कसलेसे आर्त आवाज ...
समोरच्या डोंगरउतारावरून
काळे ठिपके मुंग्यांसारखे ...
त्यांच्याबरोबरच सगळीकडे कलणारं पांघरूण...
आता आवाज स्पष्ट पोटातून बेंऽ बेंऽ
मग आजुबाजूच्या शेतातून
मग चहुबाजूनी
त्यामागोमाग तसेच लहान आवाज
त्याहून आर्त बेंऽऽ बेंऽऽ
माझ्या मागून कुठल्यातरी मेंढवाड्यातून
दोन्ही आर्त
एकमेकांत मिसळण्यासाठी
काळ्या मेंढ्यांनीं डोंगरावरून आणलेला
दाट काळोख पसरून राहिलेला सर्वत्र
त्यातला एक काळा ठिपका मी
माझंच अंग मला चाचपावं लागतं
आजूबाजूला काळा समुद्र ...
वर आता कुठे चांदण्या दिसताहेत
मी मान फिरवून फिरवून
चंद्र शोधायला लागतो ...
No comments:
Post a Comment