romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, February 29, 2008

रंगबावरी


रंगबावरी झालीस ग तू
लाजलाजरी झालीस ग
बंध अचानक जुळून येता
मळभ टाकून उठलीस ग!

त्याला आत दडवतानाही
स्वत:शीच किती हसलीस ग
बोललीस न कुणा काहीही
तरी ओळखली गेलीस ग!

वेलीचा आधार तरुला
तशीच खंबीर झालीस ग
कधीतरी डोळ्यांनी तुझ्या मग
तूच फसवली गेलीस ग!

गाव आपला मागे टाकून
हिरवा साज तू ल्यालीस ग
तिमिरातून मग भल्या पहाटे
घरट्यात तुझ्या तू वसलीस ग!

तळहातीच्या रेषांहुनही
फोडाला त्या जपलीस ग
आई होण्याआधी कुणाची
मायच त्याची झालीस ग!

Thursday, February 28, 2008

असे आम्ही जगतो...

चमचमणारे डोईवर पावसाचे दिवे
सळसळणाऱ्या वाऱ्याने आरासही झुले
पाहून आनंदा भरते कढ आतले दाबतो
असे आम्ही जगतो असे आम्ही जगतो!

काजळाने भरलेले टपोरे डोळे
आणि गालावर क्षणातच ओळखीचे ह्सू
निरागस जिवणीत भविष्य पहातो
असे आम्ही जगतो असे आम्ही जगतो!

गार हवेचा स्पर्श चिवचिवती भूपाळी
पहिला मोकळा श्वास तनमना जाग येई
कोंडले निश्वास दिसभर टाकतो
असे आम्ही जगतो असे आम्ही जगतो!

इंद्र्धनूच्या झोतात भावभावनांशी खेळ
मळभ दाटता उरी,अक्षरांशी खेळ
माणसे नात्याची खेळ आयुष्याचा होतो
असे आम्ही जगतो असे आम्ही जगतो!

Wednesday, February 27, 2008

काही चारोळ्या... प्रेमाआधी... प्रेमानंतर...

प्रेमाआधी...

मी माझं ह्रदय उघडून
त्याना मिठीत घेऊन बसलो
ते निखारे होऊन अस्तनीत कधी गेले
कळलंच नाही!...

ह्या ह्रदयाला साला आता
सीलंच ठोकलं पाहिजे!
सगळ्यानी आतबाहेर करून
दार खिळखिळं करून टाकलंय!...


प्रेमानंतर...
तुझा हात माझ्या केसांमधून फिरतो
तेव्हा मी गर्तेतून परततो!
एक कर! हात तसाच ठेव!
मग बघ कसा मी जगतो!!!...

तुझं प्रेम मला किती
गुदमरऊन टाकणारं
झालोय जरी तुझा तरी
चक्राऊन सोडणारं!!!...

Monday, February 25, 2008

पाणी

प्रसंगी
डोळ्यातून येतं
काळजाचं होतं
अंगातही असतं
आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं!
तेवढंच पुरत असतं तर
किती बरं झालं असतं!

Sunday, February 24, 2008

मला जगायचे आहे...

मला जगायचे आहे
या पोटातून या रहाटातून
मला रंगायचे आहे
या मनांतून या भावनांतून
मला लिहायचे आहे
या उरातून या बुध्दितून
मला बोलायचे आहे
या अधारातून या संगरातून
मला पोहोचायचे आहे
या शिखरांतून सात समुद्रांतून
मला मिळवायचे आहे
या मख्खांतून या दुख्खांतून
मला जगायचे आहे
या सरणांतून या मरणांतून
मला जगायचे आहे!

केवळ जगणं...

तेव्हा मी कोळी बनलो
आपल्याच विचारांचं मखमली
आणि इन्द्रधनुष्यी भासणारं जाळं पसरून
त्यात डोक्यातल्या किड्यांचं
निरसन करत बसलो
आजुबाजूच्या दलदलीत
कमळं शोधण्यापेक्षा
हे बरंच बरं होतं,
त्यांच्या मुळांची जाळी तर जीवघेणी असतात...
एकटा पडलो, निष्क्रिय झालो
सगळं खरं -पण-
केवळ जगणं
हा सुद्धा एक अनुभव आहे!

Sunday, February 17, 2008

ठिपका

कसलेसे आर्त आवाज ...
समोरच्या डोंगरउतारावरून
काळे ठिपके मुंग्यांसारखे ...
त्यांच्याबरोबरच सगळीकडे कलणारं पांघरूण...
आता आवाज स्पष्ट पोटातून बेंऽ बेंऽ
मग आजुबाजूच्या शेतातून
मग चहुबाजूनी
त्यामागोमाग तसेच लहान आवाज
त्याहून आर्त बेंऽऽ बेंऽऽ
माझ्या मागून कुठल्यातरी मेंढवाड्यातून
दोन्ही आर्त
एकमेकांत मिसळण्यासाठी
काळ्या मेंढ्यांनीं डोंगरावरून आणलेला
दाट काळोख पसरून राहिलेला सर्वत्र
त्यातला एक काळा ठिपका मी
माझंच अंग मला चाचपावं लागतं
आजूबाजूला काळा समुद्र ...
वर आता कुठे चांदण्या दिसताहेत
मी मान फिरवून फिरवून
चंद्र शोधायला लागतो ...

शांत हवेच्या कानात...

शांत हवेच्या कानात वेडे वारेसे शिरावे

आले कुठून मळभ अवचित ना कळावे

काळेशार मेघ जणू मनी काहूर दाटावे

क्षणी बरसता धारा मनमोकळे ते व्हावे

निराकार ईश्वराने रूप केवढेसे घ्यावे

थेंब थेंब अमृताने धरतीला भिजवावे

निळ्याभोर आकाशाने कीती रंग पालटावे

आरश्यात धरतीच्या मात्र हिरवेच व्हावे


Saturday, February 16, 2008

उमलले मी

उमलले मी उमलले मी
मधुगंध देण्या आतुरले
चाहुल कुणा भ्रमराची
मनं माझे मोहरले


शांत झोपल्या कळीला
गुपित आज हे कळले
मधुर तरंग गात्रांत
अंग अंग बहरले


जाग पहाटेच आली
अंग चिंब चिंब ओले
ओथंबल्या आरश्यात
रूप अनोखे सजले


त्याने यावेच म्हणून
वारयासंगे झुलले
तो दिसता क्षणात
पानामागे दडले

खेळ माझ्याशी हा माझा
भान नाही उरले
लाज लाजले कितीदा
पुन्हा पुन्हा फुलले!

नवी पहाट

सगळं धुऊन जातं तेव्हा
जेव्हा आभाळ बरसतं
मुंबईत सुद्धा केवढातरी निसर्ग
रेल्वेमार्गाशेजारची गर्द हिरवी रानं...
इमारती , कौलारू चाळी , रस्ते , पूल , बागा ,
चौक , मोटारी ... सारं स्वछं चकाचक !
मनाची जळमटंही जातात वाहून
बाहेर बघितल्यावर
हे बाहेर बघणंच जमत नाही नाहीतर
आतच जखडलेला जीव सतत...
ओथंबलेली झाडं , पानं...
जणू सगळं विश्वच ओथंबलेलं
वाटतं रोज यावा पाऊस असाच
तीनशे पासष्टं दिवस
मनाला मिळायची नाही मग उसंत
जळमटं विणायची -
एकात ऐक गुंतलेली कसली कसली
अखंड कोळीष्टकं...
मन राहील हासत
उमलाणारया पारदर्शक कळीसारखं
दवबिंदूंनी ओथंबून...



Friday, February 15, 2008

धुकं

धुक्यात मी जेव्हा पहिल्यांदा पोचलो
पोचलो कसला?
झोपेतून उठून बाहेर आलो तर
वेडाच झालो झिरझिरीत पडदा बघून
सूर्यसुद्धा पौर्णिमेच्या चंद्रासारखा चंदेरी
म्हणून उत्साहानं धुक्याकडे म्हणून चालायला लागलो
तर धुकं आपलं माझ्यापुढेच
मी उभा आहे तिथलं स्वछं दिसतयं
आणि माझ्यामागे? तिथंही धुकंच!
भूतकाळ आणि भविष्यकाळ संपल्यासारखा मी
पुढंच जावं आणि धुक्यात पोचावं
म्हणून वेग वाढवला
पडद्यामागून आल्यासारखी दुधाळ झाडं; पायवाट आणि
जादूचा चश्मा घातल्यासारखा मी
चालता चालता रंग बदलणारया सूर्याकडे पहात राहिलो
तो सोनेरी होत चाललेला
आणि धुकं?
ते पळत पळत समोरच्या डोंगराआड
तिथं तर पोहोचता येणार नाही
मी हसलो; वळलो
पायाशी मोती सांडले
वेचायला जातो तर
अळवाचं हालतं पान
आणि त्यावरून ओघळणारा
मोत्यांचा सर...







Wednesday, February 13, 2008

मी...झाड...संध्याकाळ...

तू माझ्यावर ओठंगून
समुद्र किनारयावरच्या वाळूत
लाट झिरपत जावी तशी

आधीच अफाट संवेदनानी भारलेला मी
तुझं वाहनच बनून जातो
अतृप्त आत्मा जसं एखादं
झाड शोधत असतो
सततची अतृप्ती संपवण्यासाठी- तशी तू

अचानक वाहू लागतात वारे
आणि काळोख झाला आहे सर्वत्र म्हणावं
तरी मला नीट दिसत असतो
आभाळाचा साईक
त्यावर डोलणारी सिल्हाउट भासणारी सुसाट झाडं

मी घरातून कुंपणापर्यंत
कुंपणाच्या बाजूबाजूनी
पुन्हा घरात
कृत्रिम उजेडातल्या माझ्या म्हणवल्या जाणारया
सांदिकोपरयातून कोरी नजर फिरवत
कुंपणापर्यंत गेल्यावर घराची आठवण आणि
घराच्या गोतावळ्यात कुंपणाची हाक
तुझ्या अमलाखाली मी
हालता निःशंक लंबक
दमून आजचा दिवस संपवतो
बरया वाईट स्वप्नांच्या राज्यात रमण्यासाठी
पुन्हा दचकून जाग येईपर्यन्त
तेव्हा माझ्यावरचं तुझं राज्यं पुन्हा सुरू व्हायला
एक वर्कींग डे बाकी असतो...