टळटळीत दुपार.एक पंचावन्न-छपन्नचा बुटका, टकला, जाडगेलासा इसम वाघ मागे लागल्यासारखा धावतोय.अस्ताव्यस्त कपडे, हातातल्या रूमालाच्या बोळ्याने टकलावरचा घाम पुसतोय.हातात जेवणाचा डबा असलेली रेक्झिनची आकारहीन बॅग.घाईघाईने एका जुन्या चाळीतल्या दोन खणांच्या जागेत शिरतो.बाहेरची चाहूल घेतो.आतलीही चाहूल घेतो.आत यायचं दार बंद करून घेतो.
बाहेरच्या खोलीच्या डाव्या बाजूला सरकतो.इथे असलेल्या उघड्या खिडकीखालच्या टेबलावर हळूच बॅग ठेवतो.चटकन् खिडकीपासून बाजूला होतो.अंगातला शर्ट काढून तो उड्या मा-मारून भिंतीवरच्या खुंटीला अडकवतो.भिजलेला, अंगाला घट्टं चिकटलेला गंजीफ्रॉक डोक्यातून काढत असतानाच आतल्या खोलीतून एक उंच, हडकुळी पन्नाशीची बाई बाहेर येते.तिची नजर त्या पुरूषावर पडते आणि ती पांढरीफटक पडते.
“ब-बा-बाऽईऽऽ... चो-चो-चोऽर... चोऽऽरऽऽ”
पुरूषाच्या डोक्यातून न निघणारा गंजीफ्रॉक त्या बाईच्या ओरडण्यामुळे आणखीच अडकून रहातो.तो कसातरी तिला तो तो आहे, चोर नाही असं सांगायच्या प्रयत्नात तिच्या जवळ जातोय.तो जवळ येतोय हे पाहून ती ’चोऽऽरऽऽ’ असं बोंबलत बंद दाराकडे धाव घेते.तो तिचा हात घट्ट धरून तिला अडवायचा प्रयत्न करतो.तिच्या आणि त्याच्या परस्परविरोधी शरीरयष्टींमुळे ते त्याला फार अवघड जातंय.पण तो यशस्वी होतो.ती आता थरथर कापायला लागलीय.तो कसाबसा डोक्यात अडकलेल्या त्या गंजीफ्रॉकमधून कुठूनतरी डोकं बाहेर काढून इकडेतिकडे बघत हळू आवाजात तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतो.
“अगंऽ शू:ऽऽ मी आहे मी!”
ती त्याच्याकडे बघायलाच तयार नाही.तो त्याच्या त्या अडकलेल्या अवस्थेत तिला स्वत:कडे वळवायच्या प्रयत्नात,“अगं मीऽमी आहे मीऽ”
बाई थरथर कापत, घामाघूम होऊन कशीबशी त्याच्याकडे पहाते.त्या अवतारात तिला तो पटकन् ओळखता येत नाही.ओळखल्यावर ती शेर होते.त्याला कोपरापासून हात जोडते.तिचा आवाज चांगलाच खडा आहे.
“तुम्हीऽऽ.. कमाल आहे बाबा तुमची!”
“शू:ऽऽ माझी कसली कमाल?” इकडे तिकडे बघतोय.
“मग कुणाची?ऽऽ ऊन लागतं म्हणून का कुणी गंजीफ्राक काढून डोक्याला गुंडाळतं?ऽऽ आणि तसंच घरात- हॅ हॅ हॅ हॅऽऽ”
तिचा खडा आवाज आणि सातमजली हास्य थांबवायला तो तिच्याभोवतीने शू:ऽऽ शू:ऽऽ करत नाचू लागतो.महात्प्रयासानंतर ती थांबते,“ही ही तुझी अक्कल! बेअक्कल!” गंजीफ्रॉक अंगावेगळा करण्यात त्याला आत्ता यश मिळालंय.बाईचा आवाज पूर्ववत खडा झालाय.
“आवाजाला काय झालंय तुमच्या?ऽऽ”
पुरूष पूर्णपणे पकलेला.आपल्या कानांवर गच्चं हात ठेवतो.तोंडाजवळ उलटी मूठ धरून ती मागेपुढे करतो.मग रागारागाने हात वर झटकतो.
“धरणं?.. की- की- कुणाचं वर जाणं? झालंय काय?ऽऽ”
पुरूष चिडून हातानेच ’मी वर गेलोय’ असं सांगू लागतो.
“एवढं कुठलं आलंय आमचं नशीब!” बाई थांबायला तयारच नाही.पुरूषाला नाईलाजाने कुजबुजत्या स्वरात बोलणं भाग पडतं.
“काय बोलतेएस हे काय बोलतेएस?”
“समजायचं तरी काय-” पुरूष दातओठ खात हाताने तिला ’आवाज खाली, आवाज खाली’ असं सांगतोय.तिचा आवाज यंत्रवत पण त्यामुळे विनोदी पद्धतीने खाली आलाय,“-काय समजायचं बाबा माणसानं? काय झालं तरी काय एवढं?”
पुरूष तोंडाजवळ आंगठा नेऊन पाणी आण अशी खूण करतो.
“बाबाऽऽ काय हे तुम्हीऽ आता भर दुपारीसुद्धाऽ हेऽऽ” बाईचा अंगठा स्वत:च्या तोंडाजवळ स्थिरावलेला.पुरूष कपाळावर हात मारून घेतो.आता त्याला नाईलाजाने नॉर्मल आवाजात का होईना बोलणं भाग पडतं.
“पाणी आण! माझे आई! पाणी आण आधी! मग सांगतो काय झालंय ते! जाऽऽ”
ती पाणी आणायला जाते.तो हुऽऽश्श करत खोलीमधोमध असलेल्या कॉटवर बसतो.हातातल्या ओल्या गंजीफ्रॉकनेच वारा घेऊ लागतो.ती पाणी आणते.तो ते घटाघटा पितो.ती खुणेनेच ’काय झालं?’ असं विचारते.तो ’आणखी पाणी आण’ असं खुणेनेच सांगतो...
त्याचं दुसरय़ांदा पाणी पिऊन झालंय हे लक्षात आल्यावर ती आता तिच्या कुजबुजत्या पण इतक्या मोठ्या आवाजात बोलायला लागते की तिचा खडा आवाज बरा.
“काऽऽय झालंऽऽय?”
पुरूषाच्या सहनशीलतेच्या सीमा संपल्याएत.तो उठतो, खिडकीजवळ जाऊन ती बंद करायला लागतो.तोच, “हे काऽय बाबा भलत्यावेळीऽऽ.. लोकं मेली चेष्टा करायला टपलेलीच असतात आणि तुम्ही त्याना-”
“बाईऽ माझे आईऽऽ तू आधी हळू आवाजात बोलशील का?”
बाई पटकन् हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन कॉटवर बसते.तो तिच्याकडे पाठ करून पूर्ण बेअरिंग घेतो.
“मी.. माझी.. नोकरी सुटली!”
बाई धावत त्याच्याजवळ येते.
“काय? काय? काय? काय?” तो पटकन् उडी मारून दुसरय़ा खुंटीवरचा मुंडा काढतो.चोरासारखा कोपरय़ात जाऊन तो अंगात घालायला लागतो.
“काय म्हणालात?”
पुरूष वेरिएशन देत तेच सांगतो. “ नोकरी सुटली.. माझी!”
बाईच्या डोळ्यात प्रचंड संशय, “सुटली.. का काढलं?”
पुरूष त्राग्याने पळत पळत जाऊन कॉटवर बसतो.
“तू म्हणजे अगदी-”
“हो!ऽऽ” बाईचा आवाज चढलाय.तो तिला केविलवाण्या पद्धतीने ’हळू बोल, हळू बोल’ असं सांगायच्या प्रयत्नात आहे पण ती आता जुमानत नाही, “काढलं आणि सुटलं यातला फरक मी तुम्हाला सांगू?.. तरी तुम्हाला सांगत होते त्या सुलेमानच्या नादी नका लागू!.. त्याच्या नादी लागून ऑफिसच्या मालकीची ती नेरूळची जागा विकलीत! विकलीत ना?”
पुरूषाची नजर आता बेरकी झालीय.तो उठतो.हात झटकतो.बंद दरवाज्याजवळ जाऊन उभा रहातो.
“मी.. कुठे? माझा काय संबंध? मला- मी-”
“मी, मला, माझेचे वाक्यात उपयोग बंद करा!”
एकदम रडायलाच लागते.तो कावराबावरा.त्याला काय करावं सुचत नाही.तो नुसता तिच्या आजूबाजूनी शू: शू: करत बंद खिडकी दरवाज्याकडे पहात रहातो.तिचं चालूच.
“जळ्ळं माझं नशीबंच दरिद्री!.. बापाकडे सगळं होतं.. ते होत्याचं नव्हतं बघायची पाळी आली.. इथे आले.. इथे आधीच ठणठणाट! जरासं सुदरत होतं ते ही आता.. त्या.. पठाणाकडून पैसे घेऊन तिसरय़ांनाच व्याजाने दिलेत.. सावकार तुम्ही.. ही तुमची अक्कल!.. ते परत घेण्याची ताकत नाही.. वर ही ही जागा विकायची भानगड.. झाला झाला सत्यानाऽऽश!..
तोंडात पदर कोंबून भोकाड पसरते...
9 comments:
वाचतेय... पुढचा टाका लवकर!
स्वागत भाग्यश्री! जरा वेगळ्या प्रकारचं असणार आहे हे! तुमच्या प्रतिसादामुळे हुरूप आलाय.खरंच लिहितोय लवकर! :)
मग पुढे ?
:) पुढचा भाग पोस्ट करायलाच निघालोय! आभार अनघा!
रोचक लेखन शैली. प्रवाही लेखन.
मन:पूर्वक आभार आशाताई! तुमच्यासारख्यांच्या प्रतिसादामुळे हुरूप वाढतो!
कथा interesting आहे..पुढचा भाग वाचायला घेतोय..
धन्यवाद श्रीराज! तुमच्या पुढच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे!
reading....waiting... yevudet lavakar....! :)
Post a Comment