दोन जीवांचे मीलन होता
दरिया नीलम होता
कधी तो चमचम होता
कधी काळाशार होता
तिन्हीसांजेचे मळभ काल ते
सरता सरता सरत नसावे
लाटांवर कलत्या उन्हाचे
कवडसे आज किती खेळावे
असणे त्याचे माहित नसता
अवचित दोघां तेच कळावे
आजवर न भेटल्या फुलाने
जगणे अवघे गंधित व्हावे
शब्दांनी ओठांवर यावे
अंतर अंतरांतले मिटावे
रिती अंतरे शब्दही मुके
अधरांनी अधरा बिलगावे
झाले त्याचे सुतक न उरावे
न दंगून स्वप्नात रहावे
अथांग हा सागर साक्षी
घटकाभर स्वर्गात रमावे
दोन जीवांचे मीलन होता
दरिया नीरव होता
कधी तो उफाळत होता
कधी गूढगंभीर होता!
1 comment:
ह्या ओळी कमाल आहेत.
असणे त्याचे माहित नसता
अवचित दोघां तेच कळावे
आजवर न भेटल्या फुलाने
जगणे अवघे गंधित व्हावे
खूपच छान!!!
-अभी
Post a Comment