romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, May 23, 2011

सिरसीतला सुसह्य ग्रीष्म! (कूलर समर)

सिरसी हे उत्तर कर्नाटकातले एक गाव.कर्नाटकातलं महाबळेश्वर असं त्याला म्हणायचं ते तिथल्या वातावरणाची कल्पना येण्यासाठी.महाबळेश्वरमधेही हल्ली मे महिन्यात दुपारचं उकडतंच, सिरसीलाही अगदी तसंच.संध्याकाळी, रात्री आणि पहाटे मात्रं अतिशय सुखद गारवा!
सिरसीचा उच्चार बरेच वेळा शिरशी असा केला जातो.पण सिरसी हे अधिकृत नामाभिधान आहे असं इथे आल्यावर लक्षात येतं.अशा या ठिकाणी सहा रात्री नुकत्याच सहकुटुंब घालवल्या.आम्ही एकूण छप्पन्न पर्यटक होतो आणि हा अप्रतिम आनंद आम्ही सगळ्यानीच घेतला अनुभव ट्रॅवल्स या मूळ मुंबईतल्या पण कर्नाटकात पाय रोवलेल्या एकमेव पर्यटनसंस्थेद्वारे.मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे इथले हे पर्यटक वय वर्षं पाच ते सात पासून वय वर्षं सहाऐंशी पर्यंतचे होते.हे एक मोठं कुटुंबच होतं आणि या कुटुंबाला कुटुंबासारखंच ठेवलं अनुभव ट्रॅवल्सचे सर्वेसर्वा श्री अरूण भट यांनी.
अरूण भटांचा उल्लेख एक वल्ली असा करावा लागेल.हे खरं तर मुळचे हाडाचे शिक्षक.साधारण चाळीस वर्षांपूर्वी गिरगावातल्या साहित्यसंघ इमारतीत भटसरांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे वर्ग (कोचिंग क्लासेस) चालत आणि ते अतिशय सुप्रसिद्ध होते.एकोणतीस वर्षं भट सरांनी हे वर्ग एखाद्या व्रतासारखे चालवले आणि एप्रिल-मे महिन्यात हिमालयात पर्यटक न्यायला सुरवात केली.अरूण भटांची कर्नाटकमधल्या किनार्‍यांची सफर अर्थात कोस्टल कर्नाटका चांगलीच गाजली.इतकी गाजली की अरूण भट किंवा अनुभव ट्रॅवल्स पेक्षा नुसतं ’कोस्टल’ म्हणूनच ती जास्त प्रसिद्ध झाली.आम्हा सगळ्या पर्यटकांचा योग असा की या दौरय़ात श्री भट, त्यांच्या पत्नी डॉ.शीला भट आणि कन्या प्राची भट आमच्या बरोबर होते.हे सगळं कुटुंब भट सरांचा मुलगा श्री मयुरेश भटसह अनुभव ट्रॅवल्सचं काम बघतं.कुणी म्हणेल पर्यटनसंस्थेबद्दल हे एवढं काय सांगत बसायचं? तर- भट यांचं मूळ जरी कर्नाटकातलं असलं तरी ते पूर्णपणे मराठी कुटुंब आहे.सगळं कुटुंब पर्यटनक्षेत्रात आहे.सगळ्यात महत्वाचं म्हणजे नको इतकी जाहिरातबाजी करून लोकांच्या खिश्यावर डल्ला मारण्याचा पवित्रा घेण्यापेक्षा त्यांचा भर मौखिक प्रसिद्धी, कौटुंबिक वातावरण, खाण्यापिण्याची प्रचंड रेलचेल यावर आहे.आम्ही सगळेच या दौरय़ावर खूष आहोत.स्वत: श्री अरूण भट हा हाडाचा परफॉर्मर आहे! अशा दौर्‍यांवर त्यांचे पूर्वीचे विद्यार्थी असतातच.ते सांगतात की भटसरांच्या वागण्याबोलण्यामधे इतक्या वर्षात काडीचा फरक पडलेला नाही.आज करोडोंची उलाढाल असूनही हा माणूस जश्याचा तसा आहे, जमिनीवर आहे.समूहासमोर अनेकविध मनोरंजक मार्गांनी व्यक्तं होणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे.ते सतत माणसांबरोबर असतात, समूहाला आपल्या आयुष्यातल्या घटनांनी, विनोदानं, कवितांनी गुंगवून टाकतात.वैयक्तिक प्रसिद्धीपासून जाणूनबुजून लांब रहातात.खाण्याची आणि खिलवण्याची त्याना जन्मजात आवड आहे.आपला परफॉर्मन्स त्यानी रंगमंचावर सादर करण्याची हाव धरलेली नाही.आयुष्यावर ’बरंच काही’ बोलू शकण्यासाठी आवश्यक असणारं भलं मोठं रंगीबेरंगी गाठोडं त्यांच्याजवळ आहे.ते व्यक्तं करण्याची प्रथमश्रेणीची पात्रता त्यांच्याकडे आहे (एवढंच काय सुयोग या नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा श्री सुधीर भट हे त्यांचे सख्खे लहान भाऊ!) पण आपल्या पर्यटक मित्रांसमोर मित्रत्वानं उघडपणे व्यक्तं होणं त्यांनी कायमसाठी स्विकारलं आहे.ह्या व्यक्तं होण्यात व्यावसायिक भाग आहेच पण मानवी संवेदना जपणं हे हल्ली कुठल्याही व्यवसायात दुरापास्त होत चाललेलं वैशिष्ट्यं त्यांनी अजून जपलेलं आहे.
तर ह्या अशा दौरय़ावर मी मुंबईहून सहकुटुंब निघालो विडीयोकोच बसमधून रात्री साडेनऊला.बारा वाजेपर्यंत बस चेंबूरजवळंच ठाण मांडून होती.सकाळी साडेसहावाजता कोल्हापूर आणि हुबळी या कर्नाटकातल्या महत्वाच्या, पुण्याची आठवण करून देईल अशा शहरी पोचलो सकाळी दहाच्या सुमारास.उशीर झाला होता.हुबळीत एका हॉटेलमधे सकाळचे विधी आटोपून उरलेला प्रवास करायचा होता.सिरसी अजून रस्त्याने अडीच तासाच्या अंतरावर (१०० किमी.) होतं!...

2 comments:

sanket said...

Mala tar Bengaluru la pan unhala jaNavlach nahi ! agadi alhad-dayak vatavaran ahe ithe !

विनायक पंडित said...

:)छानच संकेत!