romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Saturday, November 22, 2008

आजोळचे सवंगडी

नेहेमीप्रमाणे अचानक माझं मन मला आजोळी नेऊन पोचवतं.मला वांग्याचा बोळ आठवू लागतो.बोळाच्या नाक्यावरचा तो चहावाला.त्याची गाडी.गाडीवर कोळश्याच्या शेगडीवर ठेवलेलं त्याचं चहाचं अल्युमिनियमच्या उभं कुकरसारखं, टोपीसारखं झाकण असलेलं भांडं.तो चहाचा मऽऽऽस्त! वास.बरण्यांमधून असलेली खारी, टोस्ट आणि इतर बिस्कीटं.गळ्यात छोटी खाकी कापडी पैश्याची थैली घालून सदैव हसतमुख असलेला चहावाला.लहान चणीचा.मोठमोठ्याने बोलत, हास्यविनोद करत असलेला, सतत कामात गर्कही.पांढरा घोळदार पायजमा, बहुतेक वेळा टिपिकल निळ्या रंगाचा, कॉटनचा दोन बटणांचा फूलशर्ट. आम्ही मुलांनी फक्तं बघायचं, चहाचा वास भरून घ्यायचा, पुढे निघायचं!

बोळात शिरल्यावर डाव्या हाताला ब्रॉस बॅन्डचं ऑफिस वजा राहतं घर वजा रिहर्सल रूम.इथले क्लॅरोनेट, वेगवेगळ्या आकाराचे ट्रंपेट्स यांचे शिकाऊ, सराईत इत्यादी आवाज ऐकत आश्चर्याने बघत बघत पुढे.एक-दोन सजवलेले बॅंडवाले पायरीवर बसून वाद्यांवर मेहनत घेत असलेले…

मग घराचे वेध.उमराणीकरांचा वाडा म्हणायचं पण वाडा म्हटल्यावर जे चित्र उभं रहातं तसं घर नव्हे.शेजारी एक पडका वाडा.मी मोठा होऊन माझं आजोळ दुसऱ्या भागातल्या खऱ्याखुर्र्या वाड्यात स्थलांतरीत होईपर्यंत हा शेजारचा वाडा पडकाच राहिलेला.या पडक्या वाड्यात भर दुपारी (कारण-मोठी माणसं झोपलेली) आमचा मुक्त संचार.वाडा जमीनदोस्त व्हायचाच राहिलेला.आत एरंडाची झाडं वाढलेली.उंच वाढला एरंडू परि न्हवेच इष्कूदंडू हे थोरांचं वचन- आजी, आजोबा, आई, मावशी सगळ्यांचंच- पुढे सतत ऐकायला मिळालेलं.या इष्कूदंडूवर कुणी प्रकाश टाकावा!याचा अर्थ ऊस पण हा शब्द बरोबर लक्षात रहिलाय?का वेगळाच काही शब्द आहे?महत्वाचं हे की केवळ उंच वाढलाएस! हे सततचं थोरांचं सांगणं!

एक वर्षं किंवा सहा महिने असेल मी इथे राहिलो.मला शाळेत घातलं.माझी मावशी मला शाळेत ने-आणायची.माझ्या मोठ्या मामानं मला आणि माझ्या मामेबहिणीला निळं दप्तर आणि रंगीबेरंगी छत्री असे दोन सेट आणले.ही माझ्या वयाची मामेबहिण माझी पहिली सवंगडी.

घराचं आवार एका पॅसेज सारखं.सुरवातीला चौकोनी दगडी कमान.पुरूषभर उंचीची.आत आल्यावर उजव्या बाजूचं दुसरं बिर्हाड आमचं.पहिल्यांचं आणि आमचं पटत नसावं.या घराबद्दल गूढ वातावरण.आमच्या बिर्हाडासमोर एक गोल कमान असलेलं उघडं छोटं देऊळ.या देवळाच्या पार्श्वभूमीवर आजी, आजोबा आणि त्यांची मुलं असा एक जुना फोटो स्मरणात राहिलेला.समोर त्या देवळाच्या मागे वडेरांचं बिर्हाड.वडेरांचा पक्या माझ्यापेक्षा खूप मोठा.माझ्या हरवलेल्या लहान बहिणीला यानंच शोधून आणलं, नाहीतर…नाना वडेर भिक्षुकी करायचे.आड्व्या मांडीवर एक पाय सोडून घराच्या पायरीवर बसलेले.पक्याची एक बहिण माझ्याबरोबरची.

आमच्या शेजारी जरा उंचावर आणखी एक भिक्षुक कुटुंब पुशीरकरांचं.दाढीचे खुंट सदैव वाढलेले, भस्माचे पट्टे आंगाखांद्याडोक्यावर ओढलेले, तोंडात सतत पानाचा तोबरा, डोळे लाल, आवाजाची पट्टी कायम उंच-व्यवसायामुळे असेल- असे कुटुंब प्रमुख आणि गोऱ्या, बुटक्या, बारीक डोळ्यांच्या, हसतमुख किण्याच्या आई.पक्या, तुक्या, किण्या, सख्या आणि बहिणी.सख्या स्पेशल चाईल्ड.सगळे कपडे काढून टाकलेला तो विचित्र आवाजात ओरडत धावत सुटायचा आणि तो आमच्याच मागे लागलाय म्हणून आम्ही त्याला घाबरायचो.त्याचा भाऊ किण्या माझा दोस्त.किण्या, त्यांच्या बाजूला आणखी उंचावरचे, शेजारी साधना, संजू गाडगीळ आणि मी आमचा खेळ रंगायचा अंबाबाईच्या देवळातल्या गरूड मंडपात.

पण माझे सनसनाटी मित्र म्हणजे रम्या, राज्या आणि थोडाफार राज्याचा मोठा भाऊ नंद्या.वाड्याच्या कमानीच्याही आधी वाड्यापेक्षा वेगळं वाटावं अश्या बिर्हाडात रम्या रहायचा.काही कुटुंबात बाप आणि मुलं एका साच्यातून काढल्यासारखी एकसारखी दिसतात तसं रम्याचं होतं.रम्या मातीचं किल्लं करायचं.रम्या आपल्या हापपॅंटीच्या घोळदार खिश्यात बैदुल (गोट्या) घिऊनच असायचं.त्ये धावलं की खिसा खुळखुळ्ळ वाजायचा.हसरं होतं रम्या.राज्या, नंद्या वाड्यासमोरच्या वेढ्यांच्या वाड्यातलं.राज्या हसरं, एका नाकपुडीत कायम शेंबडाचं मोती असल्यालं.नंद्या हसरं, टगं वाटणारं.राज्याच्या नादाला लागून स्वैपाकघराच्या खिडकीत आजीनं कनवटीचं काढून ठेवल्याल्या पैश्यातलं दोन पैसं न सांगता उचलून खाल्लेलं (त्याचं काहीतरी घेऊन खाल्लेलं) मग आजी, मावशी रागं भरलंल्या.वेढ्यांच्या घरात भाताच्या कण्या ओरपून खाल्लंल्या आणि मग घरला सांगितल्यावर कावाकाव.राज्या, नंद्या माडीवर रहायचे.त्यांचे वडील एस्टीत वाहक असावेत.राज्याचे काका खाली रहायचे ते एस्टीत ड्रायव्हर.त्यांचा मुलगा सुभ्या का असाच कुणीतरी.दोन्ही घरांमधून इस्तू जात न्हवता.

त्यावेळचे खेळ म्हणजे घरात इश्पिठं- म्हणजे पत्ते- हा ही शब्द नक्की काय असावा?मामेबहिणीबरोबर घरात मोठ्मोठ्या लाकडी पाटांचा आडोसा करून भातुकली आणि बाहेर राज्या, रम्या, नंद्याबरोबर रेडी गो? तारा धेन! -पकडापकडीचा खेळ! हे तारा धेन नक्की काय?हाच शब्द आहे की दुसरा काही?...

…हल्ली दोन-चार वर्षांपूर्वी ओळख झालेले समोर आले की त्यांची नावं आठवत नाहीत, कधी ते नक्की कुठे भेटले ते आठवत नाही आणि लहानपणचं सगळं नावा-चेहेऱ्यानिशी आठवतं याला काय म्हणावं?वाड्याच्या मागच्या भागात, मागच्या दाराजवळ एक कोकणस्थी कुटुंब रहात होतं.म्हातारे डोळ्यांच्या बुबुळावर पांढरी साय चढलेले आजोबा आणि समोरचे वरचे सगळे दात तोंडाबाहेर आलेल्या ठसठशीत कुंकू लावणाऱ्या लाल नऊवारीतल्या आजी आणि त्यांची उंच तरूण देखणी स्कर्ट-ब्लाऊज घालणारी मुलगी या कुटुंबाचं नाव आठवत नाही पण चेहेरे?अगदी लख्खं आठवतात.

हे सगळे कुठे असतील?अजून तिथे असतील?गावात गेल्यावर अनेकदा माझी पावलं बोळापर्यंत जातात.पण आत शिरत नाहीत.मुळात गावात रहाणंच होत नाही.गावातल्या नातलगांनी आता गावाबाहेर जागा घेतल्यात.दरवेळा मी नक्की ठरवतो की यावेळी त्या घरापर्यंत जायचं.आत शिरून मला फिरता येणार नाही कदाचित.पण घर लांबून बघता येईल.राज्या, रम्या, नंद्या, साधना, संजू, किण्या दिसतील पण ते गुलजारच्या सिनेमात आपल्या मनाच्या पड्द्यावर तिथे असल्यासारखे(?) दिसतात तसे!…

हे सगळे कुठे, कसे असतील हा विचार सतत बैचेन करत असतो आणि माझं व्यवहारी मन माझ्या लहानपणातल्या त्या थोरांसारखं मला वचन सांगत असतं-यथा काष्ठंचं काष्ठंचं समेयेता महादधौ!-सागरात योगायोगाने दोन ओंड्क्यांची भेट होते आणि मग ते भिन्न दिशांना अपरिचितांसारखे नाहिसे होतात ही जगरहाटी आहे!

पण मन मानत नाही…      

3 comments:

Abhi said...

खुपच छान लिहिले आहे. सर्व अगदि डोळ्यासमोर येते

-अभी

Anonymous said...

good,i remember vangi bol,i used to pass through, while going towards market, in my childhood

नंदकिशोर said...

hi...
apan khupach chhan lihile ahe...
kharach kolhapur he gavach ase ved lavnare ahe...