खूप दिवसांपासून या सिनेमाबद्दल लिहायचं राहूनच जातंय.” द सिरियन ब्राईड” हा इस्त्रायली सिनेमा २००५ सालच्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमधे दाखवला गेला आणि आजतागायत डोक्यातून गेलाच नाही.दिग्दर्शन: इरान रिकलिस.२००४ साल हे त्याचं प्रदर्शन वर्षं.
ड्रुझ जमातीतल्या मोना या मुलीचा विवाह ठरलाय आणि तिला ती रहात असलेल्या गोलन टेकड्यांच्या परिसरात तिची बहिण पूर्वतयारीसाठी ब्युटीपार्लरमधे घेऊन जातेय या दृष्याने चित्रपटाची सुरवात होते.गोलन टेकड्यांच्या चढणीवरून त्या जात असताना पार्श्वभूमीवर लांबवर खूप खालच्या भागात असलेला हमरस्ता दिसतोय. गोलन टेकड्यांचा भाग आता इस्त्रायली अंमलाखाली आहे आणि तिथल्या मोनाचं लग्नं सिरियामधल्या एका प्रथितयश अभिनेत्याशी ठरलं आहे.ईस्त्रायल आणि सिरिया या देशांमधल्या घमासानीनंतर या दोन्ही देशांच्यामधे युनो कर्मचाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेला सैनिकी प्रदेश तयार करण्यात आलाय.विशेष कारणांसाठीच सीमारेषेचा पार करण्याची परवानगी दोन्ही देशांकडून मिळू शकते.मोनाला ६ महिने लागले आहेत ईस्त्रायली सरकारकडून गोलन टेकड्यांचा परिसर सोडायची परवानगी मिळवायला.एकदा तिने हद्द ओलांडली की तिला परतण्याची, आपल्या कुंटुंबाला भेट देण्याची संधी कदचित आयुष्यात मिळणार नाही आणि त्यामुळे ती विचारात पडलीय.दुसरीकडे तिला आपल्या होणाऱ्या नवऱ्याला जाणून घेण्याची संधीच मिळालेली नाही.अश्या मोठ्या तिढ्याने दिग्दर्शक सिनेमाला सुरवात करतो आणि एकापाठोपाठ एक अत्यंत उत्तम व्यक्तिरेखा सादर करू लागतो.
मोनाचे वडील सिरियाशी जुळवून घेणं या मताचे खंदे पुरस्कर्ते म्हणून नुकतेच इस्त्रायली तुरूंगात जाऊन जामीनावर बाहेर आलेत.त्यांच्या एका मुलाने जमातीविरूध्द जाऊन एका रशियन डॉक्टरशी लग्न केलंय तो बहिणीच्या लग्नासाठी येऊ घातलाय.त्याच्या येण्याबद्दल वडलांना गावातून इशारा मिळालाय.मोनाची बहिण एक अयशस्वी विवाहबंधनात असलेली मोठ्या दोन मुलींची आई आहे.या तिघींना त्या ट्राऊझर्स घालतात म्हणून मुक्त स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या समजलं जातं.ही बहिण समाजसेविका म्हणून प्रशिक्षण घेण्याच्या तयारीत आहे.तिच्या नवऱ्याचा परंपरागत व्यवसाय आहे खाटिकाचा.मोठ्या मुलीला इस्त्रायलभिमुख विचारसरणी असलेल्या घरातल्या मुलाशी लग्नं करायचं आहे आणि आईला असं वाटतं की तिनं अजून शिकावं जे आईला करायला मिळालं नाही.बापाला परंपरागत पुरूषी समाजव्यवस्थेतला कुटुंबप्रमुख म्हणून या सगळ्या प्रकाराने द्विधा मनस्थितीत टाकलंय.याच कुटुंबातला, नववधूचा आणखी एक भाऊ इटलीत व्यवसाय करतो आणि तो स्वच्छंदी आहे पण त्याच्या जीवनशैलीला समाज हरकत घेत नाही आणि त्याचवेळी रशियन महिला डॉक्टरशी लग्न केलेल्या त्याच्या भावाला मात्र समाज वाळीत टाकतो…
असा भला मोठा आणि तेवढाच गुंतागुंतीचा पट घेऊन दिग्दर्शक आपल्याला पुढे नेतो.आपण सहज या प्रवाहात सामील होतो.कुठेही आपल्याकडच्या अनेक कॅरेक्टर्स असलेल्या मालिकांप्रमाणे नीरसता तर येत नाहीच!
लग्नाच्या जेवणावळींनंतर वधूला इस्त्रायल-सिरिया सीमारेषेवर आणलं गेलंय आणि इथेच तिच्या पलिकडे जाण्यात विघ्नं येऊ लागतात.दोन्ही देशांमधल्या सरकारी कारवायांचा समर्पक आणि अपूर्व असा हा भाग दिग्दर्शकानं इथे साकारलाय.कुठलीही हाणामारी नसताना आपण श्वास रोखून हया नाट्याचे साक्षीदार होऊ लागतो.इस्त्रायली सरकारनं गोलन टेकड्यांवरच्या रहिवाश्यांच्या पासपोर्टवर ते इस्त्रायल सोडून जात आहेत असा शिक्का मारण्याच्या निर्णय नुकताच घेतला आहे तर सिरियन सरकार गोलन टेकड्यांना सिरियाचा परदेशव्याप्त परिसर मानते आहे.इस्त्रायल सरकारचा शिक्का असलेल्या पारपत्रांना सिरिया सरकार इस्त्रायलच्या सिरियाविरोधी हालचाली मानते आणि अश्या इमिग्रंट्सना प्रवेश नाकारते आहे!...
सरतेशेवटी इस्त्रायली अधिकारी करेक्शन फ्लुईडने आपला शिक्का पुसायला तयार होईपर्यंत युनोचा लायझन ऑफिसर मागेपुढे करत रहातो (दोघंही शेवटी माणसेच!) आणि आता हा प्रश्नं शांततामय मार्गाने सुटू पहातोय तर सीमारेषेवर एक वेगळंच उत्स्फूर्त नाट्य घडतंय!
नववधू आणि तिच्या संपर्कात असलेली तिची स्पष्टं विचारांची मोठी बहिण यांच्यातल्या विचारमंथनानंतर नववधू सगळी सूत्रं आपल्या हातात घेऊन काही पावलांचंच असलेलं सीमारेषेपलिकडचं ते अंतर ठामपणे चालत जाऊन पार करते.त्याचवेळी तिची मोठी बहिण सगळ्या समूहापासून दूर चालत निघते निश्चयाने, मनातली स्वप्नं साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या अदृष्य भिंती तोडून टाकण्याच्या निश्चयाने!...या शेवटच्या दृष्यात विशेषत: मोठ्या बहिणीचे क्लोजअप्स आणि तिच्या समूहपासून दूर जाण्याचा प्रवास दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या माध्यमातून इतक्या प्रभावीपणे दाखवतो की आपण त्याला सलाम करतो! नि:शब्द दृश्य परिणामकारक करण्याचं हे अफलातून कसब.हा सिनेमा वैश्विक आशय असलेला आहेच.राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि मानवी स्वभाव असं सगळं स्वच्छं आणि अत्यंत परिणामकारकतेनं आपल्यासमोर उभं रहातं.हे करणं खूप कठीण आहे.उत्तम व्यक्तिरेखा, तितकाच अप्रतिम अभिनय, गुंतागुंतीच्या पटात सगळ्याचं कडबोळं न होऊ देणं, सतत उत्कंठावर्धकता टिकवणं-अर्थात पटकथेची उत्तम वीण(लेखन:सुहा अराफ, इरान रिकलीस)-जे चित्रपटाचं मुख्य अंग हे हा चित्रपट आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतो.उत्तम सिनेमाची अपेक्षा असलेल्यांना आणखी काय पाहिजे?
1 comment:
या सिनेमाची डीव्हीडी वगैरे कुठे उपलब्ध होईल का?
Post a Comment