उपनगरातल्या एका सहकारी गृहनिर्माण संस्थेचा परिसर.बहुसंख्येने अर्थातच मध्यमवर्ग.तांबडं फुटायची वेळ म्हणतात तशी वेळ.रखवालदार डोळे तांबरलेला.मुख्य प्रवेशद्वारावर.पोटापासून ओढ देत जोरदार जांभया देऊन झोप उडवायचा प्रयत्न करणारा.तीन-चार इमारतींची सोसायटी.इतर प्रवेशद्वारांवर साधारण असंच दृष्य असेल.कदाचित रखवालदारच नसेल.
रखवालदार रामदेव रजकने पुन्हा एकदा तंबाखू मळायला घेतला.हातावर बोट घासता-घासता त्याला पुन्हा पेंग यायला लागली.अचानक काहीतरी हालचाल झाली आणि तो दचकला.त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.धसक्याने हातातला तंबाखूही सांडला.सोसायटीतले आरोग्य जागरूक प्रभातफेरीसाठी बाहेर पडून वेळ लोटला होता.कचेरीत जाणारे बाहेर पडायला अवधी होता.एखाद् दुसराच तसा बाहेर पडत होता.शाळांच्या बसेस पश्चिमेच्या गेटजवळ गर्दी करत.हे मुख्य प्रवेशद्वार असलं तरी गल्लीत होतं.मेन रोड संकुलाच्या पश्चिमेला.तिथे बसेस वगैरे.
झालेली हालचाल रामदेव रजकला अस्वस्थ करून गेली होती.आपण खरंच ते पाहिलंय का…डोळ्यांनी…सर्वात मागच्या, तिसऱ्या आणि चौथ्या इमारतीच्या बेचक्यात एक अतिशय छोटं गार्डन केलं होतं.सुशोभित बगीचा.तिथल्या झाडांत ती हालचाल दिसली.रजकला रहावेना.खात्री करून घेण्यासाठी तो प्रवेशद्वारातून बाहेर रस्त्यावर बघत, कुठे काही इतर हालचाल नाही ना ते बघत बगीच्याकडे निघाला.अनेक झुडपं आणि दोन-चार बऱ्यापैकी वाढलेली झाडं.फूट-दीड फूट गच्चं पानं असलेला, फांद्या असलेला झाडांचा विस्तार.त्यातल्या दोन झाडांच्या मधे आडोश्याला त्याला जे दिसलं ते बघून त्याचे डोळे दिपल्यासारखेच झाले.ती एक अनावृत्त स्त्री होती.होय!अनावृत्त, पांढरंशुभ्र स्फटिकासारखं शरीर.ते शरीर बघतानाच लक्क्न वीज चमकावी तशी त्याच्या पायातली हवाच निघून गेली.डोक्यातून जोरदार प्रवाह.धक्का बसल्यासारखा.त्या शरीराकडे बघतच तो डोकं गच्चं धरून मटकन् खाली बसला.आश्चर्य म्हणजे त्याचे डोळे मात्र त्या धक्क्याने मिटले नाहीत.ते ताठरल्यासारखे झाले.पापणी मिटली तरी समोरचं दृष्यं क्षणार्धात नाहीसं होईल या भीतीनंही असेल.तो मटकन् खाली बसला हे मात्र त्याच्या दृष्टीनं सोयीचंच झालं.तो आपोआप लपला गेला आणि त्याच वेळी झुडपाच्या बेचक्यातून त्याला समोर दोन-चार फुटांवर उभं असलेलं ते शरीर न्याहाळताना कसलीही अडचण येत न्हवती.अर्थात हे सगळं रजकला जाणवत असण्याची सुतराम शक्यता नव्हती.त्याच्या सताड डोळ्यांना जाणवत होतं ते समोरचं स्त्री-शरीर.त्याच्या तांबरलेल्या डोळ्यांत आणखी आणखी रक्त साकळत होतं आणि ते शरीर, मुरमात पाणी मुरावं तसं त्याच्या मेंदूत मुरायला सुरवात होत असावी.
ते काही कुणा नाजूक नवयौवनेचं अनाघ्रात शरीर नव्हतं…
No comments:
Post a Comment