तो संदेश आला आणि राघवचं टाळकंच सटकलं.उंटाच्या पाठीवर शेवटची काडी पडावी तसं.उद्या महोत्सवातला प्रयोग.त्या आधीची ही संध्याकाळ.जरावेळानं छान मद्यपानाला बसता येईल.उद्याच्या प्रयोगाची तयारी.टेन्शन आणि…
राघवनं सगळा ग्रुप परत आल्याची खात्री करून घेतली.जरा वेळ जाऊ दिला आणि मग बाणासारखा सणसणत तो त्या खोलीत शिरला.उघडा.खाली जीन्स.आत शिरल्यावर काही न बोलता त्याने सर्वप्रथम मधोमध खाली बसलेल्या त्या तरूणाच्या कानाखाली काड्कन आवाज काढला.एकदा.दोनदा.
असं काही त्या तरूणाला अपेक्षितच नव्हतं.पहिल्या फटक्याने तो भेलकांडला.भांबावला.हातांनी मार चुकवण्याचा प्रयत्न करू लागला.तोपर्यंत राघवच्या मागोमाग नेहमी त्याच्याबरोबर असलेली चौकडी धावत आली.ते राघवला आवरताहेत आणि राघव त्याना जुमानत नाही असं काही वेळ चाललं.समूहाला कुठल्याही गोष्टीची खबर लगेच लागते.दाराबाहेर गर्दी जमा होतेय हे पाहून चौकडीपैकी कुणीतरी दार आतून बंद केलं.बहुदा तो राघवचा पित्त्याच असावा.इतके दिवस राघव प्रत्यक्ष काहीच बोलला नव्हता.आता त्याची रसवंती ऊतू जाऊ लागली.हे बघ,तुला किती वेळा सूचना दिल्या होत्या?त्या…×××…तिच्याबरोबर दिसू नकोस म्हणून?तू आता कायमचा बाहेर झालास.उद्याचा महोत्सवाचा प्रयोग करायचा असेल तर माफी माग!...×××!...माझी!
राघवचं हे सगळं अंदाज घेत घेत चाललं होतं.सव्वीस-एक वर्षाच्या विराजने काहीही प्रतिकार केला नाही.फक्त मार चुकवण्याचा प्रयत्न केला.प्रसंगाची सूत्रं पूर्णपणे आपल्याच हातात आहेत हे जाणवून राघव त्याला दम देत राहिला.
विराज चांगल्या घरातला.आज्ञाधारक.राघवला गुरू मानणारा.सगळी सूत्रं आपल्या हातात ठेवायची राघवची वृत्ती.ती हातातून सुटताहेत असं नुसतं राघवला स्वत:ला जरी वाटलं तरी लगेच आक्रमक होऊन ती घट्टं हातात धरून ठेवायचा राघवचा बाणा.गेले काही दिवस, महिनाभरही झाला असेल, तो विराजला सतत आडून आडून सूचना देत होता.मालविकाबरोबर दिसू नकोस म्हणून.अश्या गोष्टी थेट कश्या सांगायच्या? असं काही सांगितलं आणि “त्यात काय झालं?” असं म्हणून विराजनं ते टोलवलं तर राघवच्या दृष्टीनं तो राघवच्या इज्जतीचा प्रश्नं.त्या दोघांवर थेट काही आरोप करायचे म्हणजे अडचण.त्यांचं काही आहेच आहे असं सिध्दं करणं कठीण.मुळात ग्रुपच पन्नास जणांचा.दौऱ्यावर सगळ्या ठिकाणी सगळंच सगळ्यांच्या समोर.राघवनं आक्षेप घेतला आणि समूह विरोधात गेला तर.
थेट काही न सांगण्या-विचारण्याचं आणखी एक कारण म्हणजे राघव संस्थेचा सर्वेसर्वा.तो नवोदिताला प्रत्यक्ष काही का सांगे-विचारेल?कुणाकरवी ते सांगणं जास्तं योग्यं.प्रशस्तं.जास्त परिणामकारक.शिवाय कदाचित आरोपीला अशील होऊन अपीलात जाण्याची एक संधी.
नवोदिताला असे धोक्याचे संदेश तिसऱ्याकडून मिळणं हे प्रत्येक वेळी धक्का होता.बरोबर भूमिका करणाऱ्या मालविकाबरोबर आपले निर्माण झालेले संबंध हे नक्की काय आहे, हे विराजला, त्याचं त्यालाच समजत नव्हतं.ती बालिश आहे, आपला खेळ करू पहातेय, तिची आपली मैत्री आहे, की आणखी पुढचंच काही? हे न समजल्यामुळे विराज आधीच संभ्रमात होता.विराज भिडस्तं.मुलींपासून लांब.त्यात आयुष्यात पहिल्यांदा नायक-नायिकेचे प्रसंग.प्रणयाचे.तालीम चालू असतानाच विराजची मजा बघणाऱ्या एकदोघांनी मालविकाला विश्वासात घेतलं.विराज भूमिका करताना त्याला खुलता येऊ दे अशी तिला विनंती वजा सूचना केली.यात अर्थात केवळ विराजचं भलं करण्याचा हेतू नव्हता.मजा बघण्याचाही होता.मजा क्रिएट करण्याचाही होता.
आस्ते आस्ते विराज खुलला.मालविका विशेष प्रयत्नं करतेय हे ही त्याला जाणवलं.पण त्या मागचं कारण त्याच्या दृष्टीनं गुलदस्त्यातच राहिलं.दोघांचेच प्रसंग, वाक्यं बोलणं, तालीम करणं यासाठी दोघेही सर्वांसमक्षच एकत्रंही येऊ लागले.सबंधं वाढले.ते नक्की काय प्रकारचे आहेत या विचारात विराज होता.तो सभ्यं होता, साधा होता, उथळ नव्हता.प्रेमसुलभ भावना त्याच्याही मनात येणं स्वाभाविक होतं.त्याचवेळी संबंधं वाढताहेत हे जाणवूनही असेल, आपला एक जवळचा मित्रं आहे, त्याचं आपलं जवळजवळ ठरलेलंच आहे, असं मालविकानं विराजला सांगितलं.
दोघेही पूर्ववत समुहामधे वावरू लागले…
No comments:
Post a Comment