त्या खुराड्यातला भटक्या विमुक्त जमातीचा तो एकटाच
रोज सकाळी जीवाची मारामार करून खुराडं त्याला भाकर तुकडा द्यायचं
तो भाकर तुकडा आणि एक रंगीबेरंगी झिरमिळ्या बांधलेलं बोचकं खांद्यावर घेऊन
निघायचा तो घाण्याकडे, बोचकं जणू त्याच्या शरीराचाच एक भाग
अ त्या फिदीफीदी हसायचे
ब आदरयुक्त हसायचे
क कौतुकयुक्त हसायचे
हसणं कॉमन…
घाण्यावर तो मान मोडून काम करायचा
जुंपल्रेले ते आणि हाकणारा कुणी तो
यांत काही फरकच वाटायचा नाही
अर्थातच तिथेही अ ब क ड असायचेच
किंवा हसायचेच…
दमून भागून नंतर तो लखलखणाऱ्या जंगलात शिरायचा
आणि फ्रेश व्हायचा
लाईट गेलेलेच असले तर घाण्यावर तरी टाईमपास करायचा
किंवा शेजारच्या घाण्यावर…
लखलखणाऱ्या जंगलात बोचकेवाल्यांची जत्रा भरे
कुणी म्हणे माझ्याच झिरमिळ्या जास्त लाल
कुणी म्हणे माझ्याच झिरमिळ्या जास्त चमकदार
कुणी खरोखरीचा अगदी अस्सल रेशमी झिरमिळ्यांवाला
तर कुणी चटया विणणारा, शाली, झब्बे बनवणारा
कुणी नुसताच गाठी मारणारा
त्यांच्यात तो रमे
त्याचे बोचकभाऊ कधी मोहाची फुलं, कधी जांभळं आणत
वर्गणी काढून, फुकट, किंवा आपल्यातल्याच कुणालातरी कापून
बोचकी हुसकणं चालूच असायचं त्याचं इमानेइतबारे…
आताश्या जंगलात पेपरवाले यायचे
पेपरातल्या ग्रुप फोटोत एखाद्या कोपऱ्यातल्या स्वत:ला
हा आपल्या हातावरून, पायावरून, कोपरावरून, धडावरून
ओळखायचा
तसं काही वाईट चाललं नव्हतं
आणे दोन आणे सहज मिळून जायचे
त्याची एखादी झिरमिळ कधीतरी खपायचीच ना?
त्याहीपेक्षा कधीतरी, बऱ्याच वेळा अनपेक्षितपणे
एखादं इंद्रधनुषी बोचकं त्याला बघायला मिळायचं
कधी त्याच्या बारक्याश्या झिरमिळीचं
त्याचे बोचकभाऊच कौतुक करायचे
तो खुष व्हायचा, तृप्त व्हायचा, पण तेवढाच…
हल्ली तो उशीरा बऱ्याचवेळा शेवटच्या बैलगाडीतून
त्या लखलखीत जंगलातून, कसाबसा,
पण खुराड्याची आठवण होऊनच परततो…
त्या दर रात्री त्याला एक स्वप्नं पडतं
ते आख्खं जंगल कोपरा न् कोपरा हिंडून
बोचकी देवाण घेवाण करून
समाधानी झाल्याचं
तृप्तं झाल्याचं
मन:शांती मिळवल्याचं…
सकाळी उठल्यावर लक्षात येतं
अरे, आपण बोचकं खांद्यावर घेऊनच झोपलोय!
खांद्याकडे हात गेल्यावर कळतं
खरोखरंच तो आता शरीराचाच एक अवयव झालाय
एक सुबक कुबड_
एका भटक्या विमुक्त जमातीची निशाणी
किंवा रखरखीत वाळवंटात जगणाऱ्या त्याच्या एका प्राणीमित्राची आठवण…
No comments:
Post a Comment