सरळ जाणारी पायवाट सोडून
तो डोंगराकडे चालायला लागतो कारण
डोंगरमाथ्यावर त्याला एक सफरचंद दिसतं…
शिखरावर चढून ते सहज हातात येईल, नाही?
असं म्हणून तो लक्ष एकाग्र करून चालत रहातो,
इकडे तिकडे न बघता
पण म्हणून फुलपाखरं त्याला सोडत नाहीत
मुद्दाम त्याच्या आजूबाजूला घोटाळत, त्याला मऊ स्पर्श करत
त्याच्याकडचा मध हळूच कधी काढून घेतात
त्याचं त्यालाच कळत नाही
पोटं भरली की गूल होतात
हा आपला वेड्यासारखा मध वाटत फिरतोय
गूल झालेल्या त्याना शोधत वेडापिसा होतोय
आणि वाट चुकतोय…
पुन्हा चाचपडत वाटेवर यायचं
पुन्हा लक्ष एकाग्र करायचं
तर कधी अर्ध्या चढणीवर
कधी माथ्यावर पोचल्यावर लक्षात येतं
ते मोठं सफरचंद दुसऱ्या डोंगरमाथ्यावर आहे!
पुन्हा हा सगळा डोंगर उतरून
नव्याने दुसरा डोंगर मुकाट्याने चढायला सुरवात…
सरळ जाणारी पायवाट पूर्वीच सोडून दिलेली
सफरचंद तर पाहिजे
आणि एवढा सगळा चढउतार करून
फक्त वाढत जाणारी शिदोरी पाठीवर…
पूर्वीच सोडून दिलेल्या
सरळ जाणाऱ्या पायवाटेवरून पुन्हा जायचं
म्हणजे ती मळलेली पायवाट आधी शोधायची
ती शोधल्यावर आता तिच्यावर चालायची सवय सुटलेली
कारण आता डोंगर चढायची सवय लागलेली…
सफरचंदाचा विचार रात्रंदिवस सतावत असतो
ते इव्हनं खाल्लेलं तसं असेल, फसवणारं
की धगधगणारा तेजोमय गोळा असेल, इतरांना उर्जा देणारा
की नुसताच रंगांचा खेळ असेल, अल्पायुषी…
एव्हाना पुढच्या डोंगरमाथ्याकडे जाणारे
काहीजण दिसायला लागतात
माथ्यावर जायला वाट तयार होत असते
गुंता झटकून ती वाट मळवत तोही चालायला लागतो
“फुलपाखरांनी कितीही रंगविभ्रम केले
तरी मध द्यायचा नाही
निदान तो आटलाय असं तरी भासवायचं
पण वाट चुकायची नाही”
असं तो मनाला बजावत असतो
सफरचंदाची आशा धरून चालत असतो
ते कसंही असलं किंवा नसलं तरी
कमीतकमी पुढे पुढे तरी जात असतो
पुढे जाणं इतकं सोप्पं नाहीये
हे ही त्याला पक्कं ठाऊक असतं…
No comments:
Post a Comment