romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, December 2, 2008

काही निरीक्षणे…

सर्वप्रथम स्वत:चं निरीक्षण.
२७ रात्र, २८, २९, ३० शून्यावस्थेत काढले.टिव्ही आणि वर्तमानपत्रं हे कधी नव्हे तितकावेळ डोळ्यासमोर राहिले.लिखित प्रतिक्रिया होऊच शकत नाही!
२९ ला पहाटे सीएसटीकडे जाताना, उतरल्यावर (रोज उतरत असूनही) कधी नव्हे ते स्थानक भिरभिरत्या नजरेने पहात रहातो.अतर्क्य अश्या एखाद्या हॉलीवुडपटाचा अनुभव.पण हा रंजक नक्कीच नाही!अजुनही सतत स्थानकात ते कसे शिरले असतील आणि कसे फिरले असतील, तांडव कसं घडवलं असेल याची चित्रफित मनात फिरतेय.प्रत्यक्ष अनुभवलेला नसूनही प्रचंड थरार जाणवतोय.भितीपेक्षाही विषण्णता मनाचा कब्जा करून राहिली आहे…
जीपीओकडच्या कमानीजवळ चोकीबाहेर पो.नि.शशांक शिंदे, हवालदार मुरली चौधरी यांचे फोटो लावलेला फळा आहे आणि बाजूला सहकाऱ्यांची श्रद्धांजली.मित्राला एरवी इथे टेचात उभे असलेले रूबाबदार शिंदे आठवतात.पुढे लगेच एक पोलिस व्हॅन पार्क केलेली.स्थानकाच्या बाहेर पडल्यावर जीपीओच्या मागच्या प्रवेशद्वाराजवळ आणखी एक व्हॅन, आत अंधार आणि विश्रांती घेणारे काही शिपाई, एकजण व्हॅनच्या फुटबोर्डवर पहारा देत बसलेला.मधला चौक पार करताना समोर लांब डीएन रोडच्या नाक्यावरच्या दगडी इमारतीसमोर अंधारात आणखी एक पोलिस व्हॅन.वळून कबुतरखान्याकडे येताना पोलिस बोलेरो दिसते.पहिल्या दिवशी आत चर्चा करत असलेले पोलिस.शहीद भगतसिंग मार्गाकडे सायकलवरून चाललेल्या इडलीवाल्याला हाक मारत आहेत.तो थांबत नाही…आज बोलेरो रिकामी, आत अंधार, शांत.मी बारकाईने बोलेरोकडे पहात पुढे होतो.मनात मेट्रोकडून अंधाधुंद फायर करत गेलेल्या बोलेरोची चित्रफित.
आजच्या वर्तमानपत्रात रिव्हॉल्व्हर बाळगून सीएसटी स्थानकाच्या सर्व प्रवेशद्वारात असलेल्या सगळ्या सुरक्षा कमानीतून जाऊनही पकडल्या न गेलेल्या नागरिकाची माहिती, फोटो आहे.शेवटी तो स्वत: पोलिसचौकीत गेला आणि असे कसे? (तांडवाच्या पार्श्वभूमीवरही?) असं विचारलं.पोलिसांकडे उत्तर नाही.नागरिक अजूनही सुरक्षित नाहीत!!!
पोलिसांबद्दल दया, सहानुभूती.लाकडी दस्त्यांच्या बाबा आदम काळातल्या बंदुका आणि केविलवाणे चेहेरे.एटीएस प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांच्या छात्यांवरही फलकणारी, फाटलेल्या, जीर्ण वस्त्राचा अनुभव करून देणारी ’बुलेटप्रूफ’ जाकीटे!त्यांची निधडी छाती आणि त्यांनी केलेला छातीचा कोट यावरच सगळी भिस्तं.याचं अपरिहार्य पर्यवसान बलिदानात.सेवेतले १४ अत्यंत उत्तम पोलिस गेले!किती उरले???
पोलिसांना, पोलिसांमधल्या कमांडोजनाही दिले गेलेल्या सुविधा (ड्युटिवरच्याच!) मार्कोस आणि सीएसजी कमांडोजकडे बघताना चांगल्याच उघड्या!
पोलिसांकडे दुर्लक्षं झालं बाबा!राज्यप्रमुखांची कबुली आणि त्यांचं लक्षं किंवा लक्ष्यं कुठे होतं याचं ताजला पहिलीच भेट देत असताना प्रचीती.केवळ राजीनामा देणं हे या पार्श्वभूमीवर बस्सं झालं???
सगळ्याच पोलिटिकल कावळ्यांनी काळे श्रध्दांजली फलक फलकावून निवडणुकांची बेगमी सुरू केली आहे महाराजा!!!एटीएस प्रमुखांना यांनीच वाट्टेल ती दुषणं दिली होती…
हे लिहीत असताना बाहेरच्या अंधारात मुलं गोळीबार-गोळीबार, अतिरेकी-अतिरेकी खेळताहेत!!! आणि… दूरदर्शनवरचा बोंबल्या “मुंबई कभी थमती नही!” चा लिलाव पुकारतोय! अरे ×××××! आम्ही मजबूर आहोत!पोटासाठी!!आता ही बोंबाबोंब थांबवा!!!...
माध्यमं एरवी आगाऊ पण त्यांच्या यावेळच्या प्रक्षेपणामुळे हा थरार स्वत:च्या डोळ्यांनी बघता आल्यासारखा बघता आला.अधुनमधून आगाऊपणा डोकावला पण आजच्या पिढीतल्या या पत्रकारांना, विशेषत: स्त्री पत्रकारांना अहोरात्र, दोन-दोन, तीन-तीन दिवस तिष्ठत उभं असलेलं, पोटावर पडून वर्णनं करत असलेलं बघितलं आणि त्यांच्यापुढच्या आव्हानांची कल्पना आली.
कमांडोज सारख्या देवदूतांनाही आपण काय देऊ शकलो?-परततानाही बीइएसटी बसचा खाचखळगी प्रवास?...
जागो इंडिया जागोचे एसेमेस येताहेत!तुम्हाला मतदानाचा हक्कं बजावायचा आहे असं वारंवार बजावताहेत!एक जागरूक नागरिक असं स्वत:च स्वत:ला म्हणवूनही हतबलता व्यापून उरली आहे!!!
जेव्हा जेव्हा हेमंत करकरेंची तयार होऊन मिशनवर जाणारी धीरगंभीर मूर्ती दिसतेय तेव्हा वारंवार भरून येतंय!
पुढे काय वाढून ठेवलंय?
Post a Comment