romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, November 4, 2008

“माझं घर”_कथा_“मैत्रीण”दिवाळी अंक_२००६

आज…शेवटी आज मी तटस्थपणे माझ्या घराकडे पहातेय.या सणासुदीला बदलल्या जाणाऱ्या, भरगच्च हाराखालच्या फोटोत बसून…माझं घराचं स्वप्नं पूर्ण व्हायला हा एवढा काळ जावा लागला…अजूनही चाललेल्या कुरबुरी मला ऐकू येत नाहीत, समजत नाहीत, अश्यातला भाग नाही.पण आज मात्र मी या सगळ्याच्या पलिकडे गेलेय…कम्पल्सरी…निदान या चार भिंतीतरी यापुढे बराच काळ कायम असतील…पण घर म्हणजे फक्त एवढंच असंही नव्हे…सकृतदर्शनी ’माझं घर’ झालंय…होणारे त्रास मी पुरेपुर भोगले! मागे राहिलेल्यांनी त्यांचे त्रास त्यांच्या वाट्याला जसे आलेत तसे भोगावेत, हे अगदी निरिच्छपणे म्हणा किंवा तसं व्हावं या इच्छेनेही म्हणत नाही मी, पण आता मी कुणाचेच होणारे त्रास कमी करू शकत नाही आणि माझ्यामुळे त्यात वाढही होणार नाही, एवढं खरं! घर…माझं घर…झालं! एवढं म्हणायला हरकत नाही…         

माझ्या घरातून बाहेर पडले-जिथे जन्म घेतला, लहानपण घालवलं, मैत्रिणींबरोबर खेळता खेळता, अभ्यास करता करता, त्या घरातून…अचानक एके दिवशी जाणून करून दिली गेली की हे तुझं घर नव्हेच!-म्हणजे? कुणाला आपल्या घरातून बाहेर पडावसं वाटेल?-कुठल्या मुलीला? मला एके दिवशी वाटलं…काळ्या वर्णाचा उपजत वारसा होताच…नीटस दिसणं हे काळ्या रंगाच्या बाहेर कधी येतच नाही…नसावं…त्यात शाळेच्या मैदानावर मारल्या जाणाऱ्या चुनाच्या बुक्कीतला चुना डोळ्यांत गेला आणि निमित्त होऊन डोळ्यांवर ढापणं चढली…उंची बेताचीच…शाळा संपली…शिक्षणात हुशार, पण ते घेतलं म्हणजे लग्न जमणं आणखीच कठीण!-मुलीनं पुढे शिकायचं? आपलं आपण जमवायला प्राथमिक अर्हता हव्यात, मग धैर्य हवं, ते कुठुन आणायचं? मला घराबाहेर पडावसं वाटायला लागलं… मला वाटलं, कारण हळूहळू मी तिथे असण्यामुळे… अजून असण्यामुळे…लग्न होऊन माझ्या घरी गेलेली नसल्यामुळे…उमटणाऱ्या प्रतिक्रिया जाणवत होत्या…धक्का बसवणाऱ्या नसल्या त्या तरी डोहात खडा पडल्यावर अखंड अनंत तरंग पसरत रहावेत…सगळ्यांच्याच मनात…तश्या… पुन्हा, उजवून घ्यायला, हुंडा कुणी, कुठून, कुणाकडून आणायचा? मी डोळे बंद करून डोळ्यासमोर अंधार केला आणि पुढचा रस्ता पकडला…घरच्यांना आपल्या मुलीचं चांगलं व्हावं असं कसं बरं नाही वाटणार? माझ्या दृष्टीनं मागच्यांना त्यांचे रस्ते मोकळे झाले हे बरंच झालं…मी जे आजपर्यंत माझं घर म्हणत होते त्याचं ’माहेर’ झालं…माहेरचं घर चौसोपी नव्हे, पण सोपा, अंधारं माजघर, स्वयंपाकघर, न्हाणीघर, परसू, पायखाना शिवाय माडी-तीन खणांची…शहरात आल्यावर पहिला धक्का म्हणजे ज्या घरात आले ते घर माझं नव्हेच! नणंदेचं! शहरातल्या चाळीतलं घर…चाळीत रहदारीच रहदारी…चाळीतल्या चाळीत आणि चाळीतल्यांची घराघरांत… एखाद्या प्रवासी बोटीवर असल्यासारखं… त्यातच नवी नवलाई…त्यातच…गरोदरपण…पहिलं…मागच्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत रहाणं…शून्य मनानं…मुद्दाम आणलेली शून्यता…आपलं दैव असं म्हणून…मला वाचनाची, लिखाणाची आवड असणं, बहुश्रुत असावंसं वाटणं आणि…माझ्या संसाररथाच्या दुसऱ्या चाकाशी बघावा लागणारा अनाडी, कामगारी थाट…परदेशी अत्तरांचा…उंची सलूनमधे जाऊनच केस कापण्याचा…इस्त्रीच्या उंची कपड्यांचा…वाचाळपणा…खिश्यातल्या रिकामपणावर सगळं भारी झालेलं…गरोदरपणाच्या जड अवस्थेत मला सगळं समजू लागलं…पहिला मुलगा होईस्तोवर नणंदेचा संसारच आपण जगतोय हेही…            

Post a Comment