आकाशवाणीवर प्रवेश तर उत्तम झाला.ज्या दोन डॉक्टरांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या त्यानी मी नवोदित असूनही मला प्रोत्साहनच दिलं.आता मुख्य काम होणार होतं.ध्वनिमुद्रणाचं.
आकाशवाणीच्या इमारतीतल्या ध्वनिमुद्रण कक्षाकडे जाताना आणि आत शिरताना एका बाजूला अनामिक भीती आणि दुसर्या बाजूला नवीन काही घडतंय याची हूरहूर जाणवत होती.
ध्वनिमुद्रण कक्षाचे दोन भाग होते.एका भागात गोल टेबल.त्यावर चार ते पाच ध्वनिक्षेपक.भोवताली खुर्च्या.हा कक्ष ज्यांचं ध्वनिमुद्रण करायचं आहे त्या व्यक्तींसाठी आणि दुसरा पर्यायानं लहान आणि भल्यामोठ्या ध्वनिमुद्रण यंत्राने व्यापलेला कक्ष ध्वनिमुद्रकाचं काम करणार्यासाठी.
त्यावेळी ध्वनिमुद्रणात संगणकीय तंत्रज्ञान नव्हतं.ज्यांचं ध्वनिमुद्रण करायचं आहे त्याना ध्वनिमुद्रक तसंच कार्यक्रम अधिकार्याकडून अनेक सूचना दिल्या जात.
हातात कागदांची चळत असेल आणि ती वाचत ध्वनिमुद्रण करायचं असेल तर कागद सरकवल्याचा, फडफडवल्याचा आवाज आपल्या कानांना जाणवला नाही तरी ध्वनिक्षेपक बरोबर पकडतो.त्यावेळी हा दोष काढून टाकणं बहुदा जिकीरीच होत असावं.संगणकीय तंत्रज्ञान आल्यानंतर आपल्यासारखा माणूसही Audacity सारखं सॉफ्टवेअर वापरून नुसतं ध्वनिमुद्रणंच काय ध्वनिमुद्रण संकलनही शिकून घेऊन उत्तम पद्धतीने वापरात आणू शकतो.ध्वनिमुद्रणातल्या नको असलेल्या आवाजांची गच्छंती सहज होऊ शकते.
तेव्हा तसं नव्हतं.तुम्ही ध्वनिक्षेपकासमोर बसलात की तुमची बसण्याची ढब बदलतानाही आवाज होऊन उपयोग नसे.पायांचा टेबलाच्या खालच्या भागावर होणारा आघात, काही जणांना असते ती पाय हलवत रहायची सवय, अशा गोष्टींमुळे निर्माण होणार्या व्यत्ययांवर ध्वनिमुद्रण मधेच थांबवून फेरध्वनिमुद्रण करण्याशिवाय गत्त्यंतर नसे.
नवोदित आणि अनुभवी दोन्ही ध्वनिमुद्रणकर्त्यांना ध्वनिमुद्रक असलेल्या कक्षाकडे आणि ध्वनिमुद्रकाच्या उंचावून खाली आणलेल्या हाताकडे डोळे लाऊन बसावं लागे.प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी आणि एकमेकांच्या आवाजाची पट्टी जुळवणं हे धनिमुद्रकाचं पहिलं महत्वाचं काम असे.ते त्याला अचूकपणे करावं लागे.
ध्वनिक्षेपकाच्या नक्की कुठल्या बाजूला आपलं तोंड असावं हा ही नवोदित ध्वनिमुद्रणकर्त्याला जिकीरीचा व्यायाम होई.तोंडातून प, फ, भ अशा अक्षरांमुळे बाहेर पडणार्या श्वासाचा ’ब्लो’ ध्वनिमुद्रणात व्यत्त्यय आणतो हे सतत लक्षात ठेवावं लागे.हा दोष काढून टाकणं संगणकीय तंत्रज्ञानात पर्यायानं सहजशक्य झालं आहे.
या सगळ्या कसरती मला सुसह्य झाल्या त्या ध्वनिमुद्रक, कार्यक्रम निर्माते जयंत एरंडेसर आणि ज्यांची मुलाखत घ्यायची ते तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्यामुळेच.मी वयानेही या सगळ्यांपेक्षा चांगलाच लहान होतो.जिथे टीमवर्क अर्थात समूहाने काम करायला लागतं अशा कामांत अनुभवी वरिष्ठांनी जर नवोदितांना सांभाळून घेतलं नाही तर त्या कामाचा विचका होतोच पण त्या नवोदिताला अशा वातावरणाबद्दल कायमची अढी बसते.सुदैवाने मला अनुभवी वरिष्ठांची मदत झाली.माझं त्यांच्या इतकं महत्वाचं काम नसून त्यानी माझं कौतुक केलं आणि मला या माध्यमासंबंधी मार्गदर्शनही केलं.प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण करताना तर दोन्ही डॉक्टर्सनी ती मुलाखत अगदी गप्पांसारखी रंगवली...
आता पुढचा टप्पा होता आकाशवाणी नाट्य विभागातल्या आवाजचाचणीचा.दरम्यान मी त्यासाठीचा अर्ज भरला होता.नाटकांतून अभिनय केलेला असल्यामुळे या चाचणीत मला जास्त रस होता.आवाजाची सर्वसामान्य प्रत जोखणं, म्हणजेच आवाज ध्वनिमुद्रणासाठी उपयुक्त आहे ना हे पहाणं आणि तो आकाशवाणीवरून केवळ आवाजातलं नाटक निर्माण करण्यास योग्य आहे ना ते जोखणं अशा दोन टप्प्यांवर ही चाचणी होईल असं सांगण्यात आलं होतं.
चाचणीसाठी कुठल्याही नाटकातला एक संवाद तयार करून आणायचा आणि त्याचं वाचून ध्वनिमुद्रण करायचं होतं.मी संवाद शोधायला सुरवात केली आणि शोधाअंती त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीवर लोकप्रिय झालेल्या ’माझं काय चुकलं?’ या नाटकातल्या नायकाच्या एका संवादानं माझा ताबा घेतला.हे नाटक ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार श्री रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं.त्यांच्याच ’जौळ’ या कादंबरीवर आधारित.
ही एक सत्य घटना होती.मुंबईजवळ असलेल्या शहरातल्या एका उपनगरातल्या घरातली आई, मुलगा आणि सून यांचा एकत्र संसार, बायको आणि आई यांच्यामधे झालेली त्या मुलाची प्रचंड ओढाताण, जागेची अडचण, आईचं खडतर पूर्वायुष्यं आणि हट्टी स्वभाव, मुलाचा मनस्वी स्वभाव आणि शेवटी मुलाचं लोकलमधून उडी मारून आत्महत्या करणं…
आत्महत्येआधीच्या, त्या मुलाचा आणि त्याच्या बायकोचा त्या संवादानं माझा कब्जा घेतला होता.मुलाची आत्महत्येची मानसिक तयारी पूर्ण झाली आहे.’लोकलच्या दारात उभं रहायचं.अंधारा लांबलचक बोगदा आला की दाराच्या मधल्या रॉडवरचा हात अलगद सोडून द्यायचा’ इतक्या सहजपणे तो बोलतो, इतकी त्याची तयारी झाली आहे!...
हा संवाद निवडलाय म्हणजे मी भलतंच आव्हान पेलतोय का? कसं होईल ध्वनिमुद्रण? नाही झालो उत्तीर्ण तर काय? नेहेमीसारखा मी अनेक प्रश्नांना आणि त्यामुळे येणार्या अपरिहार्य ताणाला सामोरा जाऊ लागलो.झोप उडणं हे अशावेळी नेहेमीचं होऊन बसतं तसं बसलं…
2 comments:
छान लिहिलंय तुम्हीं!
काय झालं मग पुढे?
आभार अनघा! पुढच्या पोस्टमधे लिहितोय.आणखी मजा आहे.वाचाल नं पुढची पोस्ट?
Post a Comment