romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, December 11, 2008

तो… आणि मी!

तो म्हणाला, मरमरून काम करू नकोस,

कामचुकारपणा करायला शीक!

पगार भरपूर असला म्हणून

दिवाळी भेटी मागून घ्यायला लाजू नकोस!

वरच्याना मात्रं खूष ठेव

हाताची घडी घालून नेहमीच

जेव्हा ते पहात असतात केबिनच्या काचेमधून

तू सतत कामात गर्क असलेला त्याना दिसू दे!

इतरांनी न केलेलं काम तुझ्यावर पडलं

नाही म्हणू नकोसच-

करूही नकोस!

मी ते ऐकलं नाही!

पुढे तो 'गुणवंत कामगार' झाला

मी मात्रं

फुकटचा आत्मसंमान बाळगणारा

एक फालतू कारकून ठरलो…

तो म्हणाला, अरे या फिल्डमधे

अनोळखी माणसालासुद्धा

हात पसरून घट्ट आलिंगन द्यायचं असतं

त्याची पाठ फिरल्यावर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष

त्याला लाथ हाणायची असते आणि

पुढच्याला कवेत घ्यायचं असतं!

मी विचित्र नजरेनं त्याच्याकडे पाहिलं

तो म्हणाला, अरे पण-तू-इथे कसा???

तुझे आई-बाप, काका-मामा, आत्या-मावश्या

इथे कधीच नव्हत्या!

मी चाचरत म्हटलं,नव्हत्या… नव्हत्या…

पण… माझ्याकडे ठिणगी आहे…

तो स्टेजवर हसतो तसा

छातीतला कफ खुळखुळवत हसला

म्हणाला, तुला काय वाटलं?

तुझ्या ठिणगीकडे बघून

ते तुला शिडीच्या वरच्या पायरीवर ठेवतील?

अरे, तुझ्यासारख्यांना वाकवून शिडी करायलाच तर

ते कुठुन कुठून इथे गोळा झालेत!

मी म्हटलं, मी वेळेवर येतो,

पुरेसा गंभीर आहे, अभ्यास करतो,

स्टेजचं पावित्र्यं-

त्याला ठसकाच लागला

एक घोट घेऊन तो म्हणाला,

अरे, स्टेजमागच्या अंधारात जे चालतं

ते बघून तो अंधारसुद्धा डोळे मिटून घेतो, माहितेय?

आणि स्टेजवर

वेडेचाळे केले की समोरचे खदखदून दाद देतात

आतडी पिळवटली, कुस्तीसारखा घाम गाळला की

अश्रूंचा महापूर वहातात

समोरच्यांनी सिलेक्टीव रहाणं

हा दखलपात्र गुन्हा आहे साहेब!!

जा तू! कुठल्यातरी इन्फ्लुएन्शियल माणसाला गाठ

आणि पटव!... काही कळतंय का??

मला काहीच कळलं नाही

पुढं तो बडं प्रस्थं झाला

स्वहस्ते बक्षिसं वाटत राहिला

मी, एक, ठिणगी जपत रहाणारा

धडपडणाराच राहिलो

सर्वांगातल्या ठिणग्यांनी जेव्हा

मस्तकात जाळ पेटवला

आणि मला नाईलाजानं

दारोदार फिरावं लागलं

तेव्हा 'तो' मला कळायला लागला…

आता तो मला दुरून हसत असतो

आणि मी

माझ्या अस्मितेला न जमणारे

हिशोब करत असतो… 

Post a Comment