आ वासलेल्या जमिनीवर
संतत धारा बरसत होत्या
पेरलेल्या दाण्यांवर
मोत्याचं पाणी चढत होतं
कोवळी उन्हं पूर्वेच्या कोपऱ्यातून
गुदगुल्या करून जागवत होती
उब देत होती
भविष्याची आठवण करून देत होती
आंगठा चोखत पहुडलेलं तान्हुलं
लपेटलेलं वस्त्र विस्कटत
आकाशावर नजर ठेऊन
गालातल्या गालात हसत होतं
धरतीच्या कवचातून फुटून
रसरशीत मोत्यांचे सर
अवकाशाकडे झेपावत होते
उष्णतेने झेलपाटत तरीही डोलत होते
डोक्यावर रणरणारी आग
मृगजळ निर्माण करत होती
जाळून काढत होती
झळाळी आणत होती
शिट्टी फुकणारा जोम
पडत धडपडत
क्षितीजावर नजर ठेऊन
पुढे पुढे जात होता
मोत्यांच्या राशी प्रसवून धरणी
अस्ताव्यस्त, क्लांत पडली होती
एका मोत्यातून हजार होऊन
शांत शीतल झाली होती
क्षणाच्या रंगीत पखरणीनंतर पश्चिमा
प्रकाश शोषून घेत होती
चित्र धूसर करत होती
काळा कुंचला फिरवत होती
आडवा हात कपाळावर धरून
हाशहुश करणारं बोळकं
डोळ्यातल्या डोळ्यातच नजर अडकून
चाचपडत होतं, जीर्ण शालीत थरथरत होतं…
No comments:
Post a Comment