंजीव हो!
मृत्युचं मोल समजायला
तेवढी किंमत मोजायला
हरकत नाही!

Friday, March 28, 2008

कवि म्हणे...

पूर्वी होते फक्त सात
कसे झाले त्याचे नऊ
बारा वाजले डब्यांचे
तरी गर्दी म्हणे मैंहुँमैंहुँ

जन अवघे उंदीर
राजकारणी मांजरे
धर्म बडा खूष होई
म्हणे आले दिस बरे

बुश म्हणे त्याचे जग
युध्द लादेन कधीही
क्लोन मेंढ्यांचेच कां ते?
वाढवितो आमुचेही!

कवि म्हणे चंद्र हवा
नसो चंद्रावरी हवा
पृथ्वीवर हेवादावा
स्वर्ग चंद्रावर व्हावा!!

Thursday, March 27, 2008

मनोव्यापार

बजबजलेल्या व्यापारी शहरात
फुटपाथवरच्या बेवारशी मुटकुळ्यावर
कोरा मांजरपाट
वर हार आणि पैसे
आजुबाजूला नोटासुध्दा
हा ही पैसे कमवण्याचा धंदा?...
रंगहीन सुरकुतलेला पंजा
फुगलेल्या मांजरपाटातून डोकावणारा
माझ्यासारखे अनेक जातिवंत हळवे
शॉक लागून थबकणारे
काहींचा हात खिशाकडे
मग वेग कमी करून रस्ता पकडणारे…
कुणीतरी अग्नी देऊन नक्कीच
मुक्तं करेल या देहाला
आणि आमचा माणुसकीवरचा विश्वास
कायम राहील!...

Wednesday, March 26, 2008

भर गर्दीतून...

असंख्य घोटाळ्यांचा चारा…
श्रीखंडापासून गुवापर्यंत
प्रत्येक गोष्टीत पैसे खाणं…
कामावर स्वेटर विणणं आणि
शिळोप्याच्या कढीला ऊत आणणं…
नाक्यानाक्यावर उभे
मो’बाईक आणि मोबाईलवाले
सुशिक्षित भाई…
आणि एक
बेवारशी सात वर्षाचा भाऊ
लहानग्या बहिणीला वडापाव देऊन
तिच्या डोक्यावर थोपटत
भर गर्दीतून
वाट काढणारा…

Sunday, March 23, 2008

ब्रेव्हो मदर!

तुझा घराणी राजदंडुका…
दंडकारण्यात पिचमरत
भौमितिक वाढणारी
लव्हाळी जनावरप्रजा
खुर्च्याखुर्च्यांमधून लादमांडले
लीदबनले अरण्यराज एकासरस एक
आयाळीतल्या चलनी झिरमिळ्या कुरवाळत स्वस्थं
अटकपत्रांचे झेंडे जामीनदांडीवर फलकावत अढळ
एका चक्रावर तीन… तर?...
ब्रेव्हो मदर… ब्रेव्हो!

Saturday, March 22, 2008

कुंकू

तुझा झेंडा त्यांनी खांद्यावर मारला तेव्हापासून
डाव्या तर्जनीच्या नखावर
सतत पुढे पुढे सरकणारा
काळ्या शाईचा ठिपका…
असंख्य ठिपके असंख्य तर्जन्या
हवेत तडफडणारे अब्जावधी हात
खुर्च्यांची फक्त अदलाबदल
मुखवटे तेच
जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीऽ
तुझ्या भाळी असंख्य काळे ठिपकेच फक्त
विधवेचं कुंकू…

प्रतीक्षेस...

प्रतीक्षाऽ
स्टेशनमधे गाडी शिरण्याआधीच चार तास
मी तयार असतो
आणि माझ्या या तयार असण्याला
उतावीळपणा म्हटलं जातं
म्हणून तुझं फावलंय!
माझा सगळा आत्मकेंद्रितपणा
मी माझ्या सगळ्याच शब्दांमधून मांडतो
आणि माझं हसं होतं
म्हणून तू शेफारलीएस!
अगंऽ आख्खी दिंडी माझ्यामागून
माझ्यापुढे निघून जातेय
आणि मी आहे तिथेच
जळतं लाकूड उराशी घेऊन
तुला वाटतं तू जिंकतेएस!
कुठे कुठे आडवी नाही आलीस?
अगदी माझी आई मला सोडून जात असताना
आणि नंतर मी बाप होऊ घातल्यावरही?
पण लक्षात ठेव!
माझी सगळी गात्रं थकली
आणि हातात आधाराला जरी काठी आली
तरीही मी लढत रहाणारच!
तू माझ्या संपण्याची वाट बघत बस
मला तुझी पर्वा नाही!!!

Friday, March 21, 2008

सर

मी नेहमीप्रमाणे
माझ्या उभ्या आडव्या फराट्यात हरवलेला
वेळेआधीच खुराड्यात हजर
आत्ता तू यावीस, इथे आत्ता तू हवी होतीस!
तू म्हणजे रूसून बसलेला पाऊस…
फराट्यांमधे माझं आयुष्याचा कागदबोळा शोधत रहाणं…
मग कधीतरी अचानक
तू घाईघाईत चपला काढून टाकल्याचा आवाज
अकल्पित येणारी पावसाची सर!
तिचा आनंद काही औरच! नाही?

Monday, March 17, 2008

ती

ती उत्फुल्ल खळाळत धावते
अनेकांना तृप्त करत, नवीन जीवनं वसवत
राग आला की त्यानाच पोटात खेचत
अनेक सवतींसह आपल्या प्रियकराकडे
एखाद्या शोडषेप्रमाणे
पण सवतीमत्सर न करता…
ती आता प्रियकराबरोबरच संसार करतेय
कधी तरंग उमटवत, कधी उफाळत,
किनाऱ्याशी झुंजत, कधी भरत, कधी ओहोटत
वाऱ्यावर स्वार होत त्याच्या हातात हात घालून
प्रियकराला झालेला उष्मादाह शमवण्यासाठी
स्वत: वायुरूप होऊन अवकाशात जातेय
संततधारेने त्याच्यावर बरसून
त्याला थंड करण्यासाठी
एखाद्या गृहिणीसारखी, एखाद्या पतिव्रतेसारखी…
आता ती व्रतस्थ तपस्विनी वानप्रस्थाश्रमातली
ध्यानस्थ शीतल अभेद्य खडक
एक अष्टमांश वर सात अष्टमांश
आपल्या प्रियकरातच सामावलेली
यावेळी ती दोन्हीही
कूळ आणि मूळ शहाण्यानं शोधू नये अशी
तशीच हळूहळू प्रियकरातच विलीन होणारी
नव्या सवतींची वाट बघत
परंपरागत भारतीय स्त्रीसारखी…

प्रेमिक

एक मधू गोळा करता करता
इतका गुंग झाला की
पाकळ्या कधी मिटल्या
काळरात्र कधी झाली
त्याचं त्यालाच कळलं नाही
तेव्हापासून तो शहाणा झालाय
या फुलावरून त्या फुलावर
मध गोळा करत फिरतोय
पाकळ्या मिटायच्या आत…
एक उबेच्या आशेने अजून
उर्जेकडेच झेपावतोय
धारातीर्थी पडून परत परत
उर्जेकडेच झेपावतोय
काजळी होण्यासाठीच फक्त…
एक मनोभावे प्रदक्षिणा घालतोय
बापाकडून प्रकाश घेऊन
लुप्त होत, वाढत वाढत
पूर्ण सुखावत, सुखवत
कलेकलेने रोड होत जातो
पुन्हा लुप्त होण्यासाठी
अनेक आवर्तनांत…
एक सरळ अनंताकडेच झेप घेतोय
हरतोय, मागे होतोय, उफाळतोय
आणि त्याच वेळी इतर अनेकींना
आपल्यात ओढून घेतोय वर्षानुवर्षं
पुन्हा उचंबळण्यासाठी
आपल्या अथांगपणाला साक्षी ठेऊन
प्रतिबिंबित करतोय
फक्त ती अप्राप्य निळाईच…

बाप

आदितेजस बाप स्वत:लाच विभागून घेतो
अनेक तप्त गोळ्यांमधे
प्रत्येकाचं स्वत:चं वेगळं अस्तित्व असूनही
त्याना स्वत:भोवती फिरवत, थंड करत
त्याना, त्यांच्या अनेक वंशजाना उर्जा पुरवत, प्रकाश देत
स्वत: सतत खदखदत
सूक्ष्मतम बापही स्वत:लाच विभागून घेतोय
अनेक सूक्ष्म पिल्लांमधे
अंतिमत: सर्व प्राणीजात निर्माण करून
परमेश्वरासारखा शरीराशरीरांमधे वास करत
सजीव पेशींचा मूलभूत घटक बनून
अदृश्य बापाची मात्र सगळी अंशात्मक विभागणी
दर प्राणीमात्रात त्याचा अंश असतो म्हणे
तो वरून पहात रहातो
आपल्या अनेक पुत्रांच्या हालअपेष्टा, विटंबना
क्षुद्र कीटकांकडून
आणि त्याच्या एका पुत्राला मिळालेलं देवत्व
सहकाऱ्यांकडूनच भरवल्या गेलेल्या
शेवटच्या जेवणानंतर
लाकडात खिळ्यांनी चिणून…

हरिणी

असतेस नेहमी तशीच बावरलेली
मला ठाऊक आहे
पण तू मात्र शोधत असतेस
कस्तुरी लपलेली…

Monday, March 10, 2008

गाव

चालत रहाणे माझा धर्म आहे
दूर तिथे माझा गाव आहे…
गावतो स्वप्नात अन्‌ निसटतो जागेपणी
अळवावर मोतियाचा झरणारा थेंब आहे…
भान जागे आणि उरी एक वेडा पीर उध्वस्त
आठवांच्या खंडरात फिरणारा डोंब आहे…
राबतात हात माझे अनोळखी चेहेरा तयांचा
रेषांतच गुंतलेला आयुष्याचा कोंब आहे…
चालतो स्वखुषीने मग हास्य माझे लोपते का
अंतरीच्या जख्मेला का रडणारी झोंब आहे...
चालत रहाणे माझा धर्म आहे
दूर तिथे माझाही गाव आहे
त्याना गवसली आपुली घरे
मी घर अन् गाव माझे शोधण्यात मग्न आहे…

Sunday, March 9, 2008

बुरूज

आमच्या प्रायोगिक नाटकाची तिकीटं
ब्लॅकने विकली आहेत
असं मी अभिमानाने सांगायचो
तो तिकीटविक्रीवर बसणारा
माझा काळा मित्र
एकदा म्हणाला, विन्या,
इमला अचानक जमीनदोस्त होऊ नये कधी
खूप मोठा आघात सहन करावा लागतो
पेलवत नाही
त्यापेक्षा हळूहळू ढासळत गेलेला बरा
हळूहळूपणामुळे सवय होत जाते
नंतर नंतर काहीच वाटेनासंही होतं
तेव्हा मला कळला खऱ्या अर्थाने
अर्थशास्त्रातला घटत्या उपयुक्ततेचा सिध्दांत
आणि मी त्याना ओरडून सांगायला लागलो!-
कोसळा! कोसळा माझ्यावर!
तुमची दमछाक होईपर्यंत!!
त्यांची दमछाक होतच नाही
आणि तरीही मी आश्चर्यकारकरित्या उभा असतो
एखाद्या बुरुजासारखा
माझं ढासळलेपण सावरत…