धुक्यात मी जेव्हा पहिल्यांदा पोचलो
पोचलो कसला?
झोपेतून उठून बाहेर आलो तर
वेडाच झालो झिरझिरीत पडदा बघून
सूर्यसुद्धा पौर्णिमेच्या चंद्रासारखा चंदेरी
म्हणून उत्साहानं धुक्याकडे म्हणून चालायला लागलो
तर धुकं आपलं माझ्यापुढेच
मी उभा आहे तिथलं स्वछं दिसतयं
आणि माझ्यामागे? तिथंही धुकंच!
भूतकाळ आणि भविष्यकाळ संपल्यासारखा मी
पुढंच जावं आणि धुक्यात पोचावं
म्हणून वेग वाढवला
पडद्यामागून आल्यासारखी दुधाळ झाडं; पायवाट आणि
जादूचा चश्मा घातल्यासारखा मी
चालता चालता रंग बदलणारया सूर्याकडे पहात राहिलो
तो सोनेरी होत चाललेला
आणि धुकं?
ते पळत पळत समोरच्या डोंगराआड
तिथं तर पोहोचता येणार नाही
मी हसलो; वळलो
पायाशी मोती सांडले
वेचायला जातो तर
अळवाचं हालतं पान
आणि त्यावरून ओघळणारा
मोत्यांचा सर...
No comments:
Post a Comment